‘बॉर्न इन द गारबेज’ हा प्रा. सावन धर्मपुरीवार यांचा नऊ मर्मभेदी कथांचा  संग्रह आकाराने लहान असला, तरी आशय व अभिव्यक्तीची उंची गाठणारा आहे.
प्रा. धर्मपुरीवारांचा हा पहिलाच कथासंग्रह. प्रस्तावनेत आशा बगे यांनी म्हटल्याप्रमाणे १९९९ ते २०१० अशा २१व्या शतकातील नव्या दशकाची मोहर या कथांवर पडली आहे, हे अगदी खरेच आहे. सावन यांच्या कथांमधून एक वेगळी जाणीव व्यक्त होत जाते. ती म्हणजे मानवी जीवनातील एकटेपण व एकाकीपणाची ही होय. २१व्या शतकात ही जाणीव विलक्षण वेगाने मानवी जीवनाला पोखरत आहे. जग जवळ आलंय परंतु माणूस माणसापासून दूर जातोय. संवेदनाशून्य माणसांचे सांगाडे अवतीभवती फिरताना दिसतात. नातेसंबंधांची सर्वत्र वाताहत होताना दिसतेय. रक्तसंबंधांतला भरवसा नष्ट झालेला दिसतो. संस्कार, नीतिमूल्य, आचार, विचार यांची सर्वत्र गळचेपी होताना दिसते. जगण्यातले सर्व संदर्भ बदललेले दिसतात. एक अक्राळ-विक्राळ स्वरूप नातेसंबंधांमध्ये आलेले दिसते. माणुसकीचे सर्वत्र अवमूल्यन झालेले दिसते. धर्मपुरीवारांच्या कथांमधून या सर्व गोष्टींचे चित्रण अत्यंत वास्तवपूर्ण पद्धतीने आलेले आहे. हे मानवी जीवनातील एकाकीपण कधी परिस्थितीजन्य स्वरूपामुळे येते, तर कधी व्यक्तिगत वृतिविशेषांमधून येण्याची संभावना असते. भौतिक जगण्यातील अनेक संदर्भ या कथांमध्ये जसेच्या तसे येतात. ज्या लोकांना धर्मपुरीवारांचं आयुष्य माहिती आहे, त्यांना या कथांमध्ये ओळखीच्या अनेक जागा, अनेक व्यक्ती दिसतील. पात्रांचे पोषाख वेगळे, बहिर्गत चरित्रं वेगळी असतानाही अनेक गोष्टी जाणवतात, कळतात.
‘बॉर्न इन द गारबेज’ हे या कथासंग्रहातील एका कथेचे शीर्षक. कथासंग्रहालाही लेखकाने हेच शीर्षक दिले आहे. ‘बॉर्न इन द गारबेज’ म्हणजे काय, तर ‘कचऱ्यातला जन्म’. या शब्दाला असणारा निराशावादी अर्थ लक्षात घेऊनही लेखक आशावाद संपूर्ण कथासंग्रहात जिवंत ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो. १९९० पासून भारतात जागतिकीकरणाची लाट निर्माण झाली. त्यातूनच भारत नावाचा देश जागतिक पातळीवर एका झगमगत्या स्वरूपात जगापुढे येऊ बघतो आहे. या वातावरणात माणूस सतत धावतो आहे, पळतो आहे. या धावण्या-पळण्याच्या खेळात त्याच्यातील संवेदना विखुरतात. या यांत्रिकीकरणाच्या सपाटय़ात त्याच्या संवेदनाच बोथट होऊ लागल्या आहे. ‘बॉर्न इन द गारबेज’ या कथेतून ‘आधुनिक’ जीवनजाणिवा आणि त्यातून निर्माण होणारे एकाकीपण, तुटलेपण, परात्मपण यासारखे प्रश्न अधोरेखित झालेले आहेत.
लैंगिकतेबद्दलचे अनुभवपूर्व कुतूहल तसेच प्रत्यक्ष अनुभवानंतरही सुखातील वैविध्याची, वैचित्र्याची असलेली ओढ, अनुभव, अपेक्षाभंग, समाजाचा लैंगिकतेकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन, नीती-अनीतीच्या मूल्यसंकल्पनांचे संदर्भव्यूह आसावरी आणि सारंगच्या जीवन जाणिवांतून व्यक्त होताना दिसून येतो. ‘बॉर्न इन द गारबेज’ या कथेतून जन्मजात संस्कार आणि सनातन वासना यांच्यातील संघर्ष व्यक्त झालेला आहे.
