श्रीनिवास भणगे यांच्या ‘काळोखाची हाक’ या कथासंग्रहात एकंदर सात कथा आहेत. त्यांची आशयसूत्रे भिन्न असली तरी मानवी मनाचा तळ शोधण्याची प्रेरणा हे आंतरिक सूत्र आहे. फ्रॉइड, युंग यांच्या मानसशास्त्रीय संशोधनानंतर जगभर जीवनाकडे आणि स्त्री-पुरुष संबंधाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खरं तर भारतीय परंपरेतील वात्स्यायनाने स्त्री-पुरुष संबंधाकडे निकोप दृष्टीने पाहण्याची दृष्टी दिली होती. परंतु भारतभूमीवर सातत्याने परकीय आक्रमणे झाल्यामुळे निकोपतेला बाधा आली. याचे उदाहरणच द्यायचे झाले तर आदिवासी जमातीच्या ‘गोटुल’ परंपरेचे देता येईल. गोटुलात तरुण मुलं-मुली एकत्र राहून आपल्या जोडीदाराची निवड करीत असत. या एकत्र सहवासात कधी-मधी शरीरसंबंधही होत असत. पण ही परंपरा ब्रिटिशांनी मोडून काढली. सांगण्याचे तात्पर्य असे की, भारताच्या उलथापालथीच्या इतिहासात स्त्री-पुरुष संबंधाकडे शुचितेच्या अंगाने पाहता-पाहता स्त्रीला दुय्यमत्वही द्यायला सुरुवात केली. या संघर्षांतून जी एक आपली सांस्कृतिक-सामाजिक कोंडी झाली, त्या कोंडीचे चित्रण या सगळ्या कथांमधून आले आहे.
‘मी मज हरपून’, ‘साडेतीन पावलं’, ‘अंधाराचा चेहरा’ आणि ‘केव्हातरी.. दुपारी’ या चार कथांमधून स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे आणि लैंगिक संबंधाचे चित्रण आले आहे. ‘मी मज हरपून’ मधील मानसी दोन मुलांची आई आहे. नवऱ्याच्या कर्जाला कंटाळून ती नाटकात काम करून पैसे उभे करताना सुबोधबरोबर अभिनय करता-करता त्याच्या शारीरिक आकर्षणात अडकते. मनाने मान्य केलेले शरीरसंबंध ती नाकारत नाही. त्याच्या शुचितेला नकार देताना सुबोधला आपलं सर्वस्व अर्पण करते. पण जेव्हा तिला एकटीलाच भर पावसात बाहेर पडावे लागते तेव्हा मात्र ती मोडून पडते. शरीराच्या भुका महत्त्वाच्या असल्या तरी त्या लुटण्याच्या पातळीवर जाऊ नयेत असे तिला वाटत राहते. ‘साडेतीन पावलं’मध्ये उदयन, मानस या दोन मित्रांच्या नातेसंबंधात उदयनची बायको आभाची कशी धुसमट होते याचे चित्रण आहे. उदयनच्या अगोदर मानस आभाला भेटलेला असतो आणि नकळत एक अनामिक आकर्षण त्यांच्यात निर्माण होते. परंतु उदयनशी लग्न झाल्यावर मानस आभाला आपली ओळख दाखवत नाही. तिथं ती दुखावते आणि उदयनच्या आयुष्यातून मानसला हाकलण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करते. यात मानस स्वत:ला संपवून घेतो. मनाच्या काळोखात दडलेली ही हिंस्र जनावरे मानवी आयुष्याची कशी कोंडी करतात याचे चित्रण येथे आले आहे.
असाच आशय ‘अंधाराचा चेहरा’ मध्येही आहे. प्रेम म्हणजे नेमकं काय? हुरहुर, अस्वस्थता की शरीराची ओढ याचा शोध घेता-घेता शरीराचे आकर्षण म्हणजेच प्रेम अशा निष्कर्षांला आलेला उदयन स्वत: अपंग झाल्यावर बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन घरगडय़ाला व बायकोला विष देऊन मारतो. ‘केव्हातरी.. दुपारी’ या कथेत सुखी आयुष्य जगताना आलेली तृप्तीही कशी नकोशी वाटते, याचे चित्रण येते. चाळिशीनंतरही शरीरसंबंधात काही नवं शोधावं, अतृप्तीचा अनुभव घ्यावा असे वाटणारे जोडपे येथे आले आहे.
‘काळोखाची हाक’, ‘मिनीची डायरी’,  ‘शपथ’ या कथाही मानवी मनाचा तळ शोधतात. भविष्यकथनाच्या निमित्ताने एखादी गोष्ट लख्ख सूर्यप्रकाशाइतकी कळाली आणि त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या अबोध स्तरावरील घडामोडींमधून आपली सुटका होत नाही याचे चित्र या कथा रंगवताना दिसतात. आपण भविष्यात व्यभिचार करणार असं समजल्यामुळे पळून जाणारा व शेवटी सावत्र बहिणीशी लग्न करून व्यभिचार करणारा तरुण ‘काळोखाची हाक’मध्ये भेटतो. ‘मिनीची डायरी’मधून सायलीच्या पौगंडावस्थेतील वाढीची कहाणी भेटते. शाळेत सर्वात प्रिय असणारी सायली जेव्हा तिच्या प्रिया टीचरकडून वारंवार दुखावली जाऊन दुसऱ्याच मुलीचे कौतुक ऐकू लागते तेव्हा ती अत्यंत अस्वस्थपणे आपली जीवनयात्रा संपवते. आपणाला अदखलपात्र केले जातेय याचे मनस्वी दु:ख होऊन ती रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या करते. ‘शपथ’ ही कथा सासरच्या लोकांनी जाळून मारलेल्या स्त्रीच्या जबानीवर लक्ष केंद्रित करते. ‘माझ्याच हातून स्टोव्ह भडकून मी पेटले’ असा जबाब देणारी स्त्री जेव्हा तिचा नवरा ‘माझ्याच हातून होऊनही मला का वाचवतेस?’ असं म्हणतो तेव्हा मात्र ती अचानक आपला जबाब बदलून नवऱ्याला अटक करायला भाग पाडून प्राण सोडते.
‘काळोखाची हाक’ मधल्या सातही कथा आशयापेक्षा मनाचा तळठाव शोधण्याला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे आशय आणि विषय यांना या कथेत फारसे महत्त्व येत नाही. त्यामुळे एखाद्या घटनेचे परिणाम केवळ एखाद्या व्यक्तीच्या मानसिक पातळीवर कसे होतात, याचेच चित्रण येथे येते. परंतु त्याच घटनेचे सामाजिक किंवा कौटुंबिक पातळीवर काय परिणाम होतात याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच या कथांचे परिणाम टोकदार बनतात आणि कथा चिंचोळ्या अवकाशावर उभ्या राहतात. स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि लैंगिक संबंध हे दोन्ही विषय अत्यंत गहन आहेत. त्याला हजारो कंगोरे आहेत. काही कंगोऱ्यांचा शोध श्रीनिवास भणगे घेतात. पण तो घेताना आणि अबोध मनातील गाळ उपसताना लेखक-कलावंत म्हणून जी घुसमट व्हायला हवी, जो जीवघेणा प्रवास जाणवायला हवा आणि त्यात निवेदकाची-लेखकाची जी घुसमट दिसायला हवी, ती येथे दिसत नाही. अबोध पातळीवरील एखाद्या पैलूच्या शोधाचे सुलभीकरणच काही अंशी येथे झालेले दिसते. असे असले तरी एकाच ध्यासाने विविध घटनांचा अन्वयार्थ लावण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे.
‘मिनीची डायरी’ या कथेचा अपवाद वगळता इतर कथा या प्रौढ मानवी संबंधाचा शोध घेणाऱ्या आहेत. विशेषत: चाळिशीनंतर माणसामध्ये काही मूलभूत बदल होऊ लागतात, असं मानसशास्त्र मानत आलं आहे आणि ते खरंही आहे. या बदलत्या भावविश्वाचा शोध या कथा घेताना दिसतात. त्यामुळेच कथांमधली बहुतेक मुख्य पात्रे आपला शोध नव्याने घेताना दिसतात. जगण्याचा अन्वयार्थ लावू पाहतात. चाळिशीनंतरच्या कामजीवनाचा नव्याने शोध घेऊ पाहतात. हा शोध तितकासा आनंददायक नसला तरी ती माणसे आपल्या तळाच्या काळोखात उतरून तो काळोख उपसण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न म्हणावा तेवढा सोपा नाही. त्यासाठी मरणही जवळ करावे लागले आहे. एक गोष्ट खरी की, प्रत्येकाच्या आत जो काळोख असतो, जे जनावर असते त्याचा शोध या कथा घेतात. हा शोध घेताना मात्र लेखक म्हणून भणगे फार हस्तक्षेप करीत नाहीत. काळोखात जे जे काही हाती येईल, ते वाचकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न तोकडा आहे. या तळशोधाला आशयाची विविधता लाभली असती तर मात्र त्याची परिणामकारकता वाढीस लागली असती. तरीही त्यांनी आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे भणगे मानवी अस्तित्वाच्या चिरंतनात्वाचा शोध घेतात. त्याचे भले-बुरे सगळे कंगोरे अतिशय तन्मयतेने तपासत जातात आणि हाती आलेले वाचकांपुढे ठेवून रिकामे होतात. ही ठेवण्यातली सहजता हे या कथांचे वैशिष्टय़ मात्र नजरेआड करता येणार नाही.
‘काळोखाची हाक’ – श्रीनिवास भणगे,
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १३१, मूल्य – १२० रुपये.

Story img Loader