अलीकडच्या काळात मराठी समीक्षेविषयी साहित्यातच काय पण एकंदर महाराष्ट्रातच फारसं बरं बोललं जात नाही. याच कारण आता चतुरस्र, विचक्षण आणि अभ्यासूवृत्तीचे समीक्षक राहिले नाहीत, हे जितके खरे आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक हल्लीच्या समीक्षकांना बौद्धिक आळस नडतो आहे. समीक्षा म्हणजे काही केवळ कथा-कादंबऱ्या-कविता यांविषयांवरील पुस्तकांची समीक्षा नव्हे. ते समीक्षेचे एक अनुषंगिक कार्य असतेच. पण एकंदर साहित्याचा बदलत्या समाजजीवनाशी अनुबंध जोडण्याचे काम समीक्षेने करावयाचे असते. त्यासाठी नवनव्या साहित्य सिद्धांतांची मांडणी करत राहावी लागते. आधीच्या सिद्धांतांमध्ये मौलिक भर घालणे, त्यांची पुनर्माडणी करणे, त्यांचा चांगला प्रतिवाद करणे आणि नव्या सिद्धांताची भर घालणे, असे काम सतत करावे लागते.
अलीकडच्या समीक्षकांनी हे काम फारसे केलेले नसले तरी आता वयाच्या ऐंशीचा टप्पा ओलांडलेल्या प्रा. रा. ग. जाधव यांनी ‘साहित्याचे परिस्थितिविज्ञान’ (इकॉलॉजी ऑफ लिटरेचर) हा नवा सिद्धांत मांडला आहे. १९९६ साली जाधव यांनी ‘पर्यावरणीय प्रबोधन आणि साहित्य’ हे पुस्तक लिहिले होते. त्यात त्यांनी या सिद्धांतांची रूपरेषा स्थूलपणे मांडली होती. आता १६ वर्षांनंतर त्यांनी त्यात आणखी भर घालून ‘इकॉलॉजी ऑफ लिटरेचर’ अशी त्याची नव्याने मांडणी केली आहे.
मूलभूत विज्ञानाच्या कसोटीवर साहित्यकृती निर्जीव मानली जाते. पण साहित्याचा अवकाश हा सजीव गोष्टींचा बनलेला असतो. त्यामुळे साहित्याचा पर्यावरणाशी संबंध अनुस्युतच असतो. साहित्यात रूपके केवळ अलंकरणासाठी, काहीशी अतिशयोक्ती करण्यासाठी येतात, पण तत्त्वज्ञानात ती अधिक अर्थसंपृक्त करण्यासाठी येतात. ‘मुख चंद्र तो’ हे असेच रूपक आहे. म्हणून ‘साहित्याचे परिस्थितिविज्ञान’ ही रूपकात्मक संकल्पना आहे, असे प्रा. जाधव सुरुवातीलाच नमूद करतात.
प्रा. जाधव साठोत्तरी साहित्याचे साक्षेपी भाष्यकार आहेत. साठनंतर साहित्यात सामाजिक संदर्भाना महत्त्व आले. या काळात दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी असे वेगवेगळे वाङ्मयप्रवाह निर्माण झाले. त्यांची सामाजिक-सांस्कृतिक बाजू विज्ञानाच्या अंगाने तपासाविशी वाटू लागली. साहित्यातल्या वेगवेगळ्या वाङ्मयप्रवाहांची वैज्ञानिक कसोटय़ांवर उकल करून पाहिल्यास काय दिसते, या जिज्ञासेतून या सिद्धांतांची मांडणी झाली आहे. यातून साहित्याचे संपूर्ण स्वरूप व सत्यता हाती लागेलच असे नाही, असे प्रा. जाधव यांनी म्हटले आहे. पण सत्य सोधण्याच्या प्रक्रियेच्या वाटा वेगवेगळ्या असू शकतात, साहित्याचे परिस्थितिविज्ञान ही त्यापैकीच एक आहे, हे नि:संशय.
प्रा. जाधव हे मराठी साहित्यात उदारमतवादी समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांची भूमिका चोख आणि बिनतोड युक्तिवादांवर आधारलेली असते. त्यामुळे त्यांचे लेखन संयत आणि समतोल होते. या पुस्तकाची रचनाही त्यांनी असाच प्रकारे केली आहे.
या पुस्तकाचे दोन भाग आहेत. ‘साहित्याचे परिस्थितिविज्ञान’या पहिल्या भागात या संकल्पनेचे स्पष्टीकरण, महत्त्वाच्या संकल्पना, रामायण-महाभारतादि ग्रंथ, इतिहासलेखन, लोकवाङ्मय यांचा परिस्थितिविज्ञानाशी असलेला संबंध उलगडून दाखवला आहे. ‘पर्यावरणीय संवेदन’ या दुसऱ्या भागात मराठी साहित्यातील पर्यावरणीय संवेदनांचा स्थूल आढावा घेतला आहे. परिशिष्टांमध्ये बालकवींची ‘औंदुबर’ ही कविता तर सुरेश शिंदे यांची ‘सज्र्या’ ही कादंबरी पर्यावरणीय संवेदनाच्या बाबतीत कशी वैशिष्टय़पूर्ण ठरते, याचे विवेचन केले आहे.
या सिद्धांताचे महत्त्व काय? अशा प्रकारच्या रूपकात्मक संकल्पना हा विचारप्रक्रियेला चालना देण्यासाठी, ती उन्नत करण्यासाठी गरजेच्या असतात. कारण त्यातून ज्ञानमीमांसा अधिक समृद्ध होत जाते. प्रस्तुत पुस्तकाचे महत्त्व आहे ते त्यासाठीच.
कलेचे जीवशास्त्र, राज्यशास्त्राचे व्याकरण, भाषेचे रसायनशास्त्र, विज्ञानाचे तत्त्वज्ञानव्याकरण या संकल्पनांचीही अशाच प्रकारे मांडणी होऊ शकते. येत्या काळात मराठी समीक्षेने त्याकडे लक्ष पुरवायला हरकत नाही.
हे पुस्तक मराठी साहित्यिक, समीक्षक, प्राध्यापक यांच्याबरोबरच इतर जिज्ञासूंसाठीही तितकेच उपयुक्त आणि वाचनीय आहे.
‘साहित्याचे परिस्थितिविज्ञान’ – रा. ग. जाधव, देशमुख आणि कंपनी, मुंबई, पृष्ठे – १६७, पाने – २०० रुपये.
साहित्याचा वैज्ञानिक संदर्भ
अलीकडच्या काळात मराठी समीक्षेविषयी साहित्यातच काय पण एकंदर महाराष्ट्रातच फारसं बरं बोललं जात नाही. याच कारण आता चतुरस्र, विचक्षण आणि अभ्यासूवृत्तीचे समीक्षक राहिले नाहीत, हे जितके खरे आहे तेवढेच किंबहुना त्याहूनही अधिक हल्लीच्या समीक्षकांना बौद्धिक आळस नडतो आहे.
First published on: 13-01-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book scientific reference of literature