१९८० ते १९९० हे दशक ग्रामीण साहित्याच्या चळवळीचे एक महत्त्वपूर्ण दशक म्हणून ओळखले जाते. या चळवळीच्या माध्यमाने अनेक नवी लेखकमंडळी लिहिती झाली. यामुळेच ग्रामीण जीवन आणि जाणिवा साहित्यामधून मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्या. लेखकमंडळी ग्रामीण जीवनातील बदल आपल्या लेखणीने टिपू लागली. कथाकारांच्या कथांमधूनही सामाजिक, भौतिक वातावरण
अधिक प्रमाणात येऊ लागले. प्रा. धर्मपुरीवारांच्या ‘मेजवानी’, ‘सवारी’, ‘बायोग्राफी’ इत्यादी कथांमधून कृषीविषयक पर्यावरणाचे चित्रण येण्यापेक्षा या परिणामकारक वातावरणात घडलेल्या व्यक्तिमनाचा ठाव घेण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. बदलत्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणाने व्यक्तीच्या जीवनात झालेला मूल्यात्मक बदल अधोरेखित
केलेला आहे.
जागतिकीकरणामुळे ग्रामीण लोकांच्या जीवनात सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, भौतिक आणि औद्योगिक क्रांती घडून आली. बदलत्या खेडय़ातील माणसांनी आपल्या सोयीप्रमाणे आपल्या जीवनातही बदल करून घेतला. त्यातूनच जीवन जगण्याचे संदर्भ बदलत गेले. समाजभान हरपले
गेले. नातेसंबंधांची राखरांगोळी होत गेली. आत्मकेंद्रीपणा वाढत गेला. या सर्व गोष्टींचे अत्यंत वास्तवपूर्ण, जिवंत आणि ज्वलंत चित्र  धर्मपुरीवारांनी रेखाटले आहे. या कथा वाचत असताना ती पात्रे, घटना, प्रसंग, जसेच्या तसे आपल्या नजरेसमारे उभी राहतात. चित्रमय शैली है धर्मपुरीवारांच्या कथांचे वैशिष्टय़ आहे.
प्रा. धर्मपुरीवारांनी सामाजिक, भौतिक जीवनातील समस्या, प्रश्न आणि घडामोडींचे अत्यंत ज्वलंत, वास्तवपूर्ण चित्र रेखाटले. बेरोजगारांची व्यथा, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार, माणसामाणसातील हेवेदावे, स्त्री-पुरुष संबंध, स्त्रियांची मनोव्यथा, दोन पिढय़ांतील मूल्यसंघर्ष यासारखे विविध विषय त्यांनी आपल्या कथांमधून टिपले. जागतिकीकरणाच्या पसाऱ्यात सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल आलेत. या बदलांनी पारंपरिक संस्कृतीला धक्के देऊन विकृती निर्माण करण्याचे कार्य केले, ही जाणीव
करून देण्याचे काम हा कथासंग्रह काही प्रमाणात करतो. वाचकाला क्षणभर तरी विचार करायला भाग पाडणाऱ्या या कथा आहेत. आपल्याला केव्हा ना केव्हा या कथेतून व्यक्त झालेला अनुभव अनुभवल्याचा भास या कथा वाचताना होतो. म्हणजेच कथाकाराच्या कथेशी तादाम्य पावतो, हे या कथासंग्रहाचे वैशिष्टय़ आहे.
विलक्षण पात्रे व त्यांचे अनुभव साकारताना कथाकार मराठी भाषेसोबतच हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांचंही कलात्म उपयोजन करतो. त्याचप्रमाणे पात्रचित्रण, वातावरणनिर्मिती, पात्रांचे मनोदर्शन इत्यादींसाठी त्यांनी विविध उपमा-प्रतिमांचे उपयोजन केलेले दिसते. पात्रांच्या प्रकृतीनुसार ग्राम्यबोली व नागरभाषा यांचा धर्मपुरीवारांनी केलेला वापर नवकथेशी संबंध प्रस्थापित करणारा आहे. त्यांच्या प्रत्येक कथांमधील पात्रे जिवंत आणि रसरशीत वाटतात. आपल्या व्यथा-वेदनांची ती कहाणी सांगू पाहतात. असा अनुभव त्यांची पात्रे वाचकास देतात. आशय आणि अभिव्यक्तीच्या दालनातून हा कथासंग्रह संपन्न झालेला आहे.
‘बॉर्न इन द गारबेज’ – प्रा. सावन धर्मपुरीवार, विजय प्रकाशन, नागपूर,
पृष्ठे – १००, मूल्य – १०० रुपये.     
girishsapate@yahoo.in

opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Loksatta chaturang bhaybhyti Fear Fear Sound Bhutan Sikkim Tourism
‘भय’भूती : भीतिध्वनी
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल
Devdutt Pattanaik
गोव्यातील कॅथलिक स्वतःला अभिमानाने ब्राह्मण म्हणवतात; भारतीय नसलेल्या व्यक्तीला जातिव्यवस्था कशी समजावून सांगाल?
documentary , need of documentary,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: शोधण्यातील मजा…
the third eye of Indian art
तिसऱ्या डोळ्याने पाहिलेले स्वप्न…
Story img Loader