गेल्या चार-पाच दशकांहून अधिक काळ लेखन करणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांचा ‘रिपोर्टिगचे दिवस’ हा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. १९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी ‘साप्ताहिक मनोहर’, ‘साधना’मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत. विविध घटनांचे संदर्भमूल्य असणारे हे लेख त्यातील जिवंत व ताज्या भाषाशैलीमुळे व तत्कालीन परिस्थितीचा अन्वयार्थ लावू पाहणाऱ्या जीवनदृष्टीमुळे आजच्या काळातही महत्त्वाचे ठरतात.
१९७० ते ७५ दरम्यानचा कालखंड हा सामाजिक घुसळणीचा कालखंड होता. आणीबाणीपूर्वीच्या या काळात भारतात आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले होते. देशातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचे सिंडिकेट व इंडिकेटमध्ये विभाजन झाले होते. जनता पक्षाची नुकतीच स्थापना झाली होती. युक्रांद, दलित पँथर, समता युवा संघटना, छात्र युवासंघर्ष वाहिनी, भूमिसेना यांच्या उदयाचा हा काळ. याच काळात जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या सत्तेला आव्हान देऊन जनआंदोलन सुरू केले होते. गुजरातमध्ये नवनिर्माण आंदोलन जोरात होते. या सर्व घटनांचे बरेवाईट परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागत होते. हे परिणाम भोगणारा सर्वसामान्य माणूसच या पुस्तकाच्या केंद्रभागी आहे. पत्रकाराबरोबरच संवेदनशील कार्यकर्त्यांच्या नजरेतून अवचट तत्कालिन ‘कॉमन मॅन’कडे आणि तत्कालिन समाजवास्तवाकडे पाहत होते, त्यांच्या जगण्याचे दाहक दर्शन घडवत होते, असे या पुस्तकातून दिसते.
प्रस्तुत पुस्तकात एकंदर सात लेख असून सर्वाचा राजकारण हा मुख्य गाभा आहे. घटनांमागचे राजकारण व त्या राजकारणाचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पदर उलगडून दाखवण्याचे काम अत्यंत मेहनतीने, शोधकपणे व चौकसपणे अवचटांनी केले आहे. या दृष्टीने ‘इंदिराबाईचा फेरा’ हा पुस्तकातील पहिलाच लेख महत्त्वाचा आहे. ‘मरिआई, अक्काबाई यांचा फेरा’ या शब्दाच्या अर्थछटेशी साधम्र्य सांगणारा हा लेख इंदिरा गांधींच्या दिवसभराच्या पुणे दोऱ्याचा वृतान्त आहे. ठोकळेबाज, सरळसोट वृतान्तापेक्षा हा वृतान्त लक्षात राहतो, तो लेखकाच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे आणि बातमीमागील बित्तंबातमी काढणाऱ्या शैलीने. इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे टिपताना लेखकाने कसबी कौशल्य दाखवले आहे. (‘साप्ताहिक मनोहर’मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख इतका लोकप्रिय झाला की अंक कमी पडला म्हणून परत छापावा लागला होता.) तत्कालीन समाजदर्शनातून अवचट काळाचा पट आपल्यासमोर जिवंत करतात.
असाच काहीसा अनुभव ‘मंत्री येती घरा’ व ‘जनआंदोलनाचा शोध’ या लेखांतून येतो. यातील प्रत्येक लेखाचा बाज स्वतंत्र आहे व प्रत्येक लेखाला स्वतंत्र ओळख आहे. ‘मंत्री येती घरा’ या लेखात जनतेमधून निवडून गेलेल्या मंत्र्यांचा संस्थानिकासारखा रुबाब दिसतो. सिस्टिमला मनाप्रमाणे वागवणाऱ्या या मंत्र्यांसमोर वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची मोर्चेबांधणी कशी चालते व त्यामागचे राजकारण कसे असते याचा ‘आँखो देखा हाल’ अवचट वाचकांसमोर मांडतात. मंत्री व मोर्चेकरी यांच्या चिमटीत सापडलेला साधा पोलीस शिपाईसुद्धा अवचटांच्या निरीक्षणातून सुटत नाही. लोकशाहीचा रंग उतरलेल्या या लेखात जे समोर घडते आहे, ते जसेच्या तसे दाखवण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सत्ता व सर्वसामान्य जनता या दोन टोकांमधील फट अवचट यातून अधोरेखित करतात.
या पुस्तकातील दीर्घ स्वरूपाचा व महत्त्वाचा लेख आहे ‘जनआंदोलनाचा शोध’. जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या या आंदोलनाचा सातबाराच जणू आपल्यासमोर ठेवला आहे. बिहारची पाश्र्वभूमी लाभलेल्या या लेखात अवचटांनी आधी केलेल्या कोणत्याही दौऱ्याची पुनरावृत्ती होऊ दिलेली नाही. पूर्वग्रह नाहीत. संपूर्णपणे नव्याने लिहिलेला हा लेख तत्कालीन आंदोलनाची स्थिती, गती व विसंगती दर्शवतो. तेंडुलकरांनी म्हटल्याप्रमाणे या लेखात अवचटांची संशयी, शंकेखोर नजर सर्वत्र भिरभिरताना दिसून येते. साधी सरळ व बेधडक शैली आणि गावगाडा ते शहर असा प्रवास या लेखातून उलगडत जातो. ‘बूथ कॅप्चरिंग’सारख्या त्या काळातील नव्या दहशतवादी तंत्राकडे बोट दाखवले जाते. या लेखात अल्प शब्दांत जयप्रकाश नारायण यांचे शब्दचित्र वाचायला मिळते. ते महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराच्या महत्त्वाच्या मुद्दय़ाभोवती फिरणारा हा लेख आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतो.
समाजाच्या उपेक्षित स्तरावरील जीवनाचे दर्शन अवचटांनी आपल्या अनेक लेखांमधून घडवले आहे. याच समाजाच्या राजकीय बाजूचे दर्शन अवचट ‘नाभिक समाजाचे संमेलन’ व ‘अँग्री पँथरची झुंज’ या दोन लेखांतून घडवतात. शिक्षणामुळे राजकीय जाणिवा जागृत झालेल्या, वंचित, मागासलेल्या समाजातील विरोधाभास अवचटांनी टिपला आहे. नाभिक समाजातील विविध पोटजाती व त्यांची अंतर्गत राजकीय कुरघोडी ते बारीकबारीक प्रसंगातून टिपतात; तर ‘अँग्री पँथरची झुंज’ हा लेख दलित पँथर या लढवय्या संघटनेच्या फुटाफुटीचा विस्तृत व तटस्थ अहवाल देतो. पण प्रबंधासारखा नाही तर जिवंत. अवचटांच्या या लेखावर पँथरमध्ये फूट पाडल्याचा ठपका ठेवला गेला होता. लेख वाचून झाल्यावर ‘दूध का दूध और पानी का पानी’ होते. ढाले व ढसाळ या दोन्ही पँथर गटांना समजावून घेऊन त्यांची मते व आक्षेप लक्षात घेऊन अवचटांनी कोणा एका गटाची बाजू न घेता नि:पक्षपातीपणे जे मांडले आहे ते पुरेसे बोलके आहे. रिपब्लिकन पक्षातील फूट, भागवत जाधवचा मृत्यू या घटनांच्या संदर्भासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. या लेखात काही साहित्यिक संदर्भ येतात.
या लेखाबरोबरच अधिक साहित्यविषयक राजकारण व समाजकारणाचे दर्शन घडवणारा लेख म्हणजे ‘साहित्य संमेलनाध्यक्षांचे सामाजिक विचार!’. यातील उद्गारवाचक चिन्ह लेखातील शीर्षकाचा व आशयाचा विरोधाभास शांतपणे व्यक्त करते. साहित्यविषय व सत्ताकेंद्र असलेल्या अध्यक्षपदी पुराणमतवादी, कर्मठ विचारांची, हिटलरसमर्थक व्यक्ती निवडून आल्यावर ती कशा प्रकारे आपले सामाजिक विचार (?) प्रकट करते, ते या लेखात वाचायला मिळते. पु. भा. भावे यांच्याबरोबर अवचटांच्या झालेल्या संभाषणातून लेख आकाराला येतो. अवचट भावेंच्या आग्रही व ठाम मतांच्या माध्यमातून त्यांची मर्यादा काहीही टिपणी न करता स्पष्ट करतात. मराठी साहित्याच्या महत्त्वाच्या पदी स्थानापन्न व्यक्तीच्या संकुचित विचारांचा पर्दाफाश करतात. त्या वेळी ही मुलाखत सनसनाटी ठरली होती.
सत्ताकारण, राजकारण, समाजकारण हे पैलू या दोन्ही लेखांतून अवचट आपल्या पुढय़ात मांडतात.
सर्व घटनांना, विचारसरण्यांना अवचट एकाच मोजपट्टीतून मोजू पाहतात. या मोजपट्टीचा निकष म्हणजे सत्य, नैतिकता हा होय. यामुळे सत्यशोधक मंडळीही त्यांच्या सूक्ष्म नजरेतून सुटत नाहीत. ‘सत्यशोधकांचे सत्यशोधन’ हे शीर्षक बरेच काही व्यक्त करते. सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या बाळासाहेब देसायांच्या वागण्याचा दंभस्फोटच जणू अवचट घडवून आणतात. महत्त्वाचे तपशील व निखळ स्वच्छ नजरेने ते घटनेचे व व्यक्तीचे स्कॅनिंग करतात.
अवचटांचे एकंदर लिखाण हे त्या परिस्थितीचे छायाचित्र असते. त्यात कुठेही भेसळ, हिणकसपणा, फापटपसारा दिसत नाही, इतके ते प्रोफेशनल आहे. ते वृत्तपत्रीय असूनही शिळे वाटत नाही. आपण इतरांपेक्षा वेगळे काहीतरी सांगतो आहोत असा अट्टहासही त्यांच्या लिखाणात नाही. त्यांच्या लेखणीच्या अनुभवांची मोठी ताकद हे लेख वाचताना पाहायला मिळते. ते दृश्यात्मकही आहेत. त्यातील प्रसन्न शैलीने आपण बातमीवजा कोरडा, रुक्ष लेख वाचतो आहोत असे न वाटता, त्या लेखनाला अनुभवकथनाचा दर्जा सहजच प्राप्त होतो. यात कोठेही पंडिती भाषा, आकडेवारीची भेंडोळी अंगावर भिरकावणे नाही. त्यामुळे तो वाचकांना अधिक आपलेसे करतो.
‘रिपोर्टिगचे दिवस’ या पुस्तकाचे मोल सर्वसाधारण वाचक, विद्यार्थी, पत्रकार या सर्वासाठीच आहे. १९७० ते ७५ हा मोठा कॅनव्हास या पुस्तकामुळे आपल्या दृष्टिक्षेपात येतो. ‘स्टाइल इज द मॅन’ ही उक्ती अवचटांबाबत खरी ठरते. विचारभाषेचे बोलीभाषेशी असणारे जे नाते अशोक केळकरांना अपेक्षित आहे ते येथे दिसते. पुस्तकातील अवचटांचे ‘चार शब्द’ हे कथन व लेखांच्या शेवटी ‘आज काय वाटते?’ हे अनुभवकथन पुस्तक समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
रिपोर्टिगचे दिवस – अनिल अवचट, समकालीन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २०७, मूल्य – २०० रुपये.

Sunil Tatkare
Sunil Tatkare : “आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून…”; अमित शाह-शरद पवार भेटीनंतर सुनील तटकरेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
News About Osho
Osho : आचार्य रजनीश अर्थात ओशो कोण होते? त्यांच्या विषयीची ही रहस्यं तुम्हाला ठाऊक आहेत का?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Story img Loader