महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने ‘गांधींविषयी’ या ग्रंथाचे तीन खंड- ‘गांधी : जीवन आणि कार्य’(संपादक : किशोर बेडकिहाळ), ‘गांधी : खुर्द आणि बुद्रुक’(संपादक : रमेश ओझा), ‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ (संपादक : अशोक चौसाळकर) ‘साधना प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध होत आहेत. या खंडांतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा लेख.
मनुष्यजातीचे दुर्दैव!
महात्मा गांधी अमर स्वरूपांत विलीन झाले, त्या वेळीं मी कलकत्त्यास होतो. त्यानिमित्त मीं आपल्या मुलाला एक पत्र लिहिलें. त्यांत जें लिहिलें तें असें कीं, म. गांधींचा वधकर्ता मनुष्यजातींत जन्मास आला हें मनुष्यजातीचें फार दुर्दैव आहे. म. गांधींच्या मर्त्य शरीरावर ते हरिजन दौऱ्यावर असतांना १९३५ सालीं पुण्यास ब़ॉंबचा हल्ला झाला, पण सुदैवानें तो चुकला. त्या वेळीं मी पुण्यास होतों. ते हल्ल्यांतून सहीसलामत बाहेर पडल्याबद्दल पुणें शहरांत सभा घेण्यांत आली. त्याहि सभेंत अशाच तऱ्हेचें वाक्य बोलल्याचें मला आठवतें. गांधीजींच्या मृत्यूमुळे मला अतिशय दु:ख झालें. माझा स्वभाव दु:ख करण्याचा नाहीं. त्यांच्या मृत्यूमुळें दु:ख झालें त्याचे कारण असें कीं, माझ्या जातीच्या माणसानें त्यांचा खून केला! माझी जात याचा अर्थ ब्राह्मण जात नव्हे, तर मानवजात. मानवांत जन्म घेण्याचें भाग्य ज्याला लाभलें अशा व्यक्तीनें तो केला म्हणून मला फार दु:ख झालें. कारण गांधीजींचा जन्म मानवजातीचे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठीं झालेला होता..
मानवजातीचे मुख्य प्रश्न अद्ययावत् भौतिक शास्त्रें, शस्त्रास्त्रें म्हणजे केवळ बा साधनें सोडविण्यास असमर्थ आहेत. ते प्रश्न शस्त्रानें सुटूं शकत नाहींत. ते सोडविण्याकरितां माणसाजवळ अंत:करण व बुद्धी यांच्या प्रत्ययास आलेलीं उच्चतर मूल्यें आहेत व तीं माणसाचीं श्रेष्ठ व प्रभावी साधनें आहेत.
ह्यच विलक्षण मार्गानें गांधीजी चालले होते. तो मानव्याचा मार्ग होता. श्रेष्ठ व महान् असा मार्ग होता. मनुष्य पशू नाही. त्याला जीवनावरील व विश्वावरील अधिकार अध्यात्मामुळें म्हणजे मानसिक सामर्थ्यांमुळें प्राप्त झाला आहे.
आणखी वाचा – चतु:सूत्र : गांधीजींच्या जनआंदोलनांमागील भूमिका
नैतिक नियमांचा साक्षात्कार
संस्कृतीचा इतिहास हा मनुष्याच्या मानसिक सामर्थ्यांचा विकास आहे असें दिसून येतें. माझी कांही वर्षांपूर्वी अशी समजूत होती कीं गांधीजी श्रद्धावादी आहेत. श्रद्धावाद हा बुद्धिवादापेक्षां कमी दर्जाचा आहे. बुद्धि ही कांहीही झालें तरी श्रेष्ठ आहे. हे खरें असलें तरी बुद्धिवादाचें आरंभस्थान कुठें आहे, हा प्रश्न ज्ञानशास्त्रांत उत्पन्न होतो. बुद्धि तरी कुठून येते? श्रद्धा हें बुद्धीचें फळ आहे. श्रद्धा म्हणजे ज्ञात सत्याविषयीं जिव्हाळा. बोधाचा उगम अनुभवांतून होतो. अनुभव हा सर्व ज्ञानाचा पाया आहे. अनुभवांतून शास्त्र निर्माण होतें. ज्याचें शास्त्र अनुभूतींतून अवतीर्ण होतें तेंच शास्त्र सच्छास्त्र ठरतें. ज्यांचा अनुभव दांडगा त्यांची बुद्धिश्रेष्ठ. फ्रेंच तत्त्ववेत्ता बर्गसाँ याचें तत्त्वज्ञान अनुभूतीच्या पायावर रचलेलें आहे. तो बुद्धीस गौण स्थान देतो. बुद्धीस सत्य गम्य नाहीं, तिच्या पलीकडे स्फूर्तिमय प्रज्ञा सत्याला आकळून ठेवते असा त्याचा सिद्धान्त आहे. पण स्फूर्तिमय प्रज्ञा आणि तर्कात्मक बुद्धि ही एकमेकांची पूरक आहेत. या दोन्ही मानसिक अवस्था एकमेकांच्या संगतीने कार्य करतात.
बेथोवेन हा जर्मन संगीतज्ञ होऊन गेला. संगीताचा आस्वाद तर सर्वच घेतात. पण त्याला नादाची सूक्ष्म संवित्ति येत होती. त्याला उच्चतर नादाचा साक्षात्कार होत होता. प्रज्ञा, साक्षात्कार किंवा अनुभूति ही एक श्रेष्ठ शक्ति आहे. ही एक विलक्षण गोष्ट आहे. अलौकिक बुद्धिमत्ता व अप्रतिम कर्तृत्व यांचे रहस्य या विलक्षण शक्तीमध्यें भरून राहिले आहे. ज्यांना ती प्राप्त होत नाही त्यांचे क्षेत्र मर्यादित आहे असे समजावें. हा साक्षात्कार जगद्विजयी धुरंधर सेनापतींना होत असतो. नेपोलियन लढाईच्या अगोदर पंडितांशी सल्लामसलत करी व कांहीं निश्चित असे बेत ठरवीत असे. पण एकदा रणांगणांवर तो उतरला की पूर्वी केलेले आपले बेत तो बदलूनही टाकी. त्यामुळे विजयश्री त्याला वश होई. हीच गोष्ट महान् कलाकार, तत्त्ववेत्ते, कवि, विज्ञानवेत्ते यांनाही लागू पडते. साक्षात्कार किंवा प्रतीती (Intuition) हिचें स्वरूप कांही व्यक्तींच्या ठायीं अत्यंत विलक्षण असतें. गांधींना धर्माच्या द्वारा मानवी जीवनांतील नैतिक नियमांची प्रतीती आली होती. धर्मसंस्थेनें माणसाचा नैतिक प्रत्यय तेजस्वी ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आजही कांहीं थोर विज्ञानसंशोधक धर्माची कास धरण्याचा पाश्चात्य देशांत प्रयत्न करीत आहेत.
आणखी वाचा – लोकरंग विशेष : गांधी एक अपरिहार्य रहस्य
महान वादळी देवाचें जीवन
म. गांधींच्या चळवळी व लढाया आपण डोळय़ांनी पाहिल्या आहेत. आपण त्या दृष्टीनें अत्यंत भाग्यवान आहोंत. त्यांच्या जीवनाचा अर्थ कित्येक मोठमोठय़ा बुद्धिमान् पंडितांना कळला नाहीं. ‘बुद्धिमत्तां वरिष्ठ’ लो. टिळक गांधींना एकदा म्हणाले, ‘‘तुमच्या सत्याग्रहाला हजार माणसें लागतात तीं द्यायचीं कशीं? जिथें लोकच तयार नाहींत तिथें हें शक्यच कसें होईल’’. बोटानें करावयाच्या गणनेवर व हिशेबावर अवलंबून राहणाऱ्यांना कल्पनांच्या सामर्थ्यांचा प्रभाव प्रतीत होत नाहीं. शौर्याचा उगम हिशेबांत नसतो. त्याला स्फूर्ति, प्रतीती लागते. गांधींचा प्रत्यय अतिशय अद्भुत होता. वादळाच्या पूर्वी झाडाचें एक पान देखील हलत नाहीं. पण थोडय़ाच वेळांत झो झो वाहणारा प्रचंड झंझावात महावृक्ष देखील उन्मळून टाकतो; पर्वतांचा विश्वास डळमळतो. अशीच गोष्ट गांधींच्या बुद्धीची होती. त्यांचा प्रत्यय फार मोठा होता. तो महान प्रत्यय पंडितांच्या प्रज्ञेला देखील कित्येकदां मागें टाकतो. १९२० सालीं ‘‘एक वर्षांत स्वराज्य मिळवून देतो.’’ ही घोषणा गांधींनी केली. कित्येक हंसले. बुद्धिमानांना वाटलें स्वराज्य इतक्या लौकर कसें मिळूं शकेल! ‘‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळालें?’’ असें या बुद्धिमानांचा घोष होता. हिंदूस्थानला खरोखर एका वर्षांतच स्वराज्य मिळाले असे म्हटले पाहिजे. राष्ट्रांच्या आयुष्यांत २५ वर्षे एका वर्षांपेक्षा लहान होत. आपण पाहिलेंच आहे की १९२०, ३० सालीं देश खडबडून उठला. बुद्धिमंतांना ह्यची कांहीं कल्पनाच नव्हती. असेंच गांधीजींचें सारें जीवन होते. त्यांचे जीवन म्हणजे महान् वादळी देवाचें जीवन होय.
आजपर्यंत गांधींसारख्या ज्या महान् व्यक्ती होऊन गेल्या मग त्या आस्तिक असोत किंवा नास्तिक असोत- या मानव्याच्या गाभ्याजवळ जाऊन पोंचल्या. कार्ल मार्क्स हा मूलत: मानवतावादी होता. तो मनुष्यव्यापी ध्येयवादी होता. कार्ल मार्क्सच्या विचारांनीं अनेक माणसें अतुल स्वार्थत्यागाला प्रवृत्त झाली आहेत, क्रांतीच्या अग्नीत भस्मसात् झाली आहेत. ही प्रेरणा मार्क्सच्या अर्थवादांतून निर्माण होऊं शकत नाही. तिचा उगम नीतिशास्त्रांत आहे. ‘कॅपिटल’ हा ग्रंथ फार थोडय़ा लोकांस समजतो. कम्युनिस्ट पक्षामध्येही जगांत तो ग्रंथ अध्ययन करून समजलेले हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत, असें मी नम्रपणे म्हणतों. मार्क्सने जग इतक्या मोठय़ा प्रमाणांत कां भारून टाकलें? त्याच्या शास्त्रज्ञानाने ही किमया घडवलेली नाही, तर मानवी दास्याला अंत:करणाचा स्फूर्तिदायी संदेश, आश्वासन, भविष्यकालीन आशा मार्क्सने दाखविली म्हणून हे जागतिक उत्पात घडून आले. असा ध्येयवाद हा नैतिक असतो. कारण तो सर्व मानवांना व्यापून राहतो. मनुष्य हा मूलत: नीतिमान आहे व व्यापकता हा नीतीचा स्वभावधर्म आहे. बुद्धीचे तत्त्व हेही व्यापक असते. विशेषाकडून सामान्याकडे हे बुद्धीचे कार्य आहे. व्यापकतेची पूर्णता म्हणजेच ब्रह्मरूपता. हेच जीवनाचें अबाधित तत्त्व आहे. नीती व सत्य हा मानवी जीवनाचा आधार आहे. नीती ही मातेंत प्रथम प्रकट होते. म्हणून गांधीजींनी स्त्रियांना अधिक मानले. मनुष्यप्राण्याच्या जन्माबरोबर जगांत धर्मशास्त्र देखील जन्मास आलें. नीतीचे नियम तोडले तर त्याचे परिणाम मानवांना भोगावे लागतात. Inductive Logic पासून खरे ज्ञान निर्माण होते. कारण Induction ची सुरुवात साक्षात्कारापासून होते. विशेषाकडून सामान्याकडे जाणें ही गोष्ट तेव्हांच शक्य आहे. सृष्टि-नियम मानवी जीवनाच्या कक्षेत नीतीच्या रूपानें प्रकट होतात. सृष्टिनियमाचें पालन मानवाला करावेंच लागतें.
आणखी वाचा – पडद्यावरचा न नायक!
प्रेम हा जीवनाचा मध्यबिंदू
गांधी हिंदूस्थानांत जरी जन्माला आले होते तरी निव्वळ हिंदूस्थानी नव्हते. ‘मी इंग्रजांचा मित्र आहे’ असें गांधी म्हणत तें पूर्ण सत्य आहे. हे सत्य न ओळखता इंग्रजद्वेषाने प्रेरित होऊन लोक गांधीजींचे अनुयायी बनले. त्या द्वेषाचा विषय नाहीसा झाल्यामुळें आज कर्तव्यतत्परता मूळ धरीत नाही. द्वेषाच्या जागी प्रेमानें स्थान मिळविलें पाहिजे. प्रीति शुद्ध व अगाध बनली पाहिजे. द्वेषाने होणारे पराक्रम हे मनुष्याला प्रगत करीत नाहीत. प्रेमाने होणारे पराक्रम मनुष्यजातीची अचल, अविनाशी सोपानपरंपरा निर्माण करतात. अशी सोपानपरंपरा निर्माण करणाऱ्यांमध्ये महात्मा गांधी विराजमान होतात. म्हणून त्यांच्या मृत्यूमुळें आपलें अपरिमित नुकसान झालें असें जगाला वाटले.
इंग्लंडमधील थोर प्रज्ञावंत शास्त्रज्ञ व्हाइटहेड ह्यंनीं ‘Adventures of Idea’ नामक पुस्तकांत गांधींच्या हृदयपरिवर्तनाच्या चळवळीचा अत्यंत आदराने उल्लेख केला असून हा मानवी इतिहासातील एक महान प्रयोग आहे म्हणून त्यांनी या चळवळीचा गौरव केला आहे. लोकांच्या विचारांत मौलिक परिवर्तन घडविणे हे एक महान तत्त्व आहे व त्या तत्त्वानुसार लोकशाही राज्य निर्माण होते. त्यांत मानवी पराक्रम आहे. ह्य पराक्रमाची स्फूर्ती गांधींना लाभली.
डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले, ‘‘गांधींच्या हत्येला आपले पाप कारणीभूत झालें.’’ हे खरे आहे. गांधी निव्वळ राजकारणी नव्हते तर प्रामुख्याने साधुपुरुष होते. जरी त्यांच्या शरीराचा नाश कोणी केला, तरी म. गांधी शरीरानेच नव्हे तर आत्म्यानेंहि निघून गेले. गांधीजींच्या मृत्यूपूर्वी आपला देश द्वेषाच्या पापानें बुडालेला होता, या देशांत त्यांना राहावयास जागा नव्हती. प्राणदेवाचे ते उपासक होते. प्राण ही सर्वात महान एकच एक देवता आहे असें उपनिषदांत याज्ञवल्क्य म्हणतो. त्या प्राणदेवतेच्या मंदिरांत म्हणजे मानव-समाजांत व विशेषत: हिंदूस्थानांत त्या देवतेचे विरोधी पातक आपला प्रभाव गाजवू लागले. त्यामुळे हा प्राणदेवतेचा भक्त देवतेच्या पावित्र्याकरितां लढत लढत ह्य जगांतून निघून गेला. पण तो शरीरानेच निघून गेला नाही तर, त्याच्या आत्म्यासह, नैतिक स्फूर्तीसह निघून गेला आहे.
गांधीजी म्हणतात, ‘नीतीला अपवाद जरी असला तरी तो दोष आहे!’ ‘जशास तसें’ हे अपथ्यकर तत्त्व आहे. ‘द्वेष करणाऱ्यांशी प्रेमाने वागा’ असें गांधी म्हणत. प्रेम हा जीवनाचा मध्यबिन्दू आहे. त्यांतच मानवी पराक्रम आहे. जे लोक, जे धर्म, ज्या संस्कृती या मार्गावरून दूर गेल्या, त्यांचा मागमूसही सांपडत नाही. त्या नेहमींकरितांच नष्ट झालेल्या आढळून येतात. गांधींचे तंत्र व मंत्र यांचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. लोक निव्वळ तंत्राला चिकटून बसतात व मंत्राला सोडून देतात. राग, द्वेष, मत्सर इत्यादी विकारांविरुद्ध जे लढतात ते खरे पराक्रमी आहेत. या सर्व शौर्याचा महामेरू महात्मा गांधीजी होते. त्यांना सत्य दिसत होते व त्यामुळे ते सारखे त्याच्या पाठीमागे पुढे पुढे जात होते. ते थकले नाहीत. सत्याचा शोधक थकत नसतो. शास्त्रांचा व कलांचा विजयी इतिहास न थकणाऱ्या सत्यशोधकांनी बनविला आहे.
महात्मा गांधी यांची गणना पंडित व बुद्धिवादी यांच्यात कोणी करूं नये. बुद्धी व पांडित्य यांचा पाया अनुभव (Intuition) होय. गांधीजी अनुभवसागर होते. माणसाला द्वेषापासून जी स्फूर्ती मिळते ती त्याला मृत्यूकडे नेते, अमरत्वाकडे नव्हे. पक्ष, संघ, दलें द्वेषाच्या प्रेरणेने वाढतांना दिसतात परंतु ती अखेर मृत्यूला आिलगन देतात. प्रेमापासून मिळणारी प्रेरणा हीच सत्यप्रेरणा होय. या प्रेरणेप्रमाणे आचरण न करणाऱ्या संस्कृतींचीं कबरस्थानें आज दिसत आहेत. द्वेषाच्या महतीनें आपल्या संस्कृतीचीही तीच गती होईल.
गांधीजी या देशांतून निर्वासित झाले आहेत. त्यांना श्वास करण्यास येथें जागा नाही. ख्रिस्ताचा तिसऱ्या दिवशी पुनर्जन्म झाला असें ऐकतो.
म. गांधींचें असें पुनरुत्थान होण्यास अनुकूल परिस्थिती उत्पन्न होईल का? त्यांच्या दिव्य स्फूर्तीचा अर्थ समजून घ्या. मृत्यु हें अमरत्वाचें झांकण आहे, त्यांच्या आत्म्यास मी अभिवादन करतों!
नवभारत – ४ जानेवारी १९४९ (शुद्धलेखन मूळ उताऱ्याप्रमाणे)