संशोधन हे केवळ विद्यापीठं आणि प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांची मक्तेदारी आहे, हा समज मोडीत काढून सर्वसामान्यांच्या विशेषत: शहरांतील युवावर्गाच्या हातात संशोधनाची सूत्रं सोपवावी आणि या संशोधनाचा उपयोग युवकांच्या आणि शहराच्या परिवर्तनासाठी व्हावा, यासाठी ‘पुकार’ ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. आजमितीस शेकडो युवा संशोधकांनी मुंबईतल्या
गेल्या काही वर्षांत बदलत्या समाजाचा मागोवा घेण्यात शासनव्यवस्था आणि राजकीय पक्षही अकार्यक्षम ठरत आहेत. चळवळी नावालाही उरल्या नाहीत तर स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या कामाची चौकट निश्चित केली आहे. त्यापलीकडे डोकावण्याची त्यांना उसंत नाही. अशा वेळी मुंबईसारख्या महानगरीत किती आणि काय काय बदलत आहे, याचा मागमूस कळणं केवळ अशक्यप्राय आहे. सर्वसामान्य व्यक्ती ही केवळ ज्ञानग्रहण नव्हे तर ज्ञाननिर्मिती करू शकते, हे या संशोधन प्रकल्पांमुळे स्पष्ट झालं. वंचित, उपेक्षित समाजातल्या तरुणांच्या हाती संशोधनाचं हत्यार दिलं की त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांचा अभ्यास अधिक पोटतिडीकीनं होईल आणि खरे प्रश्न समाजासमोर येतील, ही या संशोधन प्रकल्पांमागची ‘पुकार’ची भूमिका आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या लक्षवेधी अभ्यासाची सविस्तर माहिती या पुस्तकातील ‘नोंद मुंबईच्या स्पंदनांची’ या प्रकरणात आहे. काही संशोधन प्रकल्पांत असेही दिसून येते की, मुंबईच्या वंचित वस्त्यांमधील तरुणांनीच तिथल्या समस्यांचा अभ्यास केला आहे.
‘पुकार’मध्ये येणारे संशोधक गट हे सुरुवातीला महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षक यांचे होते. नंतर गरीब वस्तीतील शिक्षणाचा जेमतेम कनिष्ठ स्तर पार केलेले गटही यायला लागले. त्यामुळे या अभ्यास आणि संशोधनाच्या निमित्तानं महानगरीतील विविध स्तर एकत्र आल्याचा प्रा. पुष्पा भावे यांनी प्रस्तावनेत केलेला उल्लेख
सार्थच आहे. या संशोधन प्रकल्पात अंध मुलं-मुली, मुस्लिम मुली, कचरावेचक, गिरणगावातील मुले असे अनेक गट
सहभागी झाले. त्यांनी केवळ तिथल्या समस्या अभ्यासल्या
नाहीत तर त्या परिस्थितीत सुधार होण्याकरिताही प्रयत्न केला. हे संशोधन कुठल्याही विद्यापीठीय पुस्तकी संशोधनापेक्षा सरस ठरतं, ते यामुळे!
