‘माकाम’ ही रिटा चौधरी या असामी लेखिकेची सहाशेएक पृष्ठांची बृहदकादंबरी. याच नावाने विद्या शर्मा यांनी तिचा केलेला हा मराठी भावानुवाद. बराचसा संक्षिप्त. कथानकाच्या दृष्टीने पाहता हा एक अंगावर येणारा दाहक आणि करुणाद्र्र असा अनुभव म्हणावा लागेल. अनुवादकर्तीने घेतलेली मेहनत मोठीच आहे. तरीही अनेक रचनात्मक भाषिक त्रुटींमुळे एकंदर रचनेला साजरे रूप मात्र प्राप्त झाले नाही. अलीकडे विविध भारतीय भाषा-साहित्याचे भारतीय वाचकांना अनुवादाच्या रूपाने मनोज्ञ दर्शन घडते आहे. आणि ही गोष्ट मोठी आश्वासक आहे.. म्हणूनच अभिनंदनीयही.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास अनेक चिनी माणसे चहा-व्यवसायाच्या निमित्ताने फसवून, करारबद्ध करून (म्हणजेच गुलाम बनवून) आसाममध्ये आणली गेली. अंगात कसब असलेली-नसलेली ही भोळीभाबडी माणसे रडतकुढत नाइलाजाने या मातीत राहिली, रमली, रुजली आणि इथलीच झाली. पण त्यांना कधीच कसली सावली वा संरक्षण मिळाले नाही. मरणाची राबणूक, सततची भीती-धाक-दहशत, तनामनाची घुसमट, भावनिक कोंडमारा, अस्वस्थता आणि अस्थिरता, हेच त्यांचे भागधेय होते. मागचे सारे दोर कापल्यामुळे मायभूमीला परतणे केवळ अशक्य. मग अर्थातच इथल्या समाजाशी संबंध-संपर्क वाढत गेला. प्रेम-लग्नादींसारख्या गोष्टी अटळपणे घडत गेल्या. लहान-मोठे सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक संघर्ष होत राहिले. भाषिक आदानप्रदान, रीतिरिवाज, सण-उत्सवादींतील उभय समाजांचा सहभाग यामुळे कालपुरुषाने त्यावर फुंकर घातली हे खरे, परंतु उपरेपण नि एकटेपण तसे कधीच सरत नाही. ते चरत नि चरतच जाते. हा भोवळून टाकणारा प्रत्यय देणारी ही कथा जितकी माणसांची तितकीच पायाखालच्या मातीचीही आहे. माती कधीच कसला हक्क सांगत नाही, पण माणसे मात्र तिच्यावर हक्क दाखवत तुझे-माझे करत आपली ‘खरी’ माणुसकी दाखवतात. पानोपानी येणारा हा अनुभव विलक्षण नि करुणरम्य आहे.
मूळ कादंबरी मोठय़ा ताकदीची, कसदार आणि कलात्मक असणार यात शंकाच नाही. पात्र-प्रसंगांची, स्थळांची आणि विविध संदर्भाची मोठी भाऊगर्दी असूनही कथानकाचा प्रवाह क्षणमात्रही मंदावत नाही. उलट तो प्रभावीपणे विकसित होत जातो. रुढार्थाने नायक-नायिकादीचा घाट इथे नाही. नायक म्हणायचा तर तो इतिहास किंवा काळ हाच आहे.
असाममधील चिनी माणसांची ही परवड नि तशातच १९६२चे भारत-चीन युद्ध सुरू होते. मग छळ-छळणूक आणि सगळीकडून होणारी फरफट यांना काही पारावारच राहत नाही. अंधार कोठडीतल्यासारखे दिशाहीन जिणे सुरू होते. संशयाची रोखलेली बोटे अंगात कापरे भरवतात. मुलाबाळांना घराबाहेर पडणेही कठीण होते. चौकशीसाठी म्हणून कुणाला कधी नि कुठे बोलावले जाईल, डांबले जाईल याचा पत्ता लागत नाही. या साऱ्या जीवघेणा प्रकारावर प्रकाश टाकणारे एका पात्राचे सभेतील भाषण खूप बोलके आहे – ‘‘या देशात आम्हाला बरंच काही मिळालं. हे खरं आहे की, त्याच्या बदल्यात आम्ही काहीच देऊ शकलो नाही. आम्ही फक्त आमचे श्रम आणि निष्ठा दिली आहे. आम्ही आमचा परिचय या मातीशी एकजीव करून टाकला आहे. आम्ही चीनमधून आलो हे खरं असलं तरी आम्हाला अन्न, वस्त्र आणि निवारा दिलेल्या देशाशी आम्ही विश्वासघात करू शकत नाही. कारण हा देश ही आमची मातृभूमी आहे, घरगुती भाषेत ‘जन्मभूमी’. या देशावर संकट आलेलं असताना आम्ही हाताची घडी घालून स्वस्थ बसू शकणार नाही. आमची माणसं आज घाबरलेली आहेत. त्यांच्या निष्ठेविषयी साशंकता निर्माण होईल, या भीतीमुळे ती अस्वस्थ झाली आहेत. बऱ्याच विचाराअंती आमच्यातील ज्येष्ठ व्यक्तींनी या सभेत आमचं भारताविषयीचं प्रेम आणि निष्ठा व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आम्ही आता काय करणं योग्य होईल याविषयी स्थानिक जाणकार व्यक्तींकडून या सभेत आढावा घेतला जाईल आणि ही सभा घेण्यामागचा मूळ हेतूदेखील हाच आहे.’’
लेखिकेने भारत-चीनच्या युद्धाच्या वेळचे वातावरण ज्या समग्रतेने रेखाटले आहे ते खरे तर मुळातूनच वाचायला हवे. राजकारणी मंडळींचा पोकळपणा, दिशाभूल करणारी त्यांची वक्तव्ये, युद्धनीतीमधल्या घोडचुका, मंत्र्यांचा कोडगेपणा, लंगोटी पक्षांच्या तारस्वरातील डरकाळ्या, हे सारे वास्तव अंतर्मुख करणारे आहे. प्रस्तावनेमध्ये मूळ लेखिकेने लेखनसामग्री जमवण्यापासून ते कादंबरी पूर्ण होईपर्यंतचे जे तपशील दिले आहेत, त्यात त्यांनी केलेले कष्ट, घेतलेल्या मुलाखती, त्यासाठीची धडपड नि धावपळ हे सारे थक्क करणारे आहे.
आता मराठी अनुवादाबद्दल. तो वाचनीय आहे यात वाद नाही. परंतु अनुवादकर्तीने आपल्या बाजूने घेतलेल्या सवलती खटकणाऱ्या आहेत. मूळ कादंबरीचा संक्षिप्त भावानुवाद करण्यामागील प्रयोजन काय, याचा काहीच उल्लेख नाही. अनेक ठिकाणी भाषेची कृतकता सहजपणे जाणवते. ‘असामिया’/‘असमीया’ (असामी), ‘चायबागात’, ‘चहाबागात’, ‘बगिचा’ (चहाचे मळे), मुखपृष्ठावर ‘चौधरी’ व पुस्तकामध्ये ‘चौधुरी’, ‘संसाराची एकछत्री नेत्री’ (?), ‘गणतंत्राच्या गप्पा’ (लोकशाहीच्या गप्पा), ‘दास्यत्व’ (दास्य), ‘बाजार बसला (भरला) होता’ अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मुद्रितशोधनाकडेही काहीसे दुर्लक्ष झाले आहे. तरीही भारत-चीन युद्धामुळे ससेहोलपट झालेल्या, देशोधडीला लागलेल्या भारतातील चिनी वंशाच्या जनसमूहाची ही करुण कहाणी चटका लावणारी आहे, यात शंका नाही.
‘माकाम’ – रिटा चौधरी, अनुवाद – विद्या शर्मा, राजहंस प्रकाशन, पुणे,          पृष्ठे – ३७७, मूल्य – ३०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा