lr12

अजीम नवाज राही यांचा ‘कल्लोळातला एकांत’ हा दुसरा कवितासंग्रह. ‘व्यवहाराचा काळा घोडा’ या त्यांच्या पहिल्या संग्रहानंतर जवळपास दहा वर्षांनी प्रकाशित झालेला. या संग्रहाविषयी ब्लर्बवर म्हटले आहे की, ‘हे म्हटलं तर एका माणसाचं मानसिक चरित्र आहे. हे म्हटलं तर एका माणसाचं व्यावहारिक चरित्र आहे. हे म्हटलं तर संपूर्ण समाजाचं चरित्र आहे. हे म्हटलं तर एका काळाचं चरित्र आहे. आयुष्याचे सगळेच्या सगळे संदर्भ आणि आशय निखळ शब्दांत टिपत जन्माला आलेली ही कविता आहे. एक व्यक्ती आणि एक काळ यांच्या जगण्याचा विविधरंगी अवकाश शब्दांत घेऊन एखाद्या भव्य कादंबरीसारखा हा कवितासंग्रह वाचता येतो.’ आणि याचा प्रत्यय हा संग्रह वाचताना येतो.
गेल्या जवळपास तीस वर्षांपासून अजीम नवाज राही यांचे काव्यलेखन सातत्याने सुरू आहे. त्यांच्यावर झालेल्या या कवितेच्या संस्काराची पूर्वपीठिका आणि पाश्र्वभूमी तेवढीच महत्त्वाची आहे. त्या संदर्भात सांगताना राही म्हणतात, ‘‘लहानपणी वडिलांकडून अनेक उर्दू शेर ऐकायला मिळायचे. मुळात त्यांचे प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिक्षण उर्दू माध्यमातून. पण आठवीनंतर उर्दू माध्यमाची सोय गावात नव्हती. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला आणि मराठीच्या संपन्नतेचा परिचय झाला. नंतर नाटकाच्या माध्यमातून ही भाषा विस्तारशील झाली. पुढे राजकीय सभांचे सूत्रसंचालन करताना त्या भाषेने मैत्री घट्ट केली. दहाव्या वर्षांत तलाक्ष व्हावे लागले. ही खंत असली तरी नंतरच्या आयुष्यात कवितेच्या आणि गज़्‍ालच्या अंगभूत ओढीने हे नातं अधिक दृढ होत गेलं.’’
संग्रहरूपात या सर्व कविता वाचताना त्यांच्यातील प्रकृतीशी आणि एकसंध आशयाशी आपला घनदाट परिचय होतो. सामान्य माणूस आणि कवी म्हणून जगताना एका गावखेडय़ाच्या पाश्र्वभूमीवर एका व्यक्तीला कशा प्रकारे अनेक पातळ्यांवरचा संघर्ष करावा लागतो याचा वेध ही कविता टप्प्याटप्प्याने अनेक घटना प्रसंगाच्या निमित्ताने प्रतिक्रिया देताना घेत राहते आणि त्यातून मग ब्लर्बवर म्हटल्याप्रमाणे एका व्यक्तीचे चरित्र उभे राहते. ही व्यक्ती समाजजीवनाचा अविभाज्य घटक असल्यामुळे अभिरुची, अनुभूती आणि अभिव्यक्तीच्या त्रिसूत्री परिघावर या कवितेची ओळख होते. कवितेला लाभलेली चिंतनाची डूब अतिशय प्रभावी प्रतिमा, प्रतीकाच्या माध्यमातून कवीलाही प्रभावीरित्या व्यक्त करून जाते आणि हेच या कवितेचे बलस्थान ठरते.
राही यांच्या कवितेचे मांडणीच्या अंगाने वा शैलीच्या अंगाने जाणवणारे ठसठशीत असे जे वैशिष्टय़ आहे, त्याचा उल्लेख करणे महत्त्वाचे वाटते. कारण कुणीही वाचक जेव्हा हा संग्रह हाती घेईल तेव्हा त्याला हा शैलीचा प्रयोग वेगळा वाटेल. सर्वसाधारणपणे वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने कोणत्याही गद्य किंवा पद्य लेखनांची मांडणी होत असते. मात्र कवी इथे सर्व क्रियापदे आधी वापरतो. त्यानंतर कधी कर्ता तर कधी कर्म या क्रमाने कवितेतील विधानांची परिपूर्ती होते. उदाहरणार्थ- ‘कल्लोळातला एकांत’ या शीर्षक कवितेतील खालील ओळी पाहता येतील-
मिटले तडफडत आईने डोळे
आहे कायम अजून डोळ्यात ओल
गेले हलक्याशा आजाराने परवा-
..नसते तिला येण्यासाठी काळवेळ,
येते माझ्यात आभाळून
पिंजते कापूस गणिताचा
अशा विधानांच्या मांडणीमुळे ही कविता मांडणीतील वेगळेपण जपते. त्याचप्रमाणे क्रियापदाची वाक्याच्या सुरुवातीलाच योजना करताना तिला झालेली अभिव्यक्तीची अनावर ओढसुद्धा सूचित करते.
या संग्रहातील कवितांना कोणत्याही विषयाचे वावडे नाही. मात्र आजपर्यंत मराठी कवितेला पारखा असलेला मुस्लीम वस्तीतील ‘मोहल्ला’ चेतनगुणोक्तीच्या माध्यमातून एक व्यक्तिरेखा होऊन आपल्या अंगा-प्रत्यांगांची स्पंदने व्यक्त करताना या संग्रहातील बऱ्याच कवितांमधून दिसून येतात.
उसवतो मोहल्ला मध्यरात्रीपर्यंत
आठवणी दिवसभरातल्या कष्टाच्या..
अशा ओळीमधून त्याचे हे चेतनगुणोक्ती रूप दिसून येते. पण कष्टांचेही विरेचन कशा पद्धतीने होते हे सांगताना कवी मोहल्ल्याबद्दल म्हणतो-
झडतात फैरी किस्स्यांच्या खुमासदार
पिकतात बोरी श्रवणसौख्याच्या
फुगते टम्म पखाल गप्पांची
खिळवते बैठक, शैली, कथनातली रम्य
पडतो मुडदा भयाणतेच्या अजगराचा
होते सुसह्य़ रात्र भारनियमनाची भलीमोठी..
माणूस हा समाजशील प्राणी आहे. या समाजातच व्यवहाराचा काळा घोडा पिटाळताना त्याची पार दमछाक होते. पडझड होते. कधी या धडपडीत असह्य़ वेदना वाटय़ाला येतात. पण यावर त्याच्यातील समाजशीलतेने उपायही शोधलेला असतो. हे मानवी जगण्यावरचे आदिम भाष्य इथे अधोरेखित होते. त्याचबरोबर कथन आणि श्रवण यांच्यातील अद्वैत व्यक्त करताना कवीवर झालेल्या मोहल्ल्यातील भावतुंबी संस्काराचासुद्धा ती कृतज्ञपणे उल्लेख करून आपल्या निर्मितीची बीजे शोधण्याचा प्रयत्न करते. त्यातून कवीचा आत्मसंवाद हा संवादी होऊन अनेक प्रतिमा आणि प्रतीकांच्या माध्यमातून भकास वास्तवाला कलात्मकतेच्या पातळीवर नेताना दिसतो. मोहल्ल्यातील लोकांचा व्यवसाय, रीतीभाती, परस्परसंबंधातील ताणेबाणे, व्यवसायनिष्ठ कृतीउक्तीचे भावतुंबी संदर्भ, नातेसंबंधातील चढउतार, अशा सर्वच अंगाने यातील अनेक व्यक्तिरेखांचे एका व्यक्तीने केलेले चित्रण दिसून येते.
दैनंदिन जीवनात व्यक्तीचा संबंध जसा समाजातील विविध घटकांशी येतो, तसाच त्याच्या कौटुंबिक जीवनातील भावतरंग हेसुद्धा त्याच्या जीवनाचे अविभाज्य घटक असतात. त्यांच्यामुळेच जीवनातील सुखदु:खाचे क्षण वाटय़ाला येत असतात. त्यांची पत आणि प्रत ठरत असते. कुटुंबातील पत्नी, मुले, आई-वडील, भावबंद असे अनेक घटक कल्लोळातल्या एकांतात वाचकाला भेटून एक समदु:खी अनुभव देऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून ‘वृत्तांत-बिनचेहऱ्याच्या दिवसांचा’ आणि ‘मुलगा माझा मतिमंद’ या कविता वाचण्यासारख्या आहेत.
