कसदार लेखन करणाऱ्या नव्या पिढीतल्या मोजक्या लेखकांपकी एक म्हणजे कृष्णात खोत. पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाट पन्हाळा या गावात त्यांचं बालपण गेलेलं आहे. त्यामुळे तिथल्या समाजजीवनाचं, भागाचं मार्मिक चित्रण त्यांच्या एकंदर लेखनातून प्रतििबबित होतं. आत्तापर्यंत खोत यांच्या ‘गावठाण’ व ‘रौंदाळा’ या दोन लक्षवेधी कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. नुकतीच त्यांची ‘झड -िझबड’ ही तिसरी कादंबरी प्रकाशित झाली आहे.
ही पावसाने भरलेली, पानोपानी अविरतपणे पाऊस कोसळणारी, पावसात चिंबचिंब भिजलेली कादंबरी आहे. दहा दिवस पाऊस सरीवर सरी कोसळतो व कादंबरी भरून सांडत राहतो. नदीला प्रचंड पूर येतो. पाणी पुलावरून वाहू लागते. गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटतो. या सगळ्यांमध्ये गावातील सर्वसामान्य लोकांचे काय हाल होतात, अशा प्रसंगी लोक एकमेकांशी कसे वागतात, गावचं पुढारपण करणारे गावाला वाऱ्यावर कसे सोडतात, डोक्यावर असलेली पावसाची टांगती तलवार संपूर्ण गावाला कुठल्या हाराकिरीत दहा दिवस जगवते याचं उत्कंठावर्धक व वास्तवदर्शी चित्रण म्हणजे- ‘झड -िझबड’!
पाऊस कादंबरीतील सर्व पात्रांना, गावाला भिजवतो, रडवतो. त्यांचं जगणं मुश्कील करतो, त्यांची सत्त्वपरीक्षा पाहतो, त्यांचे हाल हाल करतो. हा पाऊस आल्हाददायक, मन उत्फुल्ल करणारा मुळीच नाही; तर अक्राळविक्राळ, भेसूर, रौद्ररूप धारण केलेला व माणसांसह सबंध गावशिवाराला मुळापासून उखडवून टाकणारा, हादरवून टाकणारा आहे. त्यामुळे हा ‘काळा पाऊस’ जसा कादंबरीभर व्यापून राहतो, तसाच तो वाचकाच्या मनालाही गडदपणे दाटून राहतो. याचबरोबर गावपातळीवरील अनेक अलक्षित मुद्दय़ांना सहजपणे स्पर्शून जाते. शिवाय महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, खेडी यांबद्दलचे काही प्रश्नही नव्याने उपस्थित करते.
थोरात ही गावातील तालेवार असामी. त्याचा दत्तक घेतलेला मुलगा गावचा सरपंच असतो. गावाला एक नदी असते. नदीवर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आलं की, गावाचा अन्य गावांशी असलेला संपर्क तुटतो. त्यामुळे गावातील लोक पावसाळा आला की, चार-पाच महिन्यांचे किराणा सामान किंवा अन्य जीवनावश्यक वस्तू एकदम भरून ठेवत. नाही म्हणायला एक नाव होती. पण पुराच्या पाण्यापुढे नाव काय करणार? नदीवर पूल बांधायचे ठरते. हा पूल बांधताना थोरात पुलाच्या रस्त्यात आपली स्वतची जमीन जाऊ नये, म्हणून काळजी घेतो.
त्यासाठी तो गावातल्या १०-१५ सर्वसामान्य शेतकऱ्यांची, अल्प भू-धारक असलेल्यांची (ज्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन जमिनीचा तेवढाच एक तुकडा असतो) जमीन घेतो. यात शामाची कसदार जमीन जाते. त्याच्या पोटाचं साधनच जातं. महत्त्वाची गोष्ट ही की, ज्या ठिकाणी नदीवर हा पूल बांधायचे ठरते, ती जागाही चुकीची असते. पण थोरातपुढे कोणाचे काही चालत नाही. त्याविरुद्ध एकटा शामा आवाज उठवतो, पण त्याचं कोणी ऐकत नाही. उलट गावच्या विकासाच्या आड येतोय, म्हणून लोक त्याच्यावरच डाफरतात. ज्यांच्या जमिनी जातात तेही शामाच्या पाठीशी उभे राहत नाहीत. कारण कधी नव्हे ते आता गावात पूल होतोय, त्यामुळे पावसाळ्यात, पुरात गावातच अडकून पडण्याची पिडा एकदाची जातेय, असं गावकऱ्यांना वाटत असतं. पूल होतो. उन्हाच्या लाही लाहीमुळे पाऊस कधी येतो याकडे लोकांचं लक्ष लागलेलं असतं. पाऊस सुरू होतो. पूल झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा असतो. इथूनच खऱ्या अर्थानं पाऊस आणि गाव यांच्यातील संघर्ष सुरू होतो.
या संघर्षांचा पहिला फटका बसतो तो दुकानदार दसू याला. त्याची मुलगी गरोदर असते आणि रात्रीतून तिला प्रचंड कळा यायला सुरुवात होते. अशा स्थितीत गावातला डॉक्टर कुचकामी ठरतो. त्यामुळे तिला कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरला घेऊन जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. बाहेर पाऊस गावशिवाराला प्रचंड झोडपत असतो. नदीला पूर येतो आणि बघता बघता पूल पाण्याखाली जातो. दसूची अडलेली मुलगी वेदनेनं प्रचंड विव्हळत असते. ते पाहून दसू व त्याच्या बायकोची भयंकर उलघाल होते. मग तशा पावसात-पुराच्या पाण्यातून जायचं ठरतं. तोच एकमेव पर्याय उरतो. हा संपूर्ण प्रसंग लेखकाने अतिशय उत्कटतेनं चितारला आहे.
दिवसागणिक पुराच्या पाण्याची पातळी वाढत जाते आणि पाणी हळूहळू गावाच्या दिशेनं सरकू लागते. पूल होऊनही काहीच उपयोग होत नाही. या हतबलतेतूनच नाना म्हणतो, ‘काय त्येच्या आयीला, पूल झाला म्हनालो, बरं झालं नावंला चिखूल तुडवीत जायाला नगो, तर ह्य़ो नवीनच वनवास.’
या पुराचा पहिला बळी जातो तो कावणे आबाचा. आणि गावाला एका अनामिक भीतीनं, काळजीनं ग्रासायला सुरुवात होते. हळूहळू जनावरांच्या चारा-वैरणीचा साठाही संपत येतो. जिथे माणूसच कसाबसा जगण्यासाठी धडपडू लागतो तिथे जनावरांचं काय? पण शेतकरी स्वतपेक्षाही शेती आणि जनावरं या दोहोंवरही किती जीव लावू शकतो- प्रसंगी जीव देऊ शकतो, याचं काळीज हलवणारं चित्रण खोत यांनी खूप ताकदीनं रेखाटलं आहे.
हे सर्व प्रसंग कथानकाचा अविभाज्य भाग म्हणून सहजस्फूर्तपणे येतात. त्यामुळे कृत्रिमता कुठेही डोकावत नाही.  कैक चटका लावणारे प्रसंग ‘झड -िझबड’मधून पावसाच्या सरींप्रमाणे अधूनमधून कोसळत राहतात. गावाला झोडपत राहतात. मात्र या प्रसंगांना महत्त्वपूर्ण अशा विविध अर्थच्छटा आहेत.
सगळं गावशिवार पाण्याखाली चिरडून जातं. या ‘गावतुडव्या’ पावसामुळे शेती उद्ध्वस्त होते, घरं पडतात, माणसं-जनावरं मरतात आणि एकूणच गावाचं न भरून येणारं नुकसान होतं. पावसाआधी पुलामुळे बेफिकीर राहिलेले गावकरी जीवनावश्यक वस्तूंची तजवीज करून ठेवत नाहीत. परंतु आता त्यांना त्याची अतिशय निकड जाणवते. पावसामुळे जागचे हलता येत नाही अन् पुरामुळे गावाबाहेर जाता येत नाही, अशी विचित्र कोंडी होते. घरात असलेलं तिखट-मीठ, पीठ, तांदूळ सर्व संपत येतं. गावातल्या दुकानदारांकडील मालही संपलेला असतो. आधुनिक सोयीसुविधांमुळे काही चांगली पारंपरिक साधनं आपण हद्दपार केली, त्याची इथं प्रकर्षांने आठवण होते. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पिठाची गिरणी बंद पडते. ज्यांच्या घरचं पीठ संपतं, त्यांच्यासमोर धान्य कसं दळायचं हा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी जात्याची ज्याला-त्याला आठवण होते. पण जातं तरी कुणाकडे शिल्लक असतं? शोधाशोध केल्यावर एकाकडे अडगळीत एक जातं सापडतं. जात्यावर बसले की, लगाऱ्याच्या म्हातारीच्या ओठांतून उत्स्फूर्तपणे ओव्यांचे सूर उमटू लागतात.
