लाखो वषेर्ं चाकोरीबद्ध जीवन जगणारी मानवेतर जीवसृष्टी अलीकडे मानवासाठी उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय बनली आहे. या जीवसृष्टीसोबतच मानव आपली हजारो वर्षांची वाटचाल करत आलेला असल्याने ती त्याच्या भावविश्वाचा एक भाग बनली आहे. जीवसृष्टीतील अनेक जीव आपण अवतीभवती पाहतो. मुंगी, डास, झुरळ, पाल हे तर आपल्या घरात आपल्यासोबतच राहतात. आपल्याला त्यांचे अस्तित्व त्रासदायक वाटते. त्यांना आपल्या मार्गातून बाजूला करण्यासाठी आपण नाना उपायही अवलंबतो. परंतु त्यांना आपल्या जीवनातून बाजूला करणे किती कष्टप्रद आणि अशक्य आहे याची जाणीव आपल्याला आहेच.
या जीवांपकी ‘मुंगी’ हा स्वत:मध्ये अफाट सामथ्र्य घेऊन जीवनसंक्रमण करणारा कीटक आहे. माने यांनी तिचे संपूर्ण विश्व (एका अर्थाने भावविश्व), तिचे सामाजिकत्व, जीवननिष्ठा आणि शिस्त, जगण्याची कार्यप्रणाली, संरक्षणप्रणाली आणि युद्धनीती, अन्नशोधपद्धती, संदेशवहन, तिच्या वसाहती, बुरशीची शेती करण्याची त्यांची पारंपरिक पद्धती, मावापालन, किडय़ांचा सांभाळ करणारी गोशाळा, तेथील स्वच्छता, कामविभागणी असे सारेच थक्क करून सोडणारे विश्व या पुस्तकाच्या माध्यमातून साकारले आहे.
पृथ्वीतलावरील अस्तित्वात असलेल्या जीवांची संशोधकांनी केलेली नोंद १८ लाख इतकी आहे. पकी दहा लाख केवळ कीटक आहेत. म्हणून पृथ्वीतलावर मानवापेक्षा किटकांचेच साम्राज्य आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एडवर्ड विल्सन हे किटकांचे अभ्यासक, किटकांचे वजन पृथ्वीवरील संपूर्ण मानवजातीच्या वजनाएवढे आहे असे म्हणतात. मानवाच्या विकासासाठी या भूमीवर आवश्यक असे वातावरण किटकांनीच बनवून ठेवल्यामुळे मानवाला स्वत:चा विकास साधता आलेला आहे. तरीही आपल्या लेखी कीटक हा सामान्य जीवच असतो. त्याचे अस्तित्व आपण विशेषत्वाने विचारात घेत नाही आणि घेतले तरी; त्यांचे सामान्यत्व अधोरेखित करण्यासाठीच घेतो. या पुस्तकाने किटकांची-विशेषत: ही प्रतिमा पुसून टाकण्याचे काम केले आहे. एवढेच नाही तर आपण त्यांच्यापासून कितीतरी गोष्टी शिकू शकू याचा आत्मविश्वासही दिला आहे.
या पुस्तकाला एक संदर्भ तत्त्वज्ञानाचा आहे. तत्त्वज्ञान आणि अध्यात्म विचारात मुंगीचा दाखला यापूर्वी अनेकांनी दिला आहे. श्रीचक्रधरांनी महानुभावांसाठी सांगितलेल्या आचारसंहितेत अंहिसेचे निरपवाद पालन हे व्रत सर्वश्रेष्ठ समजले जाते. ‘तुमचेनि मुंगी रांड नोहावी’ असे सांगताना स्वामींसमोर मुंगीचे अतिसामान्यत्वच आहे. संपूर्ण जीवसृष्टीचे संरक्षण मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या लेखी अतिसामान्य असणारी मुंगी ही किती महत्त्वाची आहे हे ते सुचवू इच्छितात. संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाचे वर्णन करताना एक मार्ग पिपिलिकामार्गाचा सांगितलेला आहे. त्यांचे ‘मुंगी उडाली आकाशी..’ हे उद्गार सर्वपरिचित आहेतच. संत तुकाराम यांनीही मुंगीप्रमाणे लहान, विनम्र व्हा असा संदेश ‘लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा’ या अभंगातून दिलेला आहे; तर मानवाचे जीवन किती सामान्य आहे हे सांगताना; कवी बा. सी. मर्ढेकर हेही झुरळ, मुंगी यांचा प्रतीक म्हणून वापर करताना दिसतात. ‘मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तूं एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी’ असे म्हणताना मुंग्यांच्या काही प्रवृत्ती सांगतात. या जीवनात ‘कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबडय़ा, भुरक्या मुंग्या; कुणी पंखांच्या पावसाळी वा, बेरड ग्रीष्मांतल्या लवंग्या!’ असे म्हणतात.
यापकी अनेक मुंग्या सावधपणे एकामागोमाग चालताहेत, तर कुणी बावळ्या, अप्पलपोटय़ा मिळालेली साखर चाखत बसलेल्या आहेत. विविध उपदेश, तत्त्व-विचार सांगण्यासाठी आणि मानवी प्रवृत्ती, वर्तन आणि त्याचे क्षूद्रत्व सांगताना प्रतीक म्हणून वापरलेली मुंगी प्रत्यक्ष किती अफाट क्षमतेने काम करते, तिचे आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टींनी समृद्धजीवन मानवासाठी कसे उद्बोधक आहे, आज माहिती-तंत्रज्ञानाच्या जगातही अनेक क्षेत्रांत मुंगी आपल्याला कसे मार्गदर्शन करते, वाहतूक व्यवस्थापन, एवढेच नाही तर अभियांत्रिकीसारख्या प्रगत विद्याशाखेत तांत्रिक आणि व्यवस्थापनाच्या दिशादर्शनाचे कार्य करते; हे या पुस्तकातून अभ्यासणे खरोखरच नावीन्यपूर्ण आणि अभिनव आहे.
माने यांनी मुंगीच्या जीवनाचे हे सारे आयाम अतिशय परिश्रमपूर्वक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. मुंगी ही निसर्गाचा अविभाज्य घटक आहे. तिच्या विविध प्रजाती, तिच्यामध्ये दिसून येणारी रंगसंगती, रूप अन् वैविध्यपूर्ण जीवनशैली अभ्यासकांसमोरील एक आव्हान आहे. अॅरिस्टॉटल, चार्लस् डार्वनि ते एडवर्ड विल्सन यांच्यापर्यंत अनेकांना मुंगीच्या आश्चर्यकारक जीवनपद्धतीने प्रभावित केले आहे. एडवर्ड विल्सन यांनी तर आपले सारे जीवन मुंगी अभ्यासाला वाहिलेले आहे. म्हणूनच त्यांना ‘लॉर्ड ऑफ अॅन्टस्’ असे संबोधले जाते. या शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख हादेखील या पुस्तकाचा एक महत्त्वाचा विशेष आहे. वाळवी, मधमाश्या, मुंगी हे कीटक सामाजिक आहेत. एकत्र राहणे, कामाची विभागणी करणे, एकत्र काम करणे, परस्परांना मार्गदर्शन करणे आणि सहजीवन व्यतित करणे ही सामाजिकतेच्या संदर्भातील काही लक्षणे सांगता येतील. इतर किटकांच्या सामाजिक जीवनामध्ये मुंगीचे सामाजिक जीवन सर्वात विकसित आहे. कारण मुंगीचा समाज गुंतागुतीचा आणि वैशिष्टपूर्ण रीतीने परस्परांशी गुंतलेला आढळतो. वरकरणी अत्यंत विस्कळीत वाटणारे मुंग्यांचे जग पूर्णत: सामाजिक आणि नियमबद्ध आहे. ही सामाजिकता त्या कशा प्राप्त करतात आणि जोपासतात याचे प्रस्तुत पुस्तकातील चित्तथरारक वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे.
मुंगीचे हे सारे अद्भुत जग वाचत असताना मुंगी जर एवढे वैशिष्टय़पूर्ण सामाजिक जीवन जगत असेल; तर ती विचार करू शकते का हा प्रश्न सतत पडत राहतो. अलीकडील एका संशोधनात त्यांच्या वर्तनात यांत्रिकतेपेक्षा विचारीभाव दिसत असल्याचे समोर आले आहे. मुंग्या आपल्या क्रियांमधील सुधारणा वारंवार करतात. त्या बदलत्या परिस्थितीशी सामना करण्याची तयारी ठेवतात, सामना करतात. प्रतिसाद देतात. या साऱ्या गोष्टी मुंगीजवळ विचारीभाव असल्याचे द्योतक आहेत. मुंगीमध्ये शिकण्याची आणि शिकविण्याची क्षमता असल्याचे अभ्यासकांच्या लक्षात आलेले आहे. मार्गाचा परिचय करून देणे, चाललेले अंतर मोजणे, अन्न शोधणे या क्रियांमध्ये त्यांचा हा गुण दिसून येतो. शिवाय मुंग्यांनी बनवलेल्या वास्तू यादेखील मुंगीची क्षमता अधोरेखित करतात. मातीचे वारूळ तयार करणे, पानांपासून घर बनवणे ही एका अर्थाने मुंगीची पारंपरिक वास्तुकला तिच्या शारीरिक क्षमतेमुळे आपल्याला आश्चर्यकारक वाटते. तिची बुरशीनिर्मितीची म्हणजेच शेती करण्याची पद्धती, मावापालन, गोपालन यातील तिची शिस्त, स्वच्छता आणि र्निजतुकीकरणाची पद्धती मानवासाठी एक मोठा वस्तुपाठ आहे. त्याचबरोबर स्वत:च्या शरीराचा कौशल्यपूर्वक वापर करून पूल उभारणे, शिडय़ा बांधणे, साखळ्या तयार करणे, तरंगत्या तराफा आणि गोळे बनवणे ही मुंग्यांची सांघिक कामे माणसांसाठी मोठा आदर्श आहेत. मुंगीचे वसाहती बनवणे, वसाहतीत निर्माण होणारे बंड शमवणे हे सारेच अद्भुत आहे. मुंग्यांच्या अशा अद्भुत आणि आश्चर्यकारक विश्वाचा वेध वाचकांना मानवेतर जीवसृष्टीविषयी नवी जिज्ञासा निर्माण करणारे आणि जीवनाविषयी नवी अनुभूती देणारे आहे. माने यांनी या पुस्तकातून मुंगीच्या भावविश्वाचा घेतलेला वेध मुंगीविषयीच्या आपल्या आजवरच्या (गैर)समजांना पूर्णत: खोडून काढणारा आहे.
‘मुंगी : एक अद्भुत विश्व’- प्रदीपकुमार माने, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,
पृष्ठे- १४४, मूल्य- १४० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा