रा. ना. चव्हाण एक प्रभावी समाजचिंतक तसेच समाजसुधारकदेखील होते. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास लाभलेल्या चव्हाण यांनी शिंदे यांचा विचारवारसा पुढे चालवत १९५० ते १९९० या काळात आपल्या लेखनातून परिवर्तन फेरबदलाचा विचार मांडला. खरेतर रा. ना. यांचा विचार हा सामाजिक प्रबोधनाचा आणि एकोप्याचा आहे. तसाच तो फुले-आंबेडकरवादाचा एक घुमारा आहे. अशा ‘रा.ना.वादा’ची प्रबोधन चौकटीतील तत्त्वमीमांसा ‘प्रबोधनाची क्षितिजे’ या पुस्तकातून मांडली गेली आहे. प्रबोधन ही प्रक्रिया समाज, व्यक्ती आणि राष्ट्रात आधुनिकीकरण करणारी असते, या मुद्दय़ाचा वेध या पुस्तकात घेतला आहे.
लेखकाने वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे हे संकलन आहे. त्या सर्वाचा समान धागा प्रबोधन हा असून तो मननीय आहे. या पुस्तकात एकंदर १७ लेख आहेत. त्यापैकी १६ लेख मराठीत, तर शेवटचा एक लेख इंग्रजीत आहे. ‘नॉन ब्राह्मीण मूव्हमेंट अँड इंडियन नॅशनल काँग्रेस’ हे त्या इंग्रजी लेखाचे नाव. छत्रपती शिवाजी महाराज, म. जोतिराव फुले, लोकहितवादी, न्या. महादेव गोविंद रानडे, महर्षी विठ्ठल रामजी िशदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्यावरचे लेख त्यात आहेत, तर काही लेख हे समाजप्रबोधनाची मागील वाटचाल व भावी वाटचाल यांचा समर्पक वेध घेणारे आहेत. त्याचे तटस्थ, परखड व चिकित्सकपणे विश्लेषण लेखकाने केले आहे.
मंडल आयोगानंतरची भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेली सामाजिक घुसळणदेखील त्यांनी मांडली आहे. या पुस्तकास प्रा. अशोक चौसाळकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात- ‘‘..रा. ना. हे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळींचे चिकित्सक व साक्षेपी अभ्यासक होते. या चळवळींचे ते जसे काही प्रमाणात साक्षीदार होते, त्याचप्रमाणे या चळवळीस आपल्या परीने गती देणारे ते सिद्धहस्त लेखक पण होते. त्यांना म. वि. रा. शिंदे व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवासही लाभला होता. त्याचप्रमाणे ते प्रार्थनासमाज आणि ब्राह्मसमाज परंपरेशी संबंध जोडून असल्यामुळे त्या चळवळींच्या वाङ्मयाशी त्यांचा जवळून परिचय होता.. आधुनिक महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीत चार प्रमुख प्रवाह होते.. या चारही प्रवाहांचे रा. ना. चव्हणा हे साक्षेपी अभ्यासक होते..’
लेखकाने या पुस्तकामध्ये वैचारिक तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे. फुले, रानडे, आंबेडकर, भांडारकर, म. िशदे, कर्मवीर पाटील, लोकहितवादी या सर्वाचे विचार तुलनात्मकरीत्या मांडले आहेत. या विचारवंतांचे विचार समजून घेण्यासाठी लेखकाची तुलनात्मक वैचारिक दृष्टी उपयुक्त ठरू शकते.
महाराष्ट्रात प्रबोधन व परिवर्तन यांचा सुरेख समन्वय छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे साधला होता याचे विवेचन ‘श्री शिवाजी छत्रपती यांचे प्रबोधन व परिवर्तन’ या पहिल्या प्रकरणात केले आहे. लेखकाच्या विचारांची मध्यभूमी ही म. फुले यांचे विचार आहेत. त्यामुळेच या ग्रंथामध्ये म. फुले यांच्यासंबंधी चार लेख आहेत. म. फुले यांच्या विचाराची मांडणी करण्याबरोबरच म. फुले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी केलेली वैचारिक तुलना लेखकाच्या चिकित्सक वृत्तीची जाणीव करून देते. स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत स्वराज्याचे रूपांतर सुराज्यामध्ये होऊ शकलेले नाही, अशी टीका लेखक करतात. याला कारण म्हणजे नवे प्रश्न  सोडविण्यासाठी कुचकामी ठरलेले जुने प्रबोधन. त्यासाठी नवे प्रबोधनच गरजेचे आहे. भ्रष्टाचार ही आजची समस्या केवळ सरकार बदलून सुटणार नाही, तर ती नव्या नतिक प्रबोधनातून सुटू शकेल. नेतृत्व, जनता या सर्वानी विधायक अिहसावादी रचनात्मक विवेक अंगीकारला पाहिजे. सार्वजनिक व्यवहारात आणि राजकारणात वापरली जाणारी भाषाही लेखकांना महत्त्वाची वाटते. सौम्य, मृदू, मितभाषी सहजपणे समन्वय घडवून विकासाचा मार्ग दाखवतो. याउलट िहसक, आक्रमक, रांगडी भाषा अनेक प्रश्न, समस्या निर्माण करते.
न्या. रानडे यांचा विचार हा सकलजनवादी होता, हे लेखकांनी उत्कृष्टरीत्या मांडले आहे. मराठीमधील अनेक पुस्तकांमध्ये म. फुले व न्या. रानडे यांच्यामध्ये संघर्ष होता हे मांडलेले आहे, पण हे पुस्तक यापासून फारकत घेत नवा विचार मांडते. म. फुले- न्या. रानडे यांच्यामध्ये सहकार्य होते हे लेखक दाखवून देतात. कोणत्याही समाजसुधारकाकडे किंवा नेतृत्वाकडे जातीच्या दृष्टिकोनातून किंवा पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहू नये, अन्यथा त्याने केलेले कार्य आपण समजून घेऊ शकणार नाही असा चित्तवेधक विचार या पुस्तकातून मांडला आहे. लोकहितवादींनी ‘शतपत्रा’च्या माध्यमातून समाज जागृती व समाज कल्याण करण्याचा केलेला प्रयत्न लेखक अधोरेखित करतात. चिपळूणकर, आगरकर, टिळक या तिघांमध्ये वैचारिक मतभिन्नता असली तरी या तिघांना जोडणारा एक समान धागा होता- तो म्हणजे राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा.
या पुस्तकातील एका प्रकरणात ब्राह्मसमाज, परमहंससभा, प्रार्थना समाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज यांनी प्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनात विवेकाचा वापर केला गेला पाहिजे. धार्मिकता, भावनिकता यापेक्षा सदाचार व नतिकता यांचा अवलंब सार्वजनिक जीवनात झाला पाहिजे. आज समाजामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या सर्वाची सोडवणूक करावयाची असेल तर समाजाचे प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्या प्रबोधनाचे स्वरूप राजकीय, धार्मिक असण्यापेक्षा नतिक असणे लेखकाला जास्त गरजेचे वाटते.
थोडक्यात, सामाजिक प्रश्नांची उकल करण्याची एक नवी दृष्टी या पुस्तकातून लेखकानी मांडली आहे. अतिशय परखडपणे मांडलेल्या विचारांमुळे या पुस्तकातील निष्कर्ष काळसुसंगत ठरतात. पुस्तकात कोठेही संघर्षांची भाषा नसून प्रबोधनाची वाटचाल कशी होत गेली व आज ते कसे गरजेचे आहे याच दृष्टीने मांडणी केली आहे. हा वैचारिक ठेवा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हेदेखील प्रबोधनाच्या वाटचालीतील एक विवेकशील कृतीच आहे, असे म्हणावे लागेल.
‘प्रबोधनाची क्षितिजे’ – रा. ना. चव्हाण, संपादक – रमेश चव्हाण, प्रकाशक – रमेश चव्हाण, पुणे, पृष्ठे- २२४, मूल्य – २२५ रुपये.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा