प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
काहीतरी अतिशय क्षुल्लक विषय किंवा प्रसंग असतो. त्यावरून अनेक लोक कल्पनांचे इमले चढवतात. ते इमले इतके उंच जातात, की लिफ्टने शेवटच्या मजल्यावर गेलं की डायरेक्ट स्वर्गच! म्हणजे सगळा कलावंतांच्या कल्पनेचा आविष्कार! या अनेक कलावंतांत व्यंगचित्रकारही असतात. फक्त ते सुताऐवजी रेषा वापरतात आणि स्वर्ग गाठतात!
म्हणजे ते कल्पनेनेच स्वर्ग, त्यातील वातावरण, त्याचे मुख्य द्वार, त्यावरचे सेंट पीटर वगैरे द्वारपाल, चित्रगुप्त, रंभा, अप्सरा, पाप-पुण्याचा हिशेब, नरकातल्या शिक्षा, देवदूत इत्यादी इत्यादी वातावरणात रमतात आणि त्यावर धमाल म्हणावीत अशी हास्यचित्रंही काढतात. जगातल्या बहुतेक सर्व धर्मामध्ये स्वर्ग आणि नरक या कल्पना आहेत. (होय. कल्पनाच! कारण प्रत्यक्ष ते कोणी पाहून आल्याचा काहीच पुरावा उपलब्ध नाही!) त्यामुळे जगभरातले व्यंगचित्रकार हास्याच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करून स्वर्गातल्या आपल्या खात्यावर पुण्याचे दोन-चार गुण टाकत असणार, हे नक्की!
मुळात एक गोष्ट सर्व व्यंगचित्रकारांनी गृहीत धरलेली आहे की, स्वर्ग हा वर आकाशात आहे आणि तिथून देव किंवा देवदूत वगैरे खाली पृथ्वीवरच्या लोकांकडे पाहत आहेत! आपली पूर्वी ओळख झालेले व्यंगचित्रकार चार्ल्स बरसोट्टी यांनाही हा विषय खूप आवडत होता असं दिसतं. त्यांच्या एका चित्रात एक देवदूत हातात वीज घेऊन ढगांवर उभा आहे आणि आता ही वीज कुठे बरं पाडावी याचा निर्णय घेण्यासाठी तो टॉस करतोय असं चित्र आहे. तर दुसऱ्या एका चित्रात एक देवदूत दुसऱ्याला म्हणतोय, ‘माझी खात्री आहे- तू पुन्हा त्याच माणसावर वीज टाकणार नाहीस!’ (वीज एकाच ठिकाणी दोनदा पडत नाही- हा संदर्भ या ठिकाणी आहे)
पण बरसोट्टी यांचे अप्रतिम चित्र म्हणजे रेक्स नावाचा लाडका कुत्रा मेल्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनंतर त्याचा मालक बॉबी स्वर्गाच्या दारावर पोहोचतो. तेव्हा सेंट पीटर म्हणतो, ‘‘अच्छा.. तू बॉबी आहेस तर! अरे, हा रेक्स तुझी किती वर्षे वाट बघतोय!’’ या चित्रात बॉबी, सेंट पीटर आणि रेक्स यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेतच; पण ही कल्पनाच किती अद्भुत आहे! मालक आणि कुत्रा यांचं एकमेकावरचं अनन्यसाधारण प्रेम या चित्रातून व्यक्त होतं. लहानपणी रेक्स आणि बॉबी यांची किती घट्ट मैत्री असेल हाही विचार मनात येतो!
‘न्यू यॉर्कर’मधल्या ग्रेगरी या व्यंगचित्रकाराने खूप वेगळा विचार मांडणारं एक व्यंगचित्र काढलं आहे. साधारणपणे आपली अशी समजूत असते की, स्वर्गात किंवा नरकात सर्व समान असतात आणि आपापल्या कर्माप्रमाणे सुख वा दु:ख भोगत असतात. पण या व्यंगचित्रकाराच्या मते, पृथ्वीवरच्या सामान्य माणसांचा स्वर्ग वेगळा आणि सेलिब्रिटींचा स्वर्ग वेगळा! हा स्वर्ग नेहमीच्या स्वर्गापेक्षा आणखीन वर आहे असं त्याचं म्हणणं आहे.
आणखी एका व्यंगचित्रात स्वर्गामध्ये आलेली बाई आपला नवरा दुसऱ्या एका बाईच्या बाहुपाशात पाहून चिडली आहे. तेव्हा तिचा नवरा तिला स्पष्टपणे बजावत म्हणतो, ‘‘हे बघ, पृथ्वीवर असताना घेतलेली शपथ मी पाळलेली आहे. ती होती- मरेपर्यंत मी तुझ्याशी एकनिष्ठ राहीन.’’
एका व्यंगचित्रात नरकात पाच-सहा म्हातारी माणसं एकत्र गप्पा मारताना दाखवली आहेत आणि त्यातला एक जण म्हणतोय, ‘‘अरे, तुमच्या लक्षात आलं का? आपण सगळे एकाच कंपनीचे डायरेक्टर होतो.’’ (यावरून पृथ्वीवर त्या कंपनीचं काय झालं असेल याची कल्पना करायला हरकत नाही.)
‘न्यू यॉर्कर’मधल्या दाना फ्राडन या व्यंगचित्रकाराची कल्पनाशक्ती तर फारच अफाट आहे. त्याने स्वर्गातल्या ढगात एक फलकच लावलाय. त्यावर लिहिलंय- ‘‘सावधान! पुढे ओझोनचे छिद्र आहे!’’ एखाद्या देवदूताला या विलक्षण जागेला भेट द्यायची असेल तर हा फलक उपयोगी पडू शकतो, ही कल्पना त्यामागे आहे.
बऱ्याच व्यंगचित्रांत देवदूतांच्या डोक्यावर एक रिंग तरंगत असलेली दाखवलेली असते. तिला इंग्रजीत ‘हेलो’ असं म्हणतात. यावर जॅक मॅगवेल या इटालियन व्यंगचित्रकाराचं चित्र एकदम वेगळीच कल्पनाशक्ती दाखवणारं आहे. स्वर्गामधल्या स्वर्गीय संगीताच्या कार्यक्रमाला अनेक देवदूत जमले आहेत. अशा वेळी एक देवदूत पुढच्या रांगेतील दुसऱ्या देवदूताला म्हणतोय, ‘‘कृपया.. तुमचा तो हेलो जरा काढून ठेवाल का? (आम्हाला पुढचं नीट दिसत नाहीये.)’’
एका व्यंगचित्रात तर फारच अफलातून कल्पना रेखाटली आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये किंवा मॉलमध्ये वॉशरूमसमोर बायकांची गर्दी जास्त असते. हा विषय घेऊन व्यंगचित्रकाराने स्वर्गातल्या वॉशरूमसमोरही स्त्रियांचीच गर्दी जास्त दाखवली आहे आणि त्यातली एक जण वैतागून म्हणते, ‘‘छे! इथेसुद्धा लाइन.’’
स्वर्ग म्हटलं की पाप-पुण्य याबरोबरच पुनर्जन्म हाही महत्त्वाचा विषय! बरीच र्वष वाट पाहून थकलेल्या एकाला स्वर्गातली पुनर्जन्म विभागातली ऑफिसर सांगते, ‘‘अभिनंदन. तुला एका माशीचा पुनर्जन्म मिळालाय. हॅव अ नाइस डे!’’ या माशीचं आयुष्य फक्त एका दिवसाचं असतं, म्हणून ती ‘हॅव अ नाइस डे..’ असं म्हणते, ही यातली मेख.
हल्ली सगळीकडे संगणकीकरणाचं युग आहे. अनेक सरकारी खातीसुद्धा ‘आता केवळ एका क्लिकवर हे उपलब्ध आहे..’ अशी जाहिरात करतात. अशा वेळी समजा, स्वर्गाचं संगणकीकरण झालं तर तिथे काय बदल घडतील याची कल्पना करून एक मालिका मी रेखाटली होती. पाप-पुण्याचा हिशोब ज्या कम्प्युटरमध्ये आहे त्यात व्हायरस घुसतो आणि सगळ्यांचीच पुण्यं दिसेनाशी होतात. याचं कारण व्हायरस तयार करणारे काही आयटी इंजिनीअर्स तिथे येतात, वगैरे वगैरे. किंवा एक मोठ्ठा नोटीस बोर्ड- ज्यावर लिहिलंय, ‘येथे अप्सरांसोबत सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे.’ याच मालिकेतील एका चित्रात एका पुनर्जन्मोत्सुक माणसाला चित्रगुप्त सांगताहेत की, ‘खरं म्हणजे तुला एका उंदराचा पुनर्जन्म मिळणार होता. पण तुझा सॉफ्टवेअरमधला अनुभव पाहून आम्ही तुला इथे स्वर्गातच माऊस म्हणून वापरायचं ठरवलंय.’
स्वर्गातलं हे संगणकीकरणसुद्धा एका झटक्यात झालं नसावं. विशेषत: ‘जिथे खरी गरज आहे तिथे सगळ्यात उशिरा’ हा सरकारी नियम कदाचित तिथेही वापरला गेला असेल. हे गृहीत धरून ‘पुनर्जन्म’ या सेक्शनमध्ये समजा एक वाट पाहून कंटाळलेले गृहस्थ चौकशीसाठी गेले तर त्यांना काय अनुभव येईल, ते मी एका चित्रात रेखाटलं. हा अनुभव पाहून पृथ्वीवर पेन्शनसाठी आणि इथे पुनर्जन्मासाठी खेटे घालायला लागतात असाच विचार या गृहस्थांच्या मनात आला असणार!