फोटोवाल्याने मोठय़ा काळ्या पडद्याआड जाऊन समोर तासन् तास तिष्ठत (आणि कसेबसे हसू आणत) उभे राहिलेल्या माणसांचे फोटो काढण्याचा जमाना इतिहासजमा होऊन आता स्वत:च्या हातात कॅमेरा घेऊन स्वत:चाच स्वत: कधीही, कुठेही (आणि कसाही) फोटो काढण्याचा जमाना आला आहे. मर्यादित लोकांच्या हातातील हे तंत्र किंवा कला आज स्थल, काल, लिंग, वयनिरपेक्ष झाले आहे. तंत्रज्ञानामुळे उदयास आलेली आणि विकसित झालेली ही सर्वात तरुण कला.. वय वर्षे फक्त १७६!
मुळात आपण जे बघतो ते डोळ्यांमार्फत. आणि डोळ्यांनी टिपलेले ग्रहण होते ते मेंदूत. आणि मेंदूमध्ये उमटलेली प्रतिमा म्हणजे आपण ‘बघितलेले’ दृश्य! कॅमेरा म्हणजे डोळा आणि मेंदू म्हणजे फिल्मवर प्रक्रिया करणारी प्रयोगशाळा. कसे, ते चित्र क्र. १ मध्ये दाखविले आहे.
चित्र क्र. १ मध्ये दाखवल्याप्रमाणे समोरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील आणि कॅमेऱ्यातील भिंगातून अनुक्रमे डोळ्यातील दृष्टिपटलावर किंवा कॅमेऱ्यातील फिल्मवर पडते. दृष्टिपटलामार्फत ती मेंदूकडे पोहोचवली जाते, तर कॅमेऱ्यातील फिल्म बाहेर काढून रासायनिक प्रक्रियेसाठी पाठवली जाते आणि आपल्याला ती प्रतिमा ‘दिसते’! मेंदूतील आपल्याला ‘हव्या त्या’ प्रतिमा अनेक वर्षे टिकतात, तर छापलेले फोटो आपण नीट ठेवले तर टिकतात.
मानवी डोळ्याचे यांत्रिकीकरण करणारा हा कॅमेरा कसा असतो, ते समजावून घेऊ.
१८३९ च्या ऑगस्ट महिन्यामध्ये लुई जाक मॉन्द दागॅर या फ्रेंच चित्रकाराने पॅरिसमध्ये प्रकाशचित्रकलेची (Photography) सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या तंत्रात आणि स्वरूपात अनेक प्रकारच्या सुधारणा होत गेल्या. चित्र क्र. २ आणि ३ मध्ये सुरुवातीच्या काळातील कॅमेरे दाखवले आहेत. अगदी सुरुवातीला दागॅर यांनी प्रकाशचित्र तयार करण्यासाठी चांदीचा वर्ख दिलेल्या तांब्याच्या पत्र्यावर आयोडीनच्या वाफा सोडून त्यावर प्रकाशाला संवेदनशील असलेल्या सिल्व्हर आयोडाईडचा थर दिला आणि तो पत्रा (निगेटिव्ह) कॅमेऱ्यात ठेवला. त्यावर ‘फोटो’ काढून नंतर एका बंद लाकडी डब्यात तो पत्रा ठेवून त्यावर पाऱ्याच्या वाफा सोडल्या. पाऱ्यामुळे प्रकाशाशी संयोग झालेल्या सिल्व्हर आयोडाईडच्या थरावरील अदृश्य प्रतिमेचे दृश्य प्रतिमेत रूपांतर झाले. ही प्रतिमा कायम करण्यासाठी तो पत्रा मिठाच्या पाण्यात बुडवला. त्यात जिथे प्रकाश लागलेला नव्हता तिथले सिल्व्हर आयोडाईड विरघळून गेले आणि फक्त पाऱ्याच्या संयोगामुळे तयार झालेली प्रतिमा शिल्लक राहिली.
या प्रक्रियेत पुढे अनेक बदल होत गेले. पत्र्याच्या जागी प्लास्टिकच्या फितीवर रसायने लावून तयार केलेली ‘फिल्म’ आली. ती फिल्म प्रक्रिया करून त्याच्यावरील उमटलेली चित्रे बघण्यायोग्य करण्याच्या प्रक्रियेतही अनेक बदल होत गेले. पण कॅमेऱ्याची पायाभूत संकल्पना फार बदलली नाही.
कॅमेऱ्याचे तंत्र समजावून घेण्यासाठी आपल्याला प्रकाशाच्या अपवर्तनाचा/ वक्रीभवनाचा (Refraction of Light) नियम माहीत असणे आवश्यक आहे. काय सांगतो हा नियम? ‘प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो. या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचे अपवर्तन/ वक्रीभवन म्हणतात.’
चित्र क्र. ४ मध्ये दाखवल्याप्रमाणे एका बहिर्गोल भिंगासमोर धरलेल्या पेन्सिलीवरून परावर्तित (Reflect) होणारे प्रकाशकिरण भिंगातून पलीकडे जाताना आपली दिशा बदलतात. त्यामुळे पेन्सिलीची पलीकडे दिसणारी प्रतिमा आहे तशी, पण उलट दिसते. आपल्या डोळ्यातील भिंगातून पटलावर उमटणारी प्रतिमाही उलटीच असते. पण मेंदूतील ग्रहणप्रक्रियेमुळे आपण ती सुलट असल्याचे अनुभवतो.
चित्र क्र. ५ मध्ये कॅमेऱ्यात घडणाऱ्या घटनांचे संकल्पना-चित्र दिसते. भिंगासमोर उभ्या असलेल्या मुलीवरून परावर्तित होणारे प्रकाशकिरण कॅमेऱ्याच्या भिंगातून आत जातात. भिंगापलीकडे असणारे व्यास बदलू शकणारे छिद्र (Aperture) ते किरण हव्या त्या आकारात नियंत्रित करून आतील फिल्मकडे पाठवतात (डोळ्यामध्ये हेच काम बुबुळ करते.) आणि फिल्मवरील रसायनांशी या प्रकाशकिरणांचा संयोग होऊन उलटी प्रतिमा उमटते. ही उमटलेली प्रतिमा नुसती आकाराने उलटी नसते, तर प्रकाश तीव्रतेनुसारसुद्धा उलटीच असते. रासायनिक प्रक्रिया करून विकसित केलेली फिल्म (जिला प्रकाशचित्रकलेच्या परिभाषेत ‘निगेटिव्ह’ म्हणतात.) जर आपण बघितली, तर दृश्यातील प्रत्यक्षात पांढरा असलेला भाग इथे काळा दिसतो आणि काळा भाग पांढरा दिसतो. रंगसुद्धा उलट प्रकारेच दिसतात. या फिल्मवरून जेव्हा प्रत्यक्ष फोटो छापला जातो तेव्हा फिल्ममधून प्रकाशकिरण सोडल्यानंतर ते किरण विशिष्ट प्रकाशसंवेदक (photo sensitive) रासायनिक थर असलेल्या कागदावर फिल्मवरील प्रतिमेची सावली कागदावर उमटवतात आणि प्रतिमा पुन्हा उलट स्वरूपात दिसते.. म्हणजे मूळ प्रतिमेच्या रंगात.
साध्या एक भिंग असलेल्या (SLR- Single Lens Riflex) कॅमेऱ्याचे काम कसे चालते, ते चित्र क्र. ६ आणि ७ मध्ये दाखवले आहे. कॅमेऱ्याच्या भिंगातून येणारे प्रकाशकिरण आतील आरशावर पडतात. तेथून ते अपवर्तित झाल्याने दिशा बदलतात आणि दुसऱ्या आरशाकडे अथवा पंचकोनी लोलकाकडे (penta prism) जातात. त्यातून परावर्तित झालेल्या किरणांमुळे आपण दृश्य-शोधकामधून (view finder) भिंगासमोरचे दृश्य आहे तसे बघू शकतो. त्यात दिसणाऱ्या प्रतिमेच्या दर्जानुसार कॅमेऱ्याच्या भिंगाची आणि आतील छिद्राची व्यवस्था हवी तशी बदलून प्रतिमेचा दर्जा योग्य असल्याची खात्री करून घेतो. ही खात्री झाल्यावर कॅमेऱ्याला असलेला खटका दाबताक्षणी भिंगासमोरील आरसा वर सरकतो. फिल्मसमोरील पडदा बाजूला होतो आणि भिंगातून येणारे प्रकाशकिरण कॅमेऱ्यातील फिल्मवर पडतात आणि प्रतिमा टिपली जाते. फिल्मसमोरील पडदा किती वेळ उघडा ठेवायचा, हेही ठरवता येते.
आता तर फिल्म वापरून चालणारे कॅमेरेही कालबाह्य झाले आहेत आणि त्यांची जागा घेतलीय डिजिटल कॅमेऱ्यांनी. त्याविषयी अधिक जाणून घेऊ पुढच्या लेखात.
दीपक देवधर – dpdeodhar@gmail.com
कॅमेरा
फोटोवाल्याने मोठय़ा काळ्या पडद्याआड जाऊन समोर तासन् तास तिष्ठत (आणि कसेबसे हसू आणत) उभे राहिलेल्या माणसांचे फोटो काढण्याचा जमाना इतिहासजमा होऊन आता स्वत:च्या हातात कॅमेरा घेऊन
आणखी वाचा
First published on: 26-07-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व तंत्रजिज्ञासा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camera