डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर (१८८४-१९३७) हे गेल्या शतकातील एक असामान्य बुद्धिमान व्यक्तित्व. उण्यापुऱ्या ५३ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अमेरिकेत जाऊन पीएच.डी. संपादन केली, तिथून परतताना ते इंग्लंडमध्ये दीड र्वष राहिले. पुढे कलकत्त्याला समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काही काळ काम केल्यावर ते पुण्यास आले आणि त्यांनी ज्ञानकोशाचा प्रकल्प हाती घेतला. समाजशास्त्राच्या अभ्यासामुळे त्यांची दृष्टी व्यापक बनली होती. भारत, अमेरिका, इंग्लंड इथल्या विविध धर्माचे आणि भिन्न संस्कृतींचे थेट दर्शन त्यांना झाले होते. नुसता भारत देश म्हटला तरी त्यात विविधता होती. जातपात, व्यवसायभिन्नता, सण, उत्सव, चालीरीती, स्त्रीपुरुष संबंध आणि त्याविषयीचे नाना प्रश्न यांची त्यांना जाणीव होती. त्यांना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासामध्ये, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये रुची आणि गती होती. त्यामुळे त्यांचे व्यक्तित्व, विचार आणि लेखन यादृष्टीने मराठी साहित्यिकांमध्ये त्यांचे वेगळेपण कुणाच्याही लक्षात येत असे. त्यांनी वैचारिक स्वरूपाचे लेखन जसे केले तसेच कादंबरीसारख्या ललितवाङ्मय प्रकारातही लेखन केले. ललितलेखकापाशी आवश्यक असणारी प्रतिभा किमान स्वरूपात का होईना त्यांच्यापाशी होती. ‘गोंडवनातील प्रियंवदा’ (१९२६), ‘परागंदा’ (१९२६), ‘आशावादी’ (१९२७), ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०), ‘गावसासू’ (१९३०), ‘विचक्षणा’ (१९३७) आणि ‘भटक्या’ (१९३७) या सात कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. यापैकी शेवटच्या दोन त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाल्या.
हरी नारायण आपटे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, पु. य. देशपांडे, वामन मल्हार जोशी, भा. वि. वरेरकर आणि ग. त्र्यं. माडखोलकर यांचा कादंबरीकार म्हणून भराचा हा कालखंड. केतकरांच्या कादंबऱ्या त्यांच्या लेखन वैशिष्टय़ामुळे वेगळ्या ठरल्या. याचे कारण त्यांची समकालीन कादंबरी लेखनाविषयीची दृष्टी आणि आपल्या कादंबऱ्यांच्या वेगळेपणाची त्यांना असलेली जाणीव. ती ‘परागंदा’च्या उपसंहारात व्यक्त झाली आहे. ते लिहितात, ‘‘कादंबरीकारांना खोडच अशी पडलेली असते की कादंबरीत कोणी एक नायक करावयाचा, त्यास काही विशेष गुण दाखवावयाचे आणि नंतर त्याचे आपण कल्पिलेल्या नायिकेशी लग्न लावावयाचे. जनन, शिक्षण, उपजीविका संपादन, महत्त्वाकांक्षा जागृती, विवाह, उपजीविकेचे कार्य करीत असता अनेक व्यक्तींशी येणारा संबंध यांच्या योगाने आयुष्यक्रम इतका गढला आहे की त्यातील मनोरंजकता सूक्ष्मदृष्टीने अवलोकन करणाऱ्यास सहज दृष्टीस पडेल; तथापि केवळ तेवढय़ावर भिस्त न ठेवता कादंबरीकार कृत्रिम कथानक तयार करतो. त्या कथानकास निश्चित प्रारंभ असतो, त्यात कारस्थान असते, त्या कारस्थानाकडे नायक-नायिकेच्या परस्परप्रेमात अंतर उत्पन्न होते. ते कारस्थान उघडकीस येते, त्या कारस्थानाच्या उघडकीमुळे नायक आणि नायिका यांच्यात पुन्हा दिलजमाई होते. प्रेमात अंतर उत्पन्न करण्यासाठी एखादा ‘दृष्टबुद्धी’ उत्पन्न करावा लागतो व येणेप्रमाणे कथानकाची कृत्रिम कादंबरी म्हणजे जगाचे किंवा समाजाचे चित्र म्हणून म्हणावयाचे पण केवळ मनोरंजकतेसाठी जगात दिसत नाहीत इतकी खोल कारस्थाने उभारावयाची असा प्रघातच पडला आहे..कथेचा कथापणा कारस्थानामुळे उत्पन्न होत नसून अनेक माणसे मिळून जो व्यवहार होतो त्यामुळे उत्पन्न होतो ही गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी असत्य जगाचे वर्णन करण्याची आवश्यकता कादंबरीकारास कधीच भासणार नाही.’’