या महानगरीत नांदणाऱ्या जित्याजागत्या वस्त्यांचं जगणं या प्रकल्पांतून मांडलं जातं आणि जागतिकीकरण आणि शहरीकरणाच्या स्थित्यंतरातील या मुंबईचा एक वेगळा चेहरा आपल्यापुढे येतो. ‘नेबरहूड प्रोजेक्ट’नं ‘पुकार’च्या संशोधनाचा श्रीगणेशा झाला. याअंतर्गत गिरगावची खोताची वाडी, वरळी कोळीवाडा असे अनेक दस्तावेजीकरणाचे प्रकल्प राबवले गेले. त्यानंतर आपलं जगणं, आपली भाषा, आपल्या जेवणाखाण्याच्या पद्धती, भोवतालचा निसर्ग आणि कचरा हेदेखील निरीक्षणाचा, अभ्यासाचा विषय असू शकतात आणि हा परस्पर संबंध जाणून घेतला तर सामाजिक वास्तव उलगडू शकतं, हे पुकारच्या ‘तरुणाई’ प्रकल्पानं अधिक सुस्पष्ट केलं. या अंतर्गत युवागटांनी आपल्या रोजच्या जगण्यातील विषय अभ्यासले. त्यांच्या संशोधनाला दिशा व बळ देण्याचं, त्यांच्या संशोधनाची आखणी करण्याचं आणि या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ‘पुकार’नं केलं. यापैकी दोन उल्लेखनीय उदाहरणं म्हणजे -‘सायन ट्रॉम्बे मार्गावर पसरलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानाच्या दिशेनं येणारा रस्ता आणि तेथील जीवन’ यावर त्या परिसरातील अभ्यासगटानं काम केलं. आणि आणखी एका अभ्यासगटानं ‘वसईजवळील गिरीज गावातील बोलीभाषांच्या नोंदी’ करण्याचं काम केलं.
त्यानंतर सुरू झालेल्या ‘पुकार’च्या युथ फेलोशिपअंतर्गत महाविद्यालयात शिकणारा वा नुकताच बाहेर पडलेला युवावर्ग, तरुण गृहिणी यांच्यासोबतच शाळा सोडलेले, बालकामगार म्हणून काम करत असलेले मजूर, शाळा सोडून घरी बसलेल्या मुली, आदिवासी, भटके-विमुक्त असा वर्ग, अनाथ, अंध, मजूर, वेश्यांची मुलं गटागटानं या संशोधनात सहभागी झाली. आपल्या जगण्याचा- पर्यायानं या शहरीकरणाच्या प्रवाहाचा शोध घेऊ लागली.
या पुस्तकात संशोधनाचं काम कसं चालतं, हेही सविस्तर स्पष्ट करण्यात आलं आहे. संशोधन करणाऱ्या अभ्यासगटांची निवड, प्रशिक्षणवर्गाबद्दलही लिहिलं गेलं आहे. या संशोधकांना अभ्यासपद्धतींची माहिती देणं, तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचं सक्षमीकरण करणं, प्रत्यक्ष माहिती गोळा करणं, गटानं संशोधन करणं आणि अहवाल तयार करणं अशा अनेक टप्प्यांची माहिती या पुस्तकात दिली आहे.
‘नोंद मुंबईच्या स्पंदनांची’ हे प्रकरण युवा गटांनी केलेल्या संशोधनावर बेतलेलं आहे. यात संशोधनातील विषयांचं वेगळेपण प्रकर्षांनं जाणवतं. या विषयांचा थेट जगण्याशी असलेला संबंध जसा स्पष्ट होतो, तसेच आपल्याला अज्ञात असलेल्या मुंबईचा नवा चेहराही आपल्यासमोर येऊ लागतो. याअंतर्गत करण्यात आलेल्या संशोधनापैकी काही विषय – गिरगावातील सणांचं व्यापारीकरण, चाळीत राहणाऱ्या मुली लग्नाचा उपयोग अपवर्ड मोबिलिटीसाठी करतात का, लोकलच्या लेडीज कंपार्टमेन्टमधून प्रवास करणाऱ्या महिलांचं जग, लघुउद्योगातील काम करणाऱ्या महिलांच्या अडचणी, मालवणी भागातील मुलींची छेडाछाड, उत्तनच्या कोळी समाजातील मुलींची शाळागळती, कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलांचं आयुष्य, तरुणांमधील ताणतणाव, तरुणांमधील व्यसनाचं प्रमाण, तरुण मुलींचं शॉपिंग वर्तन, आजच्या पिढीची मूल्यं, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपल्या पेशाबद्दलचं मत, मुला-मुलींच्या मनोरंजनाच्या कल्पना, कॉलेजमधील मुलं मैत्री करताना कोणते निकष लावतात, मालवणी भागातील शाळा सोडलेल्या मुलांची परिस्थिती, मध्यमवर्गीय मुलं जेव्हा करिअरसाठी कलेशी संबंधित निर्णय घेतात तेव्हा पालकांकडून होणारा विरोध, कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलींचा पेहराव, कॉलेजमधील तरुणांना ‘सेझ’ची किती माहिती आहे, कमावणाऱ्या विवाहित महिलांचं आयुष्य, मुंबईतील रिक्षावाल्यांच्या आयुष्य कहाण्या, धारावीतील सामाजिक कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, पडद्यामागच्या कलावंतांचे प्रश्न, तरुणांची राजकारणाबद्दलची समज, तरुणांच्या आत्महत्येची कारणं, दादरच्या फूल मार्केटमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या कहाण्या, सिनेमातील आयटम साँग्ज, बेघर लोकांच्या समस्या असे कितीतरी विषय याअंतर्गत अभ्यासले गेले. शिक्षण, रोजगार, लैंगिकता, समाज आणि संस्कृती, आरोग्य, जात, माध्यमं, राजकारण आणि प्रशासन यासंबंधित समस्या यानिमित्तानं हाताळल्या गेल्या.
शासकीय यंत्रणा आणि सरकारी योजनांच्या अनुषंगानंही काही संशोधनं झाली. त्या प्रकल्पांमध्ये मुंबईच्या गोवंडी परिसरातील बैंगनवाडीतील लोकांची पाण्याची समस्या, सांताक्रुझच्या खाडीला लागून असलेल्या गझधरबांध वस्तीतील रेशनिंग व्यवस्था, क्षेत्रसभेच्या माध्यमातून लोकसहभाग – नगरराज कायदा २००९, गरजू दलित विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता योजनेची माहिती, हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अनाथ मुलांकडे योग्य कागदपत्रं नसल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी, रेल्वे स्थानकांत वस्तू विकणाऱ्या अंध फेरीवाल्यांच्या अडचणी अशा विषयांचा समावेश होता.
वंचितांशी संबंधित काही संशोधन प्रकल्प वंचित वर्गातील मुलांनीच केले. यातील दोन उल्लेखनीय संशोधन प्रकल्प म्हणजे ठाण्यातील घोडबंदर परिसरातील हिरानंदानी इस्टेट या वसाहती उभारणाऱ्या मजुरांनी आपल्या समस्या मांडल्या तर वेश्यावस्तीतील मुलांनी आपल्या जगण्यातील अडचणी टिपल्या.
एका अभ्यासगटानं गोवंडीतील रफिकनगर परिसरातील कचरावेचक मुलांच्या कहाण्या नोंदवल्या तर एका संशोधनातून सायन कोळीवाडी परिसरातील ‘सिंगल मदर्स’ना जाणवणाऱ्या अडचणी स्पष्ट झाल्या. ज्यांचे वडील नाका कामगार होते, अशा मुलांनी आपल्या प्रकल्पात नाका कामगारांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. मुंबई उपनगरीय रेल्वेत स्ट्रेचर हमाल म्हणून काम करणाऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक, मानसिक स्थितीचा अभ्यास एका अभ्यासगटानं केला. यानिमित्तानं वंचित व्यक्तींच्या आयुष्याचं, त्यांच्या प्रश्नांचं आणि आशा-आकांक्षांचंही दस्तावेजीकरण झालं.
मुंबई शहरातील जातिव्यवस्था टिपण्याचा प्रयत्नही काही संशोधन प्रकल्पांद्वारे करण्यात आला. शहरातील मुलांना जात कशी समजते, मराठवाडय़ातून मुंबईत स्थलांतरित झालेल्या दलितांचं जीवन, नागरी दलित वस्ती सुधार योजनेची ठाणे शहरातील अंमलबजावणी, भटक्या जमातींची शहरातील सद्यस्थिती, दलितांबद्दल इतर सवर्ण जातींना काय वाटतं, इंटरनेट महाजालातील जातीय भेदाभेद अशा अनेक प्रकल्पांतून धक्कादायक बाबी उघड झाल्या.
लिंगभाव आणि लैंगिकतेसंबंधीचा अभ्यासही यूथ फेलोशिपअंतर्गत काही प्रकल्प गटांनी केला. त्यात लिंगभाव आणि मोबिलिटी, वेगवेगळ्या संस्कृतींतील लिंगभेद, मुलींना हवे तसे कपडे घालू न देण्यामागची पालकांची मानसिकता, धर्म आणि लिंगभाव यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीनं कुराने – हुकुक ओर लोगों की सोच, हिंदू – मुस्लिम अशा आंतरधर्मीय विवाहांतील महिलांचे अनुभव, पेणमधील वीटभट्टय़ांमधील महिलांचे अनुभव, मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या महिला नगरसेविकांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, मुलं मुलींची छेड का काढतात, ट्रान्सजेंडर व्यक्तींचं दुहेरी जीवन या विषयांवर प्रकल्प केले गेले.
शिक्षणसंबंधित समस्या टिपताना मुंबईतील सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांमधील शैक्षणिक दर्जाचा तुलनात्मक अभ्यास, माटुंगा- धारावी या विभागांतील सातवी ते दहावी दरम्यानच्या मुलांची शाळा सोडण्याची कारणे, शिक्षणाच्या बाबतीत मुला-मुलींमध्ये करण्यात येणारा भेदाभेद, मातृभाषेतून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षण घेताना अथवा व्यावसायिक जीवनात येणाऱ्या अडचणी, मुंबईतील रात्रशाळा – शक्यता आणि समस्या, मुंबईतील अभ्यासगल्ल्या, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध, शिक्षक हक्काच्या अंमलबजावणीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम, कमावता-कमावता शिकणाऱ्या मुलांच्या प्रेरणा असे विविध विषय हाताळण्यात आले. नाटय़ जगतातील घडामोडींचा वेधही काही प्रकल्पांतून घेतला गेला.
गेली आठ र्वष सुरू असलेल्या पुकारच्या ‘यूथ फेलोशिप’ या उपक्रमाचं फलित स्वतंत्र प्रकरणात जोखण्यात आलं आहे. सहभागी युवक-युवतींचा झालेला व्यक्तिमत्त्व विकास, ज्ञान आणि कौशल्य प्राप्त केल्यानं त्याचा लाभ त्यांना आणि समाजाला कसा झाला याचं विश्लेषण यात करण्यात आलं आहे. जगण्यासाठी वंचित मुलांची धडपड सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या मुलांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरली तर वंचित मुलांना यानिमित्तानं मिळालेल्या सहानुभूतीमुळे आपलं दु:ख हे केवळ आपलं नाही, ही आयुष्य जगायला उभारी देणारी जाणीव झाली. यानिमित्तानं आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या काही यूथ फेलोजची प्रेरणादायी उदाहरणंही पुस्तकात नमूद करण्यात आली आहेत.
‘स्वशोधातून सामाजिक सहभाग’ या संकल्पनेतून साकार झालेले हे प्रकल्प या महानगरीचा खरा चेहरा दाखवून देण्यास सक्षम ठरतात. ‘पुकार’च्या या जगावेगळ्या प्रयोगाची ही कहाणी वाचायलाच हवी अशी आहे. युवा संशोधकांच्या फळीनं मुंबई शहरातील वर्तमानाचं केलेलं हे दस्तावेजीकरण पुढच्या पिढीला मुंबईचा इतिहास जाणून घेण्यासाठी मोलाचं ठरेल, यात
शंका नाही.
‘इथे खरी मुंबई भेटते’ – पुकार, समकालीन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १५९, मूल्य – १५० रुपये.
अज्ञात मुंबईचा खरा चेहरा
संशोधन हे केवळ विद्यापीठं आणि प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांची मक्तेदारी आहे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-11-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of ithe khari mumbai bhette