इथल्या नायकाने पूर्वायुष्यात खूपच कष्टाचे आणि अभावग्रस्त जगणे जगलेले आहे. त्यात पत्नीने साथ दिलेली आहे. पण ही आर्थिक दमकोंडी आता संपलेली आहे. त्यामुळेच –
शिरला वारा मोकळिकीचा उत्साही
ईदेच्या दिवशी आणलेल्या
चारचाकी वाहनाच्या आगमनाचा
ओसरला नव्हता आनंद अद्याप
स्वीकारत होती हसतमुखाने तू
मुबारकबादी मोहल्ल्यातल्या बायांची.
असा सुखद संवाद हा नायक आपल्या पत्नीशी करू शकतो आणि तसे संवादत असतानाच जुन्या दिवसांचे भीषण चित्र फ्लॅशबॅक पद्धतीने उभारत या प्रदीर्घ कवितेला एका कथेचा मोहतुंबी घाट प्राप्त करून देण्यात यशस्वी होतो. मुलाच्या अकाली मृत्यूचे कातरकळा देणारे दु:ख या कुटुंबकथेचे दुसरे टोक आहे, ते ‘मुलगा माझा मतिमंद’ या कवितेतून ठळकपणे समोर येताना दिसते.
– निघून गेला अचानक
सफरीत दिगंताच्या तू
तो पाषाणहृदयी दिवस!
रुजली काळजात पाळेमुळे वेदनांची
सोबत आयुष्यभर भळभळत्या जखमांची
टाच पहाडाएवढी जगणे चिरडणारी
अन् ओठांवर शब्द राहतचे
दिल धडकनेका तसव्वूरही खयाली हो गया
एक तेरे जानेसे सारा गाँव खाली हो गया..
असा कवितेचा उत्तरार्ध आणि त्यातील शेवटच्या ओळी त्या कातरकळांची तीव्रता अधिक सघन करून जातात.
‘कल्लोळातला एकांत’मधील कवितेमध्ये मोहल्ल्याचे, जगण्याचे, कुटुंबाचे संदर्भ अधिक ठसठशीतपणे येत असले तरी कवीचे समाजभानही अनेक कवितांमधून तेवढय़ाच उत्कटतेने अधोरेखित होताना दिसते. त्यादृष्टीने विचार करता जागतिकीकरणाच्या वरवंटय़ाखाली रगडल्या जात असणाऱ्या सामाजिकतेचे काळीजकाची वर्णन ही कविता करते. ‘गावावर विस्तारलेले बीएसएनएल आकाश’, ‘ट्रक ड्रायव्हरची जीभ’, ‘वर्तमानपत्र’, ‘डिजिटल नागवणूक’, ‘तलावाची पॉलिथिन चादर’, ‘जाहिरातीतला वारा’ अशा कितीतरी कविता समकालीन वास्तवाला भिडताना दिसतात. त्यातून-
सजलाय डिजिटल रंगांनी
चेहरा काळाचा आज
गावखेडय़ावर, वाडय़ावस्त्यांवर
कोसळतोय पाऊस मनोरंजनाचा धुवाधार
झाल्या छत्र्या एकाकी झोपडय़ांचा आधार
पोचत नाही जिथे एस.टी.
गावात त्या दुर्गम
मालिकांमधल्या भानगडींची चर्चा
शोधतात जीव थकलेले
विश्वात कल्पनेच्या जगण्याची ऊर्जा..
अशा ओळी सहजपणे लक्षात राहून जातात. आधुनिक यांत्रिक युगाचे शब्द जसे या कवितेमधून येतात. तसेच बोलीभाषेतील मोडतोड वा गोचिड, डाफरतो, हुक्की, टिपरू असे शब्दही प्रसंगानुरूप आपल्या ओळखीचे होतात आणि वाचकाच्याही कल्लोळातील एकांताला किंवा एकांतातील कल्लोळाला हुदकण्या देतात, यात शंका नाही.
‘कल्लोळातला एकांत’ – अजीम नवाज राही, अक्षर मानव प्रकाशन, पुणे,  पृष्ठे- २९३, मूल्य- ३०० रुपये.

concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
The Political Philosophy of Niccolo Machiavelli
तर्कतीर्थ विचार : मार्क्स – कामगारांचा मॅकिआव्हेली
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Loksatta book mark Patriot Alexei Navalny Russian security forces
बुकमार्क: अकाली मावळलेला झुंजार तारा
painting show woman in the Byzantine period
दर्शिका: बाईच्या जातीनं कसं दिसायला हवं…?
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…
Story img Loader