मीना गुर्जर
मनासारखं काम करायला मिळावं, आपल्या गावाला, समाजाला आपल्या शिक्षणाचा फायदा मिळावा, एक चांगलं स्थैर्य असलेलं आयुष्य मिळावं यासाठी केलेल्या संघर्षांचा आलेख म्हणजे डॉ. भवान महाजन यांचे ‘रस्ता शोधताना’ हे आत्मकथन.
वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर शासकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काम करायचं होतं. सरकारी फितीच्या कटू अनुभवामुळे ते शक्य झाले नाही म्हणून ते इंग्लंडला गेले.
लेखक परदेशातली परिस्थिती, तिथले बरे वाईट अनुभव, तिथे मिळणारी दुय्यम वागणूक, बदलती नोकरी आणि बदलती घरं यांचे बारकावे टिपतात, पण मनासारखं काम न मिळणं, सर्जरीचा अनुभव न मिळणं, सहज – सोपी कामं मिळणं आणि त्या मानाने पैसा, सोयीसुविधा न मिळणं यामुळे ते कंटाळले.
एका क्रांतिकारकाच्या पोटी जन्म, लोकसेवेचे व्रत घेतलेल्या आजोबांचे संस्कार, बेताच्या परिस्थितीतही समृद्ध झालेले व्यक्तिमत्त्व यामुळे वैद्यकीय सुविधा फारशा नसलेल्या पैठणमध्येच आपलं कार्यक्षेत्र असावं अशी आस त्यांना असल्यामुळे ते इंग्लंडहून औरंगाबदला परत आले. इथे मात्र चांगला जम बसला. पुढचा काही काळ सुखाचाही गेला, पण त्याआधी जमीन अकृषिक करून घेणं, घरमालकाने घर आणि दवाखाना सोडायला सांगणं, घेतलेल्या जमिनीवर स्मशानाचं आरक्षण निघणं, बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाला असणारी नियमांची आडकाठी अशी सर्व अडथळय़ांची शर्यत त्यांना अनुभवावी लागली. समाजातील सर्व थरातील ताणे – बाणे त्यांच्या अनुभवातून दिसले आहेत. इतकं शिकूनही आपल्या कामावर लक्ष एकवटण्याऐवजी या असल्या गोष्टींत मन, बुद्धी, शक्ती अडकून राहते याची त्यांना खंत वाटते.
या सगळय़ा प्रवासात त्यांनी लिहिलेला त्यांचा बालपणचा काळ आणि ‘पैठण नगरी’ एखाद्या व्यक्तिरेखेसारखी सामोरी आली आहे. गोदावरीचा घाट, तिथलं शंकराचं देऊळ, पहारेकऱ्यासारखे दोन बुरूज! गोदेच्या पाण्याचा सतत ऐकू येणारा घोष! विविध स्वामींचे मठ, तिथे होणारे भजन- कीर्तन, गणेशोत्सवातले मेळे, लग्नानंतर होणारे जलसे, पूर आला की गावाची होणारी स्थिती, नित्यनेमाने येणारी कॉलराची साथ, भजन गाणारे भिक्षेकरी, देवळात होणाऱ्या मंत्र घोषांचे एकसारखे आवाज आणि वाद्यवृंदासारखे हातवारे, िलबाच्या मोहोराचा दरवळणारा गंध या सर्वातून ते जे शब्दचित्र रेखाटतात त्याला नाद, स्पर्श, गंध, गती प्राप्त झाली आहे. पैठणचा इतिहास, भूगोल, काळ आणि सांस्कृतिक वातावरण जिवंत केले आहे.
त्यावेळची एकत्र कुटुंबपद्धती घरातली सख्खी – चुलत असा भेदभाव नसलेली भरपूर माणसं, जेवण, कपडे – लत्ते याबाबतच्या कमीत कमी गरजा, घराण्यात चालत आलेली आयुर्वेदाची परंपरा, घरात वाचनाची आवड होतीच, पण ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी म्हणून केलेले विशेष होताना दिसतात, त्यांचा संपूर्ण वाडा त्यांनी आपल्याला जणू फिरून दाखवला आहे. त्या काळात त्यांना लाभलेले शिक्षकही चारित्र्यसंपन्न, मुलांचा विकास व्हावा म्हणून धडपडणारे, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे होते.
महाविद्यालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील अनुभव मांडताना त्यांनी अनेक जिवलग मित्र, वर्गमित्र, प्रयोगशाळेतील सहाय्यक, शिक्षक यांच्याबद्दल खूप आत्मीयतेने सांगितले आहे, पण त्या त्या लोकांचा प्रवास- त्यांचे यश याबद्दलही तपशीलात माहिती दिली आहे. त्या खडतर काळात हिरवळ असलेले हॉटेल, त्यांचा कट्टाही त्यांनी छान उभा केलो. ते मित्र पुढील काळातही त्यांनी जोडून ठेवले आहेत हे विशेष! आपल्या चुकांचे खापर इतरांवर न फोडता ते मोकळेपणाने त्यांनी मान्य केले आहे.
लेखकाने इंग्लंडमधील वास्तव्यात आपल्याला नाकारलेल्या संधीबद्दल, माणसामाणसांत केलेल्या दुजेभावाबद्दल सांगितले आहेच, पण त्याचबरोबर त्यांची शिस्तप्रियता, स्वच्छता, रोग्यांसाठी घेतलेली पराकोटीची काळजी, त्यांची सेवाभावी वृत्तीही नमूद केली आहे. तिथले विविध प्रकारचे संगीत, बी. बी. सी.वरील बातम्यांचा खरेपणा, टी. व्ही. सिरियल्स, तिथले चित्रपट, उत्तम काम करणाऱ्या अभिनेत्री, नाटक, बघितलेली वस्तू संग्रहालये यांतून इंग्लंडमधले सांस्कृतिक जीवन या वाचनातून कळतेच, पण आपल्या सर्वच पातळय़ांवरील संघर्षमय जीवनातही ते या सर्व गोष्टींसाठी ते वेळ काढत होते, रसिकतेने आस्वाद घेत होते हेही उमजते.
लेखनाचा उद्देश शैक्षणिक कारकीर्द – संघर्ष असल्यामुळे पत्नी छाया आणि इतर कुटुंबीय यांचे चित्रण पडद्यामागून दिसावे तसे धूसर आहे. पण तरीही मुलांबद्दल वाटणारी ओढ, त्यांना वेळ देता येत नसल्याची खंत दिसते. छाया खरोखरीच सावलीसारखी सदैव त्यांच्या समवेत उभी आहे. तिच्या भारतातील शिक्षणावरून तिला तिथल्या विद्यापीठात मेडिकलला प्रवेश मिळत असूनही केवळ पैशाअभावी ती संधी हुकली. त्यामुळे डॉक्टर विषण्ण झाले. पण पुढे छाया इंग्रजी विषय घेऊन एम. ए. करून लेक्चरर झाल्या. आपले दागिने विकून काही प्रसंग निभावले. आई-वडील, भाऊ, सासू – सासरे हेही त्यांच्यामागे खंबरीपणे उभे राहिले.
रुग्णांचे काही मजेदार तर काही लोभस अनुभव लेखकाने सांगितले आहेत. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांचे, नेतेमंडळींचे जे अनुदार वागणे घडते त्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कधी काही घटनांचा विस्कळीतपणा दिसतो; भाषेचे लालित्य नसले तरी सच्चे अनुभव, ओघवती भाषा, उचित भाष्य यामुळे वाचक त्यात गुंतत जातो. अनेक पातळय़ांवरचे अपयश नोंदवताना त्याला कसलाही मुलामा ते चढवत नाहीत. काही प्रसंगातली कटुता त्यावेळी त्यांना जशी जाणवली तिची तीव्रता पुढे कमी होऊन त्याकडे ते समतोलपणे पाहताना यात दिसले आहेत.
भूतकाळाबद्दल तटस्थता आणि वर्तमानाची नेमकी जाणीव हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. सहज आलेली समर्पक चमकदार वाक्यं आणि काही अर्थपूर्ण कवितांचाही यात अंतर्भाव आहे.
या सर्वातून उभे राहते एक सुसंस्कारित मन, प्रतिकूल परिस्थितीतही संगीत, खेळ, कविता यातून त्या मनाला दिलेली उमेद! ज्या ज्या माणसांनी जी जी छोटी – बडी मदत केली त्या त्या माणसाबद्दल वाटणारी कृतज्ञता त्यांनी मनापासून व्यक्त केली आहे. मनाला टोचणाऱ्या शल्यावर ‘आपण सेवा करू इच्छिणाऱ्यांच्या रांगेत तर होतो ना?’ असा दिलासाही त्यांनी दिला आहे.
छायासाठी अर्पणपत्रिका लिहिताना त्यांनी म्हटलं आहे , ‘‘काही ओबडधोबड खडे अन् काही नितळ सुंदर मोत्यांची ही माळ, तुझ्यासाठी माझ्या मनाच्या धाग्यात गुंफलीय.’’ ते अगदी यथायोग्य वाटतं.
सरदार जाधव यांचे मुखपृष्ठही अतिशय समर्पक आणि वेधक आहे.
‘रस्ता शोधताना’, – डॉ. भवान महाजन, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, पाने- १९१, किंमत- २५० रुपये.