मनाच्या तळाचा ठाव..
माणसाच्या मनाचा शोध घेणं हा सर्जनशील लेखक आणि वैज्ञानिक संशोधक अशा दोन्हींच्या आवडीचा विषय आहे. सर्जनशील लेखक आपल्या प्रतिभाविलासाने मनाचा तळ धुंडाळण्याचा प्रयत्न करतात, तर वैज्ञानिक संशोधक सखोल अभ्यास करून मनाचा तळठाव शोधण्याची पराकाष्ठा करतात. आणि या दोन्ही पद्धतींतून मन उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. यातून मनाचा थांग पुरता लागलेला नसला तरी त्याविषयी बरेच जाणून घेता येते. पण सर्जनशील लेखकाची प्रतिभा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्हींचा मिलाफ झाला तर मात्र मनाच्या विविध पैलूंचे मनोहारी दर्शन घडते. प्रस्तुत कथासंग्रहात नेमका तोच प्रयत्न केला आहे. व्यवसायाने शल्यचिकित्सक असलेल्या अनिल गांधी यांच्या प्रस्तुत संग्रहात २४ कथा आहेत. त्यातून त्यांनी मनविभ्रमाचे, मनोराज्याचे आणि मन चिंती ते वैरी न चिंती या पराकाष्ठेच्या मनोवर्तनाचे विविध पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने मनाच्या प्रामुख्याने दोन अवस्था मानल्या जातात. एक सुप्त मन आणि दुसरी जागृत मन. या दोन अवस्थांमुळे माणसाचे त्या त्या प्रसंगानुरूप चांगले वा वाईट रूप प्रत्ययाला येते. त्याची प्रचितीही या कथासंग्रहातून चांगल्या प्रकारे येते.
‘शोध मनाचा’ – डॉ. अनिल गांधी,
उन्मेष प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – १९५, मूल्य – २०० रुपये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाणीवाल्या बाबाची कहाणी

गंगा-यमुना या भारताच्या जीवनरेखा, जीवनधारा आहेत असे मानले जाते. भारतीय संस्कृतीचा त्या अविभाज्य भाग मानल्या जातात. या पवित्र नद्यांची सांप्रत अवस्था मात्र शोचनीय म्हणावी अशी झाली आहे. प्रदूषणाने त्यांना विळखा घातला आहे. त्यामुळे या नद्या वाचवण्यासाठी ‘जोहड’वाल्या डॉ. राजेंद्रसिंह यांनी संघर्ष मोहीम हाती घेतली आहे. त्या संघर्षांची ही कहाणी आहे. पाण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह देत असलेला लढा आता सर्वाच्या परिचयाचा आहे; पण त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, सोसलेल्या हालअपेष्टा मात्र अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. जीवघेणे हल्ले, राजस्थान सरकारने केलेल्या ३५० केसेस, अशा संकटांचा सामना करत राजेंद्रसिंहांनी आपला लढा चालू ठेवला. हळूहळू त्या लढय़ाचे मोठय़ा चळवळीत रूपांतर झाले. प्रस्तुत
पुस्तकात सुरेखा शहा यांनी गंगा-यमुनेच्या संघर्षांसाठी राजेंद्रसिंहांनी केलेले काम सांगत असतानाच राजेंद्रसिंहांचा जीवनप्रवासही सांगितला आहे. कादंबरीसारखी त्यांनी ही कथा लिहिली आहे. त्यामुळे त्यातून साल, घटना यांची नेमकी माहिती मिळत नाही, पण तरीही हे पुस्तक वाचावे असे आहे.
‘जय यमुने.. जय जय गंगे’ – सुरेखा शहा,
सुमेरू प्रकाशन, डोंबिवली,
पृष्ठे – २४०, मूल्य – २८० रुपये.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book reviews of new books