‘तडा’मध्ये भारतातील स्त्रीमुक्तीवादी (की स्वमतलबवादी?) विचारांच्या तीन स्त्रिया आणि त्यांच्या स्वार्थी कारवायांनी होरपळलेले त्यांचे निकटवर्ती तसंच अमेरिकेतील ‘मुक्त स्त्री’चे चांगलेच फटके खाल्लेल्या नचिकेतचं आयुष्य भैरप्पांनी यात मांडलं आहे. जयंती हाय प्रोसिजन या उद्योगाची उभारणी करताना जयकुमार यांच्या खांद्याला खांदा लावून श्रमणारी त्यांची सुशील, प्रेमळ पत्नी वैजयंती अचानक एका अपघातात जाते आणि त्यांच्या आयुष्यात कमालीची पोकळी निर्माण होते. या अपघातात त्यांची दहा वर्षांची मुलगी राणी हिलाही मुका मार बसतो व तिच्या मेंदूची ग्रहणशक्ती कमी होते. त्यामुळे तिचं शिक्षण थांबतं. या प्रचंड मानसिक धक्क्य़ातून कसंबसं सावरायचा प्रयत्न करणाऱ्या जयकुमारना काही काळ लोटल्यावर देहाची भूक अस्वस्थ करते. त्यांच्याच ऑफिसमध्ये त्यांची पी. ए. असलेल्या मंगळाबद्दल त्यांना आकर्षण वाटतं. तिच्या पूर्वायुष्याबद्दल अनभिज्ञ असलेले जयकुमार तिच्या स्त्री-पुरुष संबंधांबद्दलच्या खुल्या विचारांमुळे तिच्याकडे आकृष्ट होतात. तीही त्यांना हिरवा कंदील दर्शवते आणि ते एकत्र येतात. या संबंधात परस्परसंमती गृहीत असते. ते कुठल्याही नात्यात परावर्तित व्हावं अशीही अपेक्षा नसते. परंतु काही दिवसांनी ती आपल्याला त्यांच्यापासून दिवस गेल्याचं सांगून त्यांच्यापुढे लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवते. त्यांनी त्यास नकार दिल्यावर संतापलेली मंगळा स्त्रीमुक्ती चळवळीच्या नेत्या अॅड्. माया केरूर यांच्याकरवी स्त्रीशोषणाचं कारण पुढे करून जयकुमारना जबरदस्तीनं आपल्याशी लग्न करावयास भाग पाडते. त्यांचा भरभराटीत असलेला उद्योग आणि आलिशान बंगल्याची तिला भुरळ पडलेली असते. त्यासाठीच तिनं त्यांना आपल्या जाळ्यात अडकवलेलं असतं. पण हे खूप उशिरा त्यांच्या लक्षात येतं. तोवर वेळ निघून गेलेली असते.
आपल्याला जबरदस्तीनं लग्नबंधनात अडकवलेल्या मंगळाबद्दल जयकुमार यांच्या मनात प्रेम निर्माण होणं शक्यच नसतं. साहजिकच त्यांच्यात नवरा-बायकोचे संबंध प्रस्थापित होणं अशक्यच असतं. तशात मंगळा घरात आल्या दिवसापासून त्यांच्या मुलीचा- राणीचा दु:स्वास करू लागते. राणीकडे ते वाईट नजरेनं पाहतात, तिला जवळ घेऊन आपल्या अतृप्त वासना शमवतात असा आरोप मंगळा करते. तेव्हा संतापून ते तिला मारझोड करतात. त्यामुळे चिडून ती पोलिसांत फिर्याद करते आणि त्यांना जेलची हवा चाखायला लावते. इतकं घडल्यावर जयकुमार तिच्यापासून कायमस्वरूपी दूर न जाते तरच नवल.
मंगळा जयकुमारच्या पश्चात आपला कॉलेजमधला मित्र प्रभाकर याला घरी बोलावून त्याच्याशी चोरून संबंध ठेवून असते. आपला घरसंसार असलेला प्रभाकर उच्चपदस्थ नोकरीतल्या वरकमाईवर भपकेबाज आयुष्य जगत असतो. त्यालाही अशी फुकटात मौजमजा करायला मिळाली तर हवीच असते. यथावकाश मंगळा बाळंत होते. तिला मुलगा होतो. या मुलाच्या रूपानं का होईना, आपल्या उद्योगाला वारस मिळाला म्हणून जयकुमार थोडेसे नििश्चत होतात. पण मंगळाचं वाकडं शेपूट सरळ होण्याचं नाव घेत नाही. ती आपल्याशी संबंध न ठेवणाऱ्या जयकुमारवर षंढतेचा आरोप करते. त्यासाठी त्यांना माला केरूरकरवी कायद्याचा बडगा उगारण्याची धमकी देते. राणीला बोर्डिगमध्ये ठेवावं म्हणूनही ती त्यांच्या मागे लागते. पण ते त्यास ठाम नकार देतात. तिच्या षंढत्वाच्या आरोपाने व्यथित झालेले जयकुमार मित्राच्या सल्ल्यानुसार दिल्लीत कॉलगर्लशी संबंध करतात आणि आपल्या पौरुषत्वाची खात्री करून घेतात. पुढे त्याचीच भूल पडून ते वाहवत जातात. परंतु एके दिवशी हॉटेलवर पडलेल्या धाडीत ते पोलिसांना रंगेहात सापडतात. त्यांना कोठडी लागते. एकीकडे हे सगळं घडत असतानाच उद्योगातही प्रतिस्पर्धी कंपनी त्यांच्या कामगारांना फितवून आपल्याकडे खेचू बघते. कामगारही त्यांच्या आमिषाला बळी पडतात. तशात जयकुमार तुरुंगात असल्यानं सगळंच हाताबाहेर जातं. कंपनी बंद पडते. मंगळाही मग पोटगीपोटी भरपूर पैसे व जयकुमारांचा बंगला हडपून त्यांच्याशी घटस्फोट घेते. जयकुमार अक्षरश: रस्त्यावर येतात..
याच्याशीच समांतर असा मंगळाला स्त्रीमुक्तीची दीक्षा देणाऱ्या प्रा. इला यांचा अध:पतित प्रवासही ‘तडा’मध्ये येतो. तिकडे अमेरिकेत जयकुमार यांचा भाचा नचिकेत हाही तिथल्या ‘मुक्त’ स्त्रियांचे उद्ध्वस्त करणारे ‘अनुभव’ गाठीशी बांधून खचल्या अवस्थेत भारतात परततो. जयकुमार यांच्या भावाची बायकोही प्रत्यक्ष न मागितलेल्या हुंडय़ाच्या कारणास्तव आपल्या अशिक्षित, सरळ-साध्या सासूला तुरुंगात धाडते. मात्र, तिच्या मुलीच्या वाटय़ालाही जेव्हा हुंडय़ाचं प्राक्तन येतं आणि ती आत्महत्या करते तेव्हा मात्र स्त्रीमुक्तीबद्दलच्या तिच्या विचारांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहतं. यातल्या स्त्रिया स्त्रीमुक्तीचा सोयीस्कर अर्थ लावून स्वार्थासाठी आपल्या निकटवर्तीयांची जी भयानक वाताहत करतात ती अतिशय वेदनादायी आहे. त्या आपल्या प्रत्येक असमर्थनीय कृतीतही ‘स्त्रीमुक्ती’ शोधत राहतात. त्यातून स्वत:चं वृथा समाधान करत राहतात. प्रभाकर, दोरेराजासारखे लंपट पुरुष या गोष्टीचा गैरफायदा न घेते तरच नवल. जयकुमार, नचिकेत, विनय, सुजया, राणी यांच्यासारखे सरळमार्गी आयुष्य जगू पाहणारे जीव मात्र त्यात हकनाक भरडून निघतात.. उद्ध्वस्त होतात. स्त्रियांचे हक्क आणि त्यांच्या रक्षणासाठी केलेले कायदेकानूही कधी कधी वास्तवाची नीट खातरजमा न करताच निरपराधांना कसे सुळी चढवतात, हे ‘तडा’मध्ये अनुभवावयास मिळतं.
भैरप्पांनी स्त्रीमुक्तीवाल्या स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या, स्वतंत्र कहाण्या सफाईने यात एका सूत्रात गुंफल्या आहेत. कधी प्रथमपुरुषी निवेदनाद्वारे, तर कधी तृतीयपुरुषी कथनातून कादंबरी उलगडत जाते. चित्तवेधी लेखनशैली हा भैरप्पांचा विशेष. तो इथंही प्रत्ययाला येतो. घटनाप्रधानतेबरोबरच पात्रांच्या मनोव्यापाराचं खोलात विवेचन हीही ‘तडा’ची खासीयत आहे. पात्रांचे परस्परसंबंध, त्यातले तिढे, पेच तसंच त्यांची विचार करण्याची पद्धती, व्यक्त होण्याची रीत या सगळ्याचा स्वतंत्र विचार कादंबरीत जाणवतो. असे असले तरीही आपल्याला जे म्हणायचे आहे ते ठाशीवपणे मांडणारा लेखकाचा एक सुप्त, पण ठाम दृष्टिकोनही यात मिसळला आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था, त्यातली मूल्यं, स्त्री-पुरुषांची विहित कर्तव्यं यांबद्दल लेखकाला आकर्षण आहे. ‘तडा’मध्ये सोयीस्कर स्त्रीमुक्ती राबविणाऱ्या स्त्रियांबद्दलचा त्यांचा तिटकारा जाणवतो तो याचमुळे बहुधा. माणसांतलं ‘माणूसपण’ त्यांच्या लेखी महत्त्वाचं आहे. यातली माणसं स्खलनशील आहेत. सहसा सर्वांत आढळणारे मानवी गुणदोष त्यांच्यातही आहेत. परिस्थिती, विचारसरणी व स्वार्थामुळे त्यांचं आयुष्य धारेला लागतं. कधी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना विनाशाप्रत नेतो. असं असतानाही ही सर्वस्व गमावलेली माणसं कुठल्या चिवट जीवनेच्छेनं तगून राहतात, कुणास ठाऊक! तथाकथित स्त्रीमुक्तीचा भयावह कंगोरा दाखवणारी ही कादंबरी विवाद्य असली, तरीही त्यातल्या प्रतिपादनाशी काही क्षण का होईना, वाचकाला सहमत व्हायला लावते, हे मात्र नक्की.
‘तडा’ – डॉ. एस. एल. भैरप्पा, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृष्ठे – २८६, किंमत – २८० रुपये.
सोयीस्कर ‘स्त्रीमुक्ती’ची चिरफाड
प्रख्यात कन्नड कादंबरीकार डॉ. एस. एल. भैरप्पा हे नाव मराठी साहित्यवर्तुळातही आज बिनीचे म्हणून गणले जायला हरकत नाही इतकी प्रचंड लोकप्रियता त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठीतही मिळविली आहे. ‘पर्व’, ‘वंशवृक्ष’, ‘काठ’, ‘मंद्र’, ‘जा ओलांडुनी’, ‘परिशोध’, ‘तंतू’, ‘आवरण’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी खपाचे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. त्यांचं बहुतेक साहित्य अनेक भारतीय भाषांतून भाषांतरित झालेलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-03-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review tada by dr s l bhyrappa