मोजकेच पण लक्षणीय समीक्षालेखन करणाऱ्या सुधा जोशी यांच्या ‘कथा : संकल्पना आणि समीक्षा’ या समीक्षा ग्रंथाला एक तप उलटून गेल्यावर त्यांचा ‘वेध : साहित्याचा व साहित्यिकांचा’ हा दुसरा समीक्षा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. आधुनिक कथनमीमांसेच्या परिदृष्टीतून त्यांनी केलेल्या समीक्षात्मक लेखनाचा हा संग्रह आहे. प्रास्ताविकात सुधाबाईंनी म्हटल्याप्रमाणे, एकेका सुट्टय़ा साहित्यकृतीची समीक्षा करणारे लेख ‘समीक्षा’ या भागात, काही साहित्यिकांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे लेख ‘संस्मरण’ या भागात आणि काही दीर्घ वाङ्मयीन मुलाखती ‘संवाद’ या भागात असे या ग्रंथाचे त्रिविध स्वरूप आहे.
या समीक्षापर लेखांचे बाह्य़रूप तत्त्वत: वेगळे असले तरी त्यामागचे समान सूत्र म्हणजे सुधाबाईंची साहित्यविषयक डोळस आस्था! त्यांची चिंतनशीलता, त्यांचे मर्मग्राही आकलन आणि त्यांची सुस्पष्ट मांडणी! वाङ्मयीन चर्चासत्रे, परिसंवाद, पुरस्कार समारंभ अशी काही निमित्ते या लेखनाला कारणमात्र झाली असली तरी या लेखांचे स्वरूप मात्र नैमित्तिक नाही.
या ग्रंथात गंगाधर गाडगीळांवर सर्वाधिक (चार लेख!) आहेत आणि एका अर्थी ते स्वाभाविकच म्हणावं लागेल. कारण सुधाबाईंचा पीएच. डी. प्रबंधाचा विषयच मुळी ‘गंगाधर गाडगीळ : एक चिकित्सक अभ्यास’ हा होता.
‘समीक्षा’ या पहिल्या भागात ‘विद्याधर पुंडलिक आणि त्यांचे कथाविश्व’, ‘दुर्दम्य : गंगाधर गाडगीळ’, ‘बालकाण्ड : ह. मो. मराठे’, ‘एका मुंगीचे महाभारत’, ‘झळाळ’ व ‘शोभा चित्रे यांचे ललित लेखन’ हे लेख समाविष्ट केले आहेत. सुधाबाईंनी या लेखांतून अतिशय तपशिलात जाऊन, समग्रपणे त्या त्या साहित्यकृतींचे मर्म उलगडून दाखविले आहे. विद्याधर पुंडलिक आणि शोभा चित्रे यांच्या साहित्यावरील लेख म्हणजे लेखकाभ्यासाचे उत्तम नमुने आहेत. पुंडलिकांचे पूर्णतावादी (परफेक्शनिस्ट) असणे आणि त्यांची परिष्करणशीलता यातले नाते त्यांनी स्पष्ट केले आहे. नवकथेमुळे पुंडलिकांना आणि त्यांच्या समकालीन कथाकारांना निर्मितीसाठी एक मुक्त अवकाश मिळाला पण त्याचबरोबर नवकथेच्या तोडीचे आणि अभिनव करण्याचे गर्भीत आव्हानही उभे राहिले, या वस्तुस्थितीचे नेमके भान राखून त्यांनी पुंडलिकांच्या कथेची बलस्थाने सप्रमाण विशद केली आहेत. मात्र त्याचबरोबर ‘पुंडलिक हे ‘बीजधर्मी’, परंपरेला ‘नव’विण्याचे सृजनशील सामथ्र्य असलेले लेखक नव्हते’ असा नि:संदिग्ध अभिप्रायही त्यांनी नोंदवला आहे.
निवडलेली साहित्यकृती ज्या साहित्य प्रकारात मोडते, त्या प्रकाराची पाश्र्वभूमी आणि परंपरा यांची थोडक्यात पण नेटकी मांडणी करून त्या पृष्ठभूमीवर सुधाबाई साहित्यकृतीची समीक्षा करतात. उदा. ‘झळाळ’विषयी लिहिताना ललितगद्याविषयीची संकल्पना स्पष्ट करतात तर ‘दुर्दम्य’ची समीक्षा करताना चरित्रात्मक कादंबरीची चर्चा करतात.
वासंती मुझुमदार आणि शोभा चित्रे यांच्या ललित लेखनाचा परामर्श सुधा जोशी यांच्या स्वागतशील दृष्टिकोनाचा प्रत्यय देतो तर ‘एका मुंगीचे महाभारत’ हा लेख त्यांच्यातील मर्मग्राही चिकित्सकाचा! उदा. गाडगीळांच्या आत्मचरित्रातून आकारत गेलेली निवेदक ‘मी’ची प्रतिमा कशी आहे- असा प्रश्न उपस्थित करून त्या म्हणतात, ‘आपण एक सर्जनशील कलावंत आहोत याचे जागरूक भान, त्यासंबंधातली आत्मसन्मानाची, आत्मप्रतिष्ठेची भावना, स्वत:मधल्या या कलावंताबद्दलचे तीव्र कुतूहल आणि हे कलावंतपण, हे लेखकपण हेच आपले स्वत्त्व, तोच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा याबद्दलची दृढ आणि नि:संदिग्ध जाणीव हे या ‘मी’चे विशेष आहेत.’
‘संस्मरणे’ या भागात वा. रा. ढवळे, श्री. पु. भागवत आणि गंगाधर गाडगीळ यांच्या वाङ्मयीन व्यक्तित्त्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध सुधाबाईंनी घेतला आहे. संपादक, साहित्यसेवक आणि लेखक वा. रा. ढवळे यांच्यावरील लेखामुळे आजच्या वाचकाला ‘ढवळे विद्यापीठ’ ही काय चीज होती, याची कल्पना येईल. वाचकांची साहित्यविषयक क्षमता वृद्धिंगत व्हावी, असे अभिरुची संस्करणाचे कार्य अविरत करणारे ढवळे, माणसातील सर्जनशीलतेचा सातत्याने शोध घेणारे, परंपरेतील सत्त्वांशाची बूज राखणारे, जीवनाच्या सर्वच व्यवहारात नैतिकतेचा कणा जपणारे आणि ‘आपल्या लेखकांबरोबर आपणही वाढलो’ असं अभिमानानं सांगणारे श्री. पु. भागवत आणि लेखक म्हणून प्रखर आत्मभान असलेले, साहसी वृत्तीचे व अस्वस्थ कलावंत गंगाधर गाडगीळ यांच्यावरील लेख वाचनीय तर आहेतच, पण आवेश, अभिनिवेश आणि विभूतीपूजन टाळून सहृदयतेने आणि तरीही पुरेशा वस्तुनिष्ठपणे अशा प्रकारचे लेखन कसे करावे, याचा वस्तुपाठ म्हणावे लागतील. श्री. पुं. वरच्या लेखात सुधाबाईंना त्यांच्याविषयी वाटणारा जिव्हाळा आणि आदर फार हृद्यपणे उतरला आहे.
‘संवाद’ या तिसऱ्या भागात श्री. पु. भागवत, गंगाधर गाडगीळ आणि रत्नाकर मतकरी यांच्या मुलाखती समाविष्ट केल्या आहेत. सुधाबाईंनी विचारलेले नेमके आणि सुस्पष्ट प्रश्न आणि त्यांचा क्रम लक्षात घेता, या मुलाखती परिचित पठडी ओलांडून गेल्या आहेत, असे म्हणावेसे वाटते. त्या त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनांचा, साहित्यिक भूमिकांचा उलगडा होईल, असे प्रश्न त्या विचारतात. त्यामागे सुधाबाईंचा अभ्यास, अभ्यासविषयासंबंधीची आस्था आणि मर्मदृष्टी असल्याचे प्रत्ययास येते. उदा. गाडगीळांना त्यांनी त्यांच्या ‘बौद्धिक दंगेखोरी’बद्दल बोलतं केलं आहे, तर रत्नाकर मतकरींच्या दोन्ही मुलाखतींमधून त्या कथाकार मतकरी आणि चतुरस्र कलावंत मतकरी- असे त्यांच्या विविधांगी निर्मितीमागील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात.
सुधाबाईंचा पिंड मुळात अध्यापक- अभ्यासकाचा. त्यामुळे हे समीक्षालेखन जड वा क्लिष्ट झालेले नाही. आवश्यकतेनुसार विविध समीक्षा दृष्टींचा अवलंब करीत आणि मोकळ्या, स्वागतशील वृत्तीने हे लेखन झाले आहे.
‘बालकाण्ड’ या ह. मो. मराठे यांच्या आत्मकथनाच्या संथ आणि पुनराघाती लयीचं समर्थन सुधाबाईंनी केलं आहे. अशा शैलीमुळे कालावकाश लांबवल्याचा प्रत्यय दिल्याचं त्या नोंदवतात. अशासारख्या काही अभिप्रायांबाबत दुमत संभवते, पण अशा जागा या ग्रंथात जवळजवळ नाहीत.
वेगवेगळ्या अभिनिवेशांच्या आणि अस्मितांच्या सध्याच्या गदारोळात सत्त्वसंपन्न काय आणि नि:सत्त्व काय, याविषयी संभ्रमावस्था झालेली असताना, समीक्षेची आवश्यकताच काय- अशीही मते हिरीरीने मांडली जात असताना ‘सहृदय आणि तरीही वस्तुनिष्ठ अशा समीक्षा व्यापाराने रसिकांची अभिरुची संपन्न होते, उन्नत होते’ या विधानाची साक्ष पटवणारा हा समीक्षा ग्रंथ आहे, हे निश्चित!
‘वेध : साहित्याचा व साहित्यिकांचा’
– डॉ. सुधा जोशी,
मौज प्रकाशन गृह, मुंबई,
पृष्ठे – २१४, मूल्य – २०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा