‘पृथ्वीचे मारेकरी’, ‘पर्यावरणीय दहशतवाद’, ‘कोरड’, ‘भुकेचा ज्वालामुखी’ ‘.. तसं उगवेल’ आणि ‘शतकाला कौल’ अशी सहा प्रकरणे या पुस्तकात आहेत.
पर्यावरण हा देऊळगावकर यांच्या आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय असल्याची प्रचीती यातून वारंवार येते. माणसाने चालवलेल्या पर्यावरणाच्या विध्वंसामुळे जगाचेच हवामान बदलत चालले आहे आणि भविष्यातल्या (बऱ्या -) वाईटाची फळे ही माणसालाच भोगावी लागणार आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात आपण कसे वागतो यावर आपला भविष्यकाळ ठरणार आहे. जगातल्या नैसर्गिक संपदेचा विवेकशक्ती शाबूत ठेवून उपयोग घ्यायचा की ओरबाडून उपभोग घ्यायचा याचाच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. हे सांगताना ‘पृथ्वीवर आलेल्या पर्यावरणीय संकटास धनिकांची टोळीसत्ताच जबाबदार आहे,’ असा निष्कर्ष देऊळगावकर नोंदवतात. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळत नसताना बाटलीबंद पाणी आणि शीतपेये मात्र गावागावांतल्या फाटय़ावर उपलब्ध आहेत. हे चित्र पाहिले म्हणजे नकळत अनेक वस्तू आपल्याला ‘जीवनावश्यक’ का झाल्या आहेत, त्या खरेदीमागे आपली काय धारणा असते, यासारखे प्रश्न पडायला हवेत, मात्र सहजपणे होत असलेल्या बधिरीकरणात या प्रश्नांचा आपल्याला विसर पडतो. ‘जग बदलायचे असेल तर जीवनशैली बदला, उपभोग कमी करा, वाटून घेणं, सहभागी करणं वाढवा,’ असा पर्यावरणतज्ज्ञांचा दाखला देत हे ‘पृथ्वीचे मारेकरी’ या प्रकरणात पर्यावरणाच्या नासाडीची भयावह स्थिती आपल्यापुढे मांडली आहे. विकासाला विवेकाची जोड नसेल तर अवघे जगच या प्रक्रियेत भरडून जाईल, अशी धोक्याची घंटा देतात.
‘पर्यावरणीय दहशतवाद’ स्पष्ट करताना टोळीसत्तेच्या माध्यमातून जी कारस्थाने आणि षड्यंत्रे पद्धतशीरपणे रचली जातात आणि आदिवासींना टाचेखाली रगडण्याचे डावपेच किती निर्दयीपणे राबवले जातात, याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. आपापल्या भागातील जैवविविधता जतन करण्याचे उपजत ज्ञान हे त्या त्या भागातील आदिवासींना असते. आपण त्यांना प्रोत्साहित करण्याऐवजी आपलेच निर्णय त्यांच्यावर लादतो. आपल्या या असंस्कृत अर्थ-राजकारणांची फळे पुढे सर्वच समाजाला भोगावी लागतात. सध्या राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्हे दुष्काळाने होरपळत असताना ‘कोरड’ या प्रकरणाची दाहकता आणखीच परिणामकारक ठरते. आटणारे जलस्रोत, वाढणारी लोकसंख्या या पाश्र्वभूमीवर संघर्ष हा जणू पाण्याचा समानार्थी शब्द झाला आहे. पाण्यासाठी गाव ते अगदी देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या कलहाची अनेक उदाहरणे दिली आहेत. नेपाळ, पाकिस्तान, म्यानमार, अफगाणिस्तान, भूतान आणि भारतासारख्या देशांमधील जलव्यवस्थापन व पर्यावरण हिमालयावर अवलंबून आहे. तो वाचला नाही तर या देशांचे भवितव्य अंधकारमय असेल.
यातल्या प्रत्येक प्रकरणात केवळ प्रश्नांचे गांभीर्य मांडलेले नाही तर पर्यायही सुचवले आहेत. एकाच वेळी दु:स्थितीचे दर्शन घडवताना आपल्यासमोर आरसा धरण्याचे आणि उपाय मांडण्याचे कामही केले आहे. ‘सहय़ाद्री पर्वतावर कोकणच्या बाजूने एक मीटर रुंद व एक मीटर खोलीचा समतल चर खोदून त्यातील पाणी कालवे व बोगद्यांद्वारे देशावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये आणले तर अभिनव नदी जोडणी होऊ शकते,’ हा लातूरच्या पांडुरंग तोडकर यांचा प्रस्ताव किंवा विकास अभ्यासक जयंत वैद्य यांनी ‘कळसूबाई हरिश्चंद्र डोंगरावरून समतल चर खोदल्यास विजेचा वापर न करता तेरणा नदीत पाणी आणता येतं,’ असा सुचवलेला पर्याय हे पुस्तक आपल्यापुढे ठेवते. अशा मूलगामी आणि कमी खर्चिक उपायांमध्ये आपल्या राज्यकर्त्यांना रस नसतो. केवळ राज्यकर्तेच या प्रश्नावर गाफील आहेत असे नाही तर पाण्याच्या थेंबाचे महत्त्व न जाणणारे आपण सर्वच जण या समस्येला जबाबदार आहोत याची जाणीवही या पुस्तकातून प्रकर्षांने होते.
‘सुदान’मधील दुष्काळाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या केविन कार्टर या छायाचित्रकाराला पुलित्झर पारितोषिक मिळते, मात्र सुदानमधील उपासमार, भूकबळी यामुळे विषण्ण आणि विमनस्क झालेला हा छायाचित्रकार आत्महत्या करून जगाचा निरोप घेतो, अशी अस्वस्थ करणारी भूक ‘भुकेचा ज्वालामुखी’ या प्रकरणात वेगवेगळ्या संदर्भानिशी आपल्यासमोर येते. टोकाची आर्थिक विषमता, धान्याने भरलेली गोदामे आणि उपाशी जनता, पाण्याच्या बाटल्यांचा ढीग आणि हंडाभर पाण्यासाठीची वणवण, आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार आणि बैलाऐवजी बायकोलाच जुंपून केलेली नांगरणी, एकीकडे अपचन आणि दुसरीकडे कचऱ्यातून अन्न वेचणारे हात अशी आपल्या देशातली दोन ‘जगं’ हा भुकेचा ज्वालामुखी आणखी गडद करतो.
या पुस्तकात अॅडम स्मिथपासून ते अमर्त्य सेनपर्यंत आणि ऑस्कर वाइल्डपासून ते स्वामिनाथनपर्यंत अनेकांची ‘अवतरणे’ दिली आहेत. ‘तसं उगवेल’ या प्रकरणात शेतीधंद्यावरील अरिष्टांचा मागोवा घेण्यात आला आहे. ‘दहा तोंडांचा रावण’ असे स्वरूप असलेल्या शेतीप्रश्नांची मांडणी करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागील घुसमट आणि प्रश्नांचा जीवघेणा कोंडमारा व्यक्त केला आहे. रासायनिक खतांसाठीची मारामार, बियाणांचा काळाबाजार, हवामानातली अनिश्चितता, बाजारभावातील घसरण अशा अंतहीन मालिकेची जंत्री मांडली आहे. परिश्रमपूर्वक गोळा केलेले संदर्भ, प्रश्नांबद्दलची जिवंत आस्था, विकासाच्या प्रक्रियेत वंचितांच्या अस्तित्वभानांचा विचार आणि स्वत:भोवती घिरटय़ा घेत जगणाऱ्यांच्या जगात वंचितांना हाकलून देण्यासाठीच राबविली जाणारी धोरणे या पाश्र्वभूमीवर ‘विश्वाचे आर्त’ने घातलेली साद महत्त्वाची आहे.
‘विश्वाचे आर्त’ –
अतुल देऊळगावकर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई,
पृष्ठे – १८८, मूल्य – २५० रुपये.
विवेकाला घातलेली साद
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-03-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review of vishwache aart by atul deulgaonkar