हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या सांस्कृतिक संचिताचे कोंदण हे सरंजामशाही परंपरेचे आहे. म्हणूनच या परंपरेच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणाऱ्या, स्पष्टपणे बोलायचे तर साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या शास्त्रीय संगीतविषयक दृष्टिकोनाविषयी साहजिकच कुतूहल वाटते. ही मंडळी संगीतावर आणि संगीतकारांवर मनापासून प्रेम करताना दिसतात आणि सांस्कृतिक विद्रोहासाठी त्यांनी दंडही थोपटलेले असतात. अशा कलाकार, समीक्षक आणि रसिकांचा दृष्टिकोन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समजून घ्यायलाच नव्हे तर ते काळाबरोबर पुढे नेण्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या दृष्टिकोनातून उतरलेले प्रस्थापित कलाकारांचे मूल्यमापन संगीत समीक्षेची वेगळी मिती पुढे आणू शकते.
अस्सलपणाचा संदर्भ होऊन जगणं हीदेखील एक फार मोठी कामगिरी आहे, असे म्हणून नीलाबाईंना पं. आरोलकर यांच्या चरित्राचा व्याप करावासा वाटला. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत जाणाऱ्या वास्तवाच्या संदर्भात कलाकारांची आत्मनिष्ठ आणि (विरुद्ध) लोकाभिमुख अशी वर्गवारी करून नीलाबाई बुवांना समजून घेतात आणि समजावून देतात.
‘आलेख जीवनाचा’ या सतरा पानांच्या लेखनात (किंवा प्रकरणात) नीलाबाईंनी आरोलकर बुवांच्या चरित्राचे ठळक आणि महत्त्वाचे तेवढेच तपशील, तेही त्रोटकपणे नमूद केले आहेत. चरित्र म्हणून हे तपशील फारच त्रोटक असले तरी नीलाबाईंना जे विधान करायचे आहे, त्याची पुष्टी ते करतात. आरोलकर बुवांचे संगतवार सविस्तर चरित्र हा वगेळा लेखनविषय होऊ शकेल असे मात्र जरूर वाटत राहते. या चरित्रात घटिते नाहीत. म्हणून ते चितारणे अवघडही झाले आहे. असो.
‘नोंदवही’ या शीर्षकाने एकोणीस पानांचा मजकूर ‘मला उमगलेले बुवांचे संगीतविचार’ अशा प्रकारचा आहे. बुवांकडे शिकताना फार काही विचारण्याची-प्रश्नोत्तरे करण्याची सोय होती, असे चित्र दिसत नाही. तेव्हा बुवांनी जे म्हटले, सांगितले, बुवांची जी ठाम मते जाणवली त्याचे मनन करणे, त्यांचा अन्वय लावणे, हा उद्योग नीलाबरईना ‘आपुलाचि वाद आपणासि’ या बाण्याने करावा लागला असणार. या संवादाचीच टिपणे-टाचणे या प्रकरणात येतात पण ती टाचण स्वरूपात नसून निबंध स्वरूपात आहेत. बुवांनी ख्यालाला जे ‘फ्ल्युइड स्कल्पचर’ म्हटले आहे ते म्हणजे नेमके काय, याचा उलगडा करण्याचा संगतवार प्रयत्न या लेखनात आहे. काही बंदिशी आणि सुरावटीचे दाखले देणे या संदर्भात अपरिहार्यच होते. सामान्य वाचकालाच काय पण थोडेबहुत संगीत शिकलेल्या विद्यार्थ्यांलाही हा भाग अवघड जाईल. पण जरी हे स्वरलेखन पूर्णत: वगळून बाजूला काढले तरी बुवांचे म्हणणे काय होते हे लक्षात यावे एवढी सुस्पष्टता या लेखनात आहे. ख्याल गायकीची अतिशय मौलिक तत्त्वे या प्रकरणात सूचित झाली आहेत. प्रयोगशील कलाकारांना करून दाखवण्यात रस असतो, बोलण्यात नसतो. ते बोलतात, ते उद्गार असतात. गृहीत-साध्य-सिद्धांत अशी प्राध्यापकी मांडणी करणं हा त्यांचा पिंड नसतो. त्यांच्या उद्गारांचा अन्वय लावण्याचे काम टीकाकारांचे असते. नीलाबाईंनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे.
‘गुरूंचे गुरू- एक अशांत कलाकार’ हे प्रकरण फारच सुंदर उतरले आहे. बुवांच्या व्यक्तिमत्त्वातले अंतर्विरोध, त्यांच्या वेदनेचे स्रोत नीलाबाईंनी फार नेमकपणाने अधोरेखित केले आहेत. बुवांची बाजू घेण्याचा प्रकार त्यात बिलकूल नाही. अकृत्रिम आत्मीयतेच्या पाश्र्वभूमीवर केलेली तटस्थ कार्यकारणमीमांसा असे या लेखनाचे स्वरूप आहे आणि ते हृद्य आहे. संगीताच्या क्षेत्रात मनस्वी गुरूंचा सहवास करणे, त्यांचे शिष्यत्व निभावणे हे काय दिव्य असते याची कल्पना या क्षेत्राबाहेरील लोकांनासुद्धा असेल! बुवा आणि नीलाबाई या गुरुशिष्यांतला विसंवाद या नात्याच्या सशक्त होण्यातले अडसर नीलाबाईंनी स्पष्टपणे मांडले आहेत. तरीही त्यात कुठे तक्रारीचा सूर येऊ दिलेला नाही. खरे तर त्यांच्या मनातच कुठे तो तरळलेला नाही. आपल्या मर्यादा, आपल्या नात्याच्या मर्यादा म्हटल्या की, त्याला दोन्ही बाजू आल्याच यांची समंजस जाणीव आणि अंतर्यामीचा काहीसा विषाद या लेखनात कुठेतरी जाणवत राहतो. या विषादाचे कारण जो जिव्हाळा, जी आपुलकी, ती या लेखनाला विलोभनीय करून जाते.
ख्याल गायकी आणि टप्पा गायन या विषयांवरची बुवांची आकाशवाणीवरची दोन भाषणे ‘संगीतकला विहार’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अॅकॅडमीसाठी पं. के. जी. गिंडे आणि मोहन नाडकर्णी यांनी बुवांची मुलाखत घेतली होती. बुवांचे विचार त्यांच्याच शब्दांत या लेखनातून वाचकाच्या थेट समोर येतात. बुवांच्या नेमस्त पण नेमक्या बोलण्याचा प्रत्यय या भाषण-संभाषणातून येतो. या संभाषणाचे आकलन वाचकाला होते ते मात्र या पुस्तकातील आधी वाचलेल्या पासष्ट-सत्तर पानांमुळेच. बुवांच्या विचारांचा परिचय वाचकाला अगोदरच मिळालेला असल्यामुळे हे संभाषण अधिक नेमकेपणाने कळू शकते.
यानंतर सर्वश्री अरुण कोपकर, दिलीप चित्रे, सुरेश तळवळकर, मोहन नाडकर्णी, रामकृष्ण दास, अरविंद मुळगावकर, पं. शरद, सुमित्रा आणि समीर साठे आणि अमरेंद्र धनेश्वर यांचे लेख आहेत. हे सर्व लेख बुवांचे गाणे आणि त्यांना कसे दिसले-भावले हे सांगतातच, शिवाय या प्रत्येक लेखकाची ओझरती ओळखही या लेखांतून होते. रामकृष्ण दासांच्या अगदी छोटय़ा लेखाच्या उत्तरार्धात बुवांच्या चरित्राचा काही तपशील आला आहे, तो वेधक आहे. ‘ग्वाल्हेर गायकी अंतर्मुख होऊन गाणारे म्हणजे आरोलकरच’ असा निर्वाळा पं. तळवळकरांनी दिला आहे. बुवांच्या रागाचं स्वरूप आपल्याला शंभर-दीडशे वर्षे मागे घेऊन जात असे, ही तळवळकरांची टिप्पणी बुवांना जे अभिप्रेत होते, ते रसिकांपर्यंत पोहोचत होते, या गोष्टीची पावतीच आहे. ज्यांच्यामुळे बुवांची प्रतिभा रसिकांपर्यंत पोहोचली असे बिरुद नीलाबाईंनी सुप्रसिद्ध संगीत समीक्षक मोहन नाडकर्णी (जोशी कुटुंबीय) यांना दिले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या शब्दमर्यादेत नेमका बसणारा नाडकर्णी यांचा लेख अतिशय संपृक्त आहे. मुळगावकरांनी बुवांच्या साक्षेपी अभ्यासू वृत्तीचा दाखला दिला आहे. त्यांचे गाते शिष्य शरद साठे आणि बुवांचे प्रशिष्य अमरेंद्र धनेश्वर यांचे अधिक विस्तृत लेखन या पुस्तकासाठी मोलाचे ठरले असते.
आपल्या गुरूचे देव्हारे न माजवता वस्तुनिष्ठपणे विश्लेषणात्मक आणि काळाचं भान ठेवून लिहिलेले हे पुस्तक त्यातील अभिनिवेशरहित आत्मीयतेमुळे वाचनीय आणि मननीय झाले आहे.
‘शरच्चंद्र आरोलकर : लेणे प्रतिभेचे’ – लेखन-संपादन – नीला भागवत, लोकवाङ्मय गृह, पृष्ठे – १४३, मूल्य – २०० रुपये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा