व्यवस्थेसाठी माणूस नाही तर माणसासाठी व्यवस्था, हे ब्रीद कठोरपणे पाळत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या कार्यावरील अतुल देऊळगावकर लिखित ‘शशिकांत अहंकारी : दृष्टी आरोग्यक्रांतीची’ हे पुस्तक साधना प्रकाशनातर्फे२० एप्रिल रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील संपादित अंश…
शशिकांत अहंकारी यांनी इंटर्नशिप १९७८ साली पूर्ण केली तेव्हा त्यांचे मित्र डॉ. अरुण लिमये यांनी त्यांना अभिनंदनपर पत्रात लिहिलं, ‘‘सध्या नानासाहेब गोरे हे भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त आहेत. त्यांच्याकडून पत्र घेऊन तिथे एम.डी. होऊन यावे.’’
शशिकांत यांचा गोरे यांच्याशी उत्तम परिचय होताच, पण त्यांना गोरे यांची तशी मदत घेण्याचा तो सल्ला मानवला नाही. त्यांनी लिमयेंना उत्तर दिलं, ‘‘इंग्लंडमधून एम.डी. होऊन मी भारतात आलोच तर माझी पदवी आणि माझा रुबाब याला साजेसा माझा दवाखाना मोठ्या शहरात असेल. मग समाजाचं स्वास्थ्य सुधारण्याऐवजी अमर्याद पैशांच्या लालसेने, डॉक्टरी पेशाकडून नाडल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा मीही एक भाग होईन. पण ज्यांना प्राथमिक औषधोपचारही मिळत नाहीत, त्यांना माझ्या त्या महागड्या पदव्यांचा काय उपयोग? माझं समाजवादी मन ही परदेशाची सोन्याची वा कचकड्याची फुलं स्वीकारू शकत नाही. क्षमस्व. आपल्या सूचनेबद्दल मन:पूर्वक आभार!’’
अहंकारी आडनावाच्या त्या निरहंकारी तरुणाकडे तसा नकार देण्याचं धैर्य कुठून आलं? १९७०च्या दशकात रूढी, परंपरा आणि प्रतीकांनी सजवलेले प्रस्थापितांचे चिरेबंदी किल्ले उद्ध्वस्त करणारा ‘अँग्री यंग मॅन’ तरुणांचा नायक झाला होता. तेव्हाचे तरुण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेला नाकारून, नवी रचना घडवण्याची उमेद घेऊन नवी मांडणी करण्याचा प्रयत्न करत होते. संस्कृती अधिक उन्नत करण्याच्या हेतूने झपाटलेल्या तरुणांना कलेचं स्वरूप आणि रूप पालटायचं होतं. परंतु काळाच्या ओघात नकारामागील तत्त्वज्ञान निसटून गेलं. नकाराचा पाया तात्त्विक वा सामाजिक न उरता तो निखळ वैयक्तिक झाला. ‘कशाच्या विरोधात बंड?’ हेच न समजता सर्रास नकार सुरू झाला. तत्त्ववेत्त्यांना अभिप्रेत असलेला, व्यापक सामाजिक आणि राजकीय भान असलेला ‘अँग्री यंग मॅन’ केव्हाच अंतर्धान पावला. व्यक्तीभोवतीचा सामाजिक परीघ नष्ट झाल्यामुळे ‘मी’ वगळता इतर सर्वांबद्दल तुच्छता, अशी आत्मकेंद्री वाटचाल सुरू झाली. तेव्हा एकेकाळी बंड आणि क्रांतीची भाषा बोलणारे ‘महानुभाव’ संधी आणि शक्यता पाहून सत्ता बळकावू लागले.
शशिकांत यांच्या नकाराची जातकुळी अजिबात वैयक्तिक नव्हती. अल्बेर कामू यांनी म्हटलंय, ‘‘जगणं आणि विसंगतीविरुद्ध बंड करून उठणं, हेच जीवनाचं सार्थक आहे. जो नकार आणि स्वीकार दोन्ही करू शकतो, तोच खरा बंडखोर.’’ शशिकांत यांच्याकडे वर्तमान नाकारत विश्वाला कवेत घेणारी संयमी बंडखोर वृत्ती होती. शशिकांत यांना शाश्वत बदल घडवायचा होता. ते बदल घडवणारे उत्प्रेरक होऊन एखाद्या कुंभाराप्रमाणे त्या बदलाच्या प्रक्रियेला रूप आणि आकार देत राहिले. अनेक आघात पचवून यत्किंचितही कडवटपणा येऊ न देता जगाला प्रेम अर्पण करणाऱ्या त्या धीरोदात्त नायकानं अनेकांना कार्यरत आणि कार्यप्रवण केलं.
सार्वजनिक आरोग्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. शशिकांत अहंकारी यांचं कर्करोगामुळे ८ ऑगस्ट २०२३ रोजी निधन झालं. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘हॅलो’ च्या आवारात स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. आजूबाजूच्या गावांमध्ये त्या कार्यक्रमाची बातमी पसरली. सकाळपासून अणदूर परिसरातून मिळेल ती वाहने पकडून माणसं ‘हॅलो’च्या आवारात दाखल होऊ लागली. हळूहळू वाहनांची संख्या वाढत गेली. अकरा वाजेपर्यंत शेकडो लोक तिथं येऊन पोचले होते. त्यांत बहुसंख्य महिला होत्या.
शशिकांत यांच्या आठवणी, विविध व्यक्तींचे त्यांच्याबद्दलचे अनुभव अशा वातावरणात संध्याकाळ होऊन गेली. निघताना प्रत्येकाचे पाय जड झाले होते. कुणी मनातली भावना बोलून दाखवत होतं की, ‘‘सर जाताना आरोग्यसेवेचं हे काम आणखी जोमानं सुरू ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवून गेले आहेत.’’ शशिकांत यांच्या स्मृतिदिनी आसपासच्या शंभरएक गावांतून ते लोक स्वत:च्या खर्चाने तिथे जमले होते. ती ओढ अकृत्रिम होती. ती शशिकांत यांच्या अथक प्रयत्नांचं प्रतिबिंब होती…
शशिकांत यांनी वैद्याकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना समाजाशी भिडवण्यासाठी १९८० साली ‘हॅलो’ (हेल्थ अँड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन)ची स्थापना केली. कालांतराने खेड्यात राहणाऱ्या न शिकलेल्या एकल महिलांना सोबत घेऊन ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’ सुरू झालं. डॉक्टर, भारतवैद्या आणि प्रेरक यांच्या साथीला अनेक खेडी येऊ लागली. याच काळात जग आणि आपला देश कॉर्पोरेटोक्रसीकडे निघाले होते. जगाचं रूपांतर अजस्रा बाजारपेठत झालं आणि मोजके धनाढ्य तिला बळकावू लागले होते.
शिक्षण, आरोग्य आणि उद्याोग अशा सर्व क्षेत्रांतून अंग काढून घेऊन सरकार त्या गोष्टी खासगी संस्थांच्या हवाली करत होतं. तेव्हा खासगी वैद्याकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये वाढीस लागली. तिथल्या वैद्याकीय शिक्षणाचा खर्च कोटींची उड्डाणं घेऊ लागला. त्यात दहा वर्षं घालवल्यावर दवाखाना सुरू करण्यासाठी कोटींची गुंतवणूक होऊ लागली. त्यामध्ये नेते, नोकरशहा, बिल्डर्स आणि व्यापारी उतरले. बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तपासणी आणि निदान करणारी डायग्नोस्टिक सेंटर्स उघडली. औषध कंपन्यांप्रमाणे सगळे गुंतवणूकदार ग्राहक मिळवण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपापले दलाल नेमू लागले. त्या सुमारास, शहरांमधील जागांचे भाव वारेमाप वाढत गेले. एक-दोन डॉक्टरांनी मिळून दवाखाना सुरू करणं अशक्य होऊन गेलं. सेवाभावी आणि विश्वस्त वृत्तीने आरंभलेली रुग्णालये अस्ताला लागली. डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं पार विस्कटून गेलं. अशा वातावरणात अणदूर परिसरात ‘भारतवैद्या’ प्रत्येक रुग्णासाठी चोवीस तास उपलब्ध असतं आणि त्यातील आरोग्यसेवक अतिशय आस्थेने उपचार करतात. शशिकांत त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल अतिशय भरभरून बोलत. ते एकदा म्हणाले, ‘‘सोलापूरची एक कार्यकर्ती पहाटे पाच वाजता घरकामासाठी उठली, तर तिला एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. नुकत्याच जन्मलेल्या एका मुलीला कुणीतरी कचऱ्यात फेकून गेलं होतं. तिनं त्या मुलीला तात्काळ घरी आणलं. नंतर बचत गटातील पंधरा-बीस बायकांना बोलावून सांगितलं, ‘‘कुणीतरी इथे तान्ह्या मुलीला टाकून गेलंय. आपण तिला मरू द्यायचं नाही.’’
दुसरी बाई म्हणाली, ‘‘मला मूल नाही. या बाळाला मी दत्तक घेते.’’त्या बायकांनी लगेच पोलिसांना बोलावलं आणि त्या मुलीला दत्तक घेतलं. ‘‘न शिकलेली, कायद्याची माहिती नसलेली एक संवेदनशील बाई एवढी उदात्त कृती करून जाते. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता असामान्य धैर्य दाखवते. असे प्रसंग पाहून मला वाटतं, आपण कोण लागून गेलो त्यांच्यापुढे? त्यांना केवढी दु:खं आहेत! त्या किती संकटांना सामोरे जात असतात! कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक समस्यांना तोंड देत त्या दु:खावर, दारिद्र्यावर विजय मिळवतात. त्यांचा हा लढा अद्वितीय आहे. तो मला सतत काहीतरी शिकवून जात असतो. त्यांना बघताच माझी ऊर्जा परत सळसळू लागते. यांतून लोक धडा घेत जातील. सुरुवातीला एक जण तयार होईल. उद्या दहा होतील, दहाचे शंभर होतील. लोक बदलत जातील आणि त्यातून परिवर्तन होईल.’’
शशिकांत यांनी गावोगावच्या निराधार आणि न शिकलेल्या महिलांना बहुश्रुत केलं. त्यांनी आत्मसन्मान म्हणजे काय हे माहीत नसणाऱ्या महिलांचं मन, भावना आणि विचार यांना आकार दिला. त्यातून ‘गावाचा मनोभावे सांभाळ करणारी एकल महिला’ ही अशक्यप्राय आणि स्वप्नवत वाटणारी कल्पना प्रत्यक्षात आली. गावांमध्ये स्वत:च्या घराच्या आत कोणाला किती येऊ द्यायचं हे जात पाहूनच ठरत असे. भारतवैद्या ते वातावरण भेदू शकल्या. गरोदर महिलेचं पोट पाहताना जात हा निकष बाजूला सारला गेला. ती घटना साधी-सोपी वा किरकोळ नाही. त्या घटनेने बंदिस्त रचना असेलेल्या गावांची (आणि तिथल्या घरांची) कवाडं उघडली गेली.
शशिकांत यांनी त्या महिलांसाठी उत्तम सामाजिक भांडवल उपलब्ध केलं. त्यामुळे त्या महिलांना ‘आरोग्याचा अर्थ आम्हासिंच ठावा’ असा दुर्दम्य आत्मविश्वास आला. त्या इतर महिलांमध्ये, घरांमध्ये आणि गावांच्या सार्वजनिक आरोग्यामध्ये बदल घडवू शकल्या. त्यामुळे सामाजिक बदलाची अखंड शाृंखला अभिक्रिया सुरू झाली. शशिकांत यांनी केवळ संस्थाच नव्हे तर ती सांभाळणारी माणसांची फळी उभारली. ती सक्षम आणि स्वावलंबी केली, त्यांना रुग्णसेवेच्याही पलीकडे जाणारी, रुग्णातला माणूस पाहू शकणारी दृष्टी दिली. त्यातून घडलेले बसवराज नरे, नागिणी सुरवसे, वासंती मुळे, प्रसन्न कंदले, जावेद शेख, दिनकर गाढवे, गुलाब जाधव, बालाजी जाधव, म्हाळप्पा गळाकाटे, इंदूबाई कबाडे आणि सतीश कदम असे कितीतरी कार्यकर्ते शशिकांत यांचे सोबती होऊन गेले. शशिकांत यांच्या पश्चात ते सारे कार्यकर्ते, भारतवैद्या, बचतगटातील महिला आणि प्रशिक्षित डॉक्टर, अशी फौज ‘हॅलो’ची धुरा सक्षमतेनं सांभाळत आहेत.
शशिकांत सर्वार्थाने इतरांसाठी कार्यरत राहिले. रुग्ण, महिला, मुले, विद्यार्थी आरोग्य, सलोखा, शिक्षण, संवाद, सुधारणा, शेती, सुरक्षा, जनजागरण… किती प्रकारच्या व्यक्ती आणि कैक प्रकारचे मुद्दे सांगावेत! त्यांचं व्यक्तिमत्त्व डॉक्टरकीच्या पलीकडे ग्रामीण आयुष्याच्या प्रत्येक पैलूशी निगडित होतं. व्यवस्थेसाठी माणूस नव्हे, तर माणसासाठी व्यवस्था, ही गोष्ट त्यांना पुरेपूर आकळली होती. त्यांनी हातात घेतलेल्या प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी माणूस होता. ‘व्यक्तीचा सर्वांगीण विकास’ हा त्यांच्या एकूण कार्याचा गाभा होता. ते काम त्यांनी कळकळीनं आणि तळमळीनं केलं. त्यात माणसाबद्दलचा पराकोटीचा आपलेपणा होता. त्या कामाला दूरदृष्टीची आणि संवादाची जोड होती. म्हणूनच शशिकांत अहंकारी नावाचा माणूस अनेकांसाठी जिवाभावाचा होऊन गेला. शशिकांत यांनी महाराष्ट्राच्या आरोग्यक्षेत्राला आकार देताना सर्वसामान्य माणसाला त्याच्या केंद्रस्थानी आणलं. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी या कामातून इतरांना दृष्टिकोन दिला. कामाची रचना करण्याचा प्रत्यक्ष काम करण्याचा आणि ते काम पुढे चालवण्याचासुद्धा…