19उमर खय्यामवरील ‘श्रीगुरुकरुणामृत’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उ मर खय्याम यांचा परिचय बहुतेकांना झाडाखाली अरबी वेशातला दाढीवाला कवी, शेजारी सुरा आणि सुंदरी या चित्राद्वारे झालेला असतो. ते रुबाया लिहीत असत. अनेक गजलप्रेमींना कदाचित रुबाया गजल वृत्तातून ऐकल्याचे स्मरत असेल. पण त्यांच्या रुबायांचा भावानुभव ‘श्रीगुरुकरुणामृत’ या नावे प्रसिद्ध झाल्याचे वाचून वाचकांची उत्सुकता निश्चितच चाळवेल. उमर खय्यामचे सारे आयुष्यच कोडय़ात टाकणारे आहे. हे पुस्तकही त्याला अपवाद कसे असेल?
व्यंकटेश माधव दातार यांनी पुस्तकाची जन्मकथा अशी सांगितली आहे की, ‘गुरुमाऊली ब्रह्मानंद मायींनी १९१६ डिसेंबरमध्ये एका उत्सवात उमर खय्यामच्या रुबायांचा मराठीत अनुवाद करून त्यातील तत्त्वज्ञान हे हिंदू तत्त्वज्ञानाशी समान आहे हे स्पष्ट करण्याची आज्ञा दिली. त्यानुसार दातार यांनी हा ग्रंथ रचला. म्हणून त्याचे नाव ‘गुरुकरुणामृत.’ आता उमर खय्यामचा अनुवाद करायचा म्हणजे फारसीचे ज्ञान हवे. दातार १९ ही भाषा विद्वान पर्शियन गुरूंकडून शिकले होते. पांगरिकरांच्या ‘मुमुक्षु’ मासिकात यातील दोन लेख प्रसिद्ध झाले होते.
उमर खय्यामसंबंधी एकंदरच लोकांना कमी माहिती असण्याची शक्यता गृहीत धरून प्रारंभी  खय्यामचे चरित्र थोडक्यात दिले आहे- ‘उमर खय्यामच्या वडिलांच्या नावाविषयी मतभेद आहेत. खय्याम यांचा जन्म इ. स. १०१८-१०२३ च्या दरम्यान झाला. आपल्या अध्ययनकाळात उमर खय्याम आध्यात्मिक, धार्मिक, नैतिक विद्यांत पारंगत झाले. विद्याव्यासंग व परमार्थ चिंतन यात तदाकार झालेल्या उमरला संसार मांडायला सवड झाली नाही. शंभराहून अधिक वर्षे आयुष्य लाभलेल्या उमर यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. त्यांचा आवाका बघून थक्क व्हायला होते. त्यांचे ग्रंथ- सुभाशित (रुबाया), बीजगणित (अरबीत. फ्रेंच अनुवाद १८५१ मध्ये झाला.) भूमितीमधील सिद्धान्त व सोडवणूक, पदार्थविज्ञानशास्त्र (अरबी भाषेत) जीवाचे अस्तित्व (पर्शियन भाषेत), वातावरणातील भेद व त्याची कारणे. स्थूलार्थाने त्यांचे विचार सुफी पंथाशी मिळतेजुळते होते.
दातार यांनी उमर खय्यामच्या वैचारिक विश्वाची ओळख करून देण्याअगोदर मुस्लिमांमधील चार पंथांतले भेद स्पष्ट केले आहेत. तसेच चार विचारसरणी, तत्त्वज्ञान यांची ओळख करून दिली आहे.
खय्यामच्या पुस्तकांतून त्यांचे विचार तर त्यांनी उद्धृत केले आहेतच; शिवाय खय्यामच्या रुबायांची संख्या किती, याबाबत संशोधकांचे दावे, त्यांचे झालेले विविध अनुवाद यांचा आढावा घेतला आहे. त्यात ते सांगतात, ‘उमर खय्यामच्या कवितांच्या विवेचनावर ९८ ग्रंथ, ३४ नाटके/ प्रहसने, खय्याम क्लबने प्रसिद्ध केलेले सहा ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वर्षे नियतकालिकांतून उमरच्या काव्यावर चर्चा चालू आहे.’ (ही गणती ८२ वर्षांपूर्वीची आहे.) ही प्राथमिक माहिती दिल्यानंतर ‘उमर खय्यामची परिभाषा व अर्थपद्धती’ असे एक प्रकरण आहे. त्यात ते म्हणतात, ‘ज्या मुसलमानांत सुफी मताचा प्रसार झाला व फारसी कविता ज्यांच्या अंगवळणी पडली आहे त्यांनी मदिरेचा अर्थ भक्ती असा घेतला, तर उलटपक्षी विपरित अर्थ घेण्याचा इतरांना काय अधिकार? मद्य शब्द अध्यात्म अर्थानेच संस्कृतीतही वापरलेला आहे. ’
मराठीत उमर खय्यामच्या ५२४ रुबायांचा अनुवाद माधव ज्युलिअन यांनी केला आहे. ज्युलिअन यांनी रुबायांचे जे वर्गीकरण केले आहे त्यापेक्षा वेगळे वर्गीकरण दातार करतात व त्यातील अर्थाची भिन्न प्रकृती व्यवस्थित मांडतात. ज्युलिअन यांच्या अनुवादासंबंधी ते लिहितात- ‘वास्तविक पटवर्धनसाहेबांचे भाषांतर मनोरंजक, अभिनव व छान वठले आहे. त्यांचे परिश्रमही फार आहेत. हे उघड आहे, की उमरच्या कवितांत शब्दांहून हेत्वार्थ भिन्न असतो. तो लक्षात न घेता शब्दश: अर्थ केला तर विडंबन होण्याचा संभव असतो.’ पुढे ते रुबायांची वैशिष्टय़े सांगतात- ‘रुबाईची भाषा सुलभ व सरळ, अन्वयाची आवश्यकता नसलेली अशी, ज्ञानेश्वरीसारखी गद्यात बोलल्याप्रमाणे आहे. दृष्टान्त पद्धती गणित, ज्योतिष, पदार्थविज्ञान शाखांची आहे. उदा. ‘उद्याची घडी आज नाही जमेला, नये आयु बाकीत काढावयाला.’ कर्मानंतर भोग व भोगाकरता भोग-साधन देह व देहापासून कर्म हे रहाटगाडगे सतत फिरत आहे. त्यासंबंधी उमर म्हणतो-
विसाव्याशी कोठेही जागाचि नाही।
नसे अंत या वासनासाधनाही
किती योनिच्या भोगिल्या यातनाही!
दिसेना सुखाची परी कल्पनाही
उमर खय्यामच्या काही रुबायांचे अनुवाद उद्धृत करून लेख संपवतो-
‘असे जो कुणी जाणता राजपंथी।
गणी सर्व जीवा-शिवाच्या विभूती॥
महाकाल माझे वयाचा क्षणार्ध।
असे विश्व या लोचनी क्षणार्थ
असे नर्क चिंता चितेचे तृणार्ध।
महास्वर्ग माझे सुखाचा कणार्ध॥
क्रमी पंथ ऐसा नुरे जेथ द्वैत तेही क्रमानेच जात॥
न होसी हरी तू परी साध हेत।
तुझा तूपणा सर्व जावा लयात॥’
‘श्रीगुरुकरुणामृत’ (उमर खय्यामच्या रुबायांचा भावार्थ), व्यंकटेश माधव दातार, प्रकाशन- १९३३. मूल्य- दोन रुपये आठ आणे. ल्ल
vazemukund@yahoo.com

लंडन-पॅरिसचा सुखद ‘सैर’अनुभव
का ळ कितीही बदलला तरी परदेशी पर्यटनस्थळांच्या यादीत युरोपमधील लंडन आणि पॅरिस ही दोन शहरे नेहमीच अग्रस्थानी राहिली आहेत. या शहरांना भेट देणे जितके आनंददायी, तितकेच त्याविषयी वाचणेही सुखावणारे असते. विलास काबाडी यांचे ‘लंडन-पॅरिस’ हे नवे पुस्तक या शहरांची वाचकांना छान सैर घडवून आणते. हे ठोकळेबाज पठडीतले प्रवासवर्णन नाही. एका संवेदनशील मनाच्या व्यक्तीने परदेशभेटीत आलेले अनुभव सहज गप्पांमधून उलगडून सांगावेत तशी या पुस्तकाची रचना आहे. पानोपानी विखुरलेल्या नेत्रसुखद छायाचित्रांमुळे या सफरीची रंगत वाढली आहे. यात लंडनमधील राणीचा राजवाडा, लंडन पोलीस, हाईड पार्क या सर्वपरिचित स्थळांबरोबरच साऊथ हॉल या पंजाबी, तर व्हेम्बर्ली या गुजराती लोकांच्या वसाहतीची ओळखही लेखक करून देतो. पॅरिसविषयी असेच अनेक नवे तपशील पुस्तकात आढळून येतात.
‘लंडन-पॅरिस’- विलास काबाडी, मायबोली प्रकाशन, पृष्ठे- १०३, किंमत- ७२ रुपये. ल्ल

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Books that we forgotten