नामजोशी यांनी आजपर्यंत एकंदर शंभरच्या वर लघुपट आणि माहितीपटांसाठी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. ई टीव्ही मराठी वाहिनीवर कार्यकारी निर्माता म्हणून कामाचा दीर्घकाळ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तसेच ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. सध्या अभिषिक्ता इन्फोटेन्मेंट्स या प्रॉडक्शन हाऊसचे संचालकपद भूषवत असलेल्या नामजोशी यांनी लघुपटाच्या क्षेत्रात स्वत:च्या नावाची मोहोर उमटवली आहे. अशा तज्ज्ञ दिग्दर्शकाचे हे लघुपटांची निर्मितीप्रक्रिया समजावून सांगणारे पुस्तक सहज सुलभ, नैसर्गिक भाषेमुळे आणि अनुभवविश्वाच्या खोलीमुळे सर्वच वयोगटाच्या वाचकांना संदर्भयुक्त ठरेल.
या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच्या टॅगलाइनमध्येच लघुपटनिर्मितीबाबतच्या प्रॉडक्टिव्ह टिप्स देण्याबाबतचा उल्लेख आहे. यातूनच लेखकाचा पुस्तकाबाबतचा नेमका दृष्टिकोन स्पष्ट होतो. लघुपटनिर्मितीचे मूलभूत घटत समजावून सांगणे हा या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे. सदर पुस्तकात एकंदर पाच विभाग आहेत. यात लघुपटाच्या निर्मितीपूर्व प्रक्रियेपासून प्रत्यक्ष निर्मितीप्रक्रिया आणि निर्मितीनंतरची प्रक्रिया यांचा पूर्वार्धात समावेश आहे, तर उत्तरार्धात उत्तम कल्पना, कथेची नेमकी मांडणी आणि सुंदर सादरीकरण असलेल्या जगप्रसिद्ध उत्तमोत्तम लघुपटांचा रसास्वाद समाविष्ट आहे.
लघुपटाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या कल्पना, पटकथा संवाद यांची मांडणी, कॅमेरा, त्याच्या मूव्हमेंट्स, कॅमेरा प्रकार, त्याचे तंत्र, विविधता, ध्वनीची संकल्पना व ध्वनिमुद्रण, चित्रकरणाची पूर्वतयारी, बजेटिंग, कामाचे नियोजन, याची ओळख ‘निर्मितीप्रक्रिया’ या भागात अतिशय हलक्या फुलक्या व मनोरंजकपणे करून देण्यात आली आहे. यातील प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला येणाऱ्या सुविचार व अवतरणात त्या प्रकरणाचा बराचसा अर्क उतरल्याने संपूर्ण प्रकरण समजायला सोपे जाते. नेमकी व थेट उदाहरणासहितची भाषा ही लघुपटनिर्मितीबाबतची प्रक्रिया उलगडून दाखवते.
निर्मितीप्रक्रिया या दुसऱ्या विभागात सेट लावणे, प्रकाशयोजना करणे, मेकअप व प्रत्यक्ष चित्रीकरण याची माहिती देण्यात आली आहे. वर उल्लेख केलेल्या प्रत्येक घटकाबाबत कोणती खबरदारी घ्यावी हे लेखकाने अत्यंत बारकाव्याने सांगितल्याने त्याचे या क्षेत्रातील सूक्ष्म निरीक्षण व प्रभुत्व लक्षात येते. काळानुसार होणारे तंत्रज्ञानातील बदल सांगताना तो भाग वाचनीय व माहितीपूर्ण कसा होईल, याकडे लेखकाने लक्ष पुरवल्याने तो पुस्तकी व गंभीर होत नाही. प्रत्येक तांत्रिक बाब समजून सांगताना त्यासाठी केलेल्या समर्पक छायाचित्रांच्या व रेखीव आकृत्यांच्या वापरामुळे विषय समजून घ्यायला मदत होते. निर्मितीत्योत्तर विभागात संकलन व संकलनाचे पॅटर्न, लघुपटाचे शीर्षक, पाश्र्वसंगीत व पाश्र्वध्वनी आणि प्रीमिअर ते महोत्सव याबाबतचे सुंदर मार्गदर्शन आहे. चिंतन, अनुभव व सराव ही त्रिसूत्री दृश्यमाध्यमाच्या बाबतीत कशी महत्त्वाची आहे, हे लेखक यात ठळकपणे अधोरेखित करतो. याकरता त्याने स्वत:ला आलेल्या अनेक अनुभवांचे शेअरिंग वाचकांसोबत केले आहे. त्यामुळे लघुपटनिर्मिती करताना काय करावे व काय करू नये याचा धडा मिळतो. अगदी छोटय़ा छोटय़ा पण अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत लेखक आवर्जून काळजी घेण्याबाबत सुचवतो. उदा. कॅमेऱ्याची लेन्स स्वच्छ आहे का हे पाहणे, कॅमेऱ्याच्या बॅटरीचे चार्जिग तपासणे, एक्स्ट्रा बॅटरी सोबत ठेवणे इत्यादी. प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून काम करणाऱ्या दूरचित्रवाणी मालिका व सिनेमातील काही प्रवृत्त्यांच्या कामचुकारपणाचे दर्शनही तो जाताजाता सहज घडवतो.
लेखक, दिग्दर्शक, प्रेक्षक, तंत्रज्ञ यांचा दृश्यकलेबाबतचा दृष्टिकोन व नजर आणि विषयाचा संदर्भ यांची योग्य सांगड कशी घालावी याचा वस्तुपाठच सांगतो. लघुपटाच्या सामर्थ्यांविषयी सांगताना एकंदरच दृश्यकला माध्यमाचे प्रभावीपण आणि जमेच्या बाजू तो आपल्यासमोर मांडतो. नाटक व दृश्यमाध्यम यातील नेमका फरक सांगून लघुपट हे पडद्यावरचे नाटक होणार नाही याबाबत सावध करतो. लघुपटाबाबत ‘सांगेन युक्तीच्या चार गोष्टी’ हा लेखकाचा विचार या पुस्तकात पानोपानी प्रत्यंतराला येतो.
पुस्तकातील उत्तरार्ध हा जगभरातील उत्तमोत्तम लघुपटांच्या व माहितीपटांच्या रसास्वादाने सजलेला आहे. लघुपट या शब्दाची नेमकी व्याख्या सांगणाऱ्या आशयघन शॉर्टफिल्मने मोजक्या शब्दांत लेखकाने या विभागात मांडली आहे. लघुपटाच्या कल्पना, पटकथा-संवाद, ध्वनियोजना, प्रकाशयोजना, फ्रेमिंग व कंपोझिशन आणि संकलन या महत्त्वपूर्ण अंगांच्या दृष्टीने संदर्भयुक्त असलेल्या अनेक मान्यवरांच्या शॉर्टफिल्म प्रवाही व प्रभावी भाषेत लेखकाने आपल्यासमोर उभ्या केल्याने त्या मिळवून पाहण्याचा मोह अनावर होतो. आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्ने, फ्रान्स्वा त्रुफां, सत्यजित रे, फेलिनी, नॉरमन मॅक्लारेन, पिअर इटेक्स, जान्कोविस, मिखाईल, एन्रिको या दिग्गज नावांबरोबरच भारतीय लघुपटक्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या एस. सुखदेव, राजबन्स खन्ना, गिरीश कासारवल्ली, अविनाश देशपांडे, विधू विनोद चोप्रा, उमेश कुलकर्णी या प्रतिभावंतांचा समावेश आहे. दृश्यमाध्यमातील लघुपट या घटकाचा पायाभूत दृष्टिकोन विकसित करण्यात ‘शॉर्टकट’ हे पुस्तक प्रभावी असल्याने शॉर्टफिल्मवर प्रेम करणाऱ्यांप्रमाणेच शॉर्टफिल्मबाबत कुतूहल असणाऱ्या सर्वासाठीच उपयुक्त आहे.
‘शॉर्टकट’ – प्रसाद नामजोशी, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २७४, मूल्य – ३०० रुपये.
शॉर्टफिल्मची अबकडई
दृश्यमाध्यमात होणारे बदल हा आजच्या काळातील एक महत्त्वाचा विषय आहे. झपाटय़ाने बदलणारे तंत्रज्ञान हे प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठत असतानाच सहजगत्या स्वस्तात उपलब्ध आहे. माध्यम हे आता माणसाच्या जगण्याचा अपरिहार्य भाग झालेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-06-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review shortcut