डॉ. शमसुद्दीन तांबोळी
सध्याची सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय स्थिती अधिकाधिक मूल्यविरहित आणि अविवेकी होत असल्याची टीका होत असते. मात्र त्याविरुद्ध निर्भीडपणे बोलणाऱ्यांची संख्याही कमी असते. अशा दमनकारी परिस्थितीत ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही..’ निर्धाराने लेखन करणारे आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे काही धाडसी लेखक, पत्रकार आणि कार्यकर्ते आहेत.
आपत्कालीन परिस्थितीतील लोकांच्या वेदना कमी करून सांविधानिक मूल्ये आणि मानवी कल्याणाचा विवेकी विचार रुजवण्यासाठी आरोग्य सेना ही संघटना अस्तित्वात आली. गेल्या पंचवीस वर्षांत शारीरिक तसेच सामाजिक आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य सेनेने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. मानव आणि पर्यावरणाच्या भविष्यासाठी व्यापक दृष्टिकोन जोपासला जावा म्हणून आरोग्य सेनेच्या वतीने ‘पुरोगामी जनगर्जना’ हे मासिक सुरू करण्यात आले. आरोग्य सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य हेच ‘पुरोगामी जनगर्जना’ चे संपादक आहेत. ‘शब्दांचीच शस्त्रे’ हा त्यांच्या मागील आठ वर्षांतील निवडक अशा संपादकीय लेखांचा संग्रह आहे. या ग्रंथात समाविष्ट लेख हे तत्कालिनतेच्या मर्यादा ओलांडून वाचकांची समज वाढवतात आणि त्या-त्या विषयाशी संबंधित नवा दृष्टिकोनही देतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या समाजात आधुनिकता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, वैज्ञानिकता आणि बंधुता रुजावी अशी अपेक्षा होती, परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांतही आपण किती मागे आहोत याची जाणीव पदोपदी ‘शब्दांचीच शस्त्रे’ वाचताना होते. खास करून २०१४ ते २०२२ या काळात शासनाने जे महत्त्वाचे निर्णय घेतले, देशात ज्या घटना घडल्या, जनआंदोलने झाली आणि धर्मांधतेने धुमाकूळ घातला या सर्व घटनांचा अभ्यासपूर्ण लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक होय.
लोकस्मृती ही अल्पकालीन असते. सामाजिक आणि राष्ट्रीय अशा महत्त्वाच्या घटनाही लोकांच्या विस्मृतीत जातात आणि राजकीय लोकांना त्याचा दुरुपयोग करता येतो. असा दुरुपयोग करता येऊ नये यासाठी देश आणि समाज पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची उजळणी आणि पडताळणी करण्यासाठी हा एक उपयुक्त ग्रंथ आहे. या ग्रंथात शीर्षकाप्रमाणेच धारदार भाषेत जनमानसाला खटकलेल्या घटना, समाजमन प्रभावित करणारे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संदर्भ, अशा महत्त्वाच्या विषयांना वैश्विक विवेकी विचार आणि सांविधानिक कर्तव्यांचे निकष लावून विश्लेषण केले आहे. हे विश्लेषण सात्त्विक संताप व्यक्त करणारे असून सध्याच्या समाजिक पटलावरील असंवेदनशील, अविवेकी, विषमतावादी आणि विखारी वर्तनाचे वस्त्रहरण करते. वाचकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करण्याची क्षमता या पुस्तकात आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. या पुस्तकात एकूण ६९ लेखांचा समावेश आहे. हे सर्व लेख धर्म, विवेक, अहिंसा, स्वातंर्त्य, विषमता, आरोग्य, पर्यावरण, हिंदुत्व, राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि विविध अशा दहा भागांत सुसंगतपणे विभागले आहेत.
‘शब्दांचीच शस्त्रे’, – डॉ. अभिजित वैद्य, साधना प्रकाशन, पुणे पृष्ठे – ४६४, किंमत – ५०० रुपये
tambolimm@rediffmail.com