प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यंगचित्रकार शंकर आणि पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये एक अद्भुत नातं होतं. दोघंही एकमेकांचे चाहते होते. दोघांनाही एकमेकांच्या कामाविषयी नितांत आदर होता. दोघंही एकमेकांना असंख्य वेळा भेटले होते. दोघांनीही कधीही आपापला सुसंस्कृतपणा सोडला नाही. आणि मुख्य म्हणजे मर्यादाही ओलांडल्या नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं  म्हणजे व्यंगचित्र आणि लोकशाही या परस्परपूरक गोष्टी आहेत याची जाणीव दोघांनाही होती.

शंकर आणि नेहरू यांची पहिली भेट १९३९ साली जिनेव्हा इथं झाली. मैत्री सुरू झाली. दोघांमध्ये अनेक समान गुण होते. त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे स्वत:वर केलेल्या विनोदाला खळखळून हसून दाद देणं!

केशव शंकर पिल्ले म्हणजेच व्यंगचित्रकार शंकर (३१ जुलै १९०२- २६ डिसेंबर १९८९)  विज्ञानातील पदवी घेतल्यानंतर मुंबईला आले. लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन बरोबरीनेच एका जहाज कंपनीमध्ये क्लार्क म्हणून काम करू लागले. व्यंगचित्रांची सुरसुरी मनात होतीच. म्हणून ‘फ्री प्रेस’मध्ये काही कार्टून्स त्यांनी काढली. त्यावेळी फ्री प्रेसमध्ये काम करत असलेले एक संपादक नंतर दिल्लीला ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये गेले आणि त्यांनी शंकर यांना मुंबईतलं सर्व काही सोडून दिल्लीला पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून या अशी ऑफर दिली. आणि भारतीय व्यंगचित्रकारितेमधलं ‘शंकर’ हे पर्व सुरू झालं. किंबहुना, भारतीय राजकीय व्यंगचित्रकलेचं महापर्व सुरू झालं असं म्हटलं तरी चालेल.

शंकर हे भारतीय राजकीय व्यंगचित्रकलेचे पितामह समजले जातात. सुरुवातीच्या काळात ‘हिंदुस्तान टाइम्स’मध्ये त्यांनी भरपूर राजकीय व्यंगचित्रं काढली. त्यात लॉर्ड माउंटबॅटनपासून गांधीजींपर्यंत अनेक लोकांवर त्यांनी व्यंगचित्रांतून मनसोक्त टीकाटिप्पणी केली. स्वातंत्र्यानंतर मात्र त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा निर्माण झाली. २३ मे १९४८ रोजी त्यांनी ‘शंकर्स वीकली’ हे व्यंगचित्रांना वाहिलेलं देशातील पहिलं साप्ताहिक सुरू केलं. (१९७५ साली आणीबाणीत ते बंद पडलं.) प्रकाशन समारंभाला प्रत्यक्ष पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. आणि त्या प्रकाशन समारंभातच एक सुप्रसिद्ध वाक्य जन्माला आलं. ते म्हणजे त्यांनी शंकर यांना सल्ला दिला की, ‘‘माझ्यावर खुशाल व्यंगचित्रं काढ. घाबरू नकोस. डोन्ट स्पेअर मी, शंकर!’’

आणि पुढची अनेक र्वष- म्हणजे नेहरूंच्या अंतापर्यंत शंकर हे त्यांच्यावर व्यंगचित्रं काढत राहिले. या कालखंडातील काही निवडक व्यंगचित्रांचा संग्रह नंतर ‘चिल्ड्रेन बुक ट्रस्ट’ने प्रकाशित केला. त्याचं नावच आहे- ‘डोन्ट स्पेअर मी, शंकर.’ या चारशे पानी संग्रहात नेहरू यांच्यावर काढलेली पावणेचारशे व्यंगचित्रं आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं शुभेच्छापत्र या संग्रहात आहे. यात १९४८ सालातलं पहिलं व्यंगचित्र आहे आणि शेवटचं आहे नेहरू जाण्याच्या अगोदर पंधरा दिवस काढलेलं! नेहरू नेमके कसे आहेत याविषयी शंकर यांनी अगदी हृदयापासून लिहिलं आहे. ते म्हणतात, ‘‘पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचं रहस्य म्हणजे ते मनातून अगदी लहान मूल आहेत. लहान मुलाचा निरागसपणा, ताजेपणा, सर्व गोष्टींबद्दल असलेलं कुतूहल, छोटय़ा गोष्टींबद्दल आश्चर्य वाटणं हे लहान मुलाचे सगळे गुण त्यांच्यात आहेत. बंदुका, विमान वगैरे त्यांना खेळणी वाटतात. भल्यामोठय़ा कारखान्यांच्या योजना म्हणजे त्यांना एखादं चित्रमय कोडं वाटतं. गर्दी बघितली की त्यांना उत्साह येतो. मोठी मोठी प्रदर्शनं म्हणजे त्यांना वंडरलॅंड वाटतात. प्रवास म्हणजे एक शोध आहे असं त्यांना वाटतं. आपले सहकारी म्हणजे आपल्या संघातील खेळाडू आहेत असं त्यांना वाटतं. छोटय़ा-मोठय़ा अडथळ्यांमुळे ते चिडचिडे होतात. लोकांचं नेतृत्व करायला त्यांना आवडतं आणि त्यावेळी ते अगदी सेनानायक असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक भलेबुरे प्रसंग आले. त्यांना फसवलं गेलंय, त्रास दिला गेला आहे, धमकावलंय. पण तरीही ते ‘सिनिक’ झाले नाहीत. खरं तर ते संपूर्ण आशियाचे नेते आहेत आणि जगातील महत्त्वाचे मुत्सद्दी आहेत. पंतप्रधान कोणीही असो, पंडितजी आम्हाला खूप जवळचे वाटतात.’’

‘‘माझा कधी कधी स्वत:वर ताबा राहत नाही. मी भयंकर चिडतो. पण नंतर लगेचच भानावर  येतो,’’ असं नेहरू म्हणत. या त्यांच्या स्वभावावर शंकर यांनी हे सोबतचं चित्र काढलं आहे (नेहरूच नेहरूंना सावरताहेत!), जे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे.

भारतासारख्या प्रचंड विरोधाभास असलेल्या, चित्रविचित्र, महाकाय देशाचा पहिला पंतप्रधान होणं हे प्रचंड आव्हानात्मक काम होतं यात शंकाच नाही. सर्व प्रकारची घडी बसवणं हे फार मोठं काम नेहरू करत होते. त्यासाठी त्यांना अत्यंत जाणकार, बुद्धिमान सहकाऱ्यांची मदत मिळत होती. आणि काही कोत्या बुद्धीचे सहकारी खोडेही घालत होते. तथापि, नेहरू हे त्या काळात भारतीयांचे प्रचंड मोठे आशास्थान होते, हे मात्र नक्की. या भावनेतून शंकर हे नेहरूंवर व्यंगचित्रं काढत. एखाद्या आईचं आपल्या मुलाच्या सर्वागीण प्रगतीकडे जसं लक्ष असतं, तसं नेहरू हे देशाकडे पाहत आहेत या अर्थाचं हे चित्र.. आठव्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी रेखाटलेलं. एकूणच देशाच्या प्रगतीविषयी (म्हणजे वजन आणि भविष्य) ते काळजीपूर्वक पाहत आहेत. कारण स्वातंत्र्याला अकरा र्वष झाली आहेत. तो मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटतोय. पलीकडून रशिया, अमेरिका आणि इंग्लंड हे उत्सुकतेने पाहताना त्यांनी दाखवले आहेत.

स्वच्छ  रेखाटन- ब्रशने केलेलं, ठोस आणि विनोदी कल्पना, उत्तम अर्कचित्र ही शंकर यांची वैशिष्टय़ं!

पंतप्रधान झाल्यावर असंख्य छोटे-मोठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न नेहरूंच्या अवतीभोवती नाचू लागले आणि त्यामुळे त्यांची दमछाक व्हायला सुरुवात झाली. हे वास्तव शंकर यांनी ‘बिचारे आजोबा आणि त्यांना भंडावून सोडणारी, दंगामस्ती करणारी अनेक नातवंडं’ या रूपकात झकास रेखाटलं आहे. पंडितजींना लहान मुलं खूप आवडायची याची यासंदर्भात इथं आठवण येते.

नेहरूंच्या आवडत्या ‘पंचशील’ या संकल्पनेवर चीनचे तत्कालीन नेते चाऊ एन लाय आणि नेहरू हे एकमेकांना पत्र लिहीत आहेत- यावरचं हे चिनी आक्रमणाच्या आधी काढलेलं चित्र खूप बोलकं आहे.

‘शंकर्स वीकली’ सुरू केल्यावर शंकर यांनी एक फार मोठं काम केलं ते म्हणजे देशातील अनेक नवोदित व्यंगचित्रकारांना त्यांनी संधी दिली. अबू अब्राहम, विजयन, कुट्टी ही त्यापैकी काही नावं. शंकर यांच्या विनंतीवरून बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘शंकर्स वीकली’साठी एखाद् दुसरं राजकीय व्यंगचित्र रेखाटलं आहे. शंकर यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तीनही सन्मान मिळाले. त्यांच्या कार्याच्या मोठेपणाचा सन्मान म्हणून केरळ सरकारने त्यांचं एक भव्य म्युझियम त्यांच्या जन्मगावी म्हणजे कायमकुळम इथं उभं केलं आहे. या दोन मजली म्युझियममध्ये त्यांची शेकडो व्यंगचित्रं आहेत. भारतातलं हे या प्रकारचं पहिलं व्यंगचित्र म्युझियम आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cartoon and prime minister political cartoonist shankar and prime minister pandit jawaharlal nehru hasya ani bhasya dd70