..अशा आणीबाणीच्या स्थितीत कामी येतो, तो गावाचा एकजूट-सामूहिकपणा. आपल्याकडे आहे नाही ते सर्व अडल्या-नडलेल्यांना दिलं-घेतलं जातं. अशा वेळी जे आढय़तेनं वागतात, त्यांना समजावलं जातं. एवढंच नव्हे तर दसूच्या बाळंत झालेल्या मुलीचं अंगावरचं दूध जातं. बाळ रडरड रडत असतं. अशा वेळी दसूची बायको हमीदच्या बायकोला सांगावा धाडते आणि हमीदची बायको स्वत:च्या पित्या मुलीला ठेवून दसूच्या नातवाला दूध पाजायला जाते. इथे दसूचा िहदू धर्म आडवा येत नाही की, हमीदचा मुस्लीम धर्म.
जात-धर्म, गरीब-श्रीमंत असल्या कुठल्याही अडथळ्यांशिवाय नि:संकोचपणे माणूसधर्म पाळत गाव निसर्गाच्या या संकटाला सामोरं जातं. माणूस म्हणून माणुसकीची बूज परोपरीने राखली जाते. मानवी सहजीवनाचं भेदाभेदविरहीत मनोरम व माणुसकीमय दर्शन घडतं.
‘हमीद’ ही एक या कादंबरीतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. गावात काही बरं-वाईट घडलं की, लोकांना आपसूक हमीदची आठवण होते, त्याचा खूप खूप आधार वाटतो. हमीदही हातातले काम टाकून आलेल्याच्या मदतीला धावून जातो. आपल्याकडे मुस्लीम असणं म्हणजे काहीतरी वेगळेपणाची, दुराव्याची भावना निर्माण करणारं असतं.
या कादंबरीत केवळ घटनामागून घटना येत नाहीत तर लेखकाच्या समग्र नि समृद्ध जीवनानुभवाचा भाषेच्या माध्यमातून कलात्मक बाजही साकारतो. अनुभवाची व्यापकता, भाषेचा समृद्धपणा, आशयनिष्ठ अभिव्यक्ती व उच्च साहित्यमूल्यं आदींमुळे साहित्यकृती म्हणून या कादंबरीला एक विशिष्ट  वाङ्मयीन उंची प्राप्त झाली आहे. दर्जा प्राप्त झाला आहे. पात्रं, घटना, परिसर यांबरोबरच शब्दांची अचूक व परिणामकारक निवड, नेटकं व गोळीबंद विश्लेषण, यामुळे ही कादंबरी सुरुवातीपासून ते अखेपर्यंत आपल्या मनाची जबरदस्त पकड घेते.
लेखक म्हणून कृष्णात खोत यांच्या मनात अनेक वर्षांपासून झड लागलेल्या पावसाप्रमाणे हा विषय मुरत असला पाहिजे. त्याशिवाय कलात्मकता आणि जीवनानुभव यांचा इतका सुंदर व एकजीव समन्वय साधणं अशक्यच. हे कादंबरीकार म्हणून खोत यांचं घवघवीत यश आहे. यामुळेच वाचकाला कलाकृती म्हणून कादंबरीच्या आस्वादनाचं पुरेपूर समाधान लाभतं.
‘झड -िझबड’ला कोल्हापुरी भाषेचा एक खास लहजा व ढंग आहे. कादंबरीत जागोजागी म्हणी, वाक् प्रचार आणि अंतर्मुख करणाऱ्या चिंतनशील वाक्यांची पखरण आहे. तसेच पावसाच्या वेगवेगळ्या रूपांना लेखकाने दिलेली नावं वाचणंसुद्धा एक निराळा अनुभव आहे. यातून लेखकाच्या समृद्ध भाषिक वैभवाची चुणूक नजरेत भरते. आशय-विषयाच्या संदर्भात ‘झड-झिंबड’ ही कादंबरी मराठी कादंबरी वाङ्मयातली एक समृद्ध आणि महत्त्वपूर्ण कादंबरी आहे.
‘झड-झिंबड’ – कृष्णात खोत
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठे – २२०, मूल्य – २५० रुपये

travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
dcm devendra fadnavis reaction on shivaji maharaj statue collapse
सोसाट्याच्या वाऱ्यांच्या वेगाचे आकलन झाले नसावे : देवेंद्र फडणवीस
over 120 hospitalised after food poisoning on janmashtami in mathura
जन्माष्टमीच्या प्रसादातून विषबाधा; मथुरेतील घटना, १२०हून भाविक रुग्णालयात दाखल
vision women pune, vision young woman pune,
‘आयटी’तील तरुणीची दृष्टी अखेर वाचली! मद्यपीने भिरकाविलेल्या दगडामुळे गंभीर दुखापत; डॉक्टरांच्या ६ महिन्यांच्या प्रयत्नांना यश
Family members appeal not to believe rumors about Badlapur harassment case
त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Nitesh Rane, Anil Deshmukh, Sanjay Raut,
देशमुख, राऊत यांच्या भोजनावळीत कुख्यात गुंड, नितेश राणे यांचे ट्विट