अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com
करोनापर्वातील संचारबंदीमुळे संपूर्ण जगाला निसर्ग व पर्यावरण माहात्म्याचा अर्थ नव्यानंच गवसला आहे. सर्रास कुठंही ऐकायला मिळतं की, ‘‘निसर्गाचा अतिरेकी विनाश करणाऱ्या मानवाला निसर्गानं दिलेली ही शिक्षा आहे. निसर्गही स्वत:चं संतुलन साधण्यासाठी हालचाल करीत असतो.’’ यातून सर्वसामान्यांच्या भावना दिसून येतात. परंतु ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण प्रकल्पा’चे (यू. एन. ई. पी.) संचालक इंगर अँडरसन हेसुद्धा अशाच भावना व्यक्त करतात तेव्हा त्याला महत्त्व येऊन वैज्ञानिक जगतामध्ये निसर्ग व पृथ्वीच्या आकलनाविषयी पुन्हा नव्यानं चर्चा झडू लागल्या.
निसर्गाचं स्वरूप नेमकं कसं आहे? ते अंगभूतच सुव्यवस्थित आहे की विस्कळीत व कोलाहलीय आहे? ते सरळ एकरेषीय आहे की अरेषीय व गुंतागुंतीचे आहे? याविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत धर्मापासून विज्ञानापर्यंत सातत्यानं नवनवे अंदाज बांधण्यात आले आहेत. परंतु त्यातून अजूनही अंतिम सत्य काही हाताला लागलेलं नाही. मानवी मन, समाजमन व निसर्ग वा पृथ्वी यांच्या वर्तनाचा वा कार्यप्रणालीचा थांग लावण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. १९९७ साली प्रो. जॉर्ज एम. हॉल यांनी ‘द इन्जेनियस माइंड ऑफ नेचर : डेसिफरिंग द पॅटर्न्स ऑफ मॅन, सोसायटी अँड युनिव्हर्स’ या ग्रंथातून हे गूढ उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेच्या सैन्यातून निवृत्त होताना कर्नल पदापर्यंत गेलेल्या प्रो. हॉल यांनी इतिहासात डॉक्टरेट प्राप्त केली होती. त्यानंतर प्रो. हॉल हे एकाच वेळी भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र व अर्थशास्त्र एवढय़ा विषयांचे अध्यापन करीत होते. त्यांनी अनेक ज्ञानशाखांच्या अभ्यासातून मानव, समाज आणि विश्वाच्या आकृतिबंधाचा (पॅटर्न) अन्वय लावण्याचा प्रयत्न केला होता. १८२४ च्या सुमारास उष्मागतिकीचा (थर्मोडायनॅमिक्स) दुसरा सिद्धान्त जाहीर झाला. कुठलेही कार्य करताना वापरण्यात येणारी ऊर्जा पूर्णपणे वापरता येत नाही. काही प्रमाणात वाया जाणाऱ्या ऊर्जेला ‘एंट्रॉपी’ किंवा अवक्रमाचं माप (मेझर ऑफ डिसऑर्डर ) असंही म्हणतात. या विश्वातील ‘एंट्रॉपी’ वायाच जात आहे असा तो दुसरा सिद्धान्त सांगतो. याचा अर्थ हे विश्व सरळरेषीय प्रवास करीत असून ते विनाशाकडे जात आहे. या सिद्धान्ताला २०० र्वष होत असताना त्याचा अनेक ज्ञानशाखांच्या दृष्टीने विचार केला जाऊ लागला. प्रो. हॉल म्हणतात, ‘‘आपण प्रत्येक दिवसाची बारकाईने नोंद ठेवली तर आपण स्वयंपाक, नोकरी, घरकाम, संपर्क, छंद अशी एकानंतर एक विविध प्रकारची कामं करीत असतो. अव्यवस्था दूर करून सुसूत्रता व सुव्यवस्था निर्माण करणे हे या सर्वामध्ये एक समान सूत्र असतं. निसर्गदेखील अशीच सुव्यवस्था निर्माण करण्याचा व संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत असतो. निसर्गाचं मन हे अतिशय कल्पक आहे. विज्ञानाला अद्यापि मानवी मन, समाजमन व निसर्गाच्या मनाचं पूर्ण आकलन झालेलं नाही. हा प्रयत्न असाच चालू राहील.’’
सर्व सजीवांमध्ये विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता असते. सगळ्या सजीवांमध्ये तापमान नियंत्रण करणे, बाहेरून आलेल्या रसायनांना घालवणे, आम्ल व सामू (पीएच) पातळी टिकवत पेशी वा शरीराचे संतुलन साधणे ही प्रक्रिया सतत चालू असते. मूळ स्थितीला आणण्याची प्रक्रिया ‘अंत:स्थितीकरणा’तून (होमिओस्टॅसिस) सुरूच असते. सर्व सजीवांना सामावून घेणाऱ्या पृथ्वीलाही हाच तर्क लागू पडतो असंही अनेक वैज्ञानिकांना वाटतं.
या मंथनामुळे २६ जुलै रोजी वयाची १०१ वर्षे पूर्ण करणाऱ्या डॉ. जेम्स लव्हलॉक यांच्या ‘गाया’ सिद्धान्ताचा संदर्भ पुन:पुन्हा येऊ लागला आहे. स्मरणशक्ती, तर्कबुद्धी, विनोदबुद्धी अतिशय तल्लख असलेले डॉ. लव्हलॉक आजही अनेकांगी विश्लेषण आपल्या हाती देत असतात. त्यांनी १९७२ साली ‘गाया’ सिद्धान्त मांडला. ग्रीक संकल्पनेत पृथ्वीदेवता ‘गाया’ ही स्वयंपूर्ण व स्वयंशासित मानली जाते. त्यांनी ‘संपूर्ण पृथ्वी हीच एक स्वयंनियंत्रण (सेल्फ रेग्युलेशन) करू शकणारं एकसंध सजीव संघटन (लिव्हिंग ऑर्गेनिझम) आहे. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक आहेत. या सर्वामधील जटिल आंतरक्रिया व त्यांना मिळणारा प्रतिसाद यातून पृथ्वीवरील समतोल साधला जातो..’ अशी मांडणी केली. ते ‘गाया’ ही संज्ञा भावनिक वा धार्मिक अर्थाने वापरत नाहीत. हा जिवंत प्राणी नाही, हे ते वारंवार स्पष्ट करतात. पृथ्वीकडे एक सजीव संघटन म्हणून पाहिले तर पृथ्वीवर होणारे बदल लक्षात येतील. त्यासाठी ते ‘गाया’ हे रूपक वापरतात.
डॉ. लव्हलॉक यांना ‘गाया’ कशी गवसली याची वैज्ञानिक पाश्र्वभूमीही समजून घेण्यासारखी आहे. त्यांनी १९६० च्या सुमारास राहत्या घरात संवेदनशील (सेन्सिटिव्ह) इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्र (इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर) तयार केले. वनस्पतीवर फवारलेले रसायन डी. डी. टी. हेच आहे, हे सिद्ध करण्यासाठी राशेल कार्सन यांना इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टरची मदत झाली. मातेच्या दुधात व पेंग्विनच्या मांसामध्ये डी. डी. टी.चे अंश आहेत, हा निष्कर्ष ‘सायलेंट प्रिंग’मध्ये मांडला गेला आणि त्याला विज्ञानाचा भक्कम आधार असल्यामुळे हे दावे कोणत्याही वैज्ञानिक संस्थेलासुद्धा नाकारता आले नाहीत. त्यामुळे पर्यावरणीय विचार रुजण्यास विज्ञानाचा कुठलाही अडसर आला नाही. लव्हलॉक यांच्या इलेक्ट्रॉन हस्तगत व शोधक यंत्राची ख्याती ऐकून ‘नासा’ने १९६१ साली चंद्रावरील मातीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले. काही दिवसांतच ‘नासा’ने त्यांच्यावर ‘मंगळावर सजीव सृष्टी आहे काय?’ या शोधमोहिमेचीही जबाबदारी सोपवली. तेव्हा कोणत्याही बाबीकडे पाहताना पठडीतील विचार बाजूला सारणारे लव्हलॉक म्हणाले, ‘कोणत्याही ग्रहावरील वातावरणाची पाहणी करण्यासाठी मानवाला तिथे धाडण्याची काहीही गरज नाही. तसेच तिथली माती तपासण्याचीही आवश्यकता नाही. समजा, पृथ्वीची पाहणी करण्यासाठी कोणी आले आणि ते अंटाक्र्टिकावर अथवा सहाराच्या वाळवंटात उतरले तर सभोवतालचा परिसर पाहून त्यांचे पृथ्वीविषयी होणारे आकलन हे समग्र असेल काय? ग्रहाच्या समग्र आकलनाकरिता तेथील वातावरण समजून घेतले पाहिजे.’ त्यांनी ग्रह मृत आहे की सजीव, हे समजून घेण्यासाठी काही भौतिक व रासायनिक तपासण्या घेण्याचे ठरवले. जेम्स लव्हलॉक यांनी मंगळ ग्रहाचा अवरक्त दूरदर्शक दुर्बिणीच्या (इन्फ्रारेड टेलिस्कोप) साहाय्याने अभ्यास केला. त्यांना मंगळ व शुक्र या ग्रहांवर वायूंचा रासायनिक समतोल (इक्विलिब्रियम) आढळला. याचा अर्थ तिथे कुठलाही सजीव नाही. ग्रहावर सजीव सृष्टी असेल तर वातावरणातील वायूंचा तोल व रासायनिक रचना (काम्पोझिशन) बदलून जाईल. पृथ्वी, मंगळ व शुक्र यांवरील वातावरणाच्या अभ्यासाचे श्रेय जेम्स लव्हलॉक यांनाच जाते. मंगळ व शुक्र यांच्यावरील वातावरण हे समतोलाच्या जवळपास आहे. परंतु पृथ्वीवर वायूंचा असमतोल असून, कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक आहे. मुबलक नायट्रोजन, ऑक्सिजन व मिथेन हे मृत ग्रहावर आढळणे शक्य नाही. त्यामुळे एकेकाळी मंगळ व शुक्र हे सजीव असतीलही; मात्र मंगळावर सध्या जीव नाही आणि तो ग्रह मृतवत आहे, असा निष्कर्ष त्यांनी तेव्हा काढला होता.
१९७१ साली लव्हलॉक यांनी वातावरणातील वायूंचा अभ्यास करून क्लोरोफ्लुरोकार्बनचे प्रमाण वाढत असल्याचा इशारा दिला होता. १९७४ साली मारिओ मोलिना व फ्रँक रोलँड या वैज्ञानिकांना अंटाक्र्टिकावरील वातावरणात ओझोनच्या थराला भगदाड पडत असल्याचे जाणवले होते. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉ. जेम्स लव्हलॉक यांचा इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर उपयोगी आला. क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे हे भगदाड पडत असल्याचे सिद्ध झाले. २६ ऑगस्ट १९८७ रोजी माँट्रियल येथे जगातील १९७ देशांनी ओझोन थराचा विध्वंस करणाऱ्या क्लोरोफ्लुरोकार्बन रसायनांना हद्दपार करण्याचा निर्धार केला. ओझोनच्या थराला पडलेले भगदाड हळूहळू बुजू लागले आहे, हे अनेक निरीक्षणांतून सिद्ध होत गेले. तेव्हा त्यावेळी विख्यात दैनिक ‘द गार्डियन’ने लव्हलॉक यांचा ‘मानवजात देऊ शकेल त्या सर्व सन्मानांचे मानकरी असू शकतील असे प्रेषित!’ असा गौरव केला होता.
त्यांना वायूंच्या आवरणाचा अभ्यास करीत असताना पृथ्वीची अनेक वैशिष्टय़े नव्याने जाणवली. तीन लक्ष कोटी आकाशगंगा आणि त्यामधील १०० अब्ज तारे अशा अथांग विश्वाची १३.८ अब्ज वर्षांपूर्वी निर्मिती झाली. पृथ्वीचा जन्म हा ४.५ अब्ज वर्षांपूर्वीचा, तर त्यावरील जीवोत्पत्ती ही ३.७ अब्ज वर्षांपूर्वीची मानण्यात येते. आपले पूर्वज होमोसेपियन हे तीन लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. यादरम्यानच्या काळात पृथ्वीवर अनेक उत्पात घडून गेले. (७४,००० वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फारच थोडी मानवजात वाचू शकली होती.) पृथ्वीवरील जीवोत्पत्तीपासून आजवर सूर्याकडून येणाऱ्या ऊर्जेत २५ ते ३० टक्कय़ांनी वाढ झाली असली तरीही पृथ्वीचे तापमान त्या प्रमाणात वाढले नाही. ते बऱ्यापैकी स्थिर राहिले. पृथ्वीवरील वातावरणात ७९ टक्के नायट्रोजन, २०.७ टक्के ऑक्सिजन व ०.३ टक्के कार्बन डायऑक्साइड आहे. ऑक्सिजन हा अतिशय क्रियाशील आहे. वातावरण व पृथ्वीच्या कवचातील इतर वायू व खनिज यांच्याशी ऑक्सिजनचा संयोग घडून येत नाही. मिथेनचे स्वतंत्र अंश का दिसावेत? ऑक्सिजन जवळ येताच मिथेनचे ज्वलन होणे साहजिक असते; परंतु ते होत नाही. थोडक्यात, वायूंचे असंतुलन होत नाही. हे वायूंचे संतुलन कसे साधले जात असेल? पृथ्वीवरील सागरांची क्षारयुक्तता (खारेपण.. सॅलिनिटी) ही दीर्घकाळापासून ३.४ टक्क्यांवर स्थिर आहे. हे संतुलनसुद्धा गूढच आहे. कैक वेळा वातावरणातील कोणत्या तरी वायूंचे प्रमाण वाढले वा कमी झाले तरी पृथ्वीवरील जीवसृष्टी का टिकून राहिली? पृथ्वीवरील जैवभारामुळे (बायोमास) वातावरणातील वायूंचे संतुलन टिकून असेल काय? अनेक वैज्ञानिक या संतुलन रहस्याचा शोध घेत आहेत. जेम्स लव्हलॉक यांनी वातावरणासोबतच जीवावरण (बायोस्फिअर) व जलावरण (हायड्रोस्फिअर) यांचा अभ्यास करून त्यामधील वायूंच्या चक्राचा अन्वय लावला. यातूनच ‘गाया’ने आकार घेतला.
‘पृथ्वी हे सजीव संघटन आहे’ या गृहितकापासून ते ‘गाया सिद्धान्त’ यांवर उत्क्रांतीविषयक जीवशास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांच्यासह जगातील अनेक शास्त्रज्ञांनी कडाडून टीका केली. त्यांच्या स्वदेशातील- ब्रिटनमधील वैज्ञानिक जगताने त्यांना अजिबात पाठिंबा दिला नाही. परंतु काळाच्या ओघात गाया सिद्धान्ताला मानणारेही वाढले. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. लिन मार्गुलिस यांनी तर आपले आयुष्य या सिद्धान्ताची व्यापकता सिद्ध करण्यासाठीच वाहिले. नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. फ्रिमन डायसन यांनीही त्याचा विस्तार केला. अनेक ज्ञानशाखांचा आंतरसंबंध तपासत अभ्यास करणारे शास्त्रज्ञ व पर्यावरणशास्त्रज्ञांनी ‘गाया’ ही संकल्पना स्वीकारून तिच्या प्रसारासाठी जागतिक परिषदा घेतल्या. मॅसेच्युटस विद्यापीठ, जॉर्ज मेसन विद्यापीठ आणि अनेक वैज्ञानिक संस्था त्यात सहभागी झाल्या.
वादग्रस्त ‘गाया’ला बाजूला ठेवून लव्हलॉक यांच्या पर्यावरणाच्या चिंतनाला जग अतिशय गंभीरपणेच घेत होते. त्यांनी ‘‘गाया ही संतुलन साधत असली तरी मानवी हस्तक्षेपामुळे गाया धोक्यात आली आहे. हवामानबदलास मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे. सुधारणा करण्याची वेळ निघून गेली आहे. १९७० च्या दशकातच जगाने योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. आता वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गाचा विनाशही लक्षणीय वेगाने होत आहे. मानवच पृथ्वीचा सूड घेत आहे.. (रिव्हेंज ऑफ गाया)’’ असे बजावून ठेवले होते. त्यावेळीच ते म्हणाले होते, ‘‘थोडय़ा अंतरावरील धोका ओळखून वागण्याचं शहाणपण जगानं कधी दाखवलं आहे? हवामानबदलाच्या महासंकटाच्या तावडीत असूनही आपलं वर्तन बदलत नाही. वाळवंटीकरण सोपे, पण वननिर्माण महाकठीण आहे. महामूर्ख मानवजातीला हवामानबदल रोखणं शक्य नाही.’’
भविष्याचा वेध घेताना त्यांनी २००५ सालीच ‘२०४० साली दुष्काळ, महापूर व चक्रीवादळांचे थैमान असेल. संपूर्ण युरोप उष्णतेच्या लाटेत होरपळून निघेल. कोटय़वधींना स्थलांतर करणे अनिवार्य ठरेल. समुद्रकिनाऱ्यानजीकची शहरे पाण्याने भरून जातील. सन २१०० पर्यंत ८० टक्के मानवजात नष्ट होईल,’ असे भाकीतही वर्तवले आहे. त्यांच्या मते, ‘पर्यावरण सुधारणा करण्याची वेळ निघून गेली आहे. कर्ब-उत्सर्जनात कपात, वननिर्मितीचे प्रयत्न १९७० च्या दशकात सुरू केले असते तर आज ही वेळ ओढवली नसती.’ २०१० साली ते म्हणाले, ‘हवामानबदल हे महायुद्ध वा परग्रहावरून होणारा हल्ला यांपेक्षा महाभयंकर आव्हान आपल्यासमोर आदळले आहे. युद्धाप्रमाणे आताही काही काळ लोकशाहीचे संकेत बाजूला ठेवून कृती करण्याची गरज आहे.’
ब्रिटनमधील सॅलिसबरीजवळ बॉवरचॉक नामक खेडय़ात निसर्गाच्या सान्निध्यात एकांतवासप्रिय लव्हलॉक शांत आयुष्य व्यतीत करीत असतात. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी ते ‘‘संचारबंदीच्या काळाचा अजिबात त्रास झाला नाही. उलट, गजबज नसल्यामुळे आल्हाददायक निसर्गाचा व प्रसन्न हवामानाचा आनंद घेता आला,’’ असं म्हणाले. १०१ वर्षांच्या वयामुळे ते जरी थकले असले तरीही त्यांची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे. त्यांचा कुठलाही आग्रह नसतो. ते म्हणतात, ‘‘तुम्हाला आवडत नसेल तर ‘गाया’ टाकून इतर कुठलीही संज्ञा वापरा; परंतु पृथ्वी ही एक व्यापक यंत्रणा रहिवाशांना राहण्याजोगे वातावरण निर्माण करीत आहे, हे आता सगळे मान्य करीत आहेत.’’
लव्हलॉक यांनी १९५० च्या दशकात ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रीसर्चमधील विषाणू विभागात संशोधन केलं आहे. करोनाकाळाविषयी ते म्हणतात, ‘‘१९५७ च्या आशियाई फ्लू साथीत कोटय़वधी लोक दगावले होते. १९६८ ची फ्लू साथही भयंकर होती.’’ कुठल्याही प्रसंगाकडे विनोदबुद्धीने पाहणाऱ्या त्यांच्या स्वभावास अनुसरून ते म्हणतात, ‘‘खरं तर करोनाची महामारी हे डार्विनच्या सिद्धान्ताचं क्रूर वास्तव रूप आहे. कोविड-१९ साथीमध्ये माझ्यासारखे असंख्य वृद्ध निघून जात असून, ती तुलनेनं तरुणांसाठी कमी त्रासदायक आहे. त्यामुळे ही साथ पृथ्वीसाठी लाभदायकच आहे.’’ पृथ्वीवरील संकटाविषयी ते बजावतात, ‘‘इतर कोणत्याही महामारीपेक्षा हवामानबदल व तापमानवाढ हाच महाभयंकर रोग आहे. तोच पृथ्वीसाठी जास्त धोकादायक आहे. त्यावर काही उपाय केला नाही तर मानवजात संपुष्टात येईल.’’ पृथ्वीच्या भवितव्याविषयी ते म्हणतात, ‘‘करोनाने घरातच राहण्याची सक्ती केल्यामुळे कर्ब-उत्सर्जनात झालेली घट ही नगण्य आहे. संपूर्ण जगाला गलिच्छ ऊर्जेपासून स्वच्छ ऊर्जेकडे तत्काळ जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे पृथ्वीला वाचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा मार्ग निवडावा लागेल. काळ विकत घेण्यासाठी मला अनेक पर्यायांपैकी अवकाशातील सौरकेंद्री कक्षेत (हेलिओसेंट्रिक ऑर्बिट) महाकाय छत्री उभी करणं हे अधिक आकर्षक वाटतं.’’
अनेक प्रसंगी पत्रकार त्यांना अनेक प्रश्न विचारीत असतात. त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीविषयी ते म्हणतात, ‘‘विचार करताना तार्किकता व रेषीयता (लिनिअॅरिटी) यांच्या पलीकडे जाऊन अंत:प्रेरणा व अंतज्र्ञान यातूनही आकलन होऊ शकतं.’’ ‘वैज्ञानिक संशोधन हे एकटय़ानं करण्यासारखे आहे काय?’ असं विचारल्यावर ते- ‘‘कलावंत, कवी वा साहित्यिक यांनी त्यांच्या घरातूनच काम केल्यास कोणालाही वावगं वाटत नाही; परंतु वैज्ञानिकाला मात्र मोठमोठय़ा प्रयोगशाळांतूनच काम करावं लागतं असा समज दृढ आहे. घरी राहून २५ वर्षे स्वतंत्रपणे संशोधन करणारा मी एकमेव असू शकेन. परंतु असं करायला काही हरकत नसावी,’’ असं मिश्किल उत्तर देतात. त्यांना संशोधनाकरिता निधी कसा पुरत होता, असं विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘एकतर गरजा कमी व त्यातून काटकसर करणे अंगवळणी पडले आहे. स्वामित्वधनातून येणारी रक्कम पुरवायची.’’ सध्याच्या विज्ञानजगताविषयी- ‘‘विज्ञानाच्या शाखांमध्ये कप्पे, सीमा वा मर्यादा नाहीत. स्वत:चं नियंत्रण टिकवण्यासाठी प्राध्यापकांनी विज्ञानाला कप्पेबंद केलं आहे. विज्ञान हे तज्ज्ञांचे गट व कोंडाळे यांच्या हातात गेलं आहे. त्यांना त्यांच्या कामाचा अभिमानही वाटत असतो; परंतु ते कधीही ठाम का नसतात? त्यांना जगाचे समग्र भान का येत नाही?’’ असा सवाल ते विचारतात.
एकंदरीत, पृथ्वी वा निसर्गाच्या व्यवहारांचं आकलन कसं करावं, हा प्रश्न वैयक्तिक आहे. वैज्ञानिक, तत्त्वज्ञ व कलावंत हे भिन्न मार्गानी जाऊनही ‘निसर्गाचा विनाश करणारा विकास व त्यामागील दृष्टी आपलाच घात करणार आहे’ हाच निष्कर्ष वारंवार सांगत आहेत. लव्हलॉक यांची शताब्दी आणि करोनानिमित्ताने त्याची उजळणी केली, एवढंच.