‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ हा नीरजा यांचा तिसरा कथासंग्रह. यात भरपावसात सूर्याच्या शोधात निघालेल्या दहा स्त्रीवादिनी आहेत. दीर्घकथेच्या जवळ जाणाऱ्या या कथा आहेत. कथा हा मूळचा एखाद्या प्रसंग-तुकडय़ावर पेचप्रसंग रंगवण्याचा रंजनात्म साहित्यप्रकार आहे. कथेची निर्मिती ही लोककथेतून झालेली आहे. कथा एखाद्या प्रसंगाचा परिणाम कमीत कमी साधनसामग्रीच्या आधारे साधते. कथाकथनातही ही सामग्री अत्यल्पच असते. प्रसंग व घटनांचे  अत्यंत रोचकपणे साद्यंत वर्णन करणे स्त्रियांना स्वभावत: छान जमते. ही रोचकता नीरजा यांच्या कथेत आहे. त्यांच्या कथांमध्ये शैलीचा झपाटा आहे. त्यामुळे त्यांत पालुपद, पाल्हाळ व रटाळपणा येत नाही. या संग्रहातील दहाच्या दहा कथा आशयद्रव्याच्या परिघातून निर्माण झालेल्या आहेत. त्यात एक अंत:सूत्र आहे. ते स्त्रीवादिनीच्या रूपांत विणलेले असल्याने स्त्रीच्या अंतर्बाह्य़ मनोविश्वाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म रेषा या कथांमधून प्रकट झाल्या आहेत.
नीरजा यांची यातली कुठलीही कथा खूप मोठे समाधान देणारी नसली तरीही त्या एकाच अंत:सूत्राच्या अनेक आशयाच्या कथामालेतून निम्न लेखलेल्या स्त्रीविश्वाच्या व्यथांचे, दबलेपणाचे, कुचंबणेचे व्यापक दर्शन घडवतात. म्हणूनच त्यातून कसदारपणा हाती लागतो. या कथांतून नीरजांचा एक विचारव्यूह समोर येतो. त्यात स्त्री-पुरुष संबंधांना स्थान नाही. विवाहोत्पन्न नात्यांच्या संदर्भात आणि पुरुषांच्या वृत्तीसंबंधात प्रश्न उपस्थित करणाऱ्या या कथा आहेत. त्या उथळपणे स्त्रीवादाचा कैवार घेत नाहीत किंवा प्रचारकी भूमिकाही स्वीकारत नाहीत. समकालीन जीवनातील मूलभूत प्रश्न, अनुभव त्यांना चिंतनगर्भ बनवतात. हा सर्जनशील आविष्कार म्हणजे या कथा होत.
नीरजांच्या कथा वाचताना त्या मूलभूत प्रश्नांच्या व स्त्रीविश्वाच्या जाणिवांच्या अनुषंगाने महत्त्वाचे लिहीत आहेत हे स्पष्ट होते. स्त्रियांच्या जाणिवांचे अक्षांश-रेखांश काढून, स्त्रीच्या अनुभवांचा परिघ भेदून हा कथाव्याप त्यांनी विस्तारला आहे. कथेचा पट वाढवताना, पैस सैलावताना या कथा पात्रकेंद्री होतात. पात्रांच्या मनातील सूक्ष्म आंदोलनांचा विश्लेषणात्मक आविष्कार त्या जोरकसपणे करतात. ही पात्रे व्यथेच्या समूहाशी जोडली जातात. धक्कातंत्राचा वापरमात्र त्या करत नाहीत. स्त्रियांच्या अस्मितेच्या शोधाला शेवट नसला तरी कथा कोठे संपवावी, हे नीरजा यांना चांगले ठाऊक आहे. आपल्या पात्रांविषयी, कथेच्या आशयसूत्राविषयी, भाषेविषयी त्या चोखंदळ आहेत. पात्रांच्या दैनंदिन जीवनातील सर्वसामान्य घटनांना त्या महत्त्व देतात. घटनांचे वर्णन न करता त्या स्त्रीच्या अंतरंगात उठलेल्या तरंगांना जास्त महत्त्व देतात. त्याची पाळेमुळे शोधत घटनांतील सर्जनात्मक पातळीवर जातात. घटनांवर भाष्य करणे मात्र त्या टाळतात. त्यापेक्षा घटनात्मक पेचप्रसंगातून आपले लक्ष काढून प्रचलित पुरुषसत्ताक रूढींची, संकेतांची आणि स्त्री-पुरुष परस्परावलंबित नाजूक अशा नात्यांची व त्यांच्या स्वतंत्र- परतंत्र नात्यांची तपासणी करतात. ही तपासणी बौद्धिक आणि सर्जनोत्सुक खेळ वाटत असली तरी ती स्त्रियांच्या जगण्यासंदर्भात विशेष आहे. पात्रांमधील स्त्री विरुद्ध पुरुषसत्ताक मानसिकता अशी ही वीण आहे. त्यातून हा संघर्ष सर्वसामान्यांत पसरून त्यांच्या मनीमानसी विरघळेल असे वाटते.
पु. शि. रेगे यांच्या कविता, गोष्टी, कादंबऱ्या नीरजांनी आपल्यात मूरवून घेतल्या आहेत. त्यांच्या कथानिवेदनातला बदलही जाणवतो. ‘पावसात सूर्य..’ ही कथा इतर कथांहून सामान्य आहे, पण ती संग्रहात प्रथम येते ती निवेदनामुळे. कोर्टरूममध्ये नायिका एकटीच घटस्फोटासंदर्भात न्यायाधीशांसमोर प्रतिवाद करते. ही गोष्ट स्त्रीचा दडपलेला आत्मविश्वास जागृत करणारी आहे. या कथा केवळ रचनेचा प्रयोग करीत नाहीत, तर स्त्रियांतील एखाद् दुसऱ्या अतक्र्य कृतीचे विडंबनही करतात. ‘सुशांतचा सोळावा वाढदिवस’ या कथेतील डॉक्टर असलेल्या मातेची मुलाविषयीची अतिरेकी काळजी तिच्या मातृत्वाच्या मूळाबद्दलच प्रश्न उपस्थित करते. मुलांना लैंगिक शिक्षण द्यावे, ही धारणा बळावते. या विचाराला बळी पडलेली माता म्हणजे सुशांतची आई आहे. त्याच्या सोळाव्या वाढदिवसाला ती निरोधचे पाकीट त्याला भेट म्हणून देते. सतराव्या वाढदिवसाला ती बी.पी.ची सीडी देऊ इच्छिते. शरीराची, शरीररचनेची माहिती देत देत षौडशवर्षीय मुलाच्या मनातील कुतूहल नष्ट करून त्याला त्यासंबंधीचे ज्ञान देणे तिने अपेक्षित असताना डॉक्टर असलेली ही स्त्री उलट त्याचे अज्ञान व फरफटलेपण वाढवते. तरीही मूलत: प्रामाणिक असलेल्या तिच्या हे ध्यानी येत नाही. तिला दबाब टाकणारी आई व्हायचे नसते. उद्देश योग्य, पण दिशा पूर्णत: चुकीची असलेली ही आई प्रश्नांच्या कात्रीत कशी सापडते, हे या कथेत चौकसपणे सांगितले आहे.
‘सुटका’ या कथेतील प्रोफेसर दयाळ शर्मा समाजात प्रतिष्ठा प्राप्त करतात. इंग्रजी विभागातील पाठकबाई आणि देशपांडेबाई यांच्याकडे ते आकृष्ट होतात. देशपांडेबाई कॅन्सरने जातात. पाठकबाई आपल्याला सोडून देशपांडेबाईंना जवळ करणाऱ्या शर्माच्या मुसक्या आवळतात. संचालकांकडून चौकशी सुरू होते तेव्हा राष्ट्रीय सेवायोजनेतून आणि इतर ठिकाणहून शर्मानी पैसा लाटला आहे हे उघड होते. तेव्हा ते व्हीआरएस घेण्याच्या निर्णयाप्रत येतात. आयुष्यभर ज्या पत्नीची त्यांनी अवहेलना केली, ती पत्नीच त्यांना गावाला जाऊन राहण्याचे सुचवते, तेव्हा शर्माचा सगळा कैफ उतरतो.
या कथासंग्रहातील पात्रे छोटी-मोठी आहेत. पण त्यांच्या खिजगणतीत नसलेली पात्रेही पावसात सूर्य शोधतात.. दिशा देतात- ही लेखिकेची नवनवोन्मेषशीलता आहे. ‘सुटका’ ही कथा महाविद्यालयीन राजकारणाची पाश्र्वभूमी असलेली असली तरी ती व्यामिश्र आहे. ‘मडकं गेलं वाहून’ ही कथाही अशीच नाजूक आहे. मुंबईतील लोकलचा ऑफिसला जाण्या-येण्याचा रोजचा प्रवास, घाईगर्दी, प्रवासातल्या बायकांच्या गमतीजमती असे अफाट विश्व या कथेत आले आहे. २६ जुलै २००५ चा पाऊस मुंबईला झोडपतो. सर्व रस्ते बंद करतो. या पावसाने मुंबईतल्या कितीतरी बायकांचे जीवन उद्ध्वस्त केले असेल. त्याचे मुखदर्शन अत्यंत कळकळीने ‘मडकं गेलं वाहून’ या कथेत आले आहे. ‘गुरुचरित्र’ या कथेत आई आणि बाई यांच्यातील तुलना आहे. आई श्रेष्ठच. अंतिमत: तीही बाईच. हीच बाई आई होते. आई आणि बाई हा नात्यांचा संघर्ष यात आहे. स्त्रीद्वेष्टा असणारा नायक आईचा मात्र भक्त आहे. त्याच्या मनातला हा गुंता मात्र काही निसवत नाही. नीरजा सहसा वास्तवात रमतात. पण त्या ‘महिषासुरमर्दिनी’सारखी एखादी कॅलसीही निर्माण करतात. संसाराच्या ऐन मध्यात नवरा बेकार होतो. संसाराचा गाडा ओढता ओढता तिचे मनगट पिचते. ती नवरा मेल्याची स्वप्नं बघू लागते. एके दिवशी तो अपघाताने मरतोही. अंगावर दु:खाचा डोंगर कोसळण्याऐवजी तिला (सती) आतून आनंदाची उकळी फुटते. मानवी मनातील सुप्तावस्थेतील सत्य सुंदररीत्या या कथेत प्रकट होते. मनातील सत्य प्रकट केल्याशिवाय ओझेही उतरत नसते. असे ओझे वागवणारे मंगेशराव ‘प्रायश्चित’ या कथेत भेटतात. मंगेशरावांनी आयुष्यभर कसलीच कमाई केली नाही. पत्नीच्या आजारपणात शेवटच्या काळात ते फुकटच्या पैशाला बळी पडतात. पण त्यांना तो पचत नाही. ते एकदाचे सगळं सांगून टाकतात तेव्हा त्यांना मोकळं मोकळं वाटतं.
नीरजा यांच्या या कथासंग्रहातील विश्व अपरिचित नाही. सामान्य अशा अनुभवतुकडय़ांत त्या एका मनाची दाटणी भरून काढतात. काचचुऱ्यापासून सुंदर नक्षी काढावी तशी त्यांची कथा व्यथा, अवहेलना, प्रश्न, समस्या, असंमजसपणा याने सजलेली दिसते. बारीक बारीक बारकावे कथेत भरावयास त्या नकार देतात. खरे तर अशा रंगभरणामुळे कथा ग्रेट होत असते. नीरजांची कथा ग्रेट नाही, पण ती सामान्यसुद्धा नाही, हे खरे. स्त्रियांच्या व्यथांतील मौनपक्ष्यांचे थवे या कथांतून आढळतात.
‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ – नीरजा, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – २१२, किंमत – २५० रुपये.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Important research Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University shows that mosquitoes are repelled by yellow light of LED
डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती