ग्रेग मॉर्टेन्सन. बेस्ट सेलर म्हणून जगभरात गाजत असलेल्या ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकाचा लेखक. हे पुस्तक पाकिस्तानमधील काराकोरम या अतिशय उंच व दुर्गम पर्वतराजीतील कोर्फे या गावात ग्रेगच्या ‘सेंट्रल एशिया इन्स्टिटय़ूट’ने ज्ञानाची आस असलेल्या लोकांसाठी बांधलेल्या शाळेची अद्भुत व अविश्वसनीय गोष्ट सांगते. फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक १४० आठवडय़ांपेक्षा अधिक काळ ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये झळकत होतं; तर तब्बल ४३ आठवडे ते सर्वाधिक विक्रीत पहिल्या क्रमांकावर होतं. २००३ साली ज्या टप्प्यावर ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकाची कथा थांबते, तिथून पुढची कथा सांगणारे पुस्तक म्हणजे ‘स्टोन्स इन्टू स्कूल.’ या साऱ्या कहाणीस १९९३ साली पाकिस्तानमध्ये प्रारंभ झाला. ग्रेग जगातील द्वितीय क्रमांकाच्या ‘2 पर्वतावर चढत असताना वाट चुकला आणि भरकटत कोर्फे या खेडय़ात पोहोचला. तेथे पोहोचल्यावर तेथील लोकांच्या जगण्याचे जे भीषण वास्तव त्याच्यासमोर आले, त्यातून त्याच्या आयुष्याला नाटय़मय वळण मिळाले. आपले पुढचे आयुष्य येथून पुढे या दुर्गम पर्वतराजीमध्ये शाळा बांधण्यासाठी वेचायचा निश्चय त्याने केला. त्या अनुभवातूनच ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकाची निर्मिती झाली. या ठिकाणचे काम पूर्ण झाले. पण एवढय़ावरच थांबेल तो ग्रेग कसला? त्याला त्याचदरम्यान अफगणिस्तानमधील ईशान्येकडील दूरवरच्या एकाकी कोपऱ्यातील किरगिझी लोकांनी त्यांच्या भागात शाळा बांधण्यासाठी विनंती केली. त्यांच्या या हाकेला ओ देण्यासाठी ग्रेगने पाकिस्तानमध्ये बांधलेल्या शाळा प्रकल्पाहून कितीतरी अधिक आव्हानात्मक कामाला (ज्याला त्याचे सहकारी ‘अफगाण साहस’ म्हणतात!) हात घालण्याचा निश्चय केला. ‘थ्री कप्स ऑफ टी’ या पुस्तकातील काही घटनांमुळे ग्रेगला त्याच्या कामाची सुसूत्र दिशा सापडली. त्यामुळे ‘स्टोन्स इन्टू स्कूल’ या पुस्तकाची पाश्र्वभूमी समजण्यासाठी ग्रेगने ‘थ्री कप्स ऑफ टी’चा काही भाग या नव्या पुस्तकात दिलाय. तो वाचकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
सुमारे तीन दशके यादवी युद्ध आणि परकीय सत्तेच्या वर्चस्वाखाली होरपळत असलेल्या शतखंडित अफगाणिस्तानचे भविष्य अक्षरश: अंध:कारमय झाले होते. प्रत्येक इलाख्यावर एकेक कट्टर मूलतत्त्ववादी टोळीप्रमुख सत्ता गाजवीत होता. या काळात सत्तेसाठी अनेक मुजाहिदीन गट एकमेकांशी लढत होते. एकेकाळी बलाढय़ रशियाचा एकत्रितपणे सामना करणारे सगळे गट-तट सत्तेसाठी एकमेकांच्या जिवावर उठलेले होते. वेगवेगळ्या टोळ्या, संस्कृती, भाषा आणि भौगोलिकतेची विविधता असलेल्या अफगाणिस्तानात प्रचंड अराजकता, हिंसाचार, भ्रष्टाचार, बेकारी, अंमली पदार्थाची व्यसनाधीनता अशी सर्वव्यापी बजबजपुरी माजली होती. अशा अत्यंत कठीण काळात ग्रेग मॉर्टेन्सन आणि त्याच्या स्थानिक सहकाऱ्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी या देशात शाळा बांधण्याचे अतिशय खडतर काम हाती घेतले. त्या तशा वातावरणात शुद्ध वेडेपणाची ठरू शकणारी ही सगळी कहाणी. ‘स्टोन्स इन्टू स्कूल’ या पुस्तकातून ती आपल्यासमोर उलगडत जाते तेव्हा ‘अशक्य’ हा एकमेव शब्द आपल्यापुढे उभा राहतो.
अफगाणिस्तानमधील या सर्वात कठीण काळात अनेक प्रचंड हिंसक तसेच थरारक घटना घडत होत्या. येथील तरुणांना जिहादच्या नावाखाली कट्टर तालिबानी बनविले जात होते. या तालिबान्यांनी सर्वात मोठा घाला घातला तो येथील शिक्षणव्यवस्थेवर! मुलींनी हाती पुस्तक घेणे हे इस्लामबाह्य़ असल्याचे जाहीर करून त्यांना ठार मारण्याची शिक्षा या काळात अफगाणिस्तानात दिली जात होती. स्त्रियांची अवस्था जनावरांपेक्षा वाईट करण्यात आली होती. चोरून, लपून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना व त्यांना शिकविणाऱ्या शिक्षिकांना जाहीररीत्या ठार मारले जाई. अंगावर बॅटरीतील अ‍ॅसिड ओतणे, लैंगिक अत्याचार करणे हे तर नेहमीचेच वास्तव होते. अशा भयावह कैदखान्यात कोंडलेलं आयुष्य जगणाऱ्या अफगाणिस्तानमधील बहुसंख्य स्त्रिया आणि मुली मानसिक आजाराने व दारिद्रय़ाने प्रत्यही आत्महत्या करीत होत्या. ओसामा बिन लादेनचा त्याच्या कट्टर मूलतत्त्ववादी सहकाऱ्यांच्या जोरावर चाललेला इस्लामचा अत्यंत विखारी प्रचार अफगाणिस्तानात शिगेला पोहोचला होता. या सर्व पाश्र्वभूमीवर ग्रेग व त्याच्या सहकाऱ्यांच्या खडतर संघर्षांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
अफगाणिस्तानमधील अस्थिरता ही बंदुका, रणगाडे, हवाई हल्ले यांनी नाही, तर वह्य़ा, पुस्तकं, पेन, पेन्सिल या शिक्षणाच्या शस्त्रांनी संपणार आहे, यावर ग्रेगचा विश्वास असल्याने त्याने येथील मुलींच्या शिक्षणासाठी जे ‘अफगाण साहस’ केले ते शब्दश: जिवावर उदार होऊनच! ही सगळी कहाणी त्याने स्वत:चे अजिबात स्तुतीस्तोत्र न गाता तटस्थतेने मांडली आहे.
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर तर अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत घातक बनली होती. अमेरिकेने या हल्ल्याला जे प्रत्युत्तर दिले त्यात प्रचंड संहार झाला आणि हा देश विकासापासून कोसो मैल दूर फेकला गेला. या युद्धानंतर अमेरिकेने हाती घेतलेल्या शांतीकार्याचाही अक्षरश: बोजवारा उडाला होता. अमेरिकन कंत्राटदारांनी या मदतकार्यात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेली असतानाच उरल्यासुरल्या तोकडय़ा मदतीलाही अफगाणी नोकरशाहीने गळती लावली होती. अशावेळी दिवसात अवघी तीन तास झोप घेत, नुसत्या चहावर उत्साह टिकवून धरत ग्रेग आणि त्याचे सहकारी सहा-सहा महिने बर्फाने खिंडी बंद होणाऱ्या आणि जगातील सर्वाधिक भूसुरूंग पेरलेल्या अत्यंत धोकादायक भागात इथल्या मुलींना शिक्षणाची मूलभूत सुविधा पुरवण्याकरता शाळा बांधण्यासाठी धडपडत होते. तीस-तीस तासांचा अखंड व भीषण मोटारप्रवास, त्यानंतर घोडय़ावरची दौड व सरतेशेवटी पायी प्रवास, महिनोन् महिने आंघोळ न करता प्रचंड थंडीला सामोरे जात, वेदनाशामक गोळ्यांचे बारा ते पंधरा डोस दिवसभरात घेत.. अशा अघोरी मार्गाने वाटचाल करत आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी ते अत्यंत तळमळीने प्रयत्न करीत होते. तालिबान्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आणि अन्य अनेक धोके पचवीत त्यांनी अविश्रांतपणे केलेल्या शिक्षणविषयक कार्याचा आलेख, अंगावर खरेच शहारे आणणारा आहे. दुसऱ्या बाजूला अफगाणी लोकांची व विद्यार्थिनींची शिक्षणाची तीव्र आस या भयानक परिस्थितीतही कमी झालेली नसल्याचे आपल्या लक्षात येते. शिक्षण हेच आपल्या अंध:कारमय जीवनात नवा प्रकाशकिरण घेऊन येईल, यावर येथील लोकांनी ईश्वराइतकीच अढळ श्रद्धा होती. युद्धातील बॉम्बहल्ल्यांमुळे मोडलेल्या इमारती, मुताऱ्या, तंबू यांमध्ये अक्षरश: लपूनछपून शिक्षण घेण्याचे व देण्याचे पवित्र काम काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या साहाय्याने जिवावर उदार होऊन इथे केले जात होते. ते पाहून ग्रेगला प्रेरणा मिळाली आणि या भागात शाळा बांधून देण्याचा त्याचा निश्चय दृढनिश्चयात रूपांतरित झाला. हे अविश्वसनीय वाटावे असे खरेखुरे वास्तव या पुस्तकात अत्यंत रोमहर्षक पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे. एखाद्या अरबी सुरस कथेस लाजवेल अशी ही ‘सत्यकथा’ आहे.
याच दरम्यान पाकिस्तानात झालेल्या भूकंपात २१५९ शाळा -कॉलेजे नष्ट झाली होती. पाच लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणात त्यामुळे खंड पडला होता. चार मिनिटांत साक्षर विद्यार्थ्यांची एक संपूर्ण पिढीच्या पिढी संपली होती. आणि त्यातून उरलेले, वाचलेले सर्वच जण बधिर मन:स्थितीत होते. अशावेळी ग्रेगने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने भूकंपग्रस्त भागात शाळाबांधणीची मोहीम हाती घेतली. वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या व जगाशी संपर्क तुटलेल्या या भागांत त्याने केलेले काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिहाद्यांची भयंकर दहशत असलेल्या या परिसरात केवळ दोन महिन्यांच्या काळात दोन डझनापेक्षा जास्त छोटय़ा शाळा सुरू करण्याची ग्रेग व त्याच्या सहकाऱ्यांनी जी यातायात केली, ती वाचून आपण अक्षरश: चक्रावून जातो. सरकारी वा परकीय मदतही पोहोचू न शकणाऱ्या या भूकंपग्रस्त भागांत अथक कष्टांनी उभ्या केलेल्या शाळांचे रोमांचक अनुभव या पुस्तकात चित्रदर्शी शैलीत शब्दबद्ध करण्यात ग्रेग यशस्वी झाला आहे.
राजकारण्यांच्या पोपटपंचीपेक्षा एका कृतीशील व्यक्तीचे हे प्रचंड कार्य पाहून स्तिमित व्हायला होते. ग्रेग मॉर्टेन्सनचा दहशतवाद्यांच्या अत्याचारांना शह देण्याचा हा मार्ग निश्चितच प्रेरणादायी आहे. प्रसिद्ध पत्रकार टड्री रुबिन याने या पुस्तकाबाबत केलेले विधान सार्थ असल्याचे आपल्या प्रत्ययास येते.
मेहता प्रकाशनाने सुनीती काणे यांच्याकडे या मौलिक पुस्तकाच्या अनुवादाची जबाबदारी सोपवली ती किती योग्य होती, हे पुस्तक वाचताना पानोपानी जाणवते. अत्यंत समर्पक शब्दांत, रोजच्या जगण्यातील भाषेत त्यांनी केलेला हा सहजसुलभ अनुवाद हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाचा अर्क मांडण्यात यशस्वी झाले आहे. दगडांच्या मध्यभागी पुस्तकांची चवड रचून त्यांनी शीर्षकाला कलात्मक न्याय दिला आहे. आंतरराष्ट्रीय ख्याताचे लेखक खालीद हुसैनी यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. तीही वाचनीय व संदर्भयुक्त आहे. बॉम्ब वापरून नव्हे, तर शाळा व पुस्तकांच्या माध्यमातून पाकिस्तान व अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचा ग्रेगचा हा प्रयत्न जागतिक शांततेचे महत्त्व अधोरेखित करतो, हे निश्चित.
‘स्टोन्स इन्टू स्कूल’, मूळ लेखक : ग्रेग मॉर्टेन्सन, अनुवाद : सुनीती काणे, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – ३३६, मूल्य – ३५० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा