श्रीरंजन आवटे

नव्वदीपूर्वीच्या जगण्याचे अनेक संदर्भ घेऊन येणारी ही कादंबरी. ती भरकटण्याचे आणि कल्लोळाचे संदर्भ नोंदवून ठेवते आणि जगण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला मोकळी वाट करून देते. तात्त्विक चक्रव्यूहात ती अडकत नाही. आध्यात्मिक मुक्तीच्या वाटेवर ती थबकत नाही. तिला मुक्कामाची महत्त्वाकांक्षा नाही. ती प्रवासाचे माहात्म्य सांगते आणि त्यातली रोमहर्षकता खुबीने उलगडत पुढे जाते.

Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…

संदर्भाचं जडत्व अस्तित्वावर अतिक्रमण करतं. ओळखीचा भवताल आपले फास घट्ट आवळतो. आयुष्याचे दैनंदिन रकाने भरतानाही धाप लागते. लौकिकाचे सारे अक्षांश-रेखांश अंगावर चाल करून येतात. अस्तित्वविषयक प्रश्नोपनिषद अंतर्बा कुरतडत राहते, नि लौकिकाच्या गुदगुल्यांनी या प्रश्नोपनिषदाला वळसाही घालता येत नाही. जणू प्रयोजनाचे तर्कसूत्र शोधण्याची आदिम तहान लागते.

अशा वळणावर उभा असलेला श्रीधर आपल्या आलिशान, सुरक्षित भविष्याचे दोर कापून स्वत:ला अज्ञाताच्या डोहात झोकून देण्यासाठी सज्ज आहे. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या तीनही पातळय़ांवर यशस्वी कारकीर्द सुरू असलेला हा नायक मरीन ड्राइव्हला समुद्रकिनारी उभा आहे. त्याच्या मनातील असंख्य वादळं लक्षात घेता तो आत्महत्येचं पाऊल उचलेल की काय, अशी शंकेची पाल चुकचुकत असतानाच एका शोधयात्रेचा आरंभ होतो. अर्थात तोही आत्महत्येइतकाच प्रखर- स्वत:ला सोलवटून काढणारा. प्रख्यात पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘शोधयात्रा’ (१९८९) या कादंबरीचा हा नायक.

आणखी वाचा-आदले । आत्ताचे: एका पिढीच्या अवस्थांतराची नोंद

एखाद्या सिनेमात शोभेल असा हा प्रसंग. सर्व काही आलबेल असताना, रांकेला लागलेलं असताना कादंबरीचा नायक कुठं निघाला आहे, त्याला कसली आस आहे नि मुळात त्याला काय शोधायचं आहे, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. ‘गाइड’ मधल्या तुरुंगातून बाहेर पडलेल्या नायकासमोर जसा ‘मुसाफिर जायेगा कहाँ’ असा प्रश्न पडला आहे- तसाच काहीसा. तो चालू लागतो आणि रमेश तेंडुलकरांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे रस्त्यांना पाय फुटू लागतात.

श्रीधरच्या या प्रवासाची सुरुवात वाचताना सिद्धार्थाची अर्थात गौतम बुद्धाची आठवण येते. आलिशान राजवाडय़ात सुखासीन आयुष्य सुरू असताना सिद्धार्थ साऱ्या सांसारिक आयुष्याशी फारकत घेऊन चालू लागतो. आयुष्यात दु:ख आहे, दारिद्रय़ आहे, मृत्यू आहे. हे समजून घेतानाच शाश्वत सत्य त्याला आकळू लागतात आणि कुठल्या तरी पिंपळाखाली त्याला ‘साक्षात्कार’ होऊ लागतात नि मग साधा पिंपळही ‘बोधिवृक्ष’ होतो !

श्रीधरची शोधयात्रा ही एक प्रकारे बोधिवृक्ष शोधण्याची यात्रा आहे आणि बोधिवृक्ष कुठं एके ठिकाणी असतोच असं नाही. जगण्याचं संचित शोधण्याची यात्रा अव्याहत सुरूच असते. एका बिंदूपासून तिची सुरुवात होत नाही नि एका बिदूपाशी तिचा शेवट नाही. शोधयात्रा सतत सुरू असते एखाद्या अखंडकाप्रमाणे (continuum) नि जगणं अभिवाह (flux) असल्याप्रमाणे. त्यामुळे चिमटीत काही पकडता येतंच असं नाही. हातातून पारा निसटून जावा किंवा उडणारी म्हातारी हातातच येऊ नये नि आपला पाठशिवणीचा जीवघेणा खेळ सुरू रहावा, अशी काहीशी सुरू असते ही शोधयात्रा.

‘बुलाती है, मगर जाने का नहीं/ ये दुनिया है, इधर जाने का नहीं’ असं म्हणणाऱ्या राहत इंदौरींना अभिप्रेत असणाऱ्या ‘दुनिया’पासून पळ काढून श्रीधर आत्मशोधाला सुरुवात करतो. लौकिक दुनियेपासूनची फारकत ही आत्मशोधाच्या यात्रेची पूर्वअट आहे का? दैनंदिन जगण्यामध्ये असा आत्मचिंतनाचा अवकाश उपलब्ध नसतोच का आणि लौकिक रिंगणाबाहेर गेल्यावरच नजरेच्या टापूबाहेरचा अस्पर्शित प्रदेश आकळू शकतो का, असे प्रश्न उपस्थित होतात.

वानप्रस्थाश्रमाच्या संकल्पनेतही जंगलात जाऊन जगणं शोधण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात या आश्रमात प्रवेश करावा, असे म्हटले गेले आहे. साधूंचा श्रीधर हा तरुण आहे. आयुष्याच्या मधल्या टप्प्यावर उभा आहे आणि स्वत:च्या आयुष्याकडे एक तटस्थ निरीक्षक (bystander) असल्यागत तो पाहू लागला आहे. हिमालयात जाऊन ऋषीमुनींसारखं वैराग्य अनुभवून, जगण्याचं मूलभूत तत्त्व शोधून आणावं अशी एक पारंपरिक फॅण्टसी असते.

आणखी वाचा-आदले । आत्ताचे : आजी-मैत्रिणीचा ‘पैस’

या फॅण्टसीच्या बीजातून शोधयात्रा जन्मली आहे. मात्र ती पारंपरिक प्रकारे पुढे जात नाही. कारण श्रीधर प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला, भवतालाला प्रश्नांकित करत जातो. डेव्हिड ह्यूमच्या संशयवादाप्रमाणे त्याच्या मनातला वैचारिक आणि भावनिक कल्लोळ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एखाद्या लंबकाप्रमाणे फिरत राहतो. त्यामुळं तो जगण्याचे निष्कर्ष काढून मोकळा होत नाही. निष्कर्षांच्या अल्याड, समजून घेण्याच्या प्रक्रियेवर, अनुभवांच्या संश्लेषणावर त्याची अवघी भिस्त आहे.

प्रशांत बागड यांच्या ‘नवल’मध्ये लौकिक संदर्भ तात्त्विक शोधयात्रेकरता आनुषंगिक म्हणून येतात. मात्र अरुण साधू यांच्या ‘शोधयात्रा’मध्ये लौकिक संदर्भ हे केवळ आनुषंगिक नाहीत तर ते आत्मशोधातले मौलिक टप्पे म्हणून येतात. त्यामुळेच एखाद्या फ्लॅशबॅकप्रमाणे श्रीधरचे आयुष्य आपल्यासमोर उभे राहते आणि त्याच्या निर्णयांचे अर्थ आपल्याला कळू लागतात. त्याच्या निर्णयांची कारणमीमांसा होते आणि हळूहळू त्याच्या चिंतनात वाचकही सहभागी होतो.

जगण्याचं सर्वस्व पणाला लावून जीवघेण्या शोधयात्रेचे वाटसरू व्हायचा निर्णय घ्यायचा तर काहीतरी अमूल्य हरवले आहे, याची जाणीव मनाच्या खोल तळाशी असायला हवी. श्रीधरच्या मनाला याची समंजस जाण आहे. कुणी कवी म्हणतो तसं,‘‘घर से निकल पडा तो मुझे कोई पराया न लगा !’ घर सोडल्यावर हळूहळू आस्थेचा परीघ विस्तारण्याची प्रक्रिया सुरू होते. आपल्याला लाभलेल्या जन्मजात परिसंस्थेचं सीमोल्लंघन केल्यावरच नवी नजर उमलू लागते त्यामुळेच नवजात अर्भकासारखं श्रीधरसाठी हे जग नवंकोरं आहे. या नव्या जगात प्रवेश करतानाच बहिणीचं निधन आणि प्रेयसीचा प्रवेश यामुळे मृत्यू आणि प्रेम या सनातन बाबींमुळे श्रीधरचं जग उलटंपालटं होतं. त्यातून जगण्याबाबतच्या त्याच्या मूलभूत धारणा उन्मळून पडतात.

‘‘हा देह तुझा पण या देहातील तू कोण/ हा देह तुझा पण या देहावीण तू कोण? हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो/ ना जन्म मरण या देहातील तो म्हणतो !’’ श्रीधरच्या चिंतनानंतर रॉय किणीकरांच्या या ओळी सहज आठवतात. ‘वासांसि जीर्णानी यथा विहाय’ म्हणणाऱ्या गीतेतील अक्षरं शरीर-आत्मा या संदर्भाने द्वैत-अद्वैताचा द्वंद्वात्मक, संमोहक खेळ सुरू करतात.

हा खेळ प्रेमाच्या मूलभूत विश्वासावर सुरू आहे; पण मुळात शशी या प्रेयसीच्या पाशात अडकताना रजनीश, कृष्णमूर्ती या सगळय़ांच्या वाचनामुळे श्रीधरच्या मनात काहूर निर्माण होते. कारण प्रेमात संघर्ष सुरू होतो नि कृष्णमूर्ती तर म्हणू लागतात प्रेम म्हणजे संघर्षांचा अंत. स्वामित्वाची भावना प्रेमाच्या व्यापकतेला मारक ठरू लागते आणि अस्तित्वाचे आद्याक्षर गिरवताना दमसास पुरत नाही.

आणखी वाचा-आदले । आत्ताचे : अद्भुताला स्पर्श…

अशी शोधयात्रा करणं म्हणजे जगण्यापासून पळून जाणं. कर्तव्यच्युत होणं. आपल्या मित्राप्रमाणे समाजात जाणीव जागृती करणं हाच जीवनाचा मुख्य उद्देश असू शकतो नि आपण तर केवळ स्वत:पुरता विचार करतो आहोत, ही श्रीधरची द्विधाही समोर येते. अन्यायाचे उच्चाटन हेच जगण्याचे अंतिम उद्दिष्ट असताना वैयक्तिक पातळीवरील आत्मशोधाची गरजच काय, असा प्रश्न एक कम्युनिस्ट कार्यकर्ती उपस्थित करते तेव्हा ही धारणाच श्रीधरला अंधश्रद्धेप्रमाणे वाटू लागते. जगण्याबाबत एकांगी निकालपत्र प्रसिद्ध करून इतरांना विशिष्ट प्रकारे वागण्यास भाग पाडणं त्याला नामंजूर आहे. साधूंना सामाजिक, राजकीय भूमिका घेत असतानाच आत्मशोधाची गरजही ध्यानात येते. सामूहिकतेत व्यक्तित्त्वाच्या शोधाची आहुती द्यायला ते तयार नाहीत. त्यांना क्षणांची गरज लक्षात येते आणि तात्कालिकाच्या पलीकडे असलेलं कालातीत तत्त्वाचं मोलही ते जाणतात. त्यातून तात्कालिकता आणि शाश्वतता यांच्यातील ताण सहज लक्षात येऊ शकतो.

तसंच श्रद्धा-अंधश्रद्धा आणि त्यातली सीमारेषा आखण्यातला पेचही लख्खपणे समोर येतो. देव आहे का किंवा जगाचे नियमन करणारी विश्वशक्ती आहे का, नि असल्यास ती न्यायी आहे का ? न्यायी असेल तर जगात इतके क्रौर्य, इतकी हिंसा कशी आणि अशी न्यायी विश्वशक्ती नसेल तर या जगाचा सूत्रधार कोण आहे, असे एकात एक गुंतलेले प्रश्न उभे करून विचारोन्मुख करायला ही कादंबरी भाग पाडते.

कादंबरी काहीशी पसरट वाटण्याचा धोका अरुण साधू पत्करतात. मात्र शोधयात्रेतला ‘ठहराव’ त्यांना मोलाचा वाटतो. त्यामुळेच घटनांच्या एकापाठोपाठ मालिकेऐवजी त्याच्या प्रस्तराखालची माती तपासण्याचा त्यांचा रोचक प्रयत्न दिसतो. हा ठहराव शरच्चंद्र मुक्तिबोधांच्या कादंबरीत्रयीच्या (‘क्षिप्रा’, ‘सरहद’ आणि ‘जन हे वोळतू जेथे’) संथ प्रवाहाशी नातं सांगणारा आहे जिथं युक्तिवादाचा सोस नाही मात्र अनुभवण्याच्या प्रक्रियेची असोशी आहे.

श्रीधरसोबतच्या मित्र-मैत्रिणींच्या आयुष्याचा पट काहीसा त्रोटकपणे येतो. ते स्वाभाविकही आहे. मात्र त्यांच्या धारणांमधून, गृहीतकांमधून एक समांतर आलेख उभा राहतो. तटस्थपणे पाहणाऱ्याला त्यातून एक आशयाचे तर्कसूत्र गवसते. हे जगण्याचे आलेख धारणांची, पूर्वग्रहांची पूर्णत: एकरेषीय समीकरणे नसली तरी त्यातून या घटकांची भूमिका ध्यानात येते.

कादंबरीच्या उत्तरार्धात एक विलक्षण रोचक प्रसंग आहे, जिथे लष्करी अधिकारी श्रीधरची चौकशी करू लागतात. पूर्वायुष्याबद्दल त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे श्रीधर हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा त्यांचा संशय बळावतो. व्यवहारी जगातील सुरक्षा आणि आध्यात्मिक आत्मशोधाचा टप्पा यांच्या टकरावात दोन जगातल्या दृष्टिकोनांच्या भाषाच एकमेकांवर आदळतात. अर्थातच अनर्थाची निर्मिती होते आणि श्रीधरला अधिकारी अटक करतात. त्यामुळेच या अनर्थाच्या वाटेवर आत्मशोध असा राष्ट्रीय सुरक्षेस धोका बनतो !

कादंबरीचा शेवट विनाशवादाकडे (nihilism) जात नाही. तो परात्मतेला वलयांकित करत नाही. लौकिकामध्येच असलेला प्रेमाच्या आणि आस्थेच्या प्रदेशाचं निर्देशन करतो, हे सर्वात महत्त्वाचं. ‘शोधयात्रा’ जरी एका सुखात्मिकेच्या अर्धविरामावर थांबलेली असली तरी या आदिम प्रश्नांची निश्चित उत्तरं नसतात, हेच ती अधोरेखित करते आणि त्यामुळेच ती विहिरीच्या खोल तळाशी बुडी मारून वर येण्यापर्यंत श्वास टिकवण्याचं खुलं आव्हान वाचकासमोर उभा करते. श्रेयस आणि प्रेयस शोधतानाच्या वाटेवर असलेले खाचखळगे दाखवत साचेबद्ध ठोकताळय़ांच्या पलीकडे असणारी प्रकाशवाट प्रशस्त करण्यात कादंबरी यशस्वी ठरते. साधूंच्या श्रीधरसमोरचे काही पेच सनातन असले तरी बाकी तपशील, कथावस्तूचे संदर्भ नव्वदपूर्वीचे आहेत. आधीच नोंदवल्याप्रमाणे ते केवळ आनुषंगिक नाहीत.

जागतिकीकरणाच्या तीन दशकीय वाटचालीनंतर व्यक्तीच्या ओळखीचा मल्टिफ्रेनिक खेळ अधिक संमोहक आणि आव्हानात्मक झाला आहे. त्यामुळे आजच्या काळातील शोधयात्रा ही रंगीबेरंगी आहेच, शिवाय अधिक जटिलही. तंत्रज्ञानाच्या सुसाट वेगाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मायाजालाच्या पार्श्वभूमीवर आध्यात्मिक शोधयात्रेत होणारी कुतरओढ विलक्षण जीवघेणी आहे. तिची परिमाणं भिन्न आहेत. एखाद्या कॅलिडिओस्कोपमध्ये पाहिल्यावर होणारा रंगविभ्रम हा जणू या काळाचा अगाध महिमा आहे. त्यामुळे आजच्या काळातल्या तात्त्विक आणि आध्यात्मिक ‘ट्रेजर हंट’मध्ये सहभागी होताना भरकटण्याची शक्यताच अधिक आहे. मात्र साधूंची ‘शोधयात्रा’ भरकटण्याचे आणि कल्लोळाचे संदर्भ नोंदवून ठेवते आणि जगण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला मोकळी वाट करून देते. तात्त्विक चक्रव्यूहात ती अडकत नाही. आध्यात्मिक मुक्तीच्या वाटेवर ती थबकत नाही. तिला मुक्कामाची महत्त्वाकांक्षा नाही. ती प्रवासाचे माहात्म्य सांगते आणि त्यातली रोमहर्षकता खुबीने उलगडत पुढे जाते. कोणतीही चांगली कलाकृती कमी बोलते नि अधिक सूचन करते. साधूंची शोधयात्राही बोलते- त्याहून अधिक काही सुचवते नि अर्थशक्यतांची नवी दारं खुली करते. त्यातून आदिम उत्खननाचे काही अवशेष हाती लागले तरी यात्रिकाला प्रवास सार्थकी लागल्याचे कोरभर समाधान मिळू शकते. हे समाधान विलक्षण आहेच, पण सोबतच प्रचंड अस्वस्थताही. अशा संमिश्र भावकल्लोळाची प्रचीती देतानाच विचारप्रवर्तक करणारी शोधयात्रा म्हणूनच आजही अधिक महत्त्वाची ठरते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकी. मात्र तरुण विचारशील लेखक, कवी आणि कादंबरीकार ही दुसरी ओळख. ‘सिंगल मिंगल’ ही कादंबरी तसेच पुणे विद्यापीठातर्फे ‘विसाव्या शतकातील राजकीय विचार’ हा अभ्यासग्रंथ प्रकाशित. राज्यघटनेची ओळख सहजसोप्या पद्धतीने करून देणाऱ्या ‘आपलं आयकार्ड’ या लोकप्रिय पुस्तकाचे सहलेखक.
poetshriranjan@gmail.com

Story img Loader