याचा अर्थ असा की समग्र मानवी व्यवहार केंद्रस्थानी ठेवून कादंबरीलेखन व्हायला हवे यावर केतकरांचा कटाक्ष दिसतो. त्यांनी पूर्वकालीन वा समकालीन कादंबऱ्यांना ‘सदाशिव पेठी’ असे म्हटले, कारण त्यामधून भारतीय समाजजीवनातील मर्यादित समस्यांचे चित्रण आढळते. एका विशिष्ट धार्मिक आणि सामाजिक चौकटीत हे लेखक अडकले आहेत असे त्यांना म्हणायचे आहे. अव्वल इंग्रजीच्या काळात होत गेलेले सांस्कृतिक स्थित्यंतर, कुटुंबसंस्थेत होत गेलेला बदल, शिक्षणाच्या उपलब्ध होत गेलेल्या संधी, शहरांमध्ये नोकऱ्यांच्या वाढलेल्या शक्यता आणि त्यामुळे होते गेलेले स्थलांतर, प्रथम सहशिक्षण आणि पुढे नोकऱ्यांमध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांना काम करण्याची मिळालेली संधी, त्यातून सापडलेली मोकळीक, परस्पर सहवास, परस्पर प्रेम आणि त्यातून जातीव्यवस्था आणि लग्नसंस्थेला बसू लागलेले धक्के त्यांना समाजात दिसत होते. त्याकडे इतर लेखक दुर्लक्ष करतात हे त्यांना पसंत नसे. उदाहरणार्थ, विलायतेला जाऊन येणाऱ्यांची वाढती संख्या आणि अशा पुरुषांचे तिथल्या स्त्रियांशी आलेले संबंध, लोकहितवादींच्या कृष्णराव गोपाळ देशमुख या मुलाचे प्रत्यक्ष उदाहरण, भांडारकरांच्या एका नातीने मुस्लीम तरुणाशी केलेला विवाह (खान-पाणंदीकर विवाह), शिक्षक-प्राध्यापकांचे विद्यार्थिनींशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून निर्माण झालेले प्रश्न, हिराबाई पेडणेकर आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची मैत्री, बडोद्याच्या काशिबाई हेर्लेकर यांच्या कन्या शांताबाई यांचा आणि माधवराव पटवर्धन यांचा स्नेह आणि पुढे नाटेकर नावाच्या स्वामींच्या आहारी शांताबाईंचे जाणे, वरदा नायडू आणि माधवराव यांचे प्रेम, नागपुरातील पेरिन भरुचा आणि चमनलाल धवन या कॉलेज तरुणांचे प्रेम आणि त्यांनी तेलंग खेडी तलावात केलेली आत्महत्या, ही काही त्या काळातील समाजजीवनातील प्रसिद्ध उदाहरणे होत. याशिवाय अंगवस्त्र राखण्याची प्रथा, गोव्यातील कलावंतिणीचे जीवन, सरकारी वा खासगी संस्थांमधून, गिरण्यांमधून निर्माण होणारे संबंध, वेश्या व्यवसाय, स्त्रीपुरुष संबंध यासाठी रघुनाथराव कर्वे यांचे लेखन आणि प्रत्यक्ष कार्य हे सारे केतकर पाहात होते. समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षेत येणारे हे विषय असल्याने त्याचे मोल त्यांना वाटत होते व कादंबरीसारख्या ललितप्रकारामध्ये त्याचे चित्रण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांना जाणवले होते व त्याच हेतूने त्यांनी आपली लेखणी झिजवली.
डॉ. केतकर पहिल्या महायुद्धाच्या आधी अमेरिकेत, इंग्लंडमध्ये राहून आले होते. तिथे गेलेली भारतीय माणसे, त्यांचे प्रश्न, तेव्हा भारतात असलेले राजकीय वातावरण, जागतिक वातावरण याविषयीची त्यांची निरीक्षणे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आली, त्याला त्यांचे हे अनुभव प्रेरक ठरले आहेत. त्यांच्या ‘गोंडवनातील प्रियंवदा’ या कादंबरीत प्रियंवदेचा नवरा बॅरिस्टर होण्याकरता विलायतेला जातो तेव्हा त्याच्या पत्रांमधून विलायतमधील जीवन व विशेषत: आयडा या त्याच्या मैत्रिणीच्या रूपाने तिथले रीतिरिवाज तो पत्नीला कळवतो. कादंबरी मुळात नागपूर परिसराशी निगडित असल्याने तिथल्या ‘भोसला विजय मिल्स’च्या रूपाने मिलमधील वातावरण, कामगार, मालक, शेअर होल्डर्स इत्यादीचे चित्रण येते. होमरसी पेनांगवाला व त्यांची कन्या पुतळीबाई यांच्या संबंधात पारशी समाजाचे व पारशी-हिंदूंमधील प्रेमाचे चित्रण येते, शारदा आणि बिंबा या तरुण विधवा असल्याने विधवांचे प्रश्न, विधवांचा पुनर्विवाह, विवाहबाह्य़ स्त्रीपुरुष संबंधांचे चित्रण केतकर करतात. धुळ्याचे इतिहास संशोधक वैजनाथशास्त्री यांचे पात्र केतकर उघड उघड इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यावरून चितारतात. हरिभाऊ मोघे या संगीतशिक्षक, कीर्तनकार यांचे आणि बिंबाचे प्रेम ते दाखवतात. मिसेस कर्कवूड यांच्याद्वारे भारतात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे जीवन कादंबरीत सहज येते. याचा अर्थ असा की, एकाच कादंबरीत केतकर एक विशाल पट आणि त्यातील समस्या मांडतात. रचनेच्या दृष्टीने त्यात युक्तिवाद आहे, संस्कृत सुभाषिते, नाटय़पदे, कविता, पत्रे यांचाही त्यांनी वापर केला असून स्त्रीपुरुषांचे संवाद ठिकठिकाणी देऊन लालित्यपूर्ण लेखन होईल इकडेही लक्ष पुरवले आहे. या कादंबरीत कुणाचा मृत्यू वगैरे दारुणप्रसंगाचे चित्रण नाही. प्रेमाच्या झुळझुळ वाहणाऱ्या प्रियंवदा-रामभाऊ, हरिभाऊ मोघे-बिंबा या प्रवाहांबरोर कौमार्य, विधवाविवाहासंबंधीची गंभीर चर्चा या कादंबरीत आहे. ललितलेखकापाशी आवश्यक असणारी हलकीफुलकी, प्रवाहशील भाषा मात्र केतकरांपाशी नसल्याने आणि सामाजिक प्रश्नांच्या चर्चा-चिकित्सेत ते अधिक रमणारे असल्याने ही कादंबरी आणि त्यांच्या इतर कादंबऱ्या तेव्हा तेवढय़ा भावल्या नसाव्यात.
अमेरिकेत गेलेला व तेथे कायम झालेल्या किंवा कायम होऊ पाहणारा सुशिक्षितांचा वर्ग आहे, त्याच्या विचाराचे चित्रण हा ‘परागंदा’ या कादंबरीचा विषय आहे. तिच्यात गोविंदराव आणि शांताबाई कामत, त्यांची रघु, लीला आणि सुंदर ही मुले, प्रो. गोगटे, गंगाधरपंत आणि त्यांची बायको रुक्मिणीबाई, डॉ. मत्तमयूरी, लाला गजपतराय, स्वामी रामानंद तीर्थ, विष्णू सरंजाये अशा पात्रांद्वारे अमेरिकेतील हिंदू माणसे, त्यांच्या वृत्ती, तिथल्या हिंदुस्थानी सेटलर्स असोसिएशन आणि इंडो-अमेरिकन असोसिएशन, त्यांच्यातील मतभेद, अमेरिकेतील गदर चळवळ, अमेरिकेची हिंदुस्थानविषयक भूमिका, लाला गजपतराय यांचे भारताबद्दल अमेरिकेचे अनुकूल मत व्हावे म्हणून प्रयत्न, स्वामी रामानंदांची आध्यात्मिक भूमिका, अमेरिकन संस्कृती आणि भारतीय संस्कृतीतील प्रेम-फ्लर्टिग, चुंबनादी संबंधातील भेद, स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावे म्हणून भारावलेले गंगाधर, डॉक्टर पांडुरंग आणि हिराबाई रातुरीकरीण (गणिका) यांची कन्या डॉ. मत्तमयूरी यामधून गणिका कन्येचा प्रश्न आणि चित्रण काढण्यात केतकर रमलेले दिसतात.
