प्रा. चार्य व. न. इंगळे लिखित क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनाधारित त्रिखंडात्मक कादंबरीचा दुसरा भाग ‘पत्री सरकार’ या नावाने प्रकाशित झाला आहे. नाना पाटील यांच्या जीवनातील १९४२ ते १९४७ या रोमहर्षक काळाचे यात आहे.
१९४२चा भारतीय स्वातंत्र्य लढा अपूर्व असा होता. त्याचे आकर्षण अनेक लेखकांना व इतिहासकारांना आहे. या लढय़ाने भारतात विविध ठिकाणी आक्रमक स्वरूप धारण केले होते. त्या वेळच्या सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो लढा आकाराला आला तो ‘प्रतिसरकार’ या नावाने ओळखला जातो. त्याविषयी प्रत्यक्ष लढय़ात सहभागी झालेल्या व्यक्तींनी व काही इतिहासकारांनी लेखन केले आहे. नाना पाटील यांचे व्यक्तिमत्त्व व कार्यपद्धती विलक्षण प्रभावी होती. त्यांच्या सहजस्फूर्त ग्रामीण ढंगाच्या प्रभावी भाषणांनी अनेकांना गुंगवून ठेवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध छोटेमोठे क्रांतिकारी गट सातारा जिल्ह्यात एकत्रित झाले होते.
प्रतिसरकारच्या चळवळीसंबंधी, तिच्या मूल्यांकनासंबंधी स्वातंत्र्योत्तर काळात जे लेखन झाले ते एकतर गौरवपर तरी आहे किंवा एका बाजूचे आहे. तसेच या लेखनात व्यक्तिसापेक्षताही मोठय़ा प्रमाणात आहे. या चळवळीचा इतिहास वस्तुनिष्ठपणे मांडणारा बृहद्ग्रंथ अद्यापि नाही. त्यामुळे या लेखनाचा लंबक बऱ्याच वेळा परस्परविरोधी भूमिका घेताना दिसतो.
या पाश्र्वभूमीवर इंगळे यांनी हाच विषय कादंबरीरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐतिहासिक घडामोडींवर कादंबरी लिहिणे हे मोठे जोखमीचे काम असते. व्यक्तिगत आवडीनिवडीमुळे व ग्रहांमुळे इतिहास काळातील घटनांच्या वाटा संदिग्ध झालेल्या असतात. इतिहासाची पुनर्रचना करताना विवेकाचे भान निखळता कामा नये याची जागरूक दक्षता लेखकाला घ्यावी लागते. मराठीत इतिहासाधारित कादंबरीलेखनात मात्र असे घडताना दिसत नाही. या कादंबरीबाबतही तेच घडले आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारच्या चळवळीचा इतिहास इंगळे यांनी एकूण २७२ पृष्ठांमधून मांडला आहे. मुख्यत्वे नाना पाटील यांचे व्यक्तिमत्त्व-कार्य व त्या परिसरातील चळवळीचे चित्रण केले आहे. एकूण सात भागांत १९४२ ते ४७ या पाच वर्षांतील प्रतिसरकारच्या वाटचालीचे चित्रण या कादंबरीत केले आहे. नाना पाटील यांचे भूमिगत होणे, अज्ञातवास, प्रतिसरकारची पूर्वतयारी, चळवळ, ग्राम-न्यायदान मंडळ, स्वातंत्र्याची सीमा व स्वातंत्र्य अशा विविध पलूंचे चित्रण यामध्ये आहे. ते करत असताना प्रतिसरकारचा काळ उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. या चळवळीतील रणनीती, विविध घडामोडीची साखळी यासंबंधीचे निवेदनही आहे. विशेषत: या लढय़ातील महत्त्वपूर्ण घटनांची जोडणी करून ही कादंबरी आकाराला आली आहे. या लढय़ातील मोच्रे, लाठीमार, गुप्तपद्धती, वडूज, तासगाव, इस्लामपूर मोच्रे, कुंडल-धुळे खजिना लूट, तुफान सेना, नागनाथअण्णा, जी. डी. बापू लाड, वसंत दादा यांचे गट व त्यांच्या सहभागाचे चित्रण आहे. काही घटनांचा वृतान्त सरस उतरला आहे. विशेषत: मोर्चाचे व न्यायदान मंडळाच्या कार्याची काही वर्णने वेधक झाली आहेत. तसेच या चळवळीतील विविध भूमिका व दिशा त्यामधून ध्वनित झाल्या आहेत.
कादंबरीतील सारे निवेदन मुख्यत्वे या चळवळीविषयी जे लेखन झाले आहे ते समोर ठेवून केले आहे. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला निव्वळ माहितीपर होते, कधी चरित्राचे रूप धारण करते, तर कधी इतिहासाचे. या चित्रणाला आणि निवेदनाला कादंबरीचे रूप प्राप्त होत नाही. लेखकाच्या दृष्टीवर या चळवळीतल्या घडामोडींचा ठसा आहे. त्यामुळे केवळ घटना सरळसोट पद्धतीने सांगितल्या आहेत. शिवाय सांगण्याचा व भाष्याचा प्रभाव असल्यामुळे इतिहास आणि कल्पित याचे बेमालूम मिश्रण करता आलेले नाही. काही वेळा कल्पिताचेही अवास्तव चित्रण केले जाते. उदा. नाना पाटील यांच्या अज्ञातवासातील रात्रीच्या मुक्कामाचे केलेले वर्णन बटबटीत स्वरूपाचे आहे. कादंबरीत गावांचे, ठिकाणांचे, व्यक्तींचे बरेच तपशीलही चुकीचे आहेत. नाना पाटलांच्या भाषणांचे व मानपत्राच्या मजकुराचे अनावश्यक दीर्घ वृतान्त निवेदनात घुसडले आहेत. कादंबरीच्या शेवटी तर नाना पाटील यांच्या भाषणांचा १५ पानांचा मजकूर दिला आहे. तसेच लेखकाला या परिसराची व तिथल्या लोकभाषेची फारशी माहिती नसल्यामुळे आपल्या परिसरातल्या भाषेतील शब्द पात्रांच्या तोंडी घुसडले आहेत. उदा. ‘ढाळज’, ‘पेंडपाला’. कादंबरीचे शीर्षकही, ‘पत्री सरकार’ हे विस्मृतीत गेलेले आहे. त्यामुळे ही कादंबरी न होता केवळ बेचाळीसच्या आंदोलनाविषयीची माहिती देणारा  मजकूर झाला आहे.
‘पत्री सरकार’
– प्राचार्य व. न. इंगळे, सुविद्या प्रकाशन, सोलापूर,
पृष्ठे – २७१, मूल्य – २५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा