सयाजीराव गायकवाड हे स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक द्रष्टा आणि लोकशाहीवादी संस्थानिक होते. बडोदा हे त्यांचं संस्थान त्या काळात कला-साहित्यापासून ते आधुनिक बदलांपर्यंत अनेक गोष्टींसाठी वाखाणलं गेलं होतं. अशा या सयाजीरावांचं दीडशेवं जयंती र्वष अलीकडेच संपलं. त्यानिमित्ताने त्यांच्या भाषणाचे हे तीन खंड पुनप्र्रकाशित करण्यात आले आहेत. पहिल्या खंडात शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान या विषयावरील ३२ भाषणांचा समावेश आहे. १८७९ ते १९३७ या काळात वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रसंगोपात केलेल्या आणि इतर काही भाषणांचा हा संग्रह आहे. ‘शिक्षण हे प्रगतीपर भावनांचे बीजारोपण करण्याचे साधन आहे’ अशी सयाजीरावांची धारणा होती. त्यामुळे ते प्राथमिक शिक्षण, स्त्रीशिक्षण याविषयी कमालीचे आग्रही होते. तसेच धार्मिक प्रश्नांबाबतही सहिष्णू आणि उदारमतवादी होते. या संग्रहातून त्यांचा शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान याबाबतचा दृष्टीकोन जाणून घेता येते.
दुसऱ्या खंडात साहित्य, कला आणि संस्कृती या विषयावरील ३२ भाषणांचा समावेश आहे. सयाजीरावांना साहित्य, कला, संस्कृती याविषयी खूपच आस्था आणि ममत्व होते. त्यामुळे त्यांनी या कलांच्या वाढीसाठी, त्यांच्या जतनासाठी आपल्या बडोदा संस्थानात हरप्रकारे प्रयत्न केले. वेगवेगळ्या कलाकारांना संस्थानात मानाने बोलावून घेतले. त्यांच्यावर त्यांच्या आवडीच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. पुण्याहून दामोदर सावळाराम यंदे यांच्यासारख्या तरुणाला बोलावून त्यांच्याकडे प्रकाशनसंस्था आणि छापखान्याची जबाबदारी सोपवली. त्यामागची त्यांची कारणमीमांसा आणि विचारदृष्टी या भाषणांमधून जाणून घेता येते. धर्माचं मानवी आयुष्यात नेमकं काय स्थान असतं, याविषयी शिकागो येथे १९३३ साली भरलेल्या दुसऱ्या विश्वधर्म परिषदेचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणात नेमकेपणानं सांगितलं आहे. पण बालसंमेलन, संगीत जलसा अशा काही कार्यक्रमांत केलेली जुजबी भाषणंही यात घेतली आहेत.
तिसऱ्या खंडात राज्यप्रशासन या विषयावरील २० भाषणांचा समावेश आहे. सयाजीराव पारतंत्र्याच्या काळात बडोदा संस्थानचे राजे होते. पण त्यांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती. राजा हा कल्याणकारी असला पाहिजे, तो जनतेला उत्तरदायी असला पाहिजे, ही त्यांची धारणा होती आणि तसे त्यांचे वागणे-जगणेही होते. सुप्रशासनासाठी कुशल मनुष्यबळ मिळवावे लागते, ते योग्य रीतीने तयार करावे लागते आणि जपावेही लागते, सर्व समाजघटकांना विकासप्रक्रियेत सामावून घ्यावे लागते, जनसामान्यांपर्यंत विकासाची फळे पोचावी लागतात, ही सयाजीरावांची प्रशासनाबाबत प्रामाणिक भावना होती. त्याची झलक या खंडात पाहायला मिळते.
या तीनही खंडांतून सयाजीरावांचं द्रष्टेपणच प्रतिबिंबित होतं. या खंडांना डॉ. रमेश वरखेडे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्याही वाचनीय आहेत.
‘सयाजीराव गायकवाड यांची भाषणे’,
खंड-१ : शिक्षण, धर्म आणि तत्त्वज्ञान, पृष्ठे – १४२, मूल्य – १२० रुपये,
खंड-२ : साहित्य, कला आणि संस्कृती, पृष्ठे – १७४, मूल्य – १५० रुपये,
खंड-३ : राज्य प्रशासन, पृष्ठे – १७४, मूल्य – १५० रुपये,
प्रकाशक – साकेत प्रकाशन, औरंगाबाद.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा