प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडमधल्या एका छोटय़ा शहरात पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ज्या घरात व्यंगचित्रकार कार्ल जाईल्स (Carl Giles, १९१६-१९९५) यांचा जन्म झाला, त्याच्या शेजारी एक ‘पब’ होता. याचाच कदाचित परिणाम म्हणून की काय, त्यांना पुढे सतत पबमध्ये वेळ घालवायला खूप आवडायचं. त्यांच्या मनात एक प्रकारे या वास्तूबद्दल जरा जास्तच आदर होता. आता त्या जागी आणखी एक पब झालाय आणि त्यांना आदरांजली म्हणून त्याचं नाव ‘जाईल्स पब’ असं ठेवलंय व जाईल्स यांच्या व्यंगचित्रांतील एक व्यक्तिरेखाही तिथे रेखाटली आहे.

शाळकरी जाईल्स हा लहानपणी जरा जास्तच मस्तीखोर होता. त्या काळात लाकडी चरख्यातून  कपडे पिळून काढायची पद्धत होती. त्याच्यातून तो आपल्या लहान बहिणीच्या सुंदर बाहुल्या पिळून काढायचा आणि विद्रूप झालेल्या त्या बाहुल्या आपल्या बहिणीकडे फेकून तो विकट हास्य करायचा. (सुंदर चेहऱ्यांची विद्रूप अर्कचित्रं काढण्याची बीजं जाईल्समध्ये कदाचित इथेच रुजली असावीत!) आणि तिने आईकडे तक्रार करू नये म्हणून वर तो म्हणायचा, ‘‘माझी देवाकडे डायरेक्ट ओळख आहे. मी त्याच्याकडे तुझी तक्रार करू शकतो!’’ बिचारी बहीण! मोडलेली बाहुली घेऊन घाबरून गप्प बसायची. शाळेतही जाईल्सच्या उचापत्या सुरूच असायच्या. पण तिथे एक खमके, न हसणारे, मारकुटे शिक्षक होते. ते मुलांना छडीने बदडून काढायचे. जाईल्सला त्या काळात याचा इतका प्रसाद मिळाला की पुढे त्याने आपल्या या शिक्षकाची व्यंगचित्रात्मक व्यक्तिरेखा तयार करून शेकडो हास्यचित्रं काढली. एक प्रकारे त्याने या शिक्षकाचा आणि त्यांनी दिलेल्या त्रासाचा सूडच घेतला. ‘जाईल्स : अ लाइफ इन कार्टून्स’ या त्यांच्या चरित्रात ही सर्व मजेदार माहिती आहे.

त्यांना वेगाचं खूप आकर्षण होतं. ते शिडाच्या नौका चालवायचे. घोडय़ावरून रपेट मारायचे. एकदा प्रचंड वेगाने मोटारसायकल चालवत असताना त्यांना अपघात झाला आणि डोळा व कान यांना कायमची इजा झाली. याचाच परिणाम म्हणून की काय, पुढे दुसऱ्या महायुद्धावर पाठवताना त्यांना फक्त व्यंगचित्रकार म्हणून पाठवलं गेलं. प्रत्यक्ष सैनिकी कामापासून त्यांना सूट होती. यावर त्यांनी एक झकास हास्यचित्र काढलं. युद्धभूमीवर एक व्यंगचित्रकार व्यंगचित्र काढतोय आणि दोघे सैनिक आपापसात बोलत आहेत की, आम्ही काही गरम कपडय़ांची मागणी केली होती, पण त्यांनी या व्यंगचित्रकाराला पाठवलेलं दिसतंय!

शाळा सुटल्यावर जाईल्स यांना एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओत शिपायाची नोकरी मिळाली. पण त्यांचं चित्रकलेतील कौशल्य पाहून त्यांना तिथेच चित्रकार म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. हे काम त्यांना खूप आवडलं. अगदी मध्यरात्रीपर्यंत ते काम करायचे.. पण अगदी आनंदाने. याच अ‍ॅनिमेशनचा फायदा त्यांना पुढील आयुष्यात चित्रं काढण्यासाठी झाला. चित्रातील बारीकसारीक तपशीलही ते मनापासून रेखाटतात. चित्रकलेचे सर्व नियम ते पाळतात. अगदी सुबक रेखाटन आणि त्यात बागडणारी, मजेदार हालचाल, आविर्भाव करणारी पात्रं. त्यामुळे हे एखाद्या अ‍ॅनिमेशन फिल्ममधील चित्र आहे असा भास होतो.

घर, रस्ते, बागा, राजवाडे, हॉस्पिटल्स, कारखाने, विमानतळ, रेल्वे स्टेशन, बियर बार वगैरेंची चित्रं ते अफलातून रेखाटतात. अगदी परफेक्ट! काळा, पांढरा, ग्रे रंगाचा उत्तम वापर करून ते चित्राला सावली-प्रकाशाचा आभास  देऊन एक रिअ‍ॅलिस्टिक फील निर्माण करतात. सूर्यप्रकाश, पाऊस, हिमवृष्टी हे ऋतूही ते चित्रांतून उत्तम रीतीने सादर करतात.. जणू काही एखादा फोटोच असावा.

सुरुवातीला साम्यवादी विचारांच्या ‘रेनॉल्ड  न्यूज’ या नियतकालिकात काम केल्यावर जाईल्स यांनी नंतर आयुष्यभर ‘डेली एक्स्प्रेस’मध्ये काम केलं. आठवडय़ाला तीन ते चार मोठी व्यंगचित्रं काढणं हे त्यांचं काम होतं. जाईल्स यांनी शुद्ध राजकीय भाष्य असलेली चित्रं खूप कमी काढली, हे खरं; पण त्यांनी आपली एक वेगळीच शैली निर्माण केली. वृत्तपत्रांतून येणारे अगदी साधे विषय किंवा बातम्या निवडून त्यावर खुमासदार भाष्य करायचं, हा मार्ग त्यांनी चोखाळला- नव्हे तर निर्माण केला. दुसऱ्या महायुद्धावरची त्यांची काही चित्रं- जी रशियाला सोयीची वाटली ती- रशियामध्ये मोठय़ा आकारात जाहिरातीसारखी छापली गेली. लंडनवर बॉम्बहल्ले होत असताना आणि त्यात आपलं घर उद्ध्वस्त झालेलं असतानाही जाईल्स कार्यालयात बसून व्यंगचित्र काढत होते.

त्यांच्या चित्रांचे विषय साधेच असतात. त्यामुळे त्यातल्या व्यक्तिरेखा सर्वसामान्य माणसांच्या असतात. फक्त भाष्य खूप तिरकस, मजेदार असतं. जाईल्स यांचा ब्रिटिश रेल्वेवर विशेष राग होता- म्हणजे त्यांच्या कारभारावर! त्यावरचं एक चित्र खूप खोचक आहे. रेल्वे स्टेशनवरचा एक अधिकारी दुसऱ्याला म्हणतोय, ‘जर्मनीवर जर अशीच बॉम्बफेक होत राहिली तर  त्यांची रेल्वे अगदी आपल्या रेल्वेइतकीच बेकार होऊन जाईल!!’

युद्ध संपल्यानंतर लंडनच्या रस्त्यावर लाखो लोक जमले आणि नाचगाण्याचा जल्लोष करू लागले. यावरचं त्यांचं सोबतचं व्यंगचित्र खूप गाजलं. ‘आता सायरन वाजला तर बॉम्बहल्ल्याच्या भीतीने घाबरायचं काहीच कारण नाही..’ असं एक नागरिक पोलिसांना म्हणतोय. यातली गर्दी पाहण्यासारखी आहे. अक्षरश: शेकडो लोक जाईल्स यांनी रेखाटले आहेत. इमारतीच्या गच्चीवरचे नागरिकही झेंडे फडकावून आनंद साजरा करताहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे.

एकदा इंग्लंडचं राजघराणं अनेक आठवडे बाहेरदेशी गेलं होतं त्यावर त्यांनी एक चित्र काढलं. (आपण समजा न सांगता अचानक चार-पाच दिवसांसाठी बाहेर गेलो, तर दाराबाहेर जसे रोजचे पेपर आणि तीन-चार दुधाच्या पिशव्या पडलेल्या असतात, त्याप्रमाणे) राजवाडय़ाच्या बाहेर अनेक दिवसांची वर्तमानपत्रं आणि दुधाच्या बाटल्या पडलेल्या आहेत. आणि त्या चित्राला मथळा दिला- ‘वेलकम होम’! हे चित्र राणीला खूप आवडलं आणि त्यांनी याचं ओरिजनल चित्र जाईल्स यांच्याकडून मागवलं व सन्मानाने राजवाडय़ाच्या भिंतीवर लावलं आणि जाईल्स यांना भोजनाचं खास आमंत्रणही दिलं.

बऱ्याच वेळा हिमवृष्टीत जाईल्स घरीच चित्र पूर्ण करायचे आणि मग ते ऑफिसमध्ये नेण्यासाठी खास हेलिकॉप्टर पाठवलं जायचं, इतके ते त्याकाळी महत्त्वाचे कलावंत ठरले होते.

जाईल्स यांच्या मिश्कीलपणाचं आणखी एक उदाहरण.. कार रेसिंगमध्ये जिंकलेल्या खेळाडूचं सर्वजण अभिनंदन करत आहेत. अशावेळी एक जण सहजपणे विजेत्याला सिगरेट ऑफर करतो आणि तो विजेता नम्रपणे म्हणतो की, ‘‘माफ करा.. पण मी धूम्रपान करत नाही!’’त्या विजेत्याच्या रेसर कारवर मात्र सर्व प्रायोजक या सिगारेट कंपन्या आहेत.

‘नर्स’ या नावाचाही त्यांचा एक स्वतंत्र संग्रह आहे. हॉस्पिटल, डॉक्टर्स, नर्सेस आणि मुख्य म्हणजे पेशंट यांच्याभोवती ही हास्यचित्रं फिरतात. जाईल्स यांची सुप्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणजे आजीबाई.. ‘ग्रँडमा’! एका चित्रात ती डेंटिस्टकडे गेल्यावर पिस्तूल बाहेर काढते. तेव्हा डॉक्टर थंडपणे तिला म्हणतात, ‘आजीबाई, याची काही गरज नाही. तुमचा सोन्याचा दात इथे सुरक्षित आहे!’

दुसऱ्या एका प्रसंगात नर्सेसचा पगारवाढीसाठीचा संप यशस्वीपणे संपल्यावर डॉक्टर नर्सच्या हातातील संपाचा फलक मागतात आणि म्हणतात, ‘आता कदाचित आम्हाला याची गरज भासेल!’

या संग्रहातील सोबतचं चित्र म्हणजे टिपिकल ‘जाईल्स स्टाईल’ आहे. हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळेला पेशंटने बेल वाजवूनही नर्सेस लगेच उपलब्ध होत नाहीत हा जागतिक अनुभव असावा. त्यावर उपाय म्हणून चित्रातील पेशंटने ‘वर्षभरातील सर्वोत्कृष्ट नर्स’ अशी एक स्पर्धा असल्याचं पोस्टर डकवून दिलंय आणि पेशंटने हात वर करायच्या आत नर्सेसची  झुंड त्या पेशंटकडे धावत सुटली आहे!! या चित्रातील  धावणाऱ्या बारा नर्सेसच्या हातांत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवरचे हावभाव, एकमेकांतली स्पर्धा हे सगळं पाहण्यासारखं आहे. हास्यचित्रातील मुख्य विनोद समजून घेतल्यानंतरही आपण ते चित्र पाहत बराच काळ रेंगाळतो, हेच जाईल्स यांचं सामथ्र्य आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carl giles hasya ani bhashya dd70