पुस्तकाचा हेतू कुणी स्पष्ट शब्दांत लिहून दाखवलेला नाही. सुमारे १४० पानांच्या या पुस्तकात तेराव्या पानापासून १३६व्या पानापर्यंत एकही शब्द नाही. आहेत ती सुधारक ओलवे यांनी कॅमेऱ्यात टिपलेली, मुंबई महानगरातल्या सफाई कामगारांची चित्रं. मग अतुल देऊळगावकरांनी अत्यंत कमी शब्दांत लिहिलेली प्रस्तावना. म्हणजे देऊळगावकर यांच्या लिखाणाचं अंजली जोशी यांनी इंग्रजीसाठी निराळ्या संदर्भानिशी केलेलं भाषांतर. देऊळगावकरांनी सुधारक ओलवे यांच्या छायाचित्रांचं मर्म ओळखून, फक्त तेवढंच मांडलं आहे. छायाचित्रांचा हेतू अमुक अमुक आहे, अशी शाब्दिक इस्त्री फिरवण्याचं देऊळगावकर यांनी टाळलं आहे. ‘आपल्याकडील अस्वच्छतेला समाज वर्तन हेच जबाबदार आहे. आपली स्वच्छता ही नेहमी निवडक (सिलेक्टिव्ह) आणि घरापुरती मर्यादित राहिली..’, ‘आमची घाण तुम्ही उपसा, अशी सरकारला आज्ञा करायची, हा बाणा झाला. कुणीही कोणतेही नियम पाळायचे नाहीत, कायद्यांचा धाक नाही..’ अशी (म्हटल्यास सराईत पत्रलेखकांनाही जमून जाणारी) चीड एका सच्चा पर्यावरणवादय़ाच्या जबाबदारीनं व्यक्त करताकरताच देऊळगावकरांचं लिखाण थबकतं. पुढे एक-दोन वाक्यांखेरीज काहीच लिहिलेलं नाही.
पुस्तक वाचायचं म्हणजे शब्दच वाचायचे, अशी कल्पना असणाऱ्यांसाठी हे पुस्तक ‘वाचण्या’ची खरी सुरुवात देऊळगावकरांच्या अवचित शेवटापासून होते. ‘चित्रांचं पुस्तक चाळलं’ असं कधीमधी करणारे लोकही आता एकेक पान उलटून, ओलवे यांनी पुस्तकरूपानं आणलेला ‘मजकूर’ टिपू लागतात.
हा मजकूर काय सांगतो आहे, याची यादीच तयार होऊ लागते. ती यादी साधारण अशी :
पुलांवर, रस्त्यांवर आपण ज्यांना वळसा घालून टाळतो ते हे कामगार. सार्वजनिक जागांची सफाईवाले. रस्ते झाडणाऱ्या, भाजीबाजारातल्या कुजक्या वासानं वैतागलेल्या, मासळीबाजारातला कचरा डोक्यावर घेऊन नाकाला पदर लावूनच चालावं लागणाऱ्या बाया आणि पुरुष. आणखीच ‘आव्हानदायी’ राडीत काम करणारे. उकिरडे आणि फक्त नावालाच असलेल्या कचराकुंडय़ा यांतला नकोसा ऐवज सरकारजमा करणारे. हे उकिरडे कुठेही- सार्वजनिक संडासांच्या समोर, बाजारपेठांत, वाहनांच्या वर्दळीत, मुंबईचं वैभव मानल्या जाणाऱ्या चौपाटीवर. त्या उकिरडय़ांवर डुकरं, कुत्रे. जिवंतच असं नाही- कधी मेलेलेसुद्धा. वापरलेल्या चहाच्या खोक्याजवळच पडलेलं एक नवजात अर्भक- नाळेसकट.
विषयाचं गांभीर्य अशा प्रकारे पटवल्यावर सुधारक ओलवे यांचा कॅमेरा वाचकाला घरगल्ल्यांमध्ये आणि गटारांच्या झाकणांपर्यंत (मॅनहोल) नेतो. भर गणेशोत्सवात पाऊलभर पाण्यातून वाहत आलेला कचरा साफ करणारे, घरगल्ल्यांमध्ये काम करताना ‘वरून येणारा वर्षांव’देखील सहन करावा लागणारे, देवादिकांची पालखी वाहून नेतोय इतक्या तन्मयतेनं घाणीचं घमेलं एका बांबूला बांधून दोघांच्या खांद्यांनी तोलून नेणारे, मॅनहोलमधल्या सहकाऱ्याच्या आयुष्याच्या दोरीला एका वेळी एकाच पावलापुरती कशी ढील द्यायची याचा पक्का अंदाज असणारे, कामाची सवय झालेले- अनुभवी- कामगार.
दोन क्लोजअप आहेत इथं. समीपदृश्यं. घाणीतले वायू मोकळे होऊन बुडबुडय़ांचा थर धरलेल्या सांडपाण्यात हनुवटीपर्यंत उतरलेल्या एका तरुण कामगाराचा चेहरा. दुसऱ्या समीपदृश्यात फक्त कबंध. पोट, कंबर, मांडय़ांचा काही भाग. अंगावर फक्त चड्डी. तसल्याच घाणभरल्या पाण्याच्या अंतर्बाह्य़ थरांची.
अनेक दृश्यं नालेसफाईसारख्या सांघिक कामांची आहेत. दोन-तीन किंवा सात-आठ कामगार कामात गढलेले. पण एखाद्याचंच लक्ष जातं- कोणी तरी फोटो काढतंय आपले भारीवाल्या कॅमेऱ्यानं- त्या कामगाराची नजर थेट कॅमेऱ्याच्या भिंगात घुसते. घुसून प्रेक्षकापर्यंत पोहोचू पाहाते. ‘तुम्ही काय करणार हे फोटोबिटो काढून?’ हा प्रश्न त्या नजरेत कायम.
चित्रात माणूस दिसत असेल तर चित्र त्या माणसाचंच होतं. माणूस काय करतो आहे, कुठे पाहतो आहे, काय करणार आहे, कसा जगत असेल.. एवढे सगळे नव्हे, पण यापैकी थोडे तरी प्रश्न चित्र पाहणाऱ्याला पडतात. ओलवे यांच्यासह अनेक छायाचित्रकार या प्रश्नांची उकल होण्यासाठीच माणूस पुन्हापुन्हा पाहतात. या जगण्यातून सुटका नाही, या जगण्याचीच चिंता वाहायची आहे, हे मान्य केलेले सारे चेहरे. त्यामागचे मेंदू, चेहऱ्यांखालची धडं. त्या धडांना जिवंत राखणारी पोटं. त्यासाठी राबणारे हात. आपापल्या ‘वण्र्यविषया’चं हे मानवी वास्तव अनेक परदेशी आणि काही देशी छायाचित्रकारांनी टिपलं आहे, ते ग्रंथबद्धही झालं आहे.
सुधारक ओलवे यांच्या चित्रांमध्येही माणसं आहेत. पण या माणसांइतकाच त्यांचा परिसर आणि त्यांची घरं या चित्रांमध्ये महत्त्वाची आहेत. सफाई कामगारांच्या चाळींचे मजले आणि चाळीमागे पावसाळ्यात विखुरलेला कचरा, चाळींचा खुराडेवजा आकार, कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर किंवा ‘क्षेपणभूमी’त असलेल्या कचऱ्याच्याच पर्वतराजी, हे परिसराचे भाग असतील, पण घरातही आता माणसं वाढली आहेत. मुलांचं हसू कुठल्याशा सामाजिक संस्थेनं चालवलेल्या वर्गामध्येच फुलतं आहे. शाळेतून आल्यावर ‘आहे ते’ खाऊन घेणारी एखादी चिमुरडी आईवडलांची वाट बघत वेळ घालवणार आहे. घाणीच्या कामात अपघातानं जीव गमावलेल्यांचे फोटो घराघरांतल्या फ्रेममध्ये आहेत. मिळवता माणूसच कमी झाल्यावरची हताशा अनेक आबालवृद्धांच्या नेहमीच्या हालचालींमधूनही जाणवते आहे.
या मानवी दु:खाचा पट उलगडून दाखवताना ओलवे याच जगण्यातलं आणखी निराळं वास्तव टिपतात. चार बऱ्या क्षणांचं वास्तव. पगार, कँटीन, ‘थट्टीफस्ट’सारखे धार्मिक किंवा अधार्मिक सणउत्सव, दारू, ती ढोसल्यावर येणारा टगेपणा यांचे हे क्षण.. इतकेच, एवढय़ापुरतेच मर्यादित.
गेलं दीड दशक तरी सुधारक ओलवे हे याच विषयावर काम करत होते. पुस्तक उशिरा झालं, अगदी निवडकच फोटोंचं झालं. हेदेखील बऱ्याच छायाचित्रकारांबाबत होतं. ओलवे यांच्या पुस्तकातल्या फोटोंची संख्या दीडशेवर नसली, तरी विषयाच्या सर्व बाजू मांडणं आणि तेही संगतवार मांडणं, हे या पुस्तकाला जमलं आहे.
छायाचित्रणापुरतंच पाहायचं, तर सेबास्तिओ साल्गादो (जन्म १९४४, ब्राझील) या जगप्रसिद्ध छायाचित्रकारामुळे कामकऱ्यांच्या चित्रणाचा जो मार्ग रुंद झाला, त्या मार्गानं सुधारक ओलवे पुढे आणि खोलही गेले आहेत. मानवी जगण्यातले मूलभूत प्रश्न मांडणं, वण्र्यविषयाचं गांभीर्य ओळखून संयतपणे चित्रण करणं यादृष्टीनं पुढे आणि त्या विषयाच्या सर्वच्या सर्व बाजू आकळून घेण्यासाठी भरपूर माणसांना अधिकाधिक काळ टिपणं, या पद्धतीनं सखोल.
मराठीत सफाई कामगारांचे अनुभव, त्यांचे जीवनसंघर्ष आणि सद्यस्थिती मांडणाऱ्या पहिल्या पुस्तकाचं नाव ‘नरकसफाईची गोष्ट’ असं होतं. रमेश हरळकर यांच्यामुळे दशकभरापूर्वी ते पुस्तक सिद्ध होऊ शकलं. त्यापुढलं ‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ हे नाव या पुस्तकाला असणं पटण्याजोगं आहे, पण ‘सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा’ हे उपशीर्षक सर्वार्थानं योग्य आहे, असं म्हणता येणार नाही. ‘सांगितली न गेलेली’ (शब्दांविनाच, दिसणारी) कथा, या अर्थछटेचा विचार केल्यास उपशीर्षक ठीक आहे, पण पहिलेपणाचा मान अभावितपणे (पुस्तककर्त्यांपैकी कुणाचाही श्रेय-हेतू नसताना) या उपशीर्षकामुळे चिकटतो.
शहरात साचलेल्या अंधाराची सावली पाहून वाचक/प्रेक्षकानं विचारप्रवृत्त व्हावं, ही अपेक्षा पुस्तकाच्या शीर्षकातून- आणि आवरणचित्रांतून- तरी नक्कीच व्यक्त होते. परंतु विचारप्रवृत्त होणारे लोक पुढे काय करतात, याच्यावर या पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी पार पडणाऱ्या ‘भारतीय महिला फेडरेशन- ठाणे समिती’ किंवा अन्य अनेक संस्था-संघटनांना लक्ष ठेवावं लागेल. या पुस्तकातून काही विचारप्रवर्तन झालं की नाही, हे खरं तर कृतीतूनच कळेल.
ओलवे यांच्या या अंधारचित्रांनी सफाई कामगारांची गोष्ट छानच सांगितली, अशी दाद मिळणं वाईटच.
असलीच तर ही आपणा सुशिक्षित- सुसंस्कृत म्हणवणाऱ्यांचीच गोष्ट आहे : आपणदेखील अन्यायात आणि दमनशाहीत सामील आहोत ते कसे, याची गोष्ट.
‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ – सुधारक ओलवे, भारतीय महिला फेडरेशन, ठाणे, पृष्ठे – १४१,
मूल्य – १०० रुपये.
अंधारचित्रं!
मराठी भाषाभिमान्यांचे पीळ कसे कायम राहतात, याचा एक नमुना म्हणजे छायाचित्रांना छायाचित्रं म्हणावं की प्रकाशचित्रं, हा कधी न संपणारा वाद!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of nayalayachya va sanmanachya shodhat