आता वाङ्मय बहुविध अंगाने फुलते आहेच, पण त्यात लक्षणीय बदलही दिसून येतो. अनेक अस्पर्शित विषय, नानाविध अनोळखी अनुभव, नव्या विचारधारा यांना माणूस नि:संकोचपणे सामोरा जातोय.
जगाचा पुढे जाण्याचा वेग आणि साहित्य परिवर्तनाचा वेग असमान असला तरीही हे नवे अनुभव, नव्या विचारसरणींनी प्रवृत्त होऊन लिहिणारे, संघर्षांची वेगळी रूपे, वेगळे प्रदेश, यातून हे परिवर्तन जाणवते. संतांच्या काळात वेगवेगळे पंथ, अठरापगड जाती, स्त्रिया व्यक्त झाल्या. तर आता दलित, ग्रामीण, वेगवेगळ्या जाती-जमाती, आदिवासी आणि स्त्रिया आपल्या वेगवेगळ्या अनुभवांना सशक्तपणे व्यक्त करत आहेत. भाषाही बदलली आहे म्हणजे केवळ नवनव्या बोली पुढे आल्या असे नव्हे तर अधिक थेट, भेदक मुलाहिजा न बाळगणारी झाली.
साहित्य निर्मितीवर जसा सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा परिणाम होतो. तसाच साहित्यकृतींचाही समाजमनावर परिणाम होतो. हे कसे घडते, नैतिक मूल्यांमध्ये साहित्य-कृती बदल घडवतात का, या प्रश्नांकडे हा ‘वासुदेव मुलाटे गौरव-ग्रंथ’ निर्देश करतो.
ग्रंथाचा पहिला भाग परिवर्तनाची संकल्पना स्पष्ट करणारा तसेच सामाजिक परिस्थिती आणि साहित्यकृती यांच्या अनुबंधाविषयी वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणारा आहे. रावसाहेब कसबे यांनी व्यापक परिप्रेक्ष्यात पर्तिनाची संकल्पना स्पष्ट केली आहे. परिवर्तनाबाबतचे विविध दृष्टिकोन, परिवर्तन कोणात व कसकसे होते? परिवर्तनाची व्याख्या सांगून मानवाच्या दहा लाख वर्षांपूर्वीपासूनचा आढावा घेऊन ते सांस्कृतिक बदलाकडे येतात. अत्यंत मूलभूत, चिकित्सक मांडणी करताना ते तत्त्वज्ञान, जीवशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र या सर्वाचा विचार करून ही संकल्पना किती व्यापक आहे ते स्पष्ट करतात. माणसाच्या जैविक आणि सांस्कृतिक विकासक्रमांच्या इतिहासावर दृष्टी टाकतात. परिवर्तनाचे प्रकार, त्याची कारणे यांचा विविध पातळ्यांवर शोध घेऊन पुढील चर्चेचा भक्कम पाया घालून देतात.
नागनाथ कोत्तापल्ले मराठी साहित्याला संकुचितपणा येण्याचे कारण सांगत असतानाच खऱ्या अर्थाने जातीमुक्त झाल्याशिवाय साहित्य श्रेष्ठ पदवीस पोहोचणार नाही, असेही म्हटले आहे.
ज्येष्ठ समीक्षक सदा कऱ्हाडे यांनी मार्क्सवादाचा ऊहापोह केला आहे. आतापर्यंतच्या तत्त्वज्ञांनी जग कसे आहे ते सांगितले, परंतु हे भौतिक जगू कसे बदलायचे हे सांगण्याची हेतूपूर्वक भूमिका घेऊन मार्क्स-एंगल्स आपले सिद्धांत मांडतात. त्यामुळे मूलत: मार्क्सवाद परिवर्तनवादी, गतिशील आणि नवनवोन्मेषी आहे. परंतु मराठी साहित्यात हा प्रवाह क्षीण राहिला, रूजू शकला नाही, असे नोंदवून ते त्याची कारणे आणि तत्कालिन कालपट सांगतात.
उपयोजन या दुसऱ्या विभागात साहित्य प्रकार आणि प्रवाह यांच्या संदर्भात परिवर्तनाचा मागोवा अनेक अभ्यासकांनी घेतला आहे. डॉ. सूर्यनारायण रणसुभे सूफी संप्रदायाची ओळख करून देताना सूफी संप्रदाय श्रमिक, व्यथित, पीडित अशा शोषितांना जवळ घेतो. प्रेम आणि भक्ती यांची त्यांनी घातलेली सांगड भक्तीमार्गाला जवळची आहे. संप्रदायाने कर्मकांडाला विरोध, आपले विचार सांगण्यासाठी मोठय़ा प्रमाणात संगीताचा, लोककथांचा, स्थानिक बोलींचा वापर केला. त्यामुळे या साहित्यात परिवर्तन आले, असे नमूद केले आहे.
डॉ. र. बा. मंचरकर संतांचे सांस्कृतिक पर्यावरण काय होते, त्यामुळे संत साहित्याची निर्मिती कशी झाली हे सांगतात. संतांची चिकित्सक वृत्ती, अनुभवाचे महत्त्व, माणसात दैव शोधणं इ. अनेक गोष्टींमुळे त्यांच्या साहित्यातही कसे परिवर्तन झाले आहे याचा त्यांनी आढावा घेतला आहे.
आधुनिक कवितेमधील वेगवेगळ्या दिशांनी होत गेलेले परिवर्तन, मर्ढेकरांनंतरच्या कवितांचे विश्लेषण आणि मूल्यमापन प्रकाश देशपांडे-केजकर यांनी केले आहे. सौंदर्यवादी भावकवितेला शह देत यंत्र-संस्कृती, शहरीकरणाच्या दुष्ट चक्रात सापडलेल्या आधुनिक माणसाचा पेच आणि त्याचे भयावह वास्तव याचे यथार्थ चित्रण करणारी मर्ढेकरी कविता; तिला छेद देणारी पु. शि. रेगे यांची कविता इथून सुरुवात करून या दोन परंपरांमध्ये येणाऱ्या कवी-कवयित्रींच्या कवितांची जातकुळी ते सांगतात.
लघुपत्रिका चळवळ ही मराठी साहित्याच्या क्षेत्रातली परिवर्तनाची नांदी निर्माण करणारी, वाङ्मयीन प्रवाहांना नवी दिशा दाखवणारी ऐतिहासिक घटना होती. तिला सुरुवातीला सैद्धान्तिक बैठकही होती. डॉ. किशोर सानप या चळवळीचा (१९५०) सुरुवातीपासून आढावा घेतानाच तिच्या निर्मितीची कारणेही स्पष्ट करतात. सत्यकथेची विशिष्ट चौकट, साचेबंद साहित्य संस्कृती, विशिष्ट वर्गाची मिरासदारी मोडून काढण्याकरिता बहुजन समाजातील उत्साही तरुण पुढे आले. या लघुसाहित्यपत्रिकांनी कोंदट वाङ्मयीन संस्कृतीचा दंभस्फोट केला. कादंबरी, समीक्षेलाही नवी बैठक समृद्धी दिली. संकेतमुक्त वातावरण, मुक्त भाषिक रुपे, प्रयोगशीलता, बोलभाषेचा धीटाईने वापर ही त्यांची वैशिष्टय़े होती. पण पुढे ही चळवळ थंडावली. पण त्यातूनच प्रगल्भ जाणीव, सधन आशय देणारे नव्या वळणाचे लेखक लाभले हे चळवळीचे यश असे ते म्हणाले.
इतर लेखातून दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम, ख्रिस्ती या सर्व प्रकारच्या साहित्य-परिवर्तनाचा आढावा सूक्ष्मपणे घेतला आहे. काही नव्या विचारव्यूहांची मांडणी केली आहे.
पाचव्या भागातील मुलाखतीतून मुलाटे यांचे संघर्षमय जीवन सामोरे येते. एकूणच हा ग्रंथ वाचनीय, संदर्भासाठी अभ्यासकांना उपयुक्त, विचारांचे विविध पैलू सामोरे आणणारा आहे.
‘सामाजिक परिवर्तन आणि मराठी साहित्य’ – संपादक : डॉ. र. बा. मंचरकर (डॉ. वासुदेव मुलाटे- गौरवग्रंथ)
पद्मगंधा प्रकाशन, पृष्ठे- ४७९, मूल्य – ४७५ रुपये.
सामाजिक परिवर्तन आणि साहित्याचा अनुबंध
आता वाङ्मय बहुविध अंगाने फुलते आहेच, पण त्यात लक्षणीय बदलही दिसून येतो. अनेक अस्पर्शित विषय, नानाविध अनोळखी अनुभव, नव्या विचारधारा यांना माणूस नि:संकोचपणे सामोरा जातोय. जगाचा पुढे जाण्याचा वेग आणि साहित्य परिवर्तनाचा वेग असमान असला तरीही हे नवे अनुभव, नव्या विचारसरणींनी प्रवृत्त होऊन लिहिणारे, संघर्षांची वेगळी रूपे, वेगळे प्रदेश, यातून हे परिवर्तन जाणवते.
First published on: 06-01-2013 at 03:46 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review samajik parivartan ani marathi sahitya