सापांच्या गोड गाठीभेटींचा अनुभव तसा कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच. मात्र अशा अनुभवांना ज्ञान, विज्ञान, माहिती व मनोरंजनाच्या वाङ्मयीन बाजात चपखलपणे बसवलंय ते मधुकर दिवेकर यांच्या ‘सर्पपुराण’ या कथासंग्रहाने. एकंदर तेरा सर्पकथांचा हा संग्रह आबालवृद्ध वाचक व अभ्यासकांसाठी चांगला नजराणा म्हणता येईल. रोजच्या जीवनातील खऱ्याखुऱ्या अनुभवांना वाङ्मयीन कोंदणात अत्यंत चपखलपणे बसवण्यात लेखक बराचसा यशस्वी झाला आहे. संभाषणात्मक निवेदनातून एक थरारक, रम्य व अद्भुत आनंदाच्या दृष्टीने हा कथासंग्रह वाचनीय आहे.
अनादिकालापासून माणसाच्या सापाबद्दल असणाऱ्या भयमिश्रित कुतुहलाचे आणि रोमांचक भावभावनांचे विविधांगी व मनोहारी दर्शन या सर्पकथांमधून घडते. साप आणि माणसाचे बहिरंग व अंतरंग कधी हलक्याफुलक्या शैलीत, तर कधी चटका लावणाऱ्या, साप व माणूस या प्राण्यांमध्ये जिव्हाळा निर्माण करण्याचा एक निरागस व मनाला स्पर्शून जाणारा प्रयत्न या कथांमधून प्रत्ययास येतो. लेखक स्वत: सर्पमित्र आहेत. त्यामुळे त्यांनी मनोरंजनाचा बाज चांगल्या प्रकारे सांभाळत वैज्ञानिक दृष्टिकोन राखण्याचा प्रयत्न केला आहे.
‘सर्पपुराण’ असे समर्पक शीर्षक असलेल्या या कथासंग्रहात सर्पभाव आणि मानवीभावाच्या पुराणापासून आतापावेतो घडत आलेल्या आंतरक्रिया-प्रतिक्रियांचा धांडोळा घेतलेला आहे. ‘मलाही काही सांगायचंय’ ही पहिलीच कथा सापाला बोलता करून माणसाला अंतर्मुख करते. सापाला साप म्हणून समजावून न घेता त्याला देवापासून काळापर्यंत सर्व प्रतिमांच्या वेटोळ्यात निर्जीव करून टाकण्याचे काम माणसाने केले आहे. लेखकाने या संग्रहातील सर्व कथांमधून सापाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवत त्याचे एक सन्मान्य असे विज्ञानाधिष्ठित वास्तव वाचकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यात त्याला यशही मिळाले आहे. लेखकाचे मनोगत यादृष्टीने उल्लेखनीय म्हणावे असे आहे.
सर्पकथांच्या माध्यमातून अनेक बऱ्यावाईट मानवी प्रवृत्तींचा पर्दाफाश या कथासंग्रहात होतो. गारुडी आणि सर्पमित्र हे तसे इतर माणसांच्या मानाने सापांच्या जास्त जवळिकीतले. मात्र इतरांचा सर्पविरोध उघड करत असतानाच गारुडय़ांची ‘अर्थ’पूर्ण सर्पमैत्री आणि सर्पमित्रांचे निर्थक गारुड याकडेही लेखक डोळेझाक करत नाही. ‘नागमणी’ आणि ‘इतिसर्पपुराणम’ यासारख्या कथा भोंदूबाबांबरोबरच सर्पसंवर्धनास व मानव्यरक्षणास वाहून घेतलेल्या विज्ञानवादी संस्थांमधील निर्जीव नोकरशाही व यांत्रिक कारभाराबद्दल सात्त्विक संताप व्यक्त करतात. सापांपेक्षाही लांबलचक भरणारी ‘लालफीत’ लेखकाला विषारी वाटते. ‘साप नव्हे माणूस डूख धरतो’ असे त्याचे प्रतिपादन आहे. मानवी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेवरून प्रवास करत या कथा खऱ्याखोटय़ा विज्ञानवाद्यांचादेखील परामर्श घेण्याचा प्रयत्न करतात.
‘दंत’कथेने भान हरपणे आणि ‘दंश’कथेने झटक्यात भानावर येणे असा दुपेडी अनुभव या कथा वाचताना वारंवार येतो. ‘एकंदश असाही’ या कथेत सर्पदंशाची वेदना विसरता येते, पण मानवी दंशाचे विष उतरता उतरत नाही. वैद्यक व्यवसायाच्या काळ्या बाजूवरदेखील या कथा प्रखर झोत टाकतात. त्यापुढील कथांमध्ये सापाने केलेले लपंडाव व बघ्यांची फटफजिती याचे थरारक नाटय़ रंगवले आहे.
‘साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये आपला’ अशा उक्तीमधून साप व नवरा या दोघांनाही एका नर्मविनोदी पण कर्मविरोधी भावनेतून साहित्याने पुष्कळदा पाहिले आहे. मात्र प्रस्तुत संग्रहात सापांच्या शृंगारकथांसोबतच माणसांच्या आणि त्याहीपलीकडे जाऊन सापामुळे एकत्र आलेल्या एका युगुलाच्या प्रेमकथेचादेखील समावेश आहे. अशा विविध कथाविषयांचे नावीन्य हे या संग्रहाचे बलस्थान आहे.
सर्पकथांच्या वारुळातील ही सफर वन्यजीव प्रेमींबरोबरच सर्वच वाचक व अभ्यासकांसाठी रोमांचक ठरेल असा विश्वास वाटतो.
‘सर्पपुराण’ – म. वि. दिवेकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १६७, मूल्य – १७० रुपये.