पाणी हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. किंबहुना, अनादि अनंत अशा अवकाशाच्या पोकळीतील कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता केवळ तिथं पाणी किंवा पाण्याला जन्म देऊ शकणाऱ्या गुणतत्त्वांच्या खनिजद्रव्यांच्या तेथील उपलब्धतेवर (अर्थात् जीवसृष्टीस पोषक ठरणाऱ्या अन्य घटकांवरही!) अवलंबून असते. अंतराळाच्या या अफाट पसाऱ्यात पाण्याशिवाय जगू शकणारी वेगळी जीवसृष्टीही असू शकेलही कदाचित, कुणास ठाऊक! पण मग ती पूर्णत: आपल्यापेक्षा भिन्न असेल. असो. सध्या तरी आपणच जीवसृष्टीची ही मक्तेदारी मिरवतो आहोत. तीही पृथ्वीवरील केवळ अडीच-पावणेतीन टक्के वापरण्यायोग्य पाण्याच्या अस्तित्वामुळे! पाण्याविना पृथ्वीवरचं पानही हलत नाही. ज्या दिवशी पृथ्वीवरील पाणी संपेल, त्या दिवशी जीवसृष्टीचाही अंत झालेला असेल. इतकं पाणी इथल्या सजीवसृष्टीसाठी महत्त्वाचं आहे!
म्हणूनच या पाण्याचा सांगोपांग इतिहास, भूगोल तसंच वर्तमान व भविष्य जाणून घेणं आपणाकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. अभिजित घोरपडे यांचं ‘पाणी ते पाणी’ हे पुस्तक पाण्याच्या अनेकानेक अंगांचा रोचक प्रवास आपल्याला घडवून आणतं. मुळात पृथ्वीवरील जलतत्त्वाच्या जन्मापासून त्याच्या आजपर्यंतच्या भूत-वर्तमानावर, पाण्याच्या विशिष्ट गुणतत्त्वांवर आणि त्यातून निर्माण झालेल्या जीवसृष्टीवर, तसंच पाण्याचा भवतालावर होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध परिणामांवर, त्याचप्रमाणे प्राचीन काळापासून निरनिराळ्या ठिकाणी विकसित झालेल्या मानवी संस्कृती आणि त्यांचा उदयास्त याला कारण ठरलेलं पाणी, पाण्याची आजची स्थिती-गती, त्याचं भविष्य.. अशा अगणित मुद्दय़ांना हे पुस्तक हात घालतं.
पाण्याचं सर्वसमावेशीत्व आणि सर्वव्यापित्व अधोरेखित करताना सात विभागांमध्ये या पुस्तकातल्या लेखांची विभागणी करण्यात आली आहे. ‘पाणी आणि जीवन’ या पहिल्याच विभागात पृथ्वीवर ते कसं निर्माण झालं, त्यासंबंधीचे प्रचलित सिद्धान्त, त्यातून जीवसृष्टी कशी निर्माण झाली, तिची उत्क्रांती, त्यातून निरनिराळ्या मानवी संस्कृती कशा उदयास आल्या, पाण्याशी आपला कसकसा संबंध येतो, अचल वनस्पतीसृष्टीच्या जीवनातही पाणी किती महत्त्वाची भूमिका बजावतं, इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘पाण्याची रूपं’मध्ये पाण्याच्या बहुविध शक्तींचा परामर्श घेताना पाण्याचं बहुरूपीत्व- म्हणजे वाफ, बाष्प, दंव, धुकं, हिम, गारा, बर्फ, जड पाणी अशा स्वरूपांकडे लक्ष वेधण्यात आलं आहे. पाण्याचे औषधी गुण माणसाला फार पूर्वीपासून ज्ञात आहेत. पाण्याच्या सान्निध्यासह त्याच्या प्राशनापासून ते अन्य औषधे त्याच्या माध्यमातून घेण्यापर्यंत त्याचे अनेकानेक उपयोग आहेत. आयुर्वेदातही जलचिकित्सेचं महत्त्व विशद केलेलं आहे. पाण्यामध्ये प्रचंड शक्ती, ऊर्जा दडलेली आहे. वाफेच्या शक्तीवर चालणाऱ्या यंत्रांपासून ते जलविद्युत तसंच अन्य माध्यमांद्वारेही वीजनिर्मितीकरता पाण्याचाच या ना त्या प्रकारे वापर करावा लागतो. पाण्याचं हे शक्तिरूप फार पूर्वीच विहिरीवरील रहाटाच्या रूपात मानवाने प्रत्यक्ष वापरात आणलं होतं.
‘पाण्यासाठी युद्ध’ या लेखात देशोदेशी तसेच प्रांतोप्रांती झालेले.. होत असलेले पाणीतंटे पाण्याचं अनन्यसाधारणत्वच दर्शवितात. तिसरं महायुद्ध त्यावरूनच पेटणार असल्याचं भाकित वर्तवलं गेलं आहे. तंटे म्हटल्यावर त्यात राजकारण आलंच. आपापल्या स्वार्थाकरता पाण्याचं राजकारण सर्वत्रच होताना दिसतं. सध्या महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतो आहे. सिंचन घोटाळ्यांची नवनवीन प्रकरणं रोज समोर येत आहेत. ही झाली गल्लीतली उदाहरणं! परंतु जगभरातील विविध देशांमध्येही हे पाण्याचं राजकारण टोकाला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावरून आणि आता चीन त्यावर बांधत असलेल्या धरणावरून भारत-चीन यांच्यात सतत झगडा सुरू आहे. जगभर सर्वत्र असाच संघर्ष जारी आहे. युद्धातही पाण्याचा हत्यार म्हणून वापर करण्यात येत असल्याचे इतिहासात डोकावून पाहताना लक्षात येते. शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याचं पाणी तोडण्यापासून ते, ते दूषित करण्यापर्यंत आणि मोठे बंधारे फोडून आक्रमण थोपविण्यापर्यंत अनेक प्रकारे पाण्याचा हत्यार म्हणून प्रभावी वापर केला गेला आहे. आजही आधुनिक युद्धतंत्रात पाण्याचा शस्त्र म्हणून वापर होताना दिसतो.
निसर्गानं केलेली पाण्याची असमान विभागणी विषमतेला जन्म देती झाली आहे. जगातले अनेक देश समृद्ध वा अति मागासलेले दिसतात ते पाण्याच्या उपलब्धतेमुळे किंवा त्याच्या अनुपलब्धतेमुळेच! एवढंच कशाला, माणसांतील उच्च-नीच, स्पृश्यास्पृश्यतेच्या भेदभावास कारण ठरते तेही पाणीच!
जलस्रोतांच्या ठिकाणी मानवानं वस्ती केली. तिथं त्याची भरभराट झाली. त्यातून विविध संस्कृतींनी जन्म घेतला. मानवानं आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं जी अवकाशभरारी घेतली आहे, तीही पाण्यानं आपल्याला हरप्रकारे साहाय्य केलेलं आहे म्हणूनच! अर्थात पाण्यानंच मानवी संस्कृती उद्ध्वस्तही केल्या आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, त्सुनामी यांनी माणसाचं अस्तित्व निर्घृणपणे पुसून टाकण्याचं कामही त्यानंच केलं आहे.. आजही करत आहे.
गंमत म्हणजे पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी ९७.२ टक्के पाणी हे समुद्राचं खारे पाणी आहे. ज्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. उरलेल्यापैकीही काही पाणी ध्रुवप्रदेशांतील बर्फाच्या रूपात आहे. त्यामुळे जेमतेम दोन-अडीच टक्के गोडे पाणीच मानवाला नद्या, सरोवरे, तळी, जलाशय आदींच्या रूपात उपलब्ध आहे. या तुटपुंज्या पाण्यातच आपल्याला सगळं काही करावं लागतं. असं असलं तरीही त्याचं सुयोग्य नियोजन व वाटप केलं आणि ते जपून वापरलं तरीही माणसांचं बऱ्यापैकी धकू शकेल अशी स्थिती आहे. पण पाण्याचं महत्त्वच न कळलेल्या माणसांमुळे पाण्याचा संघर्ष दिवसेंदिवस पेटतो आहे. याकरता पाण्याचं उत्तम व्यवस्थापन होणं आवश्यक आहे. ते केलं नाही तर भविष्यात माणसाचं अस्तित्व संपवायलाही त्याला जन्म देणारं हे पाणीच कारणीभूत ठरेल अशी साधार भीती वाटते.
अभिजित घोरपडे यांनी पाण्याचे असे वेगवेगळे पैलू, त्यांचे धारदार कंगोरे, त्याला लगटून येणारे ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैयक्तिक प्रश्न यांचा अत्यंत साकल्याने या पुस्तकात ऊहापोह केलेला आहे. जलसाक्षरतेची अत्यंत मोलाची कामगिरी हे पुस्तक बजावेल यात शंका नाही. आणखीन एक गोष्ट विशेष नमूद करायला हवी. ती म्हणजे- लेखकानं चपखल उदाहरणे देत अतिशय सरळ-सोप्या भाषेत प्रत्येक लेखविषयाची केलेली सहज मांडणी! यात त्यांच्या लेखनशैलीतील रसाळतेचाही वाटा आहेच. अगदी ‘पाण्याला असलेली अगणित नावं’ या विषयावरही त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे. आज कधी नव्हे इतकी जलसाक्षरतेची निकड निर्माण झालेली असताना हे पुस्तक लोकांसमोर येणं ही काळाची एक गरज होती. ती या पुस्तकानं पूर्ण केली आहे.
‘पाणी ते पाणी’- अभिजित घोरपडे, राजहंस प्रकाशन, पृष्ठे – २०१, मूल्य – २०० रुपये.
‘भुवनम्’ आख्यान
पाणी हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा केंद्रबिंदू आहे. किंबहुना, अनादि अनंत अशा अवकाशाच्या पोकळीतील कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता केवळ तिथं पाणी किंवा पाण्याला जन्म देऊ शकणाऱ्या...
आणखी वाचा
First published on: 09-06-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review pani te pani