ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना २००५ साली अनपेक्षितपणे राष्ट्रपतीपदाची संधी चालून आली. या पाच वर्षांच्या काळात त्यांनी देशातल्या कितीतरी तरुणांशी संवाद साधला. त्या काळातले काही अनुभव, भाषणे यांचा समावेश ‘टर्निग पॉइंट्स’ पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. कलाम यांनी आपल्या एक पानी प्रस्तावनेत म्हटले आहे, ‘माझ्या आयुष्याबद्दलच्या लेखनातून अनेक भारतीयांच्या चिंता, अडचणी, आणि आकांक्षा ह्य़ांचा प्रतिध्वनी उमटतो. मीही त्यांच्यासारखेच शिडीच्या अगदी खालच्या पायरीपासून आयुष्य सुरू केले.’ पण हे अनुभवपर पुस्तक त्यापुढेही जाते.
या पुस्तकात एकंदर चौदा प्रकरणे आहेत. परिशिष्टामध्ये कलाम यांची एक मुलाखत आणि त्यांनी ध्येयसिद्धीसाठी मांडलेली एक योजना यांचा समावेश आहे. हे सर्व लेखन कलाम यांनी राष्ट्रपती असतानाच्या काळात केले आहे. ‘भारताचे गुणगान मी केव्हा गाऊ शकेन?’ या पहिल्याच लेखात कलाम यांनी राष्ट्रपती भवनातील शेवटच्या दिवसाविषयी लिहिले आहे. त्यानंतर अण्णा विद्यापीठात केलेले एक भाषण आहे. तिसऱ्या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘माझ्या आयुष्यात बदल घडविणारे सात महत्त्वाचे टप्पे’. ‘एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’मध्ये वरिष्ठ सहायक, ‘डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलमेंट लॅबोरेटरी’मध्ये संचालक, १९९८मध्ये केलेल्या अणुचाचण्या, भारत सरकारचा शास्त्रीय विषयांचा सल्लागार, अण्णा विद्यापीठामध्ये तंत्रज्ञानाचा प्राध्यापक आणि राष्ट्रपती हे ते सात टप्पे.
राष्ट्रपती असतानाच्या काळात कलाम यांना काही निर्णय घ्यावे लागले, त्या अनुभवावर आधारित लेखाला त्यांनी ‘विवादास्पद निर्णय’ असे शीर्षक दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कैदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करतात. त्यावर कलाम यांनी कसा निर्णय घेतला याचा अनुभव वाचण्यासारखा आहे.
या शिवाय युपीए-१च्या वेळी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात कलाम यांच्याकडे गेल्या, तेव्हा त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याला कलाम यांची तयारी होती, पण सोनिया गांधींनीच
डॉ. मनमोहनसिंग यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवले. ही आपल्यासाठी चकित करणारी बाब होती असा खुलासा कलाम यांनी केला आहे. या विषयावर आजवर खूप उलटसुलट मते व्यक्त झाली आहेत. अनेक आक्षेप घेतले गेले आहेत. पण प्रत्यक्षात काय घडले ते पहिल्यांदाच या पुस्तकाच्या माध्यमातून कलाम यांनी जाहीर केले आहे. हा खुलासा खूपच महत्त्वाचा आहे.
आपल्याला राष्ट्रपतीपदाच्या काळात दोन गोष्टींनी समाधान दिले, असे कलाम यांनी ‘राष्ट्रपतीपदानंतर..’ या प्रकरणात लिहिले आहे. ती म्हणजे आपण विद्यार्थ्यांमध्ये असलेली निराशा आणि उदासीनता काही प्रमाणात घालवली आणि त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे भारताच्या प्रगतीचा वेग उंचावण्यास मदत झाली, असे त्यांनी लिहिले आहे. शिकवणे आणि संशोधन करणे या दोन्ही गोष्टी कलाम यांना आवडतात. ते राष्ट्रपतीपदी होते तेव्हा त्यांनी आपल्यापरीने मुलांना शिकवण्याचे काम केले. संशोधन हा तर त्यांचा जीवनधर्मच आहे.
 या सर्वच लेखांमध्येही कलाम यांची दृष्टी, देशाविषयीची तळमळ, नम्रता, ऋजुता आणि त्यांची सचोटी जाणवते. कलाम यांचा दुर्दम्य आशावाद आणि तरुणांविषयीचा विश्वास हे या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे. राष्ट्रपतीपदी असताना कलाम यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी जो संवाद साधला, चिकाटीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांच्यापुढे मोठी स्वप्ने ठेवली, त्याची ही कहाणी आहे. पण याचबरोबर राष्ट्रपती असताना काळात घडलेल्या काही विवादास्पद घटनांबद्दलचे त्यांच्या बाजूचे तपशील त्यांनी या पुस्तकातून पहिल्यांदाच जाहीरपणे व्यक्त केले आहेत. ते तपशीलच इतके बोलके आहेत की त्यावर वेगळ्या भाष्याची गरजच राहत नाही. ते जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.
‘टर्निग पॉइंट्स’ : ए. पी. जे. अब्दुल कलाम, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे , पृष्ठे- १४८, मूल्य : १२० रुपये.

Story img Loader