डॉ. रणधीर शिंदे
मराठीतील बालसाहित्य म्हणावे एवढे समृद्ध नाही. अनुभव, भावना, कल्पनाशीलतेच्या पातळीवर मराठीतील बालसाहित्यात बहुविधता आढळत नाही. बरेचदा ते प्रौढ साहित्यच असते. तसेच या बालसाहित्यावर मध्यमवर्गीयांच्या अनुभवविश्वाच्या देखील मर्यादा आहेत. बालपणाच्या विविधस्वरूपी रंगरूपाचा मनोहारी लेखनाविष्कार मराठीत अभावरूपानेच आढळतो. लोकसंस्कृती विषयी उल्लेखनीय लेखन करणाऱ्या मुकुंद कुळे यांचा अलीकडेच ‘राई आणि इतर कथा’ हा वैशिष्टय़पूर्ण असा बालकथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. या संग्रहात पाच कथा आहेत. आई आणि मुलाच्या वात्सल्याच्या आणि माया-बंधाच्या या कथा आहेत. या पंचरंगी कथांमधून आई आणि मुलातील भावबंधाची कहाणी उलगडवली आहे. या कथा सूत्ररूपातील असल्या तरी आई आणि मूल यांच्या नात्यांतील, वाढीतील विविध अनुभव आणि भावविश्वाच्या या कथा आहेत. या कथांची पार्श्वभूमी कोकणातील एका छोटय़ा खेडय़ातील सामान्य कुटुंबाची आहे. या सर्वच कथा आई आणि मुलगा यांच्यातील परस्परसंबंधांवर केंद्रित आहेत. सुबोध पाचव्या इयत्तेला मुंबईला शिक्षणासाठी जातो. त्यानंतरच्या त्याच्या दरवर्षीच्या सुट्टीतील काळातील गावाशी निगडित भूतकाळातील आठवणींचा गुच्छ या कथाचित्रणात आहे. या सर्व कथा निवेदकाच्या बालपणाशी व आईच्या आठवणीशी निगडित आहेत. मातृत्वभावबंधाबरोबर मुलांवरील संस्कार, मूल्यनिष्ठा, निसर्ग, पर्यावरण, गावाची ओढ अशा जाणिवांची गुंफण या कथांत आहे.
आई आणि मूल यांच्यातील भावबंधांच्या आणि हृद्य आठवणींच्या या कथा आहेत. किंबहुना या प्रमेयसूत्रातील विविध आशयसूत्रांनी ही कथा आकाराला आली आहे. ‘आयं मी आलो’ या पहिल्याच कथेत आईच्या मृत्यूनंतर सुबोध गावी सहा वर्षांनी आला आहे. ‘ज्या घरात आई नाही त्या अंगणात, घरात मी पुन्हा पाऊल ठेवणार नाही’ असे वाटणारा सुबोध सहा वर्षांनी घरी-गावी परततो. आणि फोटोतील आईशी संवाद करतो. या संवादात आईच्या व्याकूळ आठवणी आहेत. आई भासाची ही कथा आहे. या सर्वच कथांमध्ये आईपणाच्या वात्सल्यभावाचे पाठलाग सूत्र आहे. आईशी निगडित अनेक आठवणी, वस्तू, घटना-प्रसंगांचे उत्कट भाव या कथांमध्ये आहेत. आईशी जखडलेपण, गुंतलेपण आणि तिच्या नसण्यातील दु:खपोकळीची जाण या कथांत आहे. बालवयातील सृष्टी जिज्ञासेचे चित्र या कथांत आहे. आई आणि मुलाच्या घालमेलीच्या व निर्मळ लोभाच्या या कथा आहेत. त्या वेळी त्याला आईसमवेतचा रम्य भूतकाळ आठवतो. घराला-मातीला विसरू नको हा आईचा संस्कार त्याला पदोपदी आठवतो. आईच्या भावबंधाच्या या विलक्षण व्याकूळ कहाण्या आहेत. त्या भूतकाळातील बालपणाच्या आठवकथा आहेत. त्यामुळे त्यास संस्कारकथेचे व मातृत्वलळाकथेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुबोधच्या घडवणुकीच्या या कथा आहेत. मात्र एवढेच त्याचे वर्णन अपुरे आहे. कथाचित्रणातील विविध कथादृष्टीबिंदूमुळे या कथेस विविध संदर्भ प्राप्त झाले आहेत.
माणूस आणि निसर्ग यांच्यातील सहजीवनाचे सूत्र या कथाचित्रणात आहे. ‘राई’ व ‘नह्यचा लेक’ या कथांत कोकणातील निसर्गाची ओढ जाणीव आहे. सुबोधच्या मनात निसर्गाविषयी कुतूहल, भीती आणि गूढता आहे. वड, पिंपळ, वेली, खैर, झाडांच्या गमती, देवाच्या राईचे चित्र आहे. आईच्या, नदी आणि राईच्या प्रेमातून तिच्या आनंदाचा भाग व्यक्त झाला आहे. आईला माहेरी कोणीही नाही, त्याची पूर्तता ती सभोवतालच्या निसर्गात करते. ती गर्द राईशी बोलते. वनात मनमुक्त नाचते. यात तिला तिचे ‘म्हायार’ भेटल्याचा आनंद आहे. नदी परिसराचे वेधक चित्र कथेत आहे. सृष्टीचा हा सारा भाग माणूस आणि भोवताल यांच्या नांदवणुकीचा इतिहास आहे. त्यामुळे तिला सुबोध झाडाचे-नदीचे लेकरू वाटते. निसर्गाच्या धाग्याने एकमेकांना बांधले गेल्याची जाणीव कुळे यांच्या कथादृष्टीत आहे. त्यामुळे या कथेतील सृष्टी आणि मानवी जग यातील नात्यांचे गडद गहिरेपण व्यक्त झाले आहे. आईने सांगितलेल्या गावाच्या, घराच्या, अवतीभवतीच्या आणि भूताखेतांच्या कथांनी लेखकाचा मन:पिंड घडविलेला आहे. त्यामुळे आईच्या लयदार वेल्हाळ गोष्टीकथनाचा प्रभाव या कथांवर आहे. माती हुंगली की आई, घर आणि गाव घुमायला लागते.. या आई आणि मुलांतील भावविश्वाची ही वैशिष्टय़पूर्ण कथा आहे.
‘राई आणि इतर कथा’- मुकुंद कुळे, मनोविकास प्रकाशन, , पाने – ६२, किंमत- ९९ रुपये