पक्षी नसलेलं आभाळ कसं असेल, ही कल्पनाही आपण करू शकत नाही.. सहज नजरेस पडलेल्या एखाद्या पक्ष्याच्या हालचालींवर आपली नजर खिळते, त्याच्या इवल्याशा छबीवर आपण मुग्ध होतो.. पक्ष्यांविषयी मनात दडलेली असंख्य कुतूहलं त्यानिमित्ताने जागी होतात. हा काय खात असेल, त्याचं घरटं कसं असेल, त्यानं ते कसं बांधलं असेल, कसं असेल त्याचं कुटुंब, आपल्या पिल्लांचा सांभाळ कसा करत असेल, कशी विश्रांती घेत असेल वगैरे वगैरे. भोवताली दिसणाऱ्या पक्ष्यांबाबत आपल्या मनातल्या रेंगाळणाऱ्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात किरण पुरंदरे लिखित ‘पक्षी – आपले सख्खे शेजारी’ या पुस्तकात. पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे यांच्या ‘पक्षी’ या पुस्तकमालिकेतील हे पहिले पुस्तक. केवळ पक्ष्यांची रंगीत छायाचित्रे आणि त्या पक्ष्याशी संबंधित माहितीची जंत्री एवढंच या पुस्तकाचं स्वरूप नाही, तर त्या पक्ष्यांना जाणून घेता यावं, आपल्याभोवती वावरणाऱ्या या पक्ष्यांशी आपल्याला मैत्र जोडता यावं, यासाठी केलेला हा प्रयास आहे. पक्ष्यांना शोधण्यासाठी आपली नजर भिरभिरावी, त्यांना निरखताना आपली सौंदर्यदृष्टी जागी व्हावी, त्यांच्या किलबिलाटाचा- त्यातील निरनिराळ्या आवाजांचा अर्थ आपल्याला ओळखता यावा, यासाठी या पुस्तकात दिलेली माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल.
या पुस्तकात वसाहती किंवा बागांमध्ये दिसणाऱ्या काही पक्ष्यांची माहिती समाविष्ट केली आहे. या पुस्तकात प्रत्येक पक्ष्याचं नाव, त्याची इतर मराठी नावं, सध्याचं इंग्रजी नाव, आधीचं इंग्रजी नाव, शास्त्रीय नाव, आकार, लांबी ही माहिती लेखाच्या सुरुवातीसच दिली आहे. एकाच पक्ष्याची स्थानिक किंवा बोलीभाषेतील एकापेक्षा जास्त नावं असू शकतात. मात्र, त्याचं शास्त्रीय नाव एकच असतं. यावरून कोणत्या पक्ष्याबद्दल बोलत आहे, हे लगेच उमजू शकते.
मुळात पक्षी कसे निर्माण झाले, पहिला पक्षी कोणता, हा कुणाच्याही मनात डोकावणारा प्रश्न. त्याची उत्तरं, संबंधित संशोधनांचे दाखले देत त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न पहिल्या प्रकरणात लेखकाने केला आहे. पक्ष्यांची शरीररचना, वैशिष्टय़े, सहजप्रेरणा सांगितली आहे. पक्ष्यांची शरीररचना, सवयी, ऋतू, खाण्याची उपलब्धता यावर पक्ष्यांचा अधिवास कसा अवलंबून असतो, याविषयी स्वारस्यपूर्ण माहिती यात दिलेली आहे.
पक्ष्यांची निसर्गातील नेमकी भूमिका विशद करताना पक्षी हे परिस्थितिकीतील (ecology) बदलांना कसे प्रतिसाद देतात आणि त्यातून परिसंस्थेविषयी (ecosystem) कुठल्या सूचना मिळू शकतात, हे स्पष्ट केले आहे. मानव आणि पर्यावरणाला पक्ष्यांचे जे अनेक उपयोग आहेत, त्याचा धावता आढावा लेखकाने घेतला आहे. मोठय़ा प्रमाणात व वेगाने वाढणारे कीटक उभं पीक खाऊन फस्त करतात. मानवासाठी तसेच पर्यावरणासाठी हा मोठा धोका असतो. पक्षी कीटकांचा नाश करून नुकसान टाळतात.
घुबड, ससाणे, श्येन आणि इतर शिकारी पक्षी घरातल्या आणि शेतातल्या उंदरांवर नैसर्गिक नियंत्रण कसे राखतात आणि त्यामुळे धान्याची बचत कशी होते, हे लेखकाने आकडेवारीच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. निसर्गाचे सफाईकार, बीजप्रसारक म्हणून पक्षी बजावत असलेली अनन्यसाधारण कामगिरी, पाणकावळे, पाणकोळी, गॅनेट्ससारख्या सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून तयार होणारं उत्तम खत, परागीभवनासाठी पक्ष्यांची अत्यावश्यक ठरणारी मध्यस्थी या सर्वाचा विचार यात करण्यात आला आहे.
पाहिलेल्या पक्ष्यांची, त्यासंबंधित अनुभवलेल्या महत्त्वाच्या नोंदी कशा कराव्यात, हे या पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पक्ष्यांचे आकारमान लिहिताना इतर पक्ष्यांच्या तुलनेत तो लहान-मोठा असल्याची नोंद करणे, पक्ष्यांचे रंग अथवा त्याच्या रंगछटांची नोंद, त्या पक्ष्याचं वैशिष्टय़, नर-मादी यांच्यातील फरक, पक्ष्यांच्या घरटय़ांचे प्रकार व बांधणी, घरटय़ाचा रंग, कोणत्या झाडावर आणि किती उंचीवर बांधलं आहे याविषयीची माहिती, पक्ष्याचा आवाज – गोड की कर्कश, शिट्टीसारखा की गाण्यासारखा, सलग की थांबून थांबून, रात्री की दिवसा यांसारख्या नोंदी, आपण पक्षी पाहिला तेव्हा तो काय करत होता याची नोंद, पक्षी पाहिला ते स्थान, काळ-वेळ, दिनांक, ऋतू, पक्ष्याचा आहार, पक्षी स्थायिक आहे की स्थलांतरित, तिन्हीसांजेस झाडावर बसलेल्या पक्ष्याच्या आकृतीवरून तो कसा ओळखावा, याविषयीची टिपणं कशी काढावीत आणि त्याचे महत्त्वही लेखकाने हातचे न राखता सांगितले आहे. पक्ष्यांची उडण्याची पद्धत, त्यांच्या लकबी, त्यांचा विशिष्ट स्वभाव, त्यांचे निवासस्थान याविषयीही पुस्तकात उपयुक्त माहिती दिली आहे. त्या पक्ष्याचा आवाज, तो कुठे दिसतो, त्याचं वैशिष्टय़, त्याचा आहार याविषयीही सांगितले आहे. यासोबत पक्ष्यांची अत्यंत बारीक निरीक्षणं व रंजक नोंदी लेखकाने दिल्या आहेत. ही टिपणं देताना त्या पक्ष्याबाबतचा त्यांना आलेला एखादा रंजक अनुभवही लेखकाने नमूद केला आहे.
या पुस्तकात आपल्या भोवतालचे अनेक पक्षी आपल्याला भेटतात. ‘अरे याचं नाव हे का?’ असं वाटून जातं. या पक्ष्यांबाबत लिहिताना केवळ माहितीची जंत्री दिलेली नाही तर त्या पक्ष्याचं अनोखं वैशिष्टय़ वाचून आपण हरखून जातो. यात लाळयुक्त धान्य चोचीतून आपल्या पिल्लांना भरवणाऱ्या कबुतराविषयी आपल्याला नव्यानं कळतं. जेव्हा खायचं नसतं तेव्हा खाद्य लपवून गरज पडेल तेव्हा खाणारा गावकावळा आपल्याला भेटतो, दुपारच्या शांत वेळी झाडाच्या आडव्या फांदीवर बैठक जमवून मजेदार आवाज काढणारा काळाकुट्ट डोमकावळा भेटतो, गुंजेसारखे लालबुंद डोळे असणारा नर कोकीळ आणि तपकिरी रंगाची आणि अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके, चट्टेपट्टे असणाऱ्या मादी कोकिळेविषयीही यात लिहिले आहे. चपळ हालचाली करणारा आणि गरुड, ससाणे यांसारख्या मोठय़ा भक्षक पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांना हुसकावू लावणारा कोतवालही आपल्याला भेटतो. हिरव्या-पिवळ्या रंगाचा आणि डोळ्यांभोवती चष्म्यासारखी पांढरी कडी असणारा चष्मेवाला, शेपटीच्या खाली गोंडय़ासारखी दिसणारी तांबूस रंगाची सैलसर पिसं असणारा चीरक, सूर्योदयाच्या वेळी ललकारी देणारा खंडय़ा, उडण्यात सफाई आणि पंखांवर ताबा असणारी घार यांची वैशिष्टय़े समजण्यास आपल्याला मदतच होईल.
यात आणखीही काही पक्ष्यांची अफलातून वैशिष्टय़े आणि त्यामागची कारणपरंपराही लेखकाने सांगितली आहे. चिखल गोळा करून त्यात आपली लाळ मिसळून त्या चिखलाचं चिऱ्यावर चिरा ठेवून घरटं बांधणारी खडपाकोळी, पावडरीसारख्या मऊ मातीत धुलिस्नान करण्याची गरज असणारी चिमणी, घरटय़ाजवळ कोणताही शिकारी पशू-पक्षी येताना दिसला की जमिनीवर उतरून, पंख पसरून जखमी असल्याचं सोंग घेऊन भक्षकाचं लक्ष आपल्याकडे वळवून पिल्लांचं रक्षण करणारी टिटवी, मोठय़ा आकाराच्या चेंडूसारखं घरटं आणि त्याचं वरच्या दिशेला वाटोळं भोक- म्हणजे दार असणारा मुनिया, वठलेल्या फांद्यांमध्ये चोचीने खोदून रुपयाच्या मोठय़ा नाण्याच्या आकाराचं घरटं करणारा तांबट, शेपटीतून तंतूंसारखी दोन शोभिवंत पिसं बाहेर आलेली आणि अत्यंत वेगाने उडणारी तारवाली, आनंदी सुरांची बरसात करणारा थोरला धोबी, छोटय़ा छोटय़ा पदांनी बनलेलं गाणं म्हणणारा दयाळ, पंख्यासारखी फुलवलेली शेपूट नाचवत उडते किडे, तुडतुडे, चिलटांचा समाचार घेणारा नाचरा, अंतराचं अचूक ज्ञान असणारा पिंगळा यांचा समावेश आहे.
या पुस्तकात सूर्यास्ताच्या सुमारास आकाशात उंच झेपावत थवा बनवणाऱ्या आणि गिरक्यांचा खेळ खेळणाऱ्या पाकोळ्यांबद्दलही लिहिलेलं आहे. खाताना बरंच वाया घालवणारा पोपट, चळवळ्या आणि नजरेत ठेवणं अवघड असलेला फुलटोचा, नाचकामाचा प्रयोग करून प्रियाराधन सोहळा करणारा नर लालबुडय़ा बुलबुल, ऐटबाज, टोकदार तुरा मिरवणारा शिपाई बुलबुल आपल्याला भेटतो.
खाद्य शोधत डोंगर चढणारा भारद्वाज, डोळ्यांभोवती पिवळी कातडी नसणारी आणि चोचीवर, कपाळाच्या सुरुवातीला पिसांचा झुबका असणारी जंगल मैना, तोऱ्यात चालणारी, फिरणारी, चापूनचोपून भांग पाडावा तशी डोक्यापासून मानेपर्यंत रुळणारी काळ्या रंगाची सैलसर पिसं असलेली भांगपाडी मैना, धुरकट राखाडी रंगामुळे आणि चोचीच्या विशिष्ट आकारामुळे चटकन ओळखू येणारा राखी धनेश, एकसुरी आवाज काढणारा वटवटय़ा या पक्ष्यांबद्दलही बरंच काही नव्याने समजतं.
पाण्याच्या नावेसारखे हेलकावे खात उडणारा आणि ‘चि’ आणि ‘वि’च्या बाराखडीत आवाज काढणाऱ्या काळ्या-पांढऱ्या-राखाडी रंगाच्या वल्गुलीची माहिती यात आहे. उलटसुलट गिरक्या घेणारा वेडा राघू, सूर्योदय झाला की फुलांच्या शोधात बाहेर पडणारा सूर्यपक्षी – शिंजीर, झाडाझुडपांना मकरंदासाठी भेट देणारा जांभळा शिंजीर, छोटय़ा चणीचा, हिरव्या रंगाचा उत्कृष्ट घर बांधणारा वास्तुशिल्पी शिंपी, शिकारी जातीचा गोलाकार पंखांची उघडझाप करणारा शिक्रा, डोळ्यांभोवतीच्या पिवळ्याजर्द कातडीमुळे पटकन ओळखू येणारी साळुंकी, वेड लावणारी शीळ
घालणारा सुभग, उठावदार सोनेरी पिवळा रंग, गुलाबी चोच आणि शेपूट व पंख काळे असणारा हळद्या, युपुपिडी प्रवर्गातील ‘हु-पो-पो-, हु-पो-पो’ किंवा ‘हुद-हुद-हुद’
असा मुलायम आवाज काढणारा हुदहुद, कुवुकुलु- कुवुकुकुकु अशी मुलायम साद भरदुपारी घालणारा होला अशा नानाविध पक्ष्यांची रोचक वैशिष्टय़े यात सांगितली आहेत.
पुस्तकाच्या शेवटी पक्षिनिरीक्षकाची सोबतीण असलेल्या दुर्बिणीच्या वापराविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यात दुर्बिणीच्या तांत्रिक वापरासोबतच ती वापरण्याची गरज नेमकी का असते, पक्षिनिरीक्षणासाठी कोणती दुर्बीण चांगली, दुर्बिणीची काळजी कशी घ्यावी याविषयीही लिहिले आहे. ग्लेझ कागदांवर उत्तम छपाई आणि पक्ष्यांची उत्तमोत्तम छायाचित्रे यामुळे या पुस्तकाच्या देखणेपणात भर पडली आहे. किरण पुरंदरे यांच्यासह केदार भट, राज ढगे, एन. जयकुमार, श्रेयस कशाळकर, अनुप देवधर, अबोली राजपाठक, माधवी कवी, कौस्तुभ ओक, राजेश कुंचुर, अविनाश शिंदे, भास्कर चव्हाण, आशीष कोठाळकर, देवदत्त लोहोकरे, रवी लोहोकरे, संकेत जोशी यांनी टिपलेल्या पक्ष्यांच्या छब्या पुस्तकात ठिकठिकाणी दिल्या आहेत.
अनोखे पक्षिजगत समजून घेण्याकरिता हे पुस्तक पक्षिप्रेमींना आणि पक्षिअभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असे आहे.
‘पक्षी : आपले सख्खे शेजारी’ – किरण पुरंदरे,  ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १४४, मूल्य – २०० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा