सुप्रसिद्ध गानविद पं. सत्यशील देशपांडे यांचे ‘गान गुणगान’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. संगीतातील घराणी अन् त्यांची वैशिष्टय़ं, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे. पुस्तकात दिलेले ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून वाचक विविधरंगी मैफिलींचा सुश्राव्य आस्वाद घेऊ  शकतात. या पुस्तकातील संक्षिप्त भाग..

गणपतराव देवासकर हे एक अफलातून, जगावेगळं आणि सव्यसाची व्यक्तिमत्त्व होतं. राजस्थानातल्या भीषण दुष्काळानं पोळून माळव्यात आलेल्या बंजारा समाजातल्या कोणी या मुलाला चार-सहा खंडी गव्हासाठी विकलं आणि रतजब अलींनी त्यांना सांभाळलं, अशी त्यांची कुळकथा देवासमध्ये प्रचलित होती. मला ही गोष्ट कुमारजींनीच सांगितली होती.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Nath Purandare New York Film Academy Film Hollywood Entertainment News
नाथची हॉलीवूडमध्ये धडपड
Marathi Book Ek hoti Maya Anant Sonawane Renuka Publications entertainment news
माया वाघिणीची रसभरित कहाणी
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल

देवासच्या राजघराण्यातील राजपुत्रांना इंग्रजी शिकवण्यासाठी ‘The Hill of Devil ही गाजलेली कादंबरी लिहिणाऱ्या इ. एम. फॉर्स्टर या प्रख्यात लेखकाची नियुक्ती झाली होती. ही Hill of Devi म्हणजे देवासचीच टेकडी. या लेखकाच्या सहवासा-संस्कारामुळं गणपतराव chaste English बोलायचे. ते उंच, गोरेपान आणि देखणे होते. त्यांनी मानापमान नाटकात धैर्यधराची भूमिकाही केली होती.

गणपतराव देवासच्या रतजब अलींच्या तालमीत तयार झाले. ते ‘तनयत’ म्हणून ओळखले जात. तनयत म्हणजे केवळ तानक्रियेला वाहून घेऊन त्यात नैपुण्य मिळवणारा विशेषज्ञ. डॉक्टर लोकांत जसे (colonel and genral) असतात, तसे पूर्वी गवयांतही असत. ख्यालाच्या समग्रतेचं भान, स्वरतालाचा सुवर्णमध्य साधून त्याच्या तीव्रीकरणाचं तारतम्य वगैरे गोष्टींचा संसर्ग गाण्याला न झाल्यानं संगीतविषयक विचार व भाषा निरोगी असायची.

तनयत आपल्या तानक्रियेनं रागातली धून फुलवी. उदाहरणार्थ, दिल्ली घराण्याचे तानरसखाँ. यांच्या तानेतही रस असल्यामुळं त्यांना हे नाव पडलं. आलिया-फकूही पंजाबातली जोडगोळी बंदुकीच्या फैरी झाडल्यासारख्या ताना मारे, म्हणून त्यांना नावं पडली होती कर्नेल व जर्नेल (colonel and genral)!

केवळ ‘आलापीये’ म्हणून नावारूपाला आलेले भास्करबुवा बखल्यांचे गुरू फैझ महम्मद खाँ व अमीरखाँ ज्यांना आदर्श मानत ते बेहेरे वहीद खाँ (म्हणजे हिराबाईंचे गुरू) ही दोघं केवळ आलापीतून रागाचा परीघ वाढवत. आपल्या गाण्यात ते एवढंच करायचे. तेच त्यांचं गाणं होतं.

भास्करबुवांचे दुसरे गुरू आणि आग्रेवाल्या विलायत हुसेनचे वडील नत्थन खाँ केवळ बोलतानेतून राग मुखर करायचे. आमचे जगन्नाथबुवा पुरोहित वारंवार बंदिश म्हणून त्या बंदिशींची वेळोवेळी कहन ऐकवून सभा जिंकून घ्यायचे. त्यांना गाणं वाढवण्यासाठी दुसरं काही करावंच लागत नसे.

त्या त्या गवयांच्या त्या त्या खासियती ऐकायला रसिक जायचे व त्या ऐकून ते कृतार्थ व्हायचे. अमीरखाँ हा एकमात्र गवैया जो आलापीयाही होता व तनयतही.