‘ब्राह्मणकन्या’मध्ये कालिंदी शिवचरणअप्पा या लिंगायत वखारदाराकडे जाऊन राहते, शिवचरणचे आधीच लग्न झालेले. कालिंदी ही अप्पासाहेब डग्ग्ये यांची कन्या. पण मुळात अप्पासाहेबांचे लग्न झाले आहे ते शांताबाई या डॉ. चिंतोपंत आणि मंजुळा यांच्या कन्येशी. त्यातच कालिंदीपुढे शिवचरणअप्पाला सोडते आणि एसतेर किल्लेकर या बेनेइस्रायल मैत्रिणीकडे जाते. एसतेरच्या मनात सत्यव्रत या कालिंदीच्या भावाबद्दलचे आकर्षण, कालिंदी पुढे गिरणी कामगारांच्या विभागात नोकरीस लागते. तिथे तिची गाठ रामरावशी पडते. रामराव हा गिरणी मालक-कामगार यांच्यातील दुवा. वकील आणि स्वतंत्र विचारांचा नेता. कालिंदी आपली कथा चंद्रिका मासिकात प्रकाशित करते. विवाहपूर्वकाळात पुरुषाशी संबंध आल्याने स्वत:ला कलंकिता म्हणवणाऱ्या नायिकेची ही कथा. उपेंद्रवज्रा तिचे नाव. ती नानाभाई नावाच्या एका क्रिकेटपटूच्या प्रेमात. पुढे नानाभाई तिच्याशी लग्नाला नकार देतो. याला उत्तर म्हणून ‘अभागी की भाग्यवान’ या लेखकाची कथा नयनदेव भगिनीस उत्तर म्हणून येते. त्या कथेत पुरुषाशी संबंध ठेवून शेवटी नकार देणाऱ्या स्त्रीचे चित्रण असते. चंद्रिकेतील पहिली कथा नयनदेव भगिनी म्हणजे कालिंदीने तर दुसरी कथा ‘अभागी की भाग्यवान’ या टोपणनावाने रामरावने लिहिलेली असते. याशिवाय कालिंदीची बहीण उषा हिला एसतेरचा दूरचा आप्त बेंजामीन मागणी घालतो. अप्पासाहेब डग्ग्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासंदर्भात वैजनाथशास्त्रांचा सल्ला घेतात. त्यानिमित्ताने वैजनाथशास्त्रांची स्त्रीपुरुषसंबंधांविषयीची स्मृतिवचने डॉ. केतकर देतात. याबरोबरच कामगार-मालक संबंधाचे वर्णन येते. या कादंबरीतही ते कथा, कविता, पत्रे यांचा वापर करतात.
‘गावसासू’ या कादंबरीत इंग्लंडमधील हिंदी मंडळीतील युद्धपूर्व परिस्थिती ते रंगवतात. तिकडे त्या काळात जाणाऱ्या व्यापारी मंडळींचे, उच्चपदस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे जीवन कादंबरीत येते. विशेषत: यापैकी अविवाहित तरुणांना आपल्या लग्नाळू मुलींच्या जाळ्यात ओढणाऱ्या मुलींच्या आयांचे चित्रण मिसेस कैलासनाथ यांच्या रूपाने करण्याचा केतकरांचा हेतू दिसतो. तिथला ब्राह्मोसमाज, हिंदुस्थान सोसायटी, युनायटेड इंडिया सोसायटी, नॉर्थवुड सोसायटी यांच्याशी संबंधित असलेल्या या बायका, तिथल्या लँडलेडी, तरुणांचे प्रेम, अनुनय, चुंबन आणि आलिंगनासंबंधीच्या कल्पना केतकर रेखाटतात.
‘विचक्षणा’मध्ये प्रा. लोंढे आणि प्रा. तर्कटे यांच्या मुलांचे विवाह, त्यानिमित्ताने निर्माण झालेले प्रश्न, गोवेकर स्त्रिया, विधवा स्त्रिया, गुजराती, खोत, ख्रिस्ती धर्मीयांशी विवाह केल्यास निर्माण होणाऱ्या समस्या यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘भटक्या’ या कादंबरीचे स्वरूप आत्मनिवेदनात्मक असून तिच्या नायक ‘ग्रंथकाराचा लेखक, वकिलाचा कारकून, डॉक्टरचा कपाउंडर, सट्टेबाजाचा कारकून’ या नात्याने विविध क्षेत्रांमध्ये कामगिरी करतो. अवघ्या १०९ पानांमध्ये केतकरांनी विस्तृत अनुभवांचा, निरीक्षणांचा, मानवी वृत्तीचा मांडलेला पसारा मन थक्क करणारा आहे.
‘आशावादी’ ही त्यांची कादंबरी वाजवीपेक्षा पसरट वाटते. स्वामी ब्रह्मगिरी ऊर्फ देवीदासपंत अत्रे यांच्या संसार आणि गृहस्थाश्रम, संन्यासवृत्ती आणि वैराग्यवस्था यांचे चित्रण येते. त्याबरोबर इंग्लंड, आफ्रिका, मुंबई, नागपूर, परिसरातील ब्रिटिश, आफ्रिकन आणि भारतीय जीवन, शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची उत्शंृखलता आणि अनौरस संततीच्या प्रश्नाकडे तिचे लक्ष वेधले आहे. देवीदासपंत अत्रे आणि एल्मा यांच्या विरह व मीलनाचे, तत्कालीन भारतीय राजकारणाचे त्यात चित्रण आढळते.
भिन्न सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक समस्यांना थेट भिडण्याची केतकरांची तीक्ष्ण व सूक्ष्म दृष्टी, त्यांच्यासंबंधी वाचकांची मनोभूमिका तयार करण्याची वृत्ती, देश-परदेशातील मानवी व्यवहाराची, भावनांची चित्रे काढण्यात त्यांनी दाखवलेली कल्पकता आणि द. न. गोखले व दुर्गा भागवत वगळता इतर समीक्षकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर समाजशास्त्रीय प्रबंध म्हणून मारलेल्या शिक्क्यामुळे त्यांची झालेली अवहेलना, सर्वसामान्य वाचकांची ‘मंजुघोषा-मुक्तामाला प्रवृत्ती’ची अभिरुची यामुळे वास्तवातील नानाविध प्रश्न-प्रवृत्तीचे चित्रण करण्याची कादंबरी प्रकाराची शक्यता डॉ. केतकरांच्या कादंबऱ्यांबरोबरच गोठली.
आज २०१३ साली या सातही कादंबऱ्यांचे पुनर्मुद्रण करावे असे का वाटले असावे, तर एकूण मानवी जीवनव्यवहारासंबंधात, स्त्रीपुरुषसंबंधात, मिश्रविवाहासंबंधात डॉ. केतकरांनी ७५-८० वर्षांपूर्वी दाखवलेले विलक्षण भान आजही समाजाला पथदर्शक ठरू शकेल असा वाटलेला विश्वास हेच कारण असू शकेल.
‘गोंडवनातील प्रियंवदा’, पृष्ठे – २०८, मूल्य – २१० रुपये.
‘परागंदा’, पृष्ठे – २४०, मूल्य – २४० रुपये.
‘आशावादी’, पृष्ठे – ३५२, मूल्य – ३५० रुपये.
‘ब्राह्मणकन्या’, पृष्ठे – ३०४, मूल्य – ३०० रुपये.
‘गावसासू’, पृष्ठे – १६०, मूल्य – १६० रुपये.
‘विचक्षणा’, पृष्ठे – २५६, मूल्य – २६० रुपये.
‘भटक्या’, पृष्ठे – ११२, मूल्य – ११० रुपये.
प्रकाशक – पद्मगंधा प्रकाशन, पुणे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा