एखादी कलाकृती- मग ती गद्य असो की पद्य- उत्कटपणे प्रत्यक्षात उतरवायची असेल तर तितक्याच प्रभावीपणे सर्वप्रथम मन:पटलावर उमटणे आवश्यक असते. एकदा का ती तशी उमटली, की मग तिचे दर्शनी स्वरूपदेखील तितकेच प्रत्ययकारी होते. हर्ष परचुरे याने लिहिलेले ‘वनाचे श्लोक’ हे पुस्तक असेच प्रत्ययकारी दर्शन घडवणारे आहे. सृष्टीशी तादात्म्य पावत मनाला साद घातल्यावर जे स्फुरले, उतरले ते म्हणजे ‘वनाचे श्लोक’.  
हर्ष परचुरे हे व्यवसायाने  सॉफ्टवेअर अभियंता असून त्यांनी डोंगरदऱ्या भटकण्याच्या, जंगले धुंडाळण्याच्या उपजत सवयीमुळे या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे. त्याचेच प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना (म्हणताना म्हणायला हवे खरं तर!) येतो. जंगलाची संपूर्ण परिसंस्था डोळ्यासमोर ठेवून परचुरे आपल्याला जंगलाचे अनोखे विश्व उलगडून दाखवितात. वनाचे घटक, वृक्षजीवनचक्र, परागीभवन, जलचक्र, वनांचे प्रकार, जैवविविधता, देवराया असा वनांचा साकल्याने विचार करून त्यांनी हे पुस्तक सिद्ध केले आहे. पर्यावरणाविषयी मराठीतून विपुल लिखाण नाही. त्यामुळे अनेक इंग्रजी संकल्पनांना, शब्दांना मराठी शब्द उपलब्ध आहेतच असे नाही. अशा ठिकाणी लेखकाने काही नवीन शब्दांची योजनादेखील केली आहे.
‘वनांच्या श्लोकां’साठी त्यांनी समर्थ रामदासांच्या ‘मनाच्या श्लोकां’चा आधार घेतला आहे. ही सर्वस्वी नवीन संकल्पना म्हणावी लागेल. ‘मनाच्या श्लोकां’मध्ये असणारी गेयता ‘वनाच्या श्लोका’त आहे. इतकेच नाही, तर या श्लोकांची भाषादेखील ‘मनाच्या श्लोकां’शी जातकुळी सांगणारी आहे. त्यामुळे रटाळ पर्यावरणीय गद्य वाचताना येणारा कंटाळा येथे अजिबात जाणवत नाही.
पहाटे मनी रान ते आठवावे, तया ठायिचे मैत्र तेही स्मरावे,
तयाचे कसे प्रेम आम्हावरी ते, कसे गोजिरे रुप सांगू तुम्हां ते.
‘वनाच्या श्लोकां’ची ही सुरुवातच अलगदपणे आपला ताबा घेते. ही सृष्टी कशी निर्मिली असेल, नेमके काय झाले असेल, उत्क्रांतीच्या ओघात येथे काय उलथापालथ झाली असावी, जंगलाचे चक्र कसे सुरू असते. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. अगदी सहज सोपी भाषा हा या साऱ्या श्लोकांचा आत्मा आहे.
खावोनि एकासि हासे दुजा जो, तया भक्षिण्याला उभा तिसरा तो,
साऱ्या जिवांची मातीच होते, त्याच्यातुनि पुन्हा झाड येते
या श्लोकातून ते अन्नसाखळीचे मर्म, तर पुढील श्लोकांतून वनांचे प्रकार अगदी सहजपणे उलगडतात-
कुठे रान पाहा अतिपावसाळी, असे गार हिरवे सदासर्वकाळी,
तिथे वृक्ष ते रुंद पाने जयांची, दिसेनास माथा अशी फार उंची.
वनाची अंतर्गत व्यवस्था कशी सुदृढ आणि सुनियोजित असते हे सांगताना लेखक लिहितो-
जयांच्या तयाच्या वाटा स्वत:च्या, जयाच्या तयाच्या वेळा स्वत:च्या
जयाचे तयाचे ठरले निवारे.. जयाचे तयाचे निश्चित अन्न ही रे!
अशा एकेक रसाळ श्लोकांतून वनाचे वैभव आपल्या मनी ठाव धरू लागते. लेखक हे सारे समजावून देतोच, पण त्याच्या स्वभावातील कार्यकर्ता/ चळवळ्या जागा असल्यामुळे केवळ शास्त्रीय ज्ञान न देता तो जाता जाता काही उपदेशाचे डोसदेखील देतो. मानवाला त्याची जागा दाखवून देणारे, त्याच्या कृत्यांची आठवण करून देणारे श्लोक विषयानुसार तो लिहितो. जंगलराज म्हणजे अनागोंदी, गुंडागर्दी समजणाऱ्या माणसाला खऱ्याखुऱ्या जंगलाची व्यवस्था समजावून सांगताना लेखक हळूच विचारतो-
सांगा, असे जंगलराज्य कोठे, कधी माणसाला जमेल का ते?
करिती मनुष्ये अनागोंदि नुसती, तरीही तया, ‘जंगलराज्य’ म्हणती!
तर केवळ हौसमौज वा पिकनिक म्हणून वनात जाऊन तेथील व्यवस्था बिघडविणाऱ्यास तो उपदेश करतो-
वनामाजि ह्य़ा उगिच जाऊ नका रे, गेलां तरी काहि आणूं नका रे!
तिथे येक तो देव जागृत फार, करिता चुका कोपतो चिकार!
मानव स्वत:ला कितीही श्रेष्ठ म्हणवून घेत असला तरी निसर्गचक्रातील त्याचे स्थान काय आहे हे दाखविताना लेखक आत्मपरीक्षणाचा सल्ला देतो आणि योग्यतेने राहायला सांगतो-
कशी जन्मली ही धरा आणि राने, उत्क्रांत केली का माणसाने?
पुन्हा एकदा आठवोनि पहा हे, तुझी योग्यता नीट जाणोनि राहे!
या सहज- सोप्या आणि तरीदेखील थेट विषय मांडणाऱ्या श्लोकांना  रेखाचित्रांच्या आणि छायाचित्रांच्या जोडीमुळे बहार आली आहे. खरं तर याला परत गद्यलेखनाच्या जोडाची गरज नव्हती. तरीदेखील लेखकाने प्रत्येक विषयावर ते केले आहे. त्यातून लेखकाचा अभ्यास जाणवतो आणि श्लोकांची शास्त्रीयता पटते. त्यामुळे हे पुस्तक सर्वसामान्य, तसेच जिज्ञासू वाचकांबरोबरच शाळा-महाविद्यालयांसाठीदेखील उपयुक्त ठरेल.
‘वनाचे श्लोक’ – हर्ष परचुरे, आशय प्रकाशन, पृष्ठे – १७६, मूल्य – ३२५ रुपये.