‘तत्त्वज्ञ राजा’ हे प्लेटोचे स्वप्न होते. अर्थात त्यात त्याला समाजाच्या गरजा समजून सामाजिक अभियांत्रिकी अमलात आणणारा राज्यकर्ता अपेक्षित होता. एम. व्ही. कामत यांनी लिहिलेले बाळ गंगाधर खेर यांचे चरित्र वाचताना आणि त्यांचे समाजकारण समजून घेताना प्लेटोच्या या स्वप्नाची आठवण येते.
गांधीयुगात महाराष्ट्र ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ या वर्णनातच अडकला. अनेक बिनीच्या लोकांनी त्यातच समाधान मानले किंवा परिस्थितीवश स्वीकारले. त्या बिनीच्या लोकांमध्ये खेर यांचे व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे व अपवादात्मक आहे. बाळासाहेब खेर यांचे महाराष्ट्राच्या समाजकारणातील अनेक क्षेत्रांत योगदान आहे. त्यात प्रामुख्याने शिक्षण, प्रशासन आणि कायद्यातील सुधारणा यांचा उल्लेख आवर्जून करावा असा आहे.
राजकीय पद ही त्यांची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. नि:स्पृहतेमुळे त्यांच्यासाठी पद हे नेहमीच साधनस्वरूप राहिले. नियतीने जणू त्यांची त्या पदांसाठी निवड केली होती. ते बहुमताने दोनदा निवडून आले. आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाने त्यांनी त्या पदांची उंची वाढवली. त्यांची विविध पदी झालेली निवड ही जणू भारतीय लोकशाहीची ओळख सांगता यावी, इतका मानदंड त्यांनी आपल्या कारभाराने या काळात निर्माण केला.
१९२२ साली बाळासाहेब खेर यांची राजकीय कारकीर्द नागरी असहकार चळवळीतील सहभागाने सुरू झाली. त्यानंतर सविनय कायदेभंग आणि ‘भारत छोडो’ या आंदोलनातील कारावास आणि दरम्यानच्या काळातील समाजकार्य यांची दखल काँग्रेसने घेतली. त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाची छाप गांधीजींपासून साऱ्याच नेत्यांवर पडली होती. म्हणूनच वसाहतीचे स्वराज्य जेव्हा विचाराधीन होते, तेव्हा त्याच्या नेतृत्वाकरता बाळासाहेब खेर यांचे नाव एकमताने पुढे आले. यातील विशेष असा की, त्याकाळी मुंबई राज्यात आजच्या कर्नाटक आणि गुजरातमधील मोठा प्रदेश समाविष्ट होता आणि राज्यात कानडी आणि गुजराती या इंग्रजीसोबत मराठीच्या सहभाषा होत्या. त्या भाषिकांचा तसेच त्यांच्या नेतृत्वाचा खेर यांना पािठबा होता. कारण खेर यांचे राजकारण आणि समाजकारण भाषा आणि प्रांतवादापलीकडील होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना या भूमिकेचा त्रास झाला तरी ते आपल्या विचारांशी ठाम राहिले. गांधीहत्या आणि फाळणीच्या राजकारणामुळे काँग्रेसी राजकारण पोळले होते. त्यात भाषिक तेढ निर्माण होण्याचा धोका टाळून संभाव्य भाषिक संघर्ष टाळावेत, ही त्यामागील भूमिका होती. तो काळ खेर यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनातील उतरणीचा होता. बदलत्या राजकारणातील विसंवादामुळे त्यांची भूमिका ही निवृत्तीची होती. सत्ता आणि पदे याबाबतीत ते अनासक्त होते. पदे त्यांच्याकडे चालून आली ती त्यांच्या योग्यतेमुळे आणि अभ्यासू वृत्तीमुळे. इंग्लंडमधील राजदूत म्हणून झालेली त्यांची निवड हीही अशीच एक. आणि त्यानंतर भाषिक आयोगाचे अध्यक्षपद तर केवळ सामाजिक कार्य आणि अभ्यासाचा विषय या जबाबदारीने त्यांनी सांभाळले.
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास समजून घेताना या चरित्राचे वाचन कालगत संदर्भ म्हणून आवश्यक ठरते. ते त्यांच्या जन्माच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत प्रकाशित झाले, हे विशेष. ब्रिटिश राजवटीत प्रशासनासाठी प्रांतपद्धत होती. एकूण आठ मोठे प्रांत आणि पाच लहान प्रांत होते. त्यावेळी मुंबई प्रांत आकाराने चौथ्या क्रमांकावर होता. वसाहतीचे स्वराज्य मिळाले आणि १९३७ मध्ये मुंबई राज्य झाले. त्या मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री बनण्याचा मान बहुमताने बाळासाहेब खेर यांना मिळाला. या मुंबई राज्यात कर्नाटक आणि गुजरातचा बराचसा भाग समाविष्ट होता. त्या सर्वाचा विश्वास आणि आदर खेर यांनी कमावला होता.
हे चरित्र ज्येष्ठ पत्रकार एम. व्ही. कामत यांनी खेर यांच्या जन्मशताब्दी वर्षांत इंग्रजीतून लिहिले आहे. मराठीत खेर यांच्यावर एकही चरित्रग्रंथ नाही. चालू वर्ष हे खेर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मतिथी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून प्रा. गिरीश जोशी यांनी ते मराठीत आणले आहे. खरे तर ते यापूर्वीच यावयास हवे होते. आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचणारांच्या मांदियाळीत खेर यांचे स्थान महत्त्वाचे असून, ते त्या अर्थी उपेक्षितच राहिले असे म्हणावे लागते. राजकारण हे जेव्हा समाजकारणाला प्राधान्य देत असे, त्या काळातील सुशिक्षित, विचारवंत आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ज्या निवडक व्यक्ती समाजकारणात होत्या, त्यात खेर यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सध्याची बांद्रा पूर्वेला असलेली खेरवाडी हे त्यांचे कृतिशील स्मारक म्हणता येईल. ती वाडी पूर्वी ‘चमडेवालाकी वाडी’ म्हणून ओळखली जाई. राजस्थानी िहदू खाटिकांची ही वस्ती होती. खेर यांनी त्यांच्यासाठी तेथे खूप सामाजिक कार्य केले. त्याची कृतज्ञता म्हणून या वस्तीला ‘खेरवाडी’ हे नाव पडले. त्याचा सविस्तर तपशील या चरित्रात दिलेला आहे.
त्यांच्या स्वभावातील नि:स्पृहता, सभ्यता, हजरजबाबीपणा आणि नर्मविनोदी स्वभाव गांधी-जीनांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वानी वाखाणला होता. लोकांना आपलेसे करण्यासाठी अंगभूत सचोटी आणि विनम्रता त्यांच्या कामी येई. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही त्यांची विद्वत्ता आणि सभ्यता जाणून त्यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध राखले होते.
खेर हे नेहरू-आंबेडकर यांचे समकालीन. मध्यमवर्गात जन्माला येऊनही आणि आजूबाजूला उत्तुंग व्यक्तिमत्त्वे असताना खेर यांनी स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राखले ते केवळ वैचारिक पातळीमुळेच! विचाराने, आचाराने आणि कृतीने ते संपूर्णपणे राष्ट्रीय नेते होते. प्रांतीयवादाच्या ते ठाम विरोधात होते. त्यासाठी प्रसंगी त्यांना कटुता सहन करावी लागली.
खेर दोनदा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले. पहिला कालखंड ब्रिटिश राजवटीतील होता, तर दुसरा स्वतंत्र भारतातील. पहिला आदर्शवादी, तर दुसरा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतातील फाळणी आणि प्रांतवादाच्या प्रश्नांमुळे वास्तववादी ठरला. त्यात खेर यांचे व्यक्तित्व कसाला लागलेले दिसते.
१९२२ ते १९५४ हा सक्रिय राजकारण आणि समाजकारणातील त्यांचा कर्तृत्वकाळ! या काळातील मुंबई प्रांतातील सर्वच राजकीय आणि सामाजिक चळवळींत त्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग राहिला. ही सारी क्षेत्रे विभिन्न असली तरी त्यामागील सामाजिक उन्नतीचा धागा समान होता.
मुंबई जेव्हा प्रांत किंवा राज्य म्हणून ब्रिटिश राजवटीत ओळखली जायची, त्या काळातील तिचे पहिले मुख्यमंत्री ही त्यांची मुख्य ओळख. पण त्यापलीकडे खेर माणूस म्हणून मोठे होते आणि नेते म्हणून द्रष्टे होते. याचे दाखले हे चरित्र वाचत असताना मिळतात. आधुनिक भारताच्या संसदीय लोकशाही बांधणीतील खेर यांचे योगदान या चरित्रामुळे समोर येते.
एकूण १३ प्रकरणांत हे चरित्र मांडलेले आहे. चरित्राचे शेवटचे प्रकरण वाचताना अनुवादकावरील वेळेचे दडपण स्पष्टपणे जाणवते. काही तांत्रिक गोष्टी संपादकीय संस्कारांतून वा फेरवाचनातून सांभाळता आल्या असत्या असे वाटते. त्यातील मुख्य म्हणजे तळटिपांची मांडणी. दुसरे म्हणजे शीर्षक पानाच्या मागील चार ओळींची नोंद. त्यात हा मूळ चरित्रातील निवडक आणि संपादित भागाचा अनुवाद असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अनेक गोष्टींबाबत कुतूहल जागे होऊनही त्याच्या पूर्ततेची अपेक्षा करता येत नाही. त्यासाठी मूळ चरित्राकडे वळणे आवश्यक ठरते. वस्तुत: राजकीय व्यक्तींची चरित्रे ही त्या काळाची, समाजकारणाची आणि नेतृत्वाची चरित्रे असतात. त्यात अनेक संदर्भ आणि अपरिहार्यता पुन्हा नव्याने तपासून घेता येतात. त्यादृष्टीने हा दस्तावेज मोलाचा असतो. त्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे.
पुस्तकातील चरित्रनायकाची आणि मूळ चरित्रकाराची ओळख करून देणाऱ्या जाणकार व्यक्तीची प्रस्तावना या पुस्तकास हवी होती असे वाटले. कारण खेर यांचा कृतिशील काळ, त्यांचे योगदान आणि आजची पिढी यात महदंतर पडले आहे. यामधील काळाचा संदर्भ जोडणारी, आजच्या काळाच्या कसोटीवर ते तपासून पाहणारी आणि चरित्रवाचनासाठी आवश्यक ती पूर्वपीठिका मांडणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना ही या चरित्राची गरज होती.
खेर यांचे सारे समाजकारण आणि राजकारण हे कायम समग्रलक्ष्यी राहिले. त्यात राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारीचे भान असे. इतिहास आणि भविष्याचा संदर्भ लक्षात घेतलेला असे. त्यामुळे साहजिकच त्यात एक द्रष्टेपण दिसून येते. त्यांचे सारे कार्य संस्थात्मक पातळीवरील आहे. त्यांचा विचार उद्याच्या राष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रासाठी होता. त्यांचे कार्य, उपक्रम आणि महनीय व्यक्तींचे संबंध यामागील वैचारिक सख्य आणि तळमळ पाहताना हेच अधोरेखित होते.
खेर यांच्या काही कार्याचा पुस्तकातील ओझरता उल्लेख म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले त्यांचे वैचारिक स्नेहसंबंध, त्यांच्यासह काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी सत्याग्रहातील सहभाग, विनामूल्य कायदेविषयक सल्ले देणाऱ्या बॉम्बे लीगल एड सोसायटीचे संस्थापक सचिव, भारतातील पहिल्या कायदेविषयक शोधनिबंधपत्रिकेचे संस्थापक-संपादक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेचे उपाध्यक्ष, श्रद्धानंद महिलाश्रम या संस्थेचे अध्यक्ष, बाडरेली सत्याग्रह समितीचे सचिव, वांद्रे येथील राजस्थानी खाटीक समाजाच्या चमडेवालाकी वाडी संस्थेचे संस्थापक -सचिव, तीनदा राजकीय चळवळीतील सहभागामुळे कारावास, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, हरिजन सेवक संघाच्या महाराष्ट्र समितीचे, ठाणे येथील आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू, रत्नागिरी येथील राहते घर आणि शेतजमीन सर्वोदय छात्रालयास देणगी, अंबरनाथ येथील घर आणि आमराई नìसग होमसाठी देणगी, बोरीवली येथील कोरा ग्रामोद्योग केंद्राचे संस्थापक-अध्यक्ष, मनोरुग्णांसाठीच्या संशोधन संस्थेचे संस्थापक सदस्य, पुणे, बडोदा आणि धारवाड विद्यापीठांची स्थापना आणि एसएनडीटी विद्यापीठाला त्यांच्या कारकीर्दीत मान्यता, भारताचे इंग्लंडमधील राजदूत, भाषा आयोगाचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय अपेयपानविरोधी आयोगाच्या दक्षिण-पूर्व शाखेची स्थापना आणि अध्यक्ष.. हे सारे त्यांचे व्यापक व्यक्तित्व दाखवून जाते. खेर यांचे हे कार्य पाहता त्यांची भाषणे आणि लेख एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावीत असे वाटते. त्यातून त्यांच्या कार्याचे चित्र अधिक स्पष्ट होईल. अशी अपेक्षा निर्माण होणे, हेच या अनुवादित पुस्तकाचे यश आहे.
‘बाळासाहेब खेर : एक सज्जन मुख्यमंत्री’- एम. व्ही. कामत, अनुवाद- प्रा. गिरीश जोशी, प्रकाशक- इंडस सोर्स बुक्स, मुंबई, पृष्ठे- २२२, मूल्य- २२५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा