जनहितयाचिकेविषयी सर्व काही..
अलीकडच्या काळात ‘जनहितयाचिकां’चा बराच बोलबोला होतो आहे. न्यायालयात दाखल झालेल्या जनहितयाचिकांच्या बातम्या वर्तमानपत्रांतून येतात. त्यामुळे काही वेळा त्यांची चर्चा होते. भारतासारख्या प्रचंड विविधता असलेल्या देशात सार्वजनिक हित आणि संरक्षणाच्या संदर्भात दाद मागण्यासाठी जनहितयाचिका हा चांगला पर्याय आहे. न्यायव्यवस्थेनं सार्वजनिक हितासाठी भारतातील कुठल्याही नागरिकाला किंवा संस्थेला उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी जनहितयाचिका दाखल करता येते. भारतीय लोकशाही प्रणालीतील न्यायव्यवस्थेतला हा अतिशय अभिनव आणि लोकशाहीकरणाला उपकारक म्हणावा असा पायंडा आहे. या पुढच्या काळात जनहितयाचिकेची उपयुक्तता वाढतच जाणार आहे. त्यामुळेच अॅड. वि. पु. शिंत्रे यांनी ‘जनहितयाचिका’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यामध्ये जनहितयाचिका म्हणजे काय, ती कोणत्या सार्वजनिक प्रश्नांसंदर्भात दाखल करता येते, कशी दाखल करावी, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं ठरवलेली मार्गदर्शक तत्त्वं, याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. याचबरोबर राज्यघटनेनं दिलेले मूलभूत हक्क-कर्तव्यं, त्याविषयीचे कायदे याविषयीही स्वतंत्र प्रकरणं आहेत. पर्यावरण, प्रदूषण, नगररचना, स्त्रिया व मुलं यांच्याशी संबंधातील प्रश्नांसंदर्भात जनहितयाचिका कशा प्रकारे दाखल करता येऊ शकते, याचीही सविस्तर माहिती दिली आहे. पण याचबरोबर जनहितयाचिका केव्हा फेटाळली जाऊ शकते, तिचा दुरुपयोग कसा प्रकारे केला जातो, याविषयीही शिंत्रे यांनी विवेचन केलं आहे. एकंदर जनहितयाचिकेविषयी सर्व प्रकारची माहिती देणारं हे उपयुक्त पुस्तक आहे. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, असं पूर्वी म्हटलं जायचं. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. शहाण्यानं कोर्टाची पायरी अवश्य चढली पाहिजे, पण ती संबंधित कायद्याची योग्य माहिती करून घेऊन. त्यासाठी हे पुस्तक फायदेशीर ठरू शकतं.
जनहितयाचिका – अॅड. वि. पु. शिंत्रे,
राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १९२,
मूल्य – २२५ रुपये.
वंगभूमीचे सांस्कृतिक शिलेदार
हा बंगालमधील साहित्य आणि चित्रपट या क्षेत्रातील काही मान्यवरांविषयाचा लेखसंग्रह आहे. या संग्रहात एकंदर १५ लेख आहेत. ते सर्व यापूर्वी कुठल्या ना कुठल्या दिवाळी अंकातून प्रकाशित झाले आहेत. असं असलं तरी सलगपणे हे लेख वाचायला मजा येते. रवींद्रनाथ-शरद्चंद्र यांच्या साहित्याची ओळख करून देणारा ‘अपूर्व बंगाल’, शरदच्चंद्र चटर्जी यांच्या ‘देवदास’ या कादंबरी आणि त्यावरील चित्रपटांविषयाचा ‘शरदबाबूंची तीन मुले’, रवीन्द्रनाथ टागोरांविषयीचा ‘रवीन्द्रनाथ’ हे तीनही लेख चांगले आहेत. पण त्यांचे दोन लेख केले असते तर ते अधिक चांगलं झालं असतं. ‘धूमकेतू’ हा काझी नझरूल इस्लाम या देशप्रेमी कवीवरचा लेख छान जमला आहे. विमलदा, सत्यजित राय यांच्याविषयीचे लेख आहेत. त्यानंतर मग ‘पथेर पाँचाली’वरचा लेख आहे. नंतर अन्नपूर्णादेवी, सुनील गंगोपाध्याय, अनिल चॅटर्जी यांच्याविषयीचे लेख आहेत. या सर्व हयात नसलेल्या व्यक्ती. यानंतर अमिताव घोष, झुम्पा लाहिरी, अपर्णा सेन आणि महाश्वेतादेवी या हयात असलेल्या व्यक्तीविषयीचे लेख आहेत. शेवटून दुसरा लेख दुर्गोत्सवाविषयी आहे. म्हणजे या पुस्तकात कुठलेही सूत्र नाही. त्याची अनुक्रमणिकाही काळजीपूर्वक केलेली नाही असं दिसतं. संपादनाचाही अभाव जाणवतो. पण हे सर्वच लेख वाचनीय आहेत, हे खरं.
अपूर्व बंगाल – नंदिनी आत्मसिद्ध,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
पृष्ठे – १९५, मूल्य – २०० रुपये