१९ ४६-४७ पासून ‘नवकथालेखक’ हे आपल्या नावामागे लागलेलं विशेषण गंगाधर गाडगीळ आजतागायत टिकवून आहेत. १९४० पासून ते आता त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झालेल्या ‘उन्ह आणि पाऊस’ या त्यांच्या कथासंग्रहापर्यंत गाडगीळांच्या कथालेखनाची चढती कमानच दिसून येते. त्यांच्या लेखनातील टवटवीतपणाही अद्याप अम्लानच राहिलेला आहे. वयोमानानुसार त्यांचे शरीर थकले होते, परंतु त्यांच्या मनात नवनवीन उन्मेषांचे धुमारे मात्र तरारून येत होते. नवथर तारुण्याच्या असोशीने शब्दांवर, कल्पनेवर आणि वास्तव परिस्थितीवर गाडगीळ मनस्वीपणे प्रेम करत होते, हे ‘उन्ह आणि पाऊस’ या संग्रहावरून स्पष्टपणे दिसून येते. सृजनशील कथालेखनाच्या बाबतीत गाडगीळ कायमच अतृप्त होते. म्हणूनच त्यांच्या कथेच्या वाटचालीत विकास दिसून येतो. आपल्या कथा तटस्थपणे न्याहाळण्याची गाडगीळांना मोठी हौस होती. ही हौस जीवनदर्शनासह कलादर्शनाचीसुद्धा होती. हे त्यांच्या कादंबरी व समीक्षा अशा दोन्ही लेखनांच्या बाबतीत खरे आहे.
प्रस्तुतचा नवा कथासंग्रह हा त्यांच्या अखेरच्या काळातील आहे. सतरा कथांचा हा एक सुंदर, सुरस असा घोस आहे. त्यांच्या वयाची, लेखनाची आणि वाङ्मयीन परिपक्व जाणिवांची कल्पना या कथांवरून येते. अनुभव ओतून कथेची निर्मिती करण्यापेक्षा त्या अनुभवांचे सहज, स्वाभाविक उपयोजन गाडगीळ करतात. तेही अत्यंत बिनचूकपणे, विलक्षण पद्धतीने व भावनिक जिव्हाळ्याने. कथा सजीव करताना कथातंत्राच्या खटाटोपात ते पडलेले दिसत नाहीत. आत्मनिवेदनातून ते कथा सांगतात. दुपारच्या गप्पांत भाषेवर प्रभुत्व असलेल्या प्रौढ, समंजस स्त्रीने अत्यंत आस्थेवाईकपणे, परंतु जराशा तटस्थपणे काही गोष्टी कराव्यात तसे गाडगीळांचे कथा सांगणे आहे. त्यांच्या या शैलीमुळे त्यांची कथा प्रगल्भ जाणिवेची व दोषरहित होते. त्यांच्या कथाशैलीत एक प्रकारचा संथपणा जाणवतो; पण तो त्यांच्या शैलीचा थाटच म्हटला पाहिजे.
न कंटाळता अनेक बारकावे गाडगीळ कथेत भरत जातात. ते अत्यंत रेखीवपणे भरण्यात गाडगीळांचा हात कोणी धरू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलांवरच्या कथा अत्यंत सुंदर झाल्या आहेत. लहान मुलांवर कथा लिहावी ती गाडगीळांनीच. ‘आईची किटकिट’ आणि ‘पतंग काटणाऱ्या आया’ या मुलांवरच्या कथा एखादा सुंदरसा चित्रपटच वाटतात. मुलांच्या विश्वाचे चित्रण करत असताना मुलांना वाढवताना आयांची होणारी ससेहोलपटही त्यांना दाखवायची असते. मुलांच्या मनस्वी वागण्यात गाडगीळांना रस असतो खरा; पण त्यासोबतचा त्यांच्या आयांचा वैताग, त्रागा तितक्याच सहअनुभूतीने ते व्यक्त करतात. या वैतागलेल्या आयांच्या तोंडची भाषा गाडगीळ नेमकेपणाने पकडतात. मुलांच्या अभ्यासाच्या तक्रारी, सवंगडय़ांच्या तक्रारी, आयांच्या तक्रारी गाडगीळ मुलांच्या तोंडून फार चांगल्या प्रकारे मांडतात. असे वाटते की, गंगाधर गाडगीळ नावाचे एक चिडखोर मूलच आपल्यासमोर आहे.
मुलांच्या निरागसपणातून, त्यांच्या अल्लडपणातून ते विनोदही साधतात. ‘आईची किटकिट’ या कथेतील सहज, स्वाभाविक विनोद वाचण्यासारखा आहे. मुलांचे स्वत:चे कौतुक स्वत:च्या तोंडी किती गोड वाटते याची मजाच जणू गाडगीळ लुटतात. ‘पतंग काटणाऱ्या आया’ ही कथा तर मुलांसह मध्यमवर्गीयांचे कौटुंबिक जीवनच उभे करते. वेगवेगळ्या ऋतूंत मुलांचे वेगवेगळे खेळ चालतात. त्यातला पतंग हा फार मोहक खेळ. मांजा, झोल, पतंग काटाकाटी, पतंग फाडणे हे सारे प्रकार या कथेत आले आहेत. पण मुलांच्या या गोंधळात गच्चीवर थापलेले पापड येतात. पतंग उडविण्याच्या नादात ते ओले पापड मुलांकडून तुडवले जातात. त्यामुळे ते त्याची धास्ती घेतात.. घरांची दाटीवाटी, खेळण्यासाठी मैदानाचा अभाव अशा अनेक समस्या गाडगीळ नकळत कथेत मांडतात. श्रेष्ठ लेखकाची गुणवत्ता एका गोष्टीला अनेक गोष्टींची जोमदार जोड देण्यात असते. म्हणूनच ती गोष्ट परिपक्व आणि वास्तवाचा भास निर्माण करते.
‘माणसानं एन्जॉय करायचं तरी कधी?’ या कथेद्वारे गाडगीळ म्हातारपण एन्जॉय करताना दिसतात. निवृत्तीनंतरच्या जीवनात अनेक समस्या उपस्थित होतात. सर्व प्रश्न, विवंचना, समस्या असूनही तरुण तुर्काना म्हातारपण एन्जॉय करण्याकरिता गाडगीळ जीवनात रस घ्यायला लावतात. पण त्याचवेळी ‘विषण्ण करणारं कोडं’सारखी कथा लिहून वृद्ध आई-वडिलांच्या समस्यांना वाचाही फोडतात. मुले-नातवंडे, सगेसोयरे असूनही वृद्धांची होणारी ही परवड खरोखर मन विषण्ण करते. गाडगीळांनी हे फार आस्थेने केले आहे.
गाडगीळ हे मराठीतील एक श्रेष्ठ कथाकार आहेत. त्यांच्या कथांना भारतीय पातळीवरसुद्धा चांगली दाद मिळालेली आहे. पण तरीही ‘उन्ह आणि पाऊस’मधल्या श्रेष्ठ कथा नाहीत. त्या फक्त चांगल्या कथा आहेत. कारण आपल्या साहित्यातून सर्वपरीने जीवनानुभव देऊन झाल्यानंतरच्या काळातील त्यांच्या या कथा आहेत. त्यामुळे त्यात मधुघट कोठून येणार? तथापि त्या ‘गाडगीळ’ नामक तलावात उल्कापात होऊन क्षीणपणे सरळ रेषेत कोसळणाऱ्या चांदण्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात ज्वानीतला अंगार व क्षुब्धता जाणवत नाही. परंतु ‘सारेच दीप कसे आता मंदावले’ असेही आढळून येत नाही. गाडगीळांच्या या कथाविश्वात कल्पकतेच्या विस्मृतीचा साधा ओरखडाही (उतारकाळातील कथांमध्येही!) जाणवत नाही.
‘उन्ह आणि पाऊस’ या संग्रहाला गाडगीळांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. ‘कथा सुचते कशी?’ या विषयावरील टिपण त्यांनी प्रस्तावना म्हणून दिले आहे. त्यांना कथा कुठे, कशी सुचते याची त्यात चर्चा केलेली आहे. घटनेतून, प्रसंगातून त्यांना कथाबीज कसे सापडते याचा निर्मितीप्रक्रियेच्या अनुषंगाने उलगडा त्यांनी केला आहे. त्यांची कथा समजून घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘उन्ह आणि पाऊस’- गंगाधर गाडगीळ, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे  – २७७, मूल्य – २७५ रुपये.