आदित्य विश्वनाथ धारप
७-८ वर्षांनी फुललेली कारवीची फुलं पाहण्यासाठी आलेल्या लोकांच्या गाड्यांनी रस्त्यालगतची कारवीची झुडपं तर चिरडली होतीच, पण त्याच बरोबर पठारावरची झुडपं लोकांनी तोडून रस्त्यावर टाकली होती. ज्याचं सौदर्य आपण बघायला आलो आहे तेच नासायचं, पायदळी तुडवायचं ही वृत्ती अनाकलनीय आहे.
शीर्षक वाचून धक्का बसेल खरं तर, पण खरोखरच हा अनुभव मला अलीकडे आला. त्याचंच हे प्रामाणिक कथन. मी एक वनस्पती अभ्यासक आहे आणि गेली ५-६ वर्षं ‘कारवीचं फुलणं’ हा माझा अभ्यासाचा विषय आहे. या निमित्तानं कारवीनं फुललेली अनेक पठारं, डोंगर उतार मी बघितले आहेत. कारवीचं फुलणं हे मोठं विलक्षण असतं. तिचं ७-८ वर्षांनी एकदाच सामूहिक फुलणं, मग मरणं आणि मग नवीन पिढी जन्माला येणं हे सारंच विलक्षण आहे. हे असं का? कसं? याचा मी अभ्यास करायचा प्रयत्न करतोय, नोंदी ठेवतोय. पण अलीकडेच एका अत्यंत वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. एका पठारावर या वर्षी भुईकारवी म्हणजे Strobilanthes reticulata सामूहिक आणि भरभरून फुलली. सदर पठाराचं नाव मी आवर्जून देत नाहीये. किमान माझ्याकडून तरी अधिक माहिती उघड होऊन कारवीचं नुकसान होऊ नये म्हणून हा अनुल्लेख. दोन आठवड्यांपूर्वी हे फुललेलं पठार बघून आलो होतो. पुढच्या नोंदींसाठी आठवडाभरानं परत या ठिकाणी गेल्यावर चित्र इतकं पालटेल असं मुळीच वाटलं नव्हतं. गणेशोत्सवानंतर कुठल्या तरी YouTuber ने Youtube आणि Instagram वर या फुलांची चित्रफीत आणि रील पत्त्यासह (अगदी गूगल पिनसहित) टाकली आणि घात झाला.
मंगळवारचा आडनिडा दिवस असूनही जवळजवळ ५० गाड्या रस्त्यावर, पठारावर, कारवीच्या आत लागल्या होत्या. शे-दोनशे माणसे आत पठारावर कारवीत शिरली होती. पुढे दुपारी ही संख्या दुप्पट – तिप्पट झाली असावी. ही गर्दी काय करत होती? काय करत नव्हती हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. उभ्या पिकात गुरं ढोरं शिरावीत आणि दिसेल तिथे तोंड लावावं आणि जितकं खावं तितक्याची नासाडीही करावी तसंच काहीसं ही सगळी मंडळी करत होती. प्रत्येक जण फुलांबरोबर फोटो काढण्यात आणि रील बनवण्यात दंग होते. ज्यांना आजूबाजूची माणसं आपल्या फोटोत, रीलमध्ये असू नयेत असं वाटत होतं ती सगळी दूर पठारावर अजून आतवर एकटे दुकटे जात होते (त्यांना बहुदा हे माहीत नसावे की कारवीत विषारी सापांचा धोका असतो). त्यासाठी कारवी तुडवून पायवाटा केल्या होत्या. काही जणी रस्त्यावर मेकअप करून रीलसाठी तयार होत होत्या. कित्येक जणांनी दुचाकी (आणि प्रसंगी चारचाकी) कारवीत घातल्या होत्या. त्यामुळे अनेक फुललेली झुडपं जमीनदोस्त झाली होती. इतकी गर्दी बघून चहा आणि नारळ पाण्याच्या गाड्या लागल्या होत्या. रस्त्यालगतची कारवीची झुडपं तर चिरडली होतीच, पण त्याच बरोबर पठारावरची झुडपं लोकांनी तोडून रस्त्यावर टाकली होती. मला खरं तर ही वृत्तीच कळलेली नाही. ज्याचं सौदर्य आपण बघायला आलो आहे तेच नासायचं, पायदळी तुडवायचं ही वृत्ती अनाकलनीय आहे. पण इथे जी गर्दी झाली होती ती बहुतांश गर्दी फुलांच्या प्रेमानं नक्कीच झाली नव्हती. बरेचसे आले होते आपली नार्सिसिस्ट कंड शमवायला. फुलं ही फक्त एक निमित्तमात्र होती. एखाद्या प्रॉप सारखी. मुख्य पात्र होती त्यात नाचणारी, उड्या मारणारी, धावणारी, लोळणारी माणसं, त्यांच्या या लीला टिपणारा कॅमेरामन आणि Youtube, फेसबुक, इंस्टाग्रामसारखी माध्यमं. मग या साऱ्या खटाटोपात आपलं काम झाल्यावर ही फुलं मेली काय आणि जगली काय, आपल्याला काय फरक पडतो?
हे ही वाचा…वेड्या दोस्तीतील शहाणीव…
हे सारं बघून माझं मन विषण्ण झालं. माझ्या मनावर ओरबाडल्यासारखे ओरखडे पडले. या पठारावर मी गेल्या ४-५ वर्षांत प्रत्येक ऋतूमध्ये आलो आहे. आपला अभ्यासाचा, प्रेमाचा विषय असा पायदळी तुडवला जाणं यापेक्षा दु:ख ते काय असू शकतं? हल्ली वनस्पती, पक्षीअभ्यासक नवीन, दुर्मीळ, उत्तम असं सगळं, त्याचे पत्ते दुसऱ्या कोणाला (पर्यटक, सामान्य माणसं) सांगत नाहीत. यामागे कास पठारावरची उत्तम शिकवण अभ्यासकांच्या गाठीशी आहे. त्यामुळे अशा ठिकाणांची माहिती अत्यंत गुप्त ठेवायची हा आता अभ्यासकांचा आणि तज्ज्ञांचा अलिखित नियम आहे. मात्र सदर पठारावरची कारवी सहज दृष्टीस पडणारी असल्यामुळे अशीच कोणीतरी आजच्या भाषेत व्हायरल केली आणि मग सगळे कारवीच्या उभ्या पिकांत शिरले. कारवीचं सामूहिक फुलणं हा खरं तर निसर्गात मधमाश्यांसाठी, फुलपाखरांसाठी, मुंग्या आणि मुंगळ्यांसाठी अनुपम्य सुखसोहळा असतो. २०२४ हे कारवीचं सामूहिक फुलायचं वर्ष. हा सोहळा जसा कीटकांसाठी आहे तसाच माणसांसाठी नेत्रसुखाचा असू शकतो. असा सोहळा बघायला जरूर जावं. पण हे भान ठेवून की ही फुलं आपल्यासाठी फुललेली नाहीयेत. आपल्या नार्सिसिस्ट पोस्ट्स आणि सेल्फीसाठी तर मुळीच नाही. या सोहळ्यातली मुख्य उत्सवमूर्ती कारवी आहे आपण हे भान सोडता कामा नये. गणेशोत्सवात आपण गणपती बघायला गेलं की गणपतीला बाजूला करून आपण मखरात बसून फोटो काढत नाही. तसंच आहे हे. एका नवऱ्याने तर आपल्या बायकोला कारवीचं झुडूप पायाने दाबून त्याच्या मधोमध उभी करून तिचा फोटो काढला. थोडक्यात, मखरातून देवाला बाजूला करून बायकोला बसवून फोटो काढावा तसं. कास पठाराला कुंपण घालायचा निर्णय दुर्दैवी आहे असंच माझं इतके दिवस मत होतं. पण तो बहुदा बरोबर निर्णय होता, असं या प्रकारावरून माझं मत होऊ लागलं आहे.
याच संदर्भात केरळमध्ये दोन वर्षांपूर्वी अनुभवलेला नीलकुरुंजीचा उत्सव आठवला. नीलकुरुंजी म्हणजे १२ वर्षांनी फुलणारी कारवीचीच दक्षिणेतली बहीण. तिथेही हजारोंच्या संख्येने केरळी माणसं अवघड डोंगरी वाट चढून फुललेली नीलकुरुंजी बघायला आले होते. नीलकुरुंजी तोडायला कायद्याने बंदी आहे. गुन्हा करणाऱ्याला कारावास, दंड अशी शिक्षा आहे. तिथे कोणी फुलं तोडत नव्हतं, पायदळी तुडवत नव्हतं. मल्याळी माणसाचं कुरुंजीवर मनापासून प्रेम आहे.
खरं तर आपल्याकडची पठारावरची ही भुईकारवी संख्येने कुरुंजीपेक्षा कमी आहे. त्यामुळे तिच्या संख्येला धक्का लागला तर घातच होईल. गेल्यावर्षी फुलून मरून गेलेल्या झुडपाच्या पायांशी नवीन पिढी जन्माला येऊन वाढत होती. ही सगळी नवीन अंकुरलेली पिल्लं पायदळी तुडवून मेलेली दिसली. माणसाच्या नार्सिसिस्ट वृत्तीची किंमत या कारवीला किती मोजायला लागेल हे येणारा काळच ठरवेल. एक मात्र नक्की की निसर्गाच्या या अनुपम सोहळ्याला या गर्दीने नख लावलं. ओरबाडलं. हे असंच जर चालू राहिलं तर उद्या हे पठार तुकतुकीत गोटा होईल. आणि मागे राहील फक्त रील्स आणि यूट्यूबवर दिसणारी कारवी. माझी यावर्षी कारवीचा अभ्यास करण्याची संधी हुकलीच पण परत या पठारावर तशी संधी मिळेल की नाही याचीच शंका वाटते.
हे ही वाचा…मनोहर मालिका आणि…
आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय? कोणी म्हणेल की या बाबतीत प्रबोधनाने फरक पडेल. कसं करावं प्रबोधन? कारवीच्या झुडपावर उभी राहून रील करणारीला काय सांगावं? ‘ताई असं करू नकोस’ म्हणून? की माझा फोटो काढ असं सांगणाऱ्या एखाद्या कॉलेजमधल्या पोराला समजावून सांगावं? का पुन्हा वनखात्याने कुंपण घालवं सगळीकडे आणि सगळ्यांनाच (अभ्यासकांसकट) बंदी करावी फुलांना हात लावण्यासाठी? का सोडून द्यावं निसर्गावर की तो आपल्या बाळांची काळजी वाहील म्हणून? नक्की करावं काय? कोणी म्हणेल की निसर्गातले सौंदर्य काही कोणाची मक्तेदारी, मालकी नाही. हे बरोबरच आहे. ही जशी सामूहिक मालकी आहे तशी सामूहिक जबाबदारीही आहे. ही जबाबदारी सगळ्यांनी मानली तर भविष्यात अशी अविवेकी कृत्ये टाळता येतील. adittyadharap@yahoo.com