इंडोनेशियातील जिवंत ज्वालामुखींबाबत खूप कुतूहल होते. तिथे गेल्यावर माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या ‘पराक्रमाची’ कहाणी ऐकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो पाहण्यासाठी गेलो. त्याचे दर्शन लांबून झाले, पण त्याने केलेला विध्वंस मात्र जवळून पाहता आला.
इं डोनेशियाचे नाव नेहमी या ना त्या नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात वाचनात येते. कधी भूकंप, कधी त्सुनामी, तर कधी ज्वालामुखी त्या राष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेले. पण या संकटांवर मात करूनही इंडोनेशियाची विविध क्षेत्रांतील वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. तेथील बौद्धमंदिरं असलेल्या म्हणजे जकार्ता, योग्यकर्ता आणि सुराबाया या तीन महत्त्वाच्या शहरांचा व परिसराचा दौरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
भारतातून इंडोनेशियाच्या कोणत्याही शहरात जाण्यासाठी थेट विमान नाही. आम्ही क्वालालंपूरमार्गे योग्यकर्ताला गेलो. इंडोनेशियाचा एक महिन्याचा पर्यटन व्हिसा विमानतळावरच प्रत्येकी २५ अमेरिकन डॉलर्स भरून मिळतो. अधिक काळ रहावयाचे असेल तर आपल्या देशातील त्यांच्या वकिलातीकडून तो घ्यावा लागतो. योग्यकर्ताचा विमानतळ अगदीच छोटा. त्यामुळे सर्वत्र गर्दीच गर्दी. आपले सामान हुडकून काढावे लागते. पण एकूण व्यवस्था ठीक वाटली.
इंडोनेशियात पाऊल ठेवल्यानंतर सर्वप्रथम परिचय व सराव करून घ्यावा लागतो, तो तेथील लाखांच्या नोटांचा. एक अमेरिकन डॉलर म्हणजे आठ ते साडेआठ हजार इंडोनेशियन रुपये. क्षणार्धात तुम्ही लक्षाधीश होता. पण एका बर्गरसाठी ४९,५०० रुपये, तर क्लब सॅण्डवीचसाठी २९,५०० रुपये मोजावे लागतात. अर्थात हळूहळू या चलनाची सवय होते. ऑक्टोबर ते एप्रिल हा येथील पावसाचा मोसम. मे ते सप्टेंबर पाऊस नसतो. हवामान जवळजवळ आपल्यासारखेच. पाऊस पडून गेल्यानंतर अधिकच गरम होऊ लागते.
इंडोनेशिया हे १७,५०५ बेटांचे मिळून बनले आहे. त्यापैकी ३०० बेटांवर अजिबातच वस्ती नाही. अनेक बेटे एकमेकांना अगदी लागून आहेत. म्हणजे मासेमारीचे साहित्य ठेवण्यासाठी एक बेट आणि राहण्यासाठी शेजारचे बेट अशी रचना आहे. कालीमादान, सुमात्रा, पापुआ, सुरावस्ती व जावा ही पाच मोठी बेटे. त्यापैकी जावा बेटात जकार्ता हे सर्वात जास्त लोकवस्तीचे पहिल्या क्रमांकाचे शहर, त्यानंतर सुराबाया, समाइन, बांडुंग व योग्यकर्ता अशी क्रमवारी लागते.
इंडोनेशियातील जिवंत ज्वालामुखींबाबत खूप कुतूहल होते. हवाईच्या ‘व्होल्कॅनो नॅशनल पार्क’मध्ये आम्ही असतानाच वाऱ्याची दिशा बदलली आणि लाव्हा रसाचा भयंकर वास आमच्या दिशेनेच येऊ लागला. त्यामुळे तातडीने सर्व पर्यटकांना पार्कच्या बाहेर काढण्यात आले. वाऱ्याची दिशा बदलल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. ब्रोयो ज्वालामुखी शहरांपासून बराच दूर आहे. त्यामुळे त्यांच्या उद्रेकाचा महत्त्वाच्या शहरांना तसा त्रास होत नाही. पण योग्यकर्ता शहरापासून अवघ्या तीस कि. मी. अंतरावर असलेल्या माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या ‘पराक्रमाची’ कहाणी ऐकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो पाहण्यासाठी गेलो.
त्याचे दर्शन लांबून झाले, पण त्याने केलेला विध्वंस मात्र जवळून पाहता आला. समुद्रसपाटीपासून २९६८ मीटर्स उंच असलेला हा ज्वालामुखी जगातील एक अत्यंत जागृत ज्वालामुखी मानण्यात येतो. उन्हाळ्याच्या दिवसात धाडसीवीर त्या डोंगरावर गिर्यारोहण करतात. त्याच्या शिखरावर जाण्यासाठी सराईत गिर्यारोहकांनाही जवळजवळ दहा तास लागतात.
मेरापी हा २००४ व २००६ मध्ये जागृत झाला होता. त्याने मोठा विध्वंस केला. २००६ मध्ये तर त्याला भीषण भूकंपाची साथ होती. त्यात सहा हजार लोक मृत्युमुखी पडले. येथून तीस-पस्तीस कि. मी. अंतरावरील व जगातील एक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या ‘बोरोबुइट’ या बुद्धमंदिराचे व ‘प्रबनन्’ हिंदू मंदिराचे त्यात प्रचंड नुकसान झाले. २०१०च्या नोव्हेंबर महिन्यातही तो जागृत झाला, त्यात १७१ जण मरण पावले. याची पूर्वसूचना शासनाने लोकांना आधी दिली होती. पण अगदी जवळ राहणाऱ्यांना पळावयास वेळच मिळाला नाही.
मेरापी जागृत होतो, तेव्हा त्याचे स्वरूप किती भयंकर असते, याचे वर्णन ऐकून अंगावर अक्षरश: काटा उभा राहतो. ज्वालामुखीच्या चार अवस्था असतात. १) शांत पण जागृत (त्यावेळेस त्याच्यातून धूर येतो.) २) अधिक जागृत. ३) उद्रेकासाठी तयार व ४) उद्रेक. २०१० मध्ये २६ सप्टेंबरला तो जागृत व्हावयास लागला व नोव्हेंबर महिन्यात त्याचा उद्रेक झाला. सुमारे ८० कि. मी.च्या वेगाने त्याचा लाव्हा रस वाहत येतो. त्याची उष्णता ६०० ते ८०० सेल्शिअस एवढी असते. (गॅसवर १०० से.वर पाणी उकळावयास लागते.) त्यामुळे त्याच्या जवळपासच्या लोकांना पळण्यासाठी अवघा सात सेकंदांचा वेळ मिळतो. त्याचे एकूण रूपही अक्राळ-विक्राळ असते. त्याच्या ज्वाला मशरूमच्या फुलाप्रमाणे आकार घेत आठ कि.मी.पर्यंत उंच उडतात आणि त्याचे कण वीस कि.मी.च्या परिसरात पसरतात. वाऱ्याची दिशा जशी असेल तेथे ते विखुरले जातात.
तो जेव्हा शांत होतो, तेव्हा १४० क्युबिक मीटर्स लाव्हा साचतो. नोव्हेंबरमध्ये जागृत झालेल्या ज्वालामुखीचे परिणाम पुढे निदान आठ-दहा महिने लोकांना भोगावे लागत असल्याचे आम्ही प्रत्यक्ष पाहिले. या ज्वालामुखीतून अजस्र दगड, वाळू बाहेर पडून इतस्तत: पसरली गेली होती. आम्ही तेथे असतानाच एक दिवस संध्याकाळी प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे हे शेकडो लहान-मोठे दगड वाहत शेजारच्या नदीत गेले आणि नदीची पातळी एकदम वाढली. लगेच परिसरातील वस्ती खाली करावी लागली. अर्थात हे नित्याचेच झाले असल्याने गावकऱ्यांना त्याची सवय झाली आहे.
लाव्हारसाच्या दगडांचे नानाविध उपयोग केले जातात. इटना येथे त्यापासून बऱ्याच वस्तू बनवण्यात येतात. त्यांची विक्रीही केली जाते. अशी एक सुंदर बाहुली आम्ही तेथे खरेदी केली. रस्त्याच्या दुतर्फा या दगडांपासून नानाविध आकाराच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते.
योग्यकर्ता भेटीचे मुख्य आकर्षण होते ‘बोरोबुदूर’ बुद्ध मंदिर. हे जगातील सातवे आश्चर्य मानण्यात येते. पूर्वी येथे कोणताच धर्म नव्हता. चवथ्या शतकात गुजरातमधून एक व्यापारी येथे आला. त्याने हिंदू धर्माची ओळख करून दिली. पाचव्या शतकात बुद्धिझम आला. हे दोन्ही धर्म वाढू लागले. त्यातूनच बोरोबुइट हे बुद्धमंदिर व प्रबनन् हिंदू मंदिराची उभारणी झाली.
बोरोबुइट मंदिरात जाताना लुंगी नेसावी लागते. त्याला ‘सरोंग’ म्हणतात. प्रवेश तिकीट घेतल्यानंतर लुंगी नेसवली जाते आणि पाण्याची बाटली व चहा-कॉफी मोफत मिळते. या मंदिराची रचना अतिशय आकर्षक आहे. उंची ३५.५ मीटर्स. त्याचे एकूण नऊ टप्पे (लेव्हल्स) आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांपर्यंत जाता येते. २००६ मध्ये जो भीषण भूकंप झाला, त्यामुळे या मंदिराचे बरेच नुकसान झाले. त्याची दुरुस्ती युनेस्कोच्या देखरेखीखाली सध्या सुरू आहे.
प्रथम उंच पायऱ्या चढून वर जावे लागते. वीस लाख मोठय़ा शिळांनी हे मंदिर उभारले आहे. त्यासाठी ५५,००० क्युबिक मीटर्स लाव्हा वापरण्यात आला. या शिळा पिरॅमिड्सप्रमाणे रचण्यात आल्या आहेत. तेथे बुद्धाच्या विविध मुद्रा व तीन अवस्थांचे दर्शन होते. कामा, रूपा व अरूपाधातू. शेवटची स्थिती म्हणजे संतरूप. हे मंदिर बारकाईने व संपूर्ण पाहावयाचे, समजून घ्यावयाचे तर २१ दिवस लागतात. या मंदिराच्या आत जागा नाही. त्याच्या चारही बाजूने प्रदक्षिणा घालूनच त्याचे भव्य-दिव्य स्वरूप लक्षात येते. बाराशे वर्षे होऊनही ते उत्तम अवस्थेत आहे. इंडोनेशियन सरकार वारंवार त्याची डागडुजी करते. त्यामुळे ते आणखी निदान हजार वर्षे निश्चित उभे राहील, असा दाखला तज्ज्ञांकडून दिला जातो.
प्रबनन् हे आशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर, योग्यकर्ताच्या जवळच आहे. त्यात एकूण २४ देवळे असून, भिंतीच्या आत १६ व पलीकडे आठ आहेत. त्यांना प्रवरा म्हणतात. आतल्या बाजूच्या देवळात ब्रह्मा, विष्णू व शिव ही मुख्य देवळे. त्यात शिवाचे मंदिर सर्वात उंच, म्हणजे ४७ मीटर्स. त्याच्या आधी नंदी, गरूड व राजहंस ही त्यांच्या वाहनांची मंदिरे आहेत. निरनिराळ्या भूकंपात या देवळांची मोठी हानी झाली. पण इंडोनेशियन सरकारने त्यांच्या पुनर्बाधणीचे काम जोरात हाती घेतले. २००६ पर्यंत १८ देवळांची दुरुस्ती पूर्ण झाली. पण परत झालेल्या भूकंपात शिवमंदिराचे जबरदस्त नुकसान झाले. त्याचे दगड केव्हाही कोसळू शकतात. म्हणून ते केवळ बघण्यासाठी बरं आहे. या देवळांचा परिसर उत्तमरीत्या सुशोभित ठेवण्यात आला आहे. योग्यकर्ताच्या सुलतानाचा छोटासा पॅलेसही पाहण्यासारखा असून, तेथील मुक्कामात प्रसिद्ध बाटिक प्रिंट्स, चांदीची विविध उत्पादने करणाऱ्या कारखान्यांना थेट द्यावयासच हवी.
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता म्हणजे मोठे गजबजलेले शहर. कधीही आणि कोठेही जा, वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसतातच. अर्थात वाहतूक बरीचशी शिस्तीत. हे उद्योगधंद्यांचे शहर. त्यामुळे हवा, पाणी कमालीचे प्रदूषित. अगदी मुंबईसारखी झोपडपट्टी आणि टोलेजंग इमारतीही. इंडोनेशियाची आर्थिक स्थिती खूप बरी. त्यामुळे २००८च्या जागतिक आर्थिक मंदीची झळ या राष्ट्राला बसली नाही.
जकार्ताच्या मध्यवर्ती चौकात पार्लमेंट आणि अन्य महत्त्वाच्या शासकीय इमारती आहेत. येथील नॅशनल म्युझियमला मुद्दाम भेट दिली. अत्यंत प्राचीन वस्तू, पुतळे याचे हे मोठे संग्रहालय आहे. गणपती, बुद्ध, दुर्गादेवी यांच्या अगदी भव्य, आकर्षक व कित्येक शतकांपूर्वीच्या मूर्ती येथे दिसतात. अनेक शीला लेखांवर त्या काळची माहिती संस्कृतमध्ये लिहिली आहे. ती वाचण्यासाठी बऱ्याचदा भारतातील संस्कृत तज्ज्ञांना बोलवण्यात येते. चार हजार वर्षांपूर्वीची पोर्सिलीन, टेराकोटाची भांडी, अवशेष उत्तमरीतीने जतन केले आहेत.
जकार्ता शहरापासून तीस मिनिटांच्या अंतरावर ३०० हेक्टर जागेत उभारण्यात आलेला ‘मिनीएचर पार्क’ म्हणजे संपूर्ण इंडोनेशियन संस्कृतीचा उत्तम परिचय आहे. तेथे ३३ प्रांताची पॅव्हॅलियन्स बनवण्यात आली आहेत. त्यातून २५०९ संस्कृतींची माहिती मिळते. येथील म्युझियम, बर्ड पार्कही पाहण्यासारखे आहेत. पण विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर बगिच्यांनी सजवलेला असून, हजारो लोकांची वर्दळ असूनही तेथील स्वच्छता आणि व्यवस्था वाखाणण्यासारखी आहे.
सुराबाया हे इंडोनेशियातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरे मोठे शहर. लोकसंख्या तीस लाखांच्या घरात आणि प्रामुख्याने उद्योगधंद्यासाठी प्रसिद्ध. सुराबाया नाव कसे पडले याची दंतकथा मोठी सुरस आहे. सुरा म्हणजे शार्कमासा आणि बाया म्हणजे मगर. शार्क समुद्रात असतो तर मगर नदीत. बाराव्या शतकात एके दिवशी, नदी समुद्राला जेथे मिळते तेथे मोठा आवाज होत होता. तेव्हा स्थानिक लोकांना वाटले की, शार्क व मगर यांची मारामारी सुरू आहे. ते पाहून काही जण सुरा तर काहीजण बायाच्या नावाने ओरडत होते. त्यावरून सुराबाया असे नाव पडले. यासा व मगर यांच्या मारामारीचे दृष्य दाखवणारे मोठे पुतळे, शहराच्या अनेक चौकांत दिसून येतात.
सुराबायात प्रामुख्याने जगातील सर्व नामांकित कंपन्यांच्या सिगरेट्सचे उत्पादन होते. त्यामुळे भरपूर पैसा येथे खेळताना दिसतो. येथील एका चार मजली भव्य मॉलमध्ये गेलो होतो. पण याहूनही मोठे असे कितीतरी मॉल सुराबायात आहेत. त्यापैकी अनेक मध्यरात्रीपर्यंत उघडे असतात, अशी माहिती स्थानिक गाइडने दिली.
येथून सुमारे ९० कि.मी. अंतरावर असलेले मलंग शहर म्हणजे थंड हवेचे ठिकाण. येथे काही प्राचीन देवळेही आहेत. डचांच्या वसाहतीचे काही अवशेष चांगले जतन केले आहेत. येथील बोलेवर्ड भाग खरोखरच पाहण्यासारखा आहे. श्रीमंतांचे अलिशान बंगले येथे आहेत. रस्त्यांच्या मध्यभागी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट केली आहे. त्यामुळे सारा परिसर एकदम खुलून दिसतो.
ठिकठिकाणी अगदी अस्सल इंडोनेशियन रेस्टॉरंट्समध्ये जेवणाचा योग आला. एका ठिकाणी त्यांच्या खास डीशची ऑर्डर दिली. नाव होते ‘नासी गोरेंग अँड गुरामे टू सा’. नासी म्हणजे राईस आणि गोरेंग याचा अर्थ फ्राईड. माशाला गुरामे म्हणतात. टू सा म्हणजे या माशावर दोन निरनिराळ्या प्रकारचे सॉस घालून तो बनवण्यात येतो. मासा होता फिलापीया. मोठा चवदार. तो मस्त भाजून, तिखट व आंबट लाल-काळ्या रंगाच्या सॉसमध्ये घोळवून देण्यात आला. त्याचे गार्निश होते त्याच माशाचे डोक्यापासूनचे कव्हर. दिसावयास आकर्षकच आणि चवीला लाजवाब..
इंडोनेशियन रेस्टॉरंट्समध्ये ठिकठिकाणी शेजारच्या टेबलांवर बसलेल्या स्थानिक स्त्री-पुरुषांच्या हातात, बिअरसारखे मोठे जार दिसत होते. पण त्यात होता, ‘लेमन टी’. जेवणासोबत लेमन टी पिण्याची येथील खास पद्धत. बिअरचा मोठा ग्लास जसा स्वस्त पडतो, त्याच हिशेबाने लेमन टीचा भला मोठा जार घेणे लोक पसंत करतात.
ज्वालामुखीच्या छायेतली बौद्धमंदिरं
इंडोनेशियातील जिवंत ज्वालामुखींबाबत खूप कुतूहल होते. तिथे गेल्यावर माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या ‘पराक्रमाची’ कहाणी ऐकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तो पाहण्यासाठी गेलो. त्याचे दर्शन लांबून झाले, पण त्याने केलेला विध्वंस मात्र जवळून पाहता आला.

First published on: 02-12-2012 at 03:33 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddha temple under the shadow of volcano