काळ्या मातीला आई मानणाऱ्या जिद्दी शेतकऱ्याची रसदार कहाणी आहे. शेती बेभरवशाची मानली जाते. पण बाळासाहेब यांनी ती भरवशाचीच नव्हे तर खात्रीची करून दाखवली. नवनवी तंत्रं आत्मसात करून बदलत्या काळाबरोबर शेतीत बदल केले.
नाशिक आणि द्राक्षं हे समीकरण तयार होऊनही आता खूप र्वष तयार झाली. पण हे समीकरण तयार होण्यात बाळासाहेब सहभागी होते. १९९० नंतर नाशिकची द्राक्षं लंडन आणि इतर देशांत निर्यात होऊ लागली. त्यात बाळासाहेबांचाही समावेश होता. या निर्यातीमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. या सर्वातून पुढे ‘महाग्रेप्स’ हा ब्रँड कसा तयार झाला, याचाही हकिकत या आत्मकथनपर पुस्तकात आली आहे.   नाशिकच्या शेतकऱ्यांच्या ‘महाग्रेप्स’ व नंतर महाराष्ट्राचा असा जो मोठा संघटनेचा व्याप उभा राहिला त्यात बाळासाहेबांचा पुढाकार लक्षणीय होता.
पण त्या आधीचा बाळासाहेबांचा प्रवास खडतर म्हणावा असाच होता. आपल्या आई-वडिलांनी कशा प्रकारे शेती केली, हे ते लहानपणापासून पाहत असल्याने बाळासाहेबांना कष्टाची तमा कधी वाटली नाही. काबाडकष्ट करत त्यांनी निश्चित ध्येयाने शेती करण्याचा, ती पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
पुढील काळात देशोदेशी प्रवास करून तेथील शेतीच्या पद्धती, नवी तंत्रं जाणून घेतली. त्यानुसार आपल्या शेतीत शक्य ते बदल करण्याचा प्रयत्न केला. आणि शेतीला आपल्या इतर शेतकरी सहकाऱ्यांच्या मदतीने प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याची ही कहाणी रंगतदार आणि वाचनीय आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी समर्पक प्रस्तावना लिहिली आहे.
‘शेतकरी नावाचा माणूस’ – बाळासाहेब जगताप, अक्षर मानव प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १९९, मूल्य – २०० रुपये.