द. मा. मिरासदारांनी आपल्या विनोदी कथाकथनातून जवळपास तीन पिढय़ांना मनमुराद हसवलं आहे. त्यांच्या ग्रामीण बाजाच्या विनोदी कथांचा एक स्वतंत्र वाचकवर्ग आहे. सहज-सोपी भाषा, छोटे छोटे प्रसंग, ग्रामीण शैलीतील ठसकेबाज संवाद आणि त्यातून फुलत गेलेल्या त्यांच्या कथा सर्व स्तरांतील वाचकांना आवडतात. कथनाची शैली असल्यामुळे या कथा वाचकांच्या डोळ्यांपुढे दृश्यरूपात उभ्या राहतात. अलीकडेच आलेली त्यांची ‘भोकरवाडीतील रसवंतिगृह’ आणि ‘गप्पागोष्टी’ ही दोन पुस्तकं त्याची प्रचीती देतात.

‘भोकरवाडीतील रसवंतिगृह’मध्ये १९ कथा आहेत. १९७९ ते २००४पर्यंतच्या या कथा आहेत. त्यातील सहा कथा ‘भोकरवाडी’च्या आहेत. नाना चेंगट, गणामास्तर, बाबू पैलवान, रामा थोरात वगैरे इरसाल पात्रं या कथांत आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र स्वभाव, त्यांची संवादाची निरनिराळी ढब यामुळे या कथांतील प्रत्येक पात्राचं स्वतंत्र अस्तित्व आहे. संग्रहातील ‘भोकरवाडीतील रसवंतिगृह’ या पहिल्याच कथेत गावाचं पुढारपण करणारी ही कंपनी गावात व्यायामशाळा काढायचं ठरवते. मात्र व्यायामशाळेसाठी पुरेसा निधी नसल्याने रसवंतिगृह चालवायचं आणि त्यातून येणाऱ्या पैशात व्यायामशाळा काढायची असा उदात्त विचार एकजण मांडतो. ही कल्पना प्रत्यक्षात आणत असताना या कंपनीची होणारी धडपड, फजिती आणि त्यावर प्रत्येकाची मल्लिनाथी वाचकांना हसवून सोडते. हीच पात्रं ‘न झालेला भूकंप’मध्ये भूकंप होणार असल्याच्या अफवेने अस्वस्थ होतात. नाना चेंगटाने ही बातमी तालुक्यातून आणलेली असते. गावात घबराट सुटते. भूकंप झालाच तर जास्त झळ पोहोचू नये म्हणून प्रत्येक जण त्यावर उपाय शोधत असतो, चर्चा करत असतो. भूकंप तर होत नाहीच, मात्र यानिमित्ताने विमा कंपनीची माणसं गावात येतात. हा सगळा बनाव द.मां.नी मस्त मांडला आहे. ‘भोकरवाडीतील समाजसेवा’त दुष्काळात पाण्याचं असलेलं दुर्भिक्ष आणि त्याच्या नियोजनासाठी पुढे सरसावलेली ही कंपनी, त्यासाठी लढवली जाणारी शक्कल याची गोष्ट सुरेख फुलवली आहे. ‘वशीकरणाचे अत्तर’, ‘भोकरवाडीतील चमत्कार’, ‘भोकरवाडीत बिबटय़ा’ या कथांतूनही या कंपनीच्या बैठका, गावासाठी काहीतरी करण्याची सततची धडपड, त्यातून त्यांची होणारी फजिती दिसत राहते. भोकरवाडीच्या या कथांत नाना चेंगटासाठी नाजूक असलेलं ‘अनशी’ हे पात्रही अधूनमधून डोकावत असतं. बाई आणि तिच्याभोवतीचा बाप्पेलोकांचा लोचटपणा यानिमित्ताने कथांत येतो; पण तो मर्यादेच्या पुढे जात नाही.

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Nayanthara News
“फक्त तीन सेकंदांच्या व्हिडीओसाठी…”, धनुषने कायदेशीर नोटीस पाठविल्याने नयनतारा भडकली; म्हणाली, “तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती…”
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत

‘नांगरट’ ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील एका स्वातंत्र्यसैनिकाच्या धूर्तपणाची आहे. सक्तमजुरीची शिक्षा भोगत असलेल्या जयंतरावांना- पेरणीचे दिवस आलेत, आपण तुरुंगात आहोत, बायकोचा तिकडे कसा निभाव लागेल, असा प्रश्न पडतो. ते मग क्ऌप्ती लढवतात आणि त्यात यशस्वी होतात. मानवी स्वभाव, परिस्थिती आणि त्याच्या आकलनातून आपल्यासमोर उभारलेल्या संकटावर जयंतराव कशी मात करतात, याचा किस्सा विनोदाच्या अंगाने सांगताना द.मा. वाचकाला खिळवून ठेवतात. धक्कातंत्राची द.मां.ची निराळी खासीयत आहे.

‘दामूची गोष्ट’, ‘एका मित्राचे लग्न’ या कथाही छोटय़ा छोटय़ा विनोदी प्रसंगांतून फुलवलेल्या मजेदार कथा आहेत.

‘एका सदोबाची चित्तरकथा’ ही एक अप्रतिम कथा या संग्रहात आहे. दिलदार स्वभावाच्या सदोबाचं पुस्तकाचं दुकान आहे. कथानायकासाठी त्याचं दुकान खुलं आहे. त्याचाही सदोबावर जीव आहे. पुस्तकाचं दुकान चालवणाऱ्या सदोबाचे पुढे कसे हाल झाले, त्याचं दुकान कसं हळूहळू बसत गेलं, पुढे चालून त्याला पुजाऱ्याचं, त्याहीनंतर वाढप्याचं काम कसं करावं लागलं हे सांगतानाच त्या पुस्तकाच्या दुकानाच्या जागेवर आता कापडाचं झगमगीत दुकान कसं उभं राहिलंय याची माहितीही कथानायक देतो. सदोबाची ही कथा वाचकाला अस्वस्थ करते.

या संग्रहातील कथा १९७९ ते २००४ या काळात लिहिल्या गेल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा कालावधीतल्या कथा आणि संग्रहाची पहिलीच आवृत्ती हे कोडे मात्र सुटत नाही. पुस्तकात भोकरवाडीच्या कथांव्यतिरिक्तही काही कथा आहेत; पण ही भोकरवाडी पुन्हा ‘गप्पागोष्टी’ या संग्रहातही डोकावते. ‘गप्पागोष्टी’चीही पहिलीच आवृत्ती असल्याचा उल्लेख आहे. शिवाय ‘भोकरवाडीच्या गोष्टी’ असं आणखीही एक द.मां.चं पुस्तक आहे. मग मुद्दामच भोकरवाडी इतर पुस्तकातही घेतली आहे, की वगळलेल्या कथा पुन्हा समाविष्ट केल्या आहेत ते कळत नाही.

‘गप्पागोष्टी’तील ‘मदत’ ही भोकरवाडीचीच कथा. पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्यात जलप्रलय झाला. त्याच्या बातम्या ऐकून भोकरवाडीतील कंपनी त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावते. त्याची ही विनोदी कथा. प्रत्येक जण आपआपल्या स्वभावानुसार गावातून मदत गोळा करायला जातो आणि गावकऱ्यांचा त्याला कसा प्रतिसाद मिळतो, त्यातील गमतीजमती या कथेत वाचायला मिळतात.

‘माझा कै. वृत्तपत्र व्यवसाय’ ही कथा पत्रकारितेवरची. द.मां.नी काही र्वष पत्रकारिता केली, त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नव्याने पत्रकारितेत येणाऱ्याला वाटत असलेलं ग्लॅमर, प्रत्यक्षात करावं लागणारं काम आणि त्याचं आकलन, वेळोवेळी गुदरणारे बाके प्रसंग आणि त्यातून होणारी कथानायकाची फजिती याचं द.मां.नी सुरेख वर्णन केलं आहे. ‘ड्राइंग मास्तरांचा क्लास’ तर अप्रतिमच. ड्राइंग मास्तरांची इतिहास शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांनी त्यांची घेतलेली फिरकी वाचकांना खदखदून हसायला लावते. ‘खेडय़ातील एक दिवस’ ही उपरोधिक कथा वाचकाला अंतर्मुख करणारी आहे. एका उच्चभ्रू कुटुंबातील मुलीला ‘खेडय़ातील एका दिवसा’वर निबंध लिहायचा असतो. त्यानिमित्ताने खेडं या विषयावर तिच्या मम्मी-पप्पांची चर्चा होते आणि एक निराळंच खेडं वाचकाच्या मनातही रूप घेऊ लागतं. तपशिलातले काही संदर्भ वगळल्यास ही कथा आजही शहरी वर्गाला लागू पडते. ‘एका वर्गातील पाठ’मधल्या भिकू मुंगळेंचा किस्साही आजच्या शिक्षण व्यवस्थेला चपखल बसतो. ‘एक सदाशिवराव आणि त्यांची बायको’त ‘हलकासा सूड’ उगवण्याची हतबल माणसाची तऱ्हा यात बघायला मिळते. ‘गणपत पाटील’ या गावच्या पाटलाचा किस्सा मानवी स्वभाव, त्याचा अहं आणि इरसालपणा व्यक्त करतो. ‘मदिराभक्तांचे संमेलन’, ‘अशीही एक शाळातपासणी’ या मनोरंजन करणाऱ्या कथा आहेत, तर ‘निकाल’ही एका खेडुताच्या अक्कलहुशारीची कथा. ‘काकांची गंभीर गोष्ट’ ही कथा, एखाद्या गंभीर घटनेचा किस्सा विनोदी अंगाने सांगण्याच्या द.मां.च्या ताकदीची प्रचीती देते. अंत्यसंस्काराची ही गोष्ट वाचकाला खदखदून हसायला लावते. गंभीर काका वारतात. त्यांचे शेजारी त्यांचा मृतदेह आणायला इस्पितळात जातात. चुकीने दुसराच मृतदेह मिळतो, तो बदलण्यासाठी पुन्हा धावपळ होते, अशी ही कथा. मात्र त्यानिमित्ताने शेजाऱ्यांत जी चर्चा होते, त्यातून मृत पावलेले काका गंभीरच आपल्यासमोर उभे राहतात. इस्पितळातून मृतदेह मिळायला उशीर होतो तेव्हा त्यांचा एक शेजारी काकांचा शिस्तीशीर स्वभाव सांगताना म्हणतो, ‘आता काका गेलेत म्हणून ठीक. नाही तर आपला मुडदा मिळायला इतका उशीर लागला, हे कळलं असतं तर असा ओरडला असता-’

‘माझ्या विनोदाची उलटतपासणी’ हा लेख मात्र कथा म्हणून या पुस्तकात का घेतला ते समजत नाही. आपण कथालेखक, त्यातल्या त्यात ग्रामीण आणि विनोदी लेखक कसे झालो, याबद्दल द.मां.नी विस्ताराने या लेखात सांगितलं आहे. खरं तर प्रस्तावना, मनोगत यात मोडणारा हा लेख. त्याची जागा चुकल्यासारखी वाटते. आपल्या विनोदाची बलस्थानं, कथांतील पात्रे, कथांसाठी मिळणारे विषय, सुचलेली शीर्षकं याबद्दल द.मां.नी या लेखात सांगितलं आहे. आपण रंजन म्हणूनच कथा लिहिल्याचं आणि वाङ्मयाचा मूलभूत हेतू ‘रंजन’ हाच आपण मानतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

खेडय़ातली इरसाल आणि बेरकी माणसं, त्यांचे आणि त्यांच्या आसपास घडणारे किस्से हे थेट संवादातून सांगण्याची द.मां.ची खास हातोटी आहे. त्यांचा विनोद निखळ असतो, तो कधी खऊट होत नाही. कुणाच्या जिव्हारी घाव करीत नाही. त्यामुळे ग्रामीण बाजाच्या या कथा सर्वसामान्य वाचकांना भुरळ घालतात. या दोन्ही संग्रहातील काही कथा या मैलाच्या दगड आहेत तशा काही कथांतील विनोद मात्र शिळा वाटण्याची शक्यता आहे. द.मां.नी ग्रामीण विनोदाची वाट मराठीत आणली; पण आता ती वाट अपवाद वगळता मराठी सिनेमा आणि तद्दन विनोदाने मळवून टाकली आहे. द.मां.च्या स्टाइलचा विनोद नंतर अनेकांनी वापरून पाहिला. कदाचित त्यामुळेही तो जुना वाटत असावा. पण त्यांनी ज्या काळात तो लिहिला तेव्हा ‘ओरिजनल’ आणि ताजातवाना असणार. आणि म्हणूनच दोन्ही संग्रहावरील ‘प्रथमावृत्ती’ कोडेच वाटते. मराठी विनोदात द.मां.चं मोठं नाव आहे. त्यामुळे पुस्तकांचं नियोजन व्यवस्थित व्हायला हवं होतं असं वाटतं.      

भोकरवाडीतील रसवंतीगृह – द. मा. मिरासदार,

पृष्ठे – १४८, मूल्य – १५० रुपये.

गप्पागोष्टी – द. मा. मिरासदार,

पृष्ठे – १४८,  मूल्य – १५० रुपये.

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

धनंजय चिंचोलीकर