हा असा काळ होता की, ख्यालातल्या बढतीचं केवळ एक अंग घेऊन त्यातल्या सौंदर्यविचाराची आयुष्यभर जोपासना करणारे व त्यानुसार गळा तयार करणारे गायक होते. त्यानंतर असा जमाना आला की, गायक ख्यालातली बढतीची सगळी अंगं एकानंतर एक, क्रमवार गाऊ लागले. कशासाठी, तर म्हणे ख्यालाच्या समग्रतेसाठी. हे असं करण्यात झालं ते एवढंच की, बऱ्याचशा गायकांकडून कुठल्याच अंगाला पूर्ण कलात्मक न्याय मिळेनासा झाला. ख्याल गाताना, ही ‘अंगं’ पुतळ्यासारखी रांगेत उभी राहू लागली. ना त्या अंगांच्या पायाभूत खोलीचा (डेप्थ) विचार झाला, ना त्यातून गायकांनी प्रतिभेच्या भराऱ्या मारणारी उपज साधली. एवढंच नाही तर मैफलीच्या समग्रतेसाठी म्हणून गायक ख्यालानंतर तराणे, ठुमरी व नाटय़पदांचीही रांग आपल्या गाण्यात लावू लागले. एक ना धड, भाराभर चिंध्या.

दिलीपचंद्र बेदी माझ्याकडं भास्करबुवा बखल्यांच्या ख्यालगायनाचं वर्णन करताना सांगत होते की, त्यांची ख्यालाची बंदिश ऐकताच लक्षात येई की, त्यांनी त्या बंदिशीचा किती खोलात जाऊन विचार केला आहे. मग त्यांची आलापी सुरू होताच वाटे की, हा गवई आलापीया आहे व यानं आपला गळा आलापीकरताच तयार केला आहे. हीच गोष्ट बोलताना आणि तान ऐकताना प्रत्ययास येई.

प्रख्यात ठुमरी गायिका सुंदराबाईंची गोष्ट आहे. भास्करबुवा बखल्यांच्या गाण्यानं प्रभावित झालेल्या बाईंनी त्यांना गाणं शिकवण्याची विनंती केली. बुवांनी ती अव्हेरली. सुंदराबाईंनी कारण विचारता बुवा म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यासारखं गाऊ लागलात तर मग मी कुणाची ठुमरी ऐकायची?’’

गणपतरावांचं गाणं क्वचितच ऐकायला मिळे. न ऐकावयास मिळणारा दुर्मीळ गवैया म्हणूनच त्यांची जास्त ख्याती होती.

एकदा आपल्या वरळीच्या हमरस्त्यावरच्या सदनिकेच्या सौधात उभ्या असलेल्या पु. ल. देशपांडय़ांनी रस्त्यावरून जात असलेल्या गणपतरावांना हेरलं. खाली जाऊन त्यांना आग्रहपूर्वक वर बोलावलं. त्यांची खूप तारीफ केली, भरपूर आदरातिथ्य केलं व अजिजीनं हाथ जोडून काही तरी ऐकवण्याची विनंती केली. त्यावर गणपतराव आपल्या ‘‘Mr. Deshpande, you are a playwright, aren’t you?’’ पु. लं. ‘हो हो’ म्हणाले. त्यांनी पुढचा प्रश्न केला, ‘‘Would you ever put the hero’s hand on the heroine’s shoulder in the first sequence of the first act of a play?’’ नाही ना? तुम्ही हिरोला हिरोईनची मनधरणी करायला लावाल ना? तद्वत तुम्ही मला काही काळ मनवा. माझी मनधरणी करा. म्हणजे तुम्हाला माझं गाणं ऐकायला मिळेल.’’

‘तनयत’

गणपतरावांच्या मी ऐकलेल्या एका मैफलीची गोष्ट सांगतो. शिवाजी पार्कच्या बालाजी जोशींकडं ही मैफल झाली. सुरुवातीला जमा झालेल्या दहा- बारा श्रोत्यांमध्ये प्रमुख मी व मुकुल शिवपुत्रच होतो. गणपतरावांनी केदार राग गायला सुरुवात केली. दहा एक मिनिटांतच अस्थायी, अंतरा, आलापी वगैरे सर्व उरकून त्यांनी तानेला सुरुवात केली. त्या तानक्रियेत ते रमून गेले. काही वेळानं हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते आणि किशोरीताई ही त्रयी आली. त्यांनी तानक्रियेला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली. थोडय़ाच वेळात पु. ल. आणि वसंतराव देशपांडे ही जोडगोळी मैफलीत अवतरली, आता त्यांनाही पहिल्यापासून तानक्रिया ऐकवणं क्रमप्राप्तच होतं. गणपतरावांनी तेच केलं.

जरी वयोमानापरत्वेत्या तानेची गती व तेज कमी झालं असलं, तरी त्या जातीची पेचदार तान काही प्रमाणात अमीरखाँचा अपवाद वगळता मी कुणाचीही ऐकलेली नाही. त्यांच्या तानेचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना तान घेण्यासाठी क्रिकेटमधले बॉलर जसा ‘स्टार्ट’ घेतात, तो घ्यावा लागत नसे. अन्य गायकांना असा स्टार्ट घ्यावा लागतो; त्यामुळं आता हे तान घेणार, हे लक्षात येऊन त्यातलं अनपेक्षित, आश्चर्य, surprise element  नष्ट होत असतं. गणपतराव गाताना ज्या सुरावर मुक्कामाला असत, तिथूनच स्टार्ट न घेता ते फास्ट गुगली टाकायचे व ऐकणाऱ्याला गारद करायचे. तानेचा हा गुणधर्म वसंतराव देशपांडे आणि कुमारजींमधेही आढळून येतो. मानवी कंठातून अशी तान निघू शकते, हे एक जगातलंआठवं आश्चर्य मानायला हवं.

असे हे गणपतराव त्यांच्या वृद्धावस्थेत आमच्या घरी वामनरावांना भेटायला यायचे ते पाच-पन्नास रुपये मागण्यासाठी आणि तान न ऐकवण्यासाठीच. ते बराच काळ आचार्य अत्र्यांच्या गॅरेजमध्ये आणि नंतर मार्वे या मुंबईच्या सुदूर उपनगरातल्या झोपडपट्टीत आपल्या ‘लल्लू’ या वयस्क मुलाबरोबर राहायचे. लल्लू थोडंफार शिंपीकाम करून मुर्गीचा मसाला विकत घेण्याइतपत कमवायचे. गणपतरावांनी या चिरंजीवांनाही ‘तनयत’ करून तो भुकेकंगाल राहील याची तजवीज करून ठेवली होती. जमेल त्या रात्री ते स्वत:च गोश्त पकवून खायचे, अन्यथा उपाशी. दिवसा मिळेल तसा आणि तेवढय़ा चहापावावर गुजराण करत. ‘बगैर गोश्त खाये तान के लिये जरुरी ताकत नहीं मिलती’ असं एकदा ते मला सांगत होते. उंच शिडशिडीत गणपतराव कायम एकाच वुलनच्या ढगळ शेरवानीत आणि पायघोळ पायजम्यात असायचे. ती शेरवानी ढगळ असण्याचं कारण ती मुळात महाकाय आचार्य अत्र्यांनी स्वत:साठी शिवलेली व त्यांना दान केलेली होती. एकदा आमच्या घरी मुंबईच्या मे महिन्यातल्या भरदुपारच्या उकाडय़ात त्या शेरवानीतल्या घामाघूम होऊन बसलेल्या गणपतरावांना पाहणं आम्हाला अशक्य व असहनीय झालं. शेवटी वामनरावांनी दरडावून त्यांना ती शेरवानी काढण्यास भाग पाडलं. आत अंगावर केवळ एक जीर्ण पिवळट बनियन होतं.

कुणी शिकण्यासाठी आलं की, ‘मेरी तरह के तान लेनेके चक्कर में पड जाओगे, तो गले की ऐसी की तैसी हो जाएगी’ अशी धमकी द्यायचे. आणि खरोखरच दोन-चार लोकांचे गळे बिघडल्याचं मी ऐकलं होतं. सुरेश हळदणकर आणि नलिनी मुळगावकर या त्यांच्या शिष्यद्वयींनी त्यांना पुष्कळ सांभाळलं. सुरेश हळदणकर या अप्रतिम व आवाजदार गायकाचा गळा शेवटी बिघडला, त्याला गणपतराव कारणीभूत असतीलही कदाचित, कोण जाणे?

देवधर स्कूलमध्ये ते कधी भेटले की, मी त्यांना जवळपासच्या हॉटेलात नेऊन चहापाणी करवत असे. कधी माझ्याबरोबर राम कोल्हटकरही असावेत. मी त्यांची खूप तारीफ करत असे, पण कैकदा विनवण्या करूनदेखील मला त्यांनी काहीही शिकवलं, सांगितलं नाही. पण मी त्यांची जी खातिरदारी केली, त्याचा अभावित आणि अनपेक्षित लाभ मला माझ्या पहिल्या युरोप टूरमध्ये झाला.

१९७०च्या दशकात मी अ‍ॅमस्टरडॅमला महिनाभर राहून लंडनला जाणार होतो. इंदौरच्या चंदू नाफडेनं त्याच्या एका मित्राच्या आईला देण्यासाठी म्हणून एक भलंथोरलं, पण वजनानं हलकं पार्सल माझ्यासोबत दिलं होतं. त्याच्या या वृद्ध आई दर चार-सहा दिवसांनी मला फोन करून विचारत, ‘‘मेरा पार्सल लेकर लंडन कब आ रहे हो?’’ मी गायक आहे, हे त्यांना कळून आलं होतं. त्यांच्याकडं फोनवर बोलायला पुष्कळ वेळ असायचा. कुठल्यातरी संगीतविषयक शंका विचारून त्या फोनवरूनच त्यांचं निरसन करू बघायच्या. ती एक एकटी अन् एकाकी संगीतप्रेमी व्यक्ती आहे, हे तोवर माझ्या ध्यानात आलं होतं. बोलता बोलता इंदौर, देवासच्या गोष्टी व देवासकरांचा विषय निघाला. या बाईंचे व देवासकरांचे संबंध देवासकरांच्या तानेइतकेच गुंतागुंतीचे असावेत. त्या कधी त्यांची प्रेमिका असल्यासारख्या विरहार्त होऊन बोलायच्या, तर कधी ‘कम्बख्तने मुझको कभी ठीक से सिखाया नहीं, पर उसके गले से तान क्या निकलती थी’ असं म्हणायच्या. मीही त्यांना देवासकरांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगायचो. होता होता त्यांनी मला लंडनमध्ये त्यांच्याकडंच राहण्याची गळ घातली व भेटायला बोलावलं ते लंडनच्या प्रसिद्ध हाईड पार्कसमोरच्या ग्रोवनर हाउस या पंचतारांकित हॉटेलमध्ये. तिथं मला भेटून त्या आपल्या घरी घेऊन जातील अशी अटकळ मी मनाशी बांधली होती. ती साफ चुकीची ठरली. एवढंच सांगतो की, या बाई इंदौरच्या महाराजांच्या खास मर्जीत असणाऱ्या सरदार मटकरांच्या कन्या लीलाबाई. ही सौंदर्यवती आता जगद्विख्यात सर डेव्हिड लीन Lawrence Of  Arabia and Doctor Zhivago सारख्या चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक) यांची घटस्फोटिता पत्नी होती. आपल्याला मिळणाऱ्या पोटगीचा भाग म्हणून त्या या पंचतारांकित हॉटेलच्या अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. तिथून पुढं महिनाभर माझा पत्ता होता c/o- Leela Lean, London. ही गोष्ट मी नंतर गणपतरावांना सांगितली, तर ते म्हणाले, ‘‘तुमने इतने दिन उसके साथ कैसे गुजार लिये? वह बहुत खूबसूरत लेकिन निहायत बेसुरी थी. मेरी तान की पेचीदगी समझती नहीं थी. मैं उसे बम्बई के ताजमहाल होटल में सिखाने जाया करता था. वह होटल मेरे लिये दूर पडता था और वहाँ का उबला हुआ, (उकडलेले) फीका गोश्त मुझे पसंद नहीं आता था.’’ आता सांगतो आहे त्या घटनेला मी हजर होतो. अमीरखाँचं गाणं होतं सिडनहॅम कॉलेजच्या हॉलमध्ये. अमीरखाँही गणपतरावांचे गुरू रजब अलीखाँ यांच्याकडं थोडंफार शिकलेले गणपतरावांचे जुनियर गुरुबंधू. कधी नाही ते गणपतराव या गाण्याला आले होते. त्या दिवशी अमीरखाँनी मारवा राग गाताना इरेला पेटून आपली एरवीची बिकट तान अधिकच गुंतागुंतीची करून गायली. गाण्यानंतर अमीरखाँनी त्यांना लवून आदाब केला. स्वत:ला मिळालेल्या बिदागीतून भरघोस रक्कम काढून गणपतरावांच्या कधीही न धुतलेल्या शेरवानीच्या खिशात कोंबली. विचारलं, ‘‘कोई परेशानी तो नहीं?’’ गणपतराव म्हणाले, ‘‘बस, इसी बात से परेशान हूँ कि लोगबाग (लोक) तान को बहुत आसान करके गाने लगे हैं और अब तुम्हारी तान भी आसान होती जा रही है।

Story img Loader