आभटकंतीतून प्रत्येकाच्या वेगळ्या अपेक्षा असतात. अनेकजण रोजच्या धबडग्यातून चार निवांत क्षण मिळावेत, यासाठी आरामदायी पर्यटनाचा मार्ग शोधतात. काहीजण शहरांत न सापडणारा निसर्ग शोधायला निघतात तर काही चक्क डोंगरदऱ्या पायी पालथ्या घालत तिथल्या निसर्गाशी आणि स्थानिकांचं जगणं जगून बघतात.. त्यांच्या जगण्याशी ‘कनेक्ट’ होऊ पाहणाऱ्या अशा ध्यासपंथींसाठी ‘कनेक्ट विथ हिमालय’ असा उपक्रम सुरू करणाऱ्या गौरव पुंज यांचे भन्नाट अनुभवविश्व ‘उडणाऱ्या लामांचा प्रदेश’ या पुस्तकात आपल्याला गवसते.
त्यांच्यासोबत हिमालयात पर्यटनासाठी गेलेल्या लोकांच्या या खऱ्याखुऱ्या गोष्टी आहेत. या व्यक्तींसोबत तिथली अपरिचित स्थळं आणि त्यांचं माहात्म्य, तिथलं समाजजीवन, बदलता इतिहास या लिखाणातून डोकावत राहतो. यात एकंदर दहा गोष्टी आहेत. त्यातील पाच गोष्टी या गिर्यारोहणाशी संबंधित असून त्यातून गिर्यारोहणासंबंधीच्या समज-गैरसमजांचे निराकरणही होते. ट्रेकिंगचा संबंध हा फिटनेसपेक्षा अधिक नेहमीच्या दिनक्रमातील सुखसुविधांना दूर ठेवण्याच्या तयारीशी कसा असतो, हे या गोष्टींतून अधोरेखित होते. ट्रेकदरम्यान व्यक्ती परिस्थितीला सामोरे कसे जातात, हा या गोष्टींचा गाभा आहे. या गोष्टी आहेत काश्मीर ते लडाख, हिमाचल, गढवाल, कुमाऊँ, सिक्कीम, अरुणाचल या हिमालयातील वेगवेगळ्या भागांच्या.. लहान पर्वतराजींच्या, खोऱ्यांच्या, नद्यांच्या, लहान खेडय़ांच्या, कुरणांच्या, समाजजीवनांच्या.. या गोष्टींतून अलवारपणे तिथल्या लोकांच्या जीवनशैलीचाही मागोवा घेता येतो.. लेखकाने गाइडच्या भूमिकेतून वाचकांना भटकंतीबाबत काही सल्लेही दिले आहेत.. उपयुक्त पुस्तकं, ब्लॉग्ज आणि वेबसाइटस्चे संदर्भही नमूद केले आहेत.
गौरव पुंज छोटय़ा छोटय़ा ग्रूप्सना हिमालयात गिर्यारोहणासाठी घेऊन जातात. त्यातील काही अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले आहेत. ते वाचणं हाही विलक्षणच अनुभव आहे. काश्मीरमधील अरू खेडय़ातून सुरू झालेला त्यांचा छोटासा ट्रेक, सीडर खोऱ्यातील अद्भुत ट्रेक, तिथे राहणाऱ्या चौपन स्त्रीचं आदरातिथ्य.. त्यांचं लडाख – नुब्रा खोऱ्यात अडकून पडणं, खारदुंगलामधील साहस, कुलू खोऱ्यातील धम्माल आणि तिथल्या गडप झालेल्या थावा शहराची भेट, वाट चुकलेल्यांना तारणारे देवभूमीतील फ्रेंडली स्पिरिट फिनॉमेनेन, ढाल्यापासून सुरू केलेल्या ट्रेक दरम्यान वाटेतले बर्थी नामक अतिप्राचीन खेडे, रुपीन- सुपीनचे खोरे, अवर्णनीय सौंदर्य लाभलेले स्पिती आणि किन्नोर, दर्मा खोऱ्यातील चार अजब कुरणांचा खजिना.. ही सारी ठिकाणे आणि तिथल्या गोष्टी खरे तर जितेजागते वास्तव पण कल्पनापल्याडच्या असल्याने आपल्याला अद्भुत वाटतात.
या पुस्तकाचा समारोप ऋजुता दिवेकर यांच्या माहितीपूर्ण लेखाने झाला आहे. यात हिमालयात ट्रेकिंग करण्याचे आपल्या शरीर-मनाला नेमके फायदे काय होतात, ऱ्होडोडेन्ड्रॉन सिद्धान्त म्हणजे नेमका काय, हिमालयात गेल्यावर काय खा, याची शास्त्रीय माहिती अत्यंत सुलभ शब्दांत दिली आहे. परिशिष्ट-१ मध्ये अति उंचावर गेल्यामुळे होणारे आजार आणि परिशिष्ट-२ मध्ये ट्रेकिंग संदर्भात उपयोगात आणले जाणारे शब्द यांची माहिती दिलेली आहे.
‘हिमालयातील ट्रेकिंग’ या शब्दांमध्ये दडलेले दडपण दूर करण्यास आणि हाताशी वेळ आणि स्वत:च्या अंतरंगात डोकावण्याचा सुज्ञपणा असेल तर कुणालाही हिमालयात ट्रेक करणे सहजशक्य आहे, हा विश्वास हे पुस्तक देते.. भटकंतीकडे बघण्याची नवी दृष्टी रुजवण्यात तर हे पुस्तक मदत करतं, त्याचबरोबर हिमालयाची साद वाचकाच्या मनाभोवती रुंजी घालत राहते, हे या पुस्तकाचं यश म्हणायला हवं. मूळ पुस्तकाचा तितकाच सशक्त अनुवाद मराठीत करण्यात प्रा. रेखा दिवेकर यशस्वी झाल्या आहेत. हरीश कापडिया यांची प्रस्तावना आणि पुस्तकात भेटणाऱ्या स्थळांची ३१हून अधिक उत्तम प्रतीची छायाचित्रे हेही या पुस्तकाचे वैशिष्टय़च.

‘उडणाऱ्या लामांचा प्रदेश आणि हिमालय प्रवासातील सत्यकथा’ – गौरव पुंज, अनुवाद- प्रा. रेखा दिवेकर,
अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे,
पृष्ठे- १९९, मूल्य – २५० रुपये.
suchita.deshpande@expressindia.com