‘‘माझ्या एका व्यंगचित्रामुळे संपूर्ण आंध्रात फार गदारोळ माजला होता. एनटीआर मुख्यमंत्री होते त्यावेळीची गोष्ट. त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे संपूर्ण विधानसभेतील फर्निचर बदललं. ते पाहायला पत्रकारांना बोलावलं. मलाही बोलावलं होतं, पण अर्थातच मी गेलो नाही. कारण अशा प्रकारच्या उधळपट्टीला माझा विरोधच होता. नंतर दुसऱ्या दिवशी मी कल्पनेनंच एक चित्र काढलं. एक कलाकुसर असलेली खुर्ची दाखवली. त्यावर कुत्रा बसलेला दाखवला आणि तो कुत्रा चपलेचा विचार करतोय असं दाखवलं. तेलुगू भाषेमध्ये चप्पल म्हणजे भ्रष्टाचार अशा आशयाची एक कविता आहे. आणि कुत्रा कुठंही बसला तरी तो त्याला आवडणाऱ्या गोष्टीचाच विचार करणार. हा अर्थ वाचकालाही पटकन उमगला.
योगायोगानं खुर्चीचं डिझाइन हे प्रत्यक्षातल्या स्पीकरच्या खुर्चीशी मिळतंजुळतं होतं. त्यावरून आमदार चिडले. त्यांनी माझ्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. तो पास झाला. सहा महिने तो खटला चालला. पेपरचे मालक दासरी नारायणराव यांचे एन. टी. रामराव यांच्याशी चांगले संबंध होते, त्यामुळे शेवटी संपादकांनी माफी मागून ते प्रकरण मिटवलं.’’ तेलगूतील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार मोहन हे अत्यंत शांततेनं हा प्रसंग सांगत होते.
‘‘पण तुमच्या खुर्चीचं डिझाइन स्पीकरच्या खुर्चीशी मिळतं कसं काय निघालं?’’ मी विचारलं.
‘‘अहो, एनटीआर यांना आम्ही लहानपणापासून पाहत असल्याने त्यांची टेस्ट काय असेल याची मला कल्पना होती.’’
वरकरणी निरुपद्रवी किंवा गमतीशीर वाटणारं हे व्यंगचित्र प्रत्यक्षात किती मर्मभेदी होतं आणि ज्यांना लागायचं त्यांना ते बरोबर लागलं हे यातून दिसतं. मोहन हे डाव्या विचारसरणीचे होते. चळवळीत सक्रिय भाग घेणारे होते. तुरुंगात गेले होते. तिथल्या भिंतीवर व्यंगचित्र काढून ते आपला क्षोभ मिटवायचे. तिथं त्यांना कम्युनिस्ट नेते इंद्रजीत गुप्ता, भूपेश गुप्ता वगैरे भेटले आणि विचारांची बैठक पक्की झाली.
गंमत म्हणजे मोहन हे डाव्या विचारसरणीचे असले तरी त्यांची व्यंगचित्र किती तरी भांडवलशाही वृत्तपत्रांनी आवर्जून छापली. राजकीय मतभेद असले तरी नेत्यांनी प्रत्यक्षात कधी वैर धरलं नाही. वर उल्लेखलेला प्रसंग किती तरी वर्षांपूर्वीचा आहे. आता मोहन नाहीत तरी त्यांची त्वेषाने मारलेली रेषा आणि जपलेलं तत्त्व अजूनही स्पष्ट आठवतं.

भारताच्या स्वातंत्र्याच्या सुमारास इंग्रजीसह दक्षिणेतील सर्व भाषा त्याचप्रमाणे मराठी, बंगाली इत्यादी भाषेतही राजकीय व्यंगचित्रकला जोम धरत होती आणि मुख्य म्हणजे वृत्तपत्रांनाही त्याची निकड भासू लागली. लोकही हळूहळू ही कला समजून घेण्याच्या मन:स्थितीमध्ये आले. विरोधी विचारांनाही समजून घ्यायचं असतं हे जनतेला या माध्यमातून कळू लागलं. विनोद, विशेषत: राजकीय व्यंगचित्र ही खेळकरपणे घ्यायची असतात. त्याचं मर्म समजावून घ्यायचं असतं, याचं जणू काही हे शिक्षणच सुरू होतं.

राजकीय व्यंगचित्रकार हा लोकशाहीतला महत्त्वाचा घटक असतो याची जाणीव ब्रिटिशांच्या जाचक शाृंखलातून नुकत्याच बाहेर पडलेल्या आणि स्वतंत्र भारतात हळूहळू उभ्या राहणाऱ्या प्रजासत्ताकाला होत होती.

बंगालमध्ये प्रफुलचंद्र लाहिरी अर्थात पीसीएल हे राजकीय व्यंगचित्रकार अत्यंत प्रभावी आणि निर्भीड व्यंगचित्र काढणारे म्हणून प्रसिद्ध होते. महात्मा गांधी हे ज्यावेळी ‘महात्मा’ होते, त्या वेळीही त्यांनी एक व्यंगचित्र काढलं. भारतीय गाईचं दूध काढून गांधीजी ते पाकिस्तानी सापाला पाजत आहेत असं हे चित्र. लोकांना जे समजायचं ते समजलं. कारण इतर भारतापेक्षा बंगालमध्ये हिंदू-मुस्लीम संघर्षाची धग अधिक जाणवत होती. परंतु याच गांधीजींवर त्यांनी शेवटचं व्यंगचित्र काढलं. ते गांधीजींच्या उपोषणावर होतं. धार्मिक विद्वेषाचा पिसाळलेला हत्ती झोपलेल्या गांधीजींवर चाल करून येतोय असं भविष्यवेधी व्यंगचित्र त्यांनी काढलं. याचाच अर्थ व्यंगचित्रकार कायमच एखाद्या व्यक्तीच्या विरोधात असतो असं नाही, तर त्याला त्या वेळी जे दिसतं त्यातली विसंगती शोधण्याचा त्याचा प्रयत्न असतो.

भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह म्हणजे शंकर पिल्ले ज्यांना आपण ‘शंकर्स वीकली’वाले शंकर म्हणून ओळखतो त्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात व्यंगचित्र काढायला सुरुवात केली आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांची कला बहरली. त्यांचं उदाहरण अगदी उमेद वाढवणारं आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या नेहरूंच्या कालखंडात नेहरूंवर व्यंगचित्रं काढली जाणे अगदी स्वाभाविकच. पूर्वीही शंकर हे अनेक वृत्तपत्रांमधून राजकीय व्यंगचित्र काढत. १९४८ साली त्यांनी ‘शंकर्स वीकली’ या व्यंगचित्र साप्ताहिकाची स्थापना केली. प्रकाशन अर्थातच जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते. त्यांची चांगली ओळख होतीच. नेहरूंचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय लोभस होतं. कलागुणांची आणि कलावंतांची जाण असलेला तो रसिक आणि उमदा माणूस होता. त्यांनी शंकर यांना भाषणातून सांगितलं की, ‘‘कृपा करून मला मोकळं सोडू नका. माझ्यावर भरपूर व्यंगचित्र काढा, निर्भयपणे!!’’ ते सुप्रसिद्ध वाक्य होतं- ‘‘डोन्ट स्पेअर मी शंकर.’’ त्यांचा हा सल्ला शिरोधार्य मानून शंकर यांनी खरोखरीच त्यांना ‘स्पेअर’ केलं नाही. शंकर यांनी नेहरूंवर थोडीथोडकी नाही तर पंधराशेहून अधिक व्यंगचित्र काढली.

काही खोचक, काही भेदक, काही गमतीशीर, तर काही सल्ला देणारी, काळजी व्यक्त करणारी. काही चित्रांत शंकर हे नेहरूंना स्त्रीवेशात दाखवायचे. उदाहरणार्थ- परदेशी जाताना सगळं मंत्रिमंडळ म्हणजे जणू घरातली लहान मुलं म्हणून आई (नेहरू) मुलांना बजावते की, मी परत येईपर्यंत सगळ्यांनी नीट राहायचं, दंगा करायचा नाही! कधी नेहरूंना त्यांनी शकुंतला या पौराणिक स्त्रीमध्ये दाखवलं तर कधी महिषासुरमर्दिनीच्या अवतारात. या सगळ्यातलं एक व्यंगचित्र अगदी इरसाल म्हणावं असं आहे. मोरारजी देसाई यांना अखेरीस नेहरूंनी मंत्रिमंडळात घेतलं या घटनेवरचं हे चित्र.

नेहरूंचं मंत्रिमंडळ म्हणजे जणू जनानखाना आणि त्यातच आता आणखी एक लग्न करून नवीन नवरी (मोरारजी) घेऊन नवरा (नेहरू) आला आहे असा हा प्रसंग! सगळे पुरुष मंत्री दाढी मिशावाले, सगळे विविध प्रकारच्या साड्या नेसलेले, मोरारजींच्या चेहऱ्यावरचे नववधूचं लाजणं आणि पराक्रमी नेहरू!! एकूणच धमाल व्यंगचित्र! पण आश्चर्य याचं वाटतं की त्या काळात नेहरूंनी सोडाच, पण एकाही मंत्र्यांनी यावर आक्षेप घेतला नाही की व्यंगचित्रकाराला तुरुंगात टाकायची धमकी दिली नाही, की मानहानीचा खटलासुद्धा नाही!! हा कलाप्रकार तुलनेने नवा असूनही राजकारणी आणि वाचकांनीही समजूतदारपणे आणि खिलाडूवृत्तीने याला दाद दिली हे महत्त्वाचं.

दरम्यान, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात शंकर यांच्या तालमीत तयार झालेले दोन महत्त्वाचे व्यंगचित्रकार म्हणजे ओ. व्ही. विजयन आणि अबू अब्राहम. शंकर हे केरळचे. विजयन आणि अबू हेही केरळचेच. पण सर्वजण दिल्लीतून राष्ट्रीय विषयांवरची व्यंगचित्रं इंग्रजीतून काढत. प्रत्येकाने स्वत:ची विनोदाची आणि रेखाटण्याची शैली तयार केली.

अबू अब्राहम हे १९७० साली इंग्लंडहून भारतात परतल्यावर विविध नियतकालिकांतून व्यंगचित्रं काढत. स्वत:ची स्वतंत्र चित्रांची शैली, स्वत:चा विनोद आणि तो फारच भेदक, अगदी आतपर्यंत जाऊन पोहोचणारा, निर्भीड. वाचताना कमालीचा बौद्धिक आनंद देणारा. विशेष म्हणजे अबू अब्राहम हे राज्यसभेचे सदस्य होते तरीही त्यांनी तटस्थपणे राजकीय व्यंगचित्रं काढली.

सर्वसामान्यपणे राष्ट्रपतींवर व्यंगचित्रं काढू नये असा संकेत आहे. पण आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांना बाथटबमध्ये दाखवून विविध वटहुकुमांवर सही करताना दाखवलं. खरं तर हक्कभंगाला आमंत्रण देणारं व्यंगचित्र. पण तसं काही त्या वेळी झालं नाही.
भ्रष्टाचार, चमचेगिरी, पक्षांतर, पक्षांतर्गत भांडण इत्यादींचा त्या वेळी सुकाळ होता. पक्षांतरांचा त्यांना भयानक तिटकारा होता. त्या संदर्भातलं त्यांचं हे सोबतचं व्यंगचित्र फार महत्त्वाचं आहे.

अबू यांचं हे चित्र फारच भेदक आणि कोडग्या राजकारण्यांवर ब्रशचे कोरडे ओढणारे आहे. तत्कालीन बहुतेक सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी विविध पक्षांच्या रूपात दाखवलं. उदाहरणार्थ- चरणसिंग, चंद्रशेखर, जगजीवनराम, देवराज अरस, राजनारायण, देवीलाल, अडवाणी इत्यादी इत्यादी आणि या एका मोठ्या झाडावरच्या फांद्यांवर हे सारे बसले आहेत. या चित्राला नाव दिलंय ‘मेटिंग सीजन’. याचा अर्थ इतकाच आहे की विविध जातींचे पक्षी अनैसर्गिकरीत्या एकत्र येऊन लोकशाहीची अंडी घालू शकतात !

निव्वळ राजकीय स्वार्थासाठी नेते जेव्हा विधिनिषेधशून्य युती करतात तेव्हा विजयन यांचा ब्रश अगदी विखारी होतो, असं म्हटलं तरी चालेल. जनता पक्षाच्या कालखंडात या अशा सर्व गोष्टींना अगदी ऊत आलेला होता. विजयन यांच्या चित्रात चरणसिंग, इंदिरा गांधी आणि जगजीवन राम हे तिघेही डुकराच्या रूपात जेवताना दाखवले आहेत आणि भाष्य आहे, ‘‘वर दाखवलेले प्राणी हे डुकरापासून मानव आणि मानवापासून डुक्कर आणि पुन्हा डुकरापासून मानव असे दिसत असले, तरी प्रत्यक्षात ते कोण आहेत हे सांगणं अशक्य आहे!!’’

एकदा भयानक दुष्काळात एका मंत्र्यांनी कबूल केलं की काही ठिकाणी जनतेने अन्नाअभावी गवत खाल्लं! त्यावर विजयन यांचं भाष्य फारच भेदक आहे. ‘‘ग्रास’’ या शब्दावर केलेली ही कोटी समाजवादाचा जप करणाऱ्याना फारच टोचणारी आहे. एखाद्या विषयामुळे व्यंगचित्रकार जेव्हा पेटून उठतो तेव्हा तो किती तीक्ष्ण भाष्य करू शकतो याची ही अस्सल भारतीय उदाहरणं.

भारताने अणुबॉम्ब बनवल्यावर विजयन यांना यातील विसंगती दिसली. अणुबॉम्ब बैलगाडीतून वाहून नेताना त्यांनी दाखवलं आणि म्हटलं, ‘‘शेती आणि सैन्य आपल्या देशाची प्रमुख क्षेत्रे ही अशी एकत्र येतात!’’

देशाच्या फाळणीची झळ लागून कराचीतून भारतात आलेला एक मुलगा पुढे व्यंगचित्रकार झाला. त्याचं नाव राजिंदर पुरी. देशातील अनेक महत्त्वाच्या वर्तमानपत्रांतून त्यांची भेदक, खिल्ली उडवणारी आणि वेगळ्या रेषाशैलीची व्यंगचित्रं यायची.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने (इंदिरा गांधींनी) आपलाच उमेदवार पाडला. त्यावरचं त्यांचं चित्र जबरदस्त आहे. आपल्या पाठीशी असणारा माणूस हा खंजिरही खुपसू शकतो हे त्यातलं मर्म.

पंतप्रधान नरसिंह राव अत्यंत बिकट आर्थिक स्थितीतून मार्ग काढत असताना त्यांना काँग्रेसचा पारंपरिक मतदारही सांभाळायचा होता त्यावरचं त्यांचं चित्र बोलक आहे. वर्ल्ड बँक आणि वोट बँक यांच्या कचाट्यात नरसिंह राव सापडले आहेत असं त्यांनी दाखवलं. त्यांच्या एका चित्रात लालकृष्ण अडवाणी म्हणतात की, ‘मला संघाने घडवले!’ त्यावर संघाचा प्रवक्ता म्हणतो, उगाचच संघाला कशाला दोष देताय!! इतक्या टोकदार भाषेत अडवाणींचं व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास उभा राहतो, हे या कलेचे वैशिष्ट्य आणि व्यंगचित्रकाराच्या प्रतिभेचं दर्शन.

‘गरिबी हटाव’ या योजनेनंतरही गरिबी न हटल्याने एक गरीब माणूस इंदिराजींना म्हणतोय, ‘‘माझी गरिबी मला परत द्या. माझे खूप हाल होताहेत!!’’ ही कल्पनाच अत्यंत हास्यस्फोटक आणि वस्तुस्थिती दाखवणारी आहे. असा विचार फक्त व्यंगचित्रकारच करू शकतो.

नेहरू यांच्यावर त्यांनीही भरपूर चित्रं काढली. पण नेहरू गेल्यानंतर पुरी यांचे चित्र फारच प्रभावी आहे. पोकळी जाणवते असे आपण म्हणतो, परंतु ते चित्रातून मांडणं फारच विलक्षण आहे. नेहरू ते मोदी असा व्यंगचित्रकार राजिंदर पुरी यांचा विस्तीर्ण पट होता.

देशात सर्वात लोकप्रिय व्यंगचित्रकार म्हटल्यावर वाचकांना आर. के. लक्ष्मण यांचं नाव आठवणं स्वाभाविकच आहे. उत्तम रेखाटन, उत्तम अर्कचित्र, विषय समजावून सांगण्याची हातोटी आणि उत्फुल्ल विनोदबुद्धी ही लक्ष्मण यांच्या यशस्वितेची प्रमुख कारणं. सर्वसामान्यांच्या मनाला झटकन भावेल अशी सारी रचना. याशिवाय आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची एकाच वर्तमानपत्रातील दीर्घ कारकीर्द. अर्थात हेही अत्यंत अवघडच.

जवळपास डझनभर पंतप्रधान आणि शेकड्यांनी मंत्री, मुख्यमंत्री यांना त्यांनी केवळ रेखाटलंच नाही, तर स्वत:च्या ब्रशनुसार वाकायला लावलं आणि वेळोवेळी या बड्या मंडळींना हास्यास्पद बनवलं. ही सारी बडी माणसं खरी कशी आहेत, हे दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं खरं काम. ते लक्ष्मण यांनी शंभर टक्के केलं. लक्ष्मण यांचे अनेक सत्ताधीशांशी चांगले संबंध होते, पण तरीही त्यामुळे त्यांनी कधीही या नेत्यांना ‘कन्सेशन’ दिलं नाही. त्यांची प्रसंगानुरूप योग्य ती किंमत त्यांनी केली!
संस्थानिकांना तनखे द्यायचे की नाही, किती द्यायचे याची चर्चा सुरू असतानाच इंदिरा गांधी यांनी अचानक निर्णय जाहीर करून विषयच संपवला. हे सारे वर्णन लक्ष्मण यांनी नेमकं केलंय. बुद्धिबळाचा पट उधळून लावून ‘‘मी जिंकले’’ असे जाहीर करणाऱ्या इंदिराजींचं व्यक्तिमत्त्व त्यांनी रेखाटलं आहे. आता तुम्ही राजे नाहीत, पण मी राणी आहे असं जणू काही इंदिराजी म्हणतात असं वाटतं. (आणि ते बऱ्याच अर्थाने खरंही होतं.)

गांधी घराणेशाहीवरचं त्यांचं चित्र म्हणजे फ्रेममधल्या नेहरूंपासून पाळण्यातल्या राहुलपर्यंत दाखवणं हे व्यंगचित्रकाराचं कसबच!!

सर्वांना सदैव आवडणारी लक्ष्मण यांची काही पॉकेट कार्टून्स ही आणीबाणीमध्ये ‘सेन्सॉर’ केली गेली. वास्तविक राजकीयदृष्ट्या निरुपद्रवी अशी ही व्यंगचित्रं. पण सत्तास्थानी बसलेल्या माणसांना किमान विनोदबुद्धी नसेल, तर मग हे असे विनोदी प्रसंग घडतात आणि इतिहासात नोंदवले जातात.

व्यंगचित्रकाराला कधी जेलमध्ये टाकू नये, असं अजित नैनान या व्यंगचित्रकारांने फार खुबीनं दाखवलं आहे. कारण कोणत्याही कठीण परिस्थितीतही विनोद निर्माण करण्याचं महत्त्वाचं आयुध हे व्यंगचित्रकाराकडे असतंच असतं, याची सत्ताधीशांनी नेहमी नोंद घ्यावी.

जवळपास पन्नास वर्षं प्रथम इंग्रजी आणि नंतर मराठी भाषेत व्यंगचित्रांची भाषा आणि ताकद उलगडून दाखवणारं अस्सल मराठी नाव म्हणजे व्यंगचित्रकार बाळ ठाकरे. प्रभावी रेखाटन, कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही कोनातून, कोणत्याही हावभावासकट अर्कचित्र काढण्याचं वरदानच जणू बाळासाहेब यांना मिळालं होतं. विषयाचा आशय समजावून सांगून त्यातून रोखठोक भाष्य करणं, उपजत असलेली हजरजबाबी विनोदबुद्धी आणि भाषेशी खेळण्याची हातोटी ही सारी बाळासाहेब ठाकरे यांची आयुधं होती. त्यामुळेच ते विलक्षण लोकप्रिय ठरले. त्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे निर्भयपणा. त्यामुळे कशाचीही तमा न बाळगता हे बिनधास्तपणे व्यंगचित्र रेखाटत असत. नेहरूंपासून ते वाजपेयी, अडवाणींपर्यंत चाळीस वर्षांचा कालखंड त्यांनी रेखाटला आहे.

त्यांच्या एक ा राजकीय व्यंगचित्रांचं थोडक्यात रसग्रहण करता येईल. जवाहरलाल नेहरू थकल्यानंतर भारतीय प्रजासत्ताकाला गोवर्धन पर्वताची उपमा देत ठाकरे यांनी नेहरू फक्त करंगळीने या पर्वताला स्पर्श करत आहेत, मात्र त्यांचे इतर सहकारी आपापला आधार देऊन पर्वत उचलत आहेत, असं विलक्षण बोलकं चित्र काढलं. थकलेल्या नेहरूंच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे आहेत. त्याचबरोबर सत्ता संपादनाची घाई झालेले मोरारजी देसाई ठाकरे यांनी मजेदारपणे रेखाटलेले आहेत.

अर्कचित्र रेखाटण्यात तर ते वाकबगारच होते. त्यातून ते इतरही अनेक गोष्टी निर्भीडपणे दाखवायचे. उदाहरणार्थ, बाबासाहेब भोसले हे अचानक मुख्यमंत्री झाले आणि केवळ केंद्राच्या कृपेने या पदावर बसले. त्यामुळे ‘भोसले’ हे आडनाव असणारा महाराष्ट्राच्या सत्तापदी बसला हे ठाकरे यांनी वेगळ्या पद्धतीने दाखवलं. ऐतिहासिक नाटकातील संवाद घेऊन नाव दिलं ‘नवा भोसला’. या चित्रातील आणखी एक गंमत म्हणजे, जिथे स्वसंरक्षणासाठी कट्यार किंवा खंजीर असतो तिथे बाबासाहेबांच्या कमरेला काटे आणि चमचे अडकवले आहेत. चमच्यांच्या माध्यमातून हितशत्रूंचा काटा काढणे हा त्याचा अर्थ असावा. अर्थात कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ठाकरे यांनी निर्भीडपणे इतकी वर्षं व्यंगचित्रं काढली. हे काम सोपे नव्हे.

एकूणच ठाकरे हे समर्थ व्यंगचित्रकार आणि त्यातून त्यापेक्षाही समर्थ राजकारणी. त्यामुळे त्यांच्यावरच व्यंगचित्रं काढली तर काय होईल असं अनेकांना वाटत असे. लक्ष्मण यांनी तर या आपल्या मित्राच्या राजकारणावर अनेक चित्रं काढली आणि मुख्य म्हणजे दोघांनीही ती एन्जॉय केली.

या बहुतेक साऱ्या व्यंगचित्रकारांनी व्यंगरेषेचं तत्त्व आणि सत्त्व जपलं होतं. आणीबाणीमध्ये जेव्हा यावर टाच येऊ लागली तेव्हा अबू अब्राहम यांनी चित्रं काढली, पण ती छापली न गेल्यानं आणीबाणीनंतर त्याचा संग्रह काढला. लक्ष्मण यांनी काही काळ चित्रं काढणं बंद केलं. ठाकरे यांच्यावर नोकरीत असताना संपादकांचा हस्तक्षेप वाढल्यावर त्यांनी थेट स्वाभिमानाने राजीनामा देऊन सत्त्व जपलं.

प्रस्तुत लेखकाच्या बाबतीतला एक किस्सा सांगणं अप्रस्तुत ठरणार नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना म्हणजे थोडक्यात ठाकरेंचं राज्य असताना ‘रमेश किणी’ प्रकरण घडलं. त्यावर मी एक व्यंगचित्र काढलं. त्या वेळी शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण! आणि रमेश किणी यांचा संशयास्पद मृत्यू पुण्यात जिथे झाला त्या अलका थिएटरमध्ये जो चित्रपट सुरू होता तो ‘ब्रोकन एरो’ या नावाचा होता. त्यावर मी काढलेलं व्यंगचित्र. पुढे योगायोगाने चार-पाच दिवसांनीच बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याचा योग आला त्या वेळी त्यांनी आवर्जून या चित्राचं खुल्या मनानं कौतुक केलं. निर्भयपणे व्यंगचित्रं काढत राहा असं त्यांना सुचवायचं होतं.

एखाद्या सरकारमध्ये स्वत:वरचे विनोद, व्यंगचित्र किंवा विडंबनगीत सहन करण्याची ताकद नसेल तर त्यांनी ते उघडपणे सांगून स्वत:चं आणखीन हसं करून घेऊ नये.

जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच वर्षात व्यंगचित्रकला आणि व्यंगचित्रकार याबद्दल काय म्हटलंय आपण समजून घेतलं पाहिजे. ते म्हणतात, ‘‘खऱ्या व्यंगचित्रकाराला एखाद्या घटनेतलं नेमकं मर्म दिसतं आणि हे मर्म तो काही मास्टरस्ट्रोक्स रेखाटून वाचकाला दाखवत असतो. ही अतिशय दुर्मीळ कला आहे- विशेषत: आपल्या देशात. विशेष म्हणजे द्वेषाचा लवलेशही न दाखवता कलावंताच्या कौशल्याने सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या स्वभावातील वैगुण्य ते दाखवून देतात. खरं तर त्यांच्या या सेवेबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आपण सर्व नेतेमंडळी हे अहंकारी, उद्धट आणि स्वकेंद्रित होण्याची प्रचंड शक्यता असते आणि हा अहंकाराचा, उद्धटपणाचा बुरखा फाटणं फार बरं असतं. त्यामुळे मी आशा करतो की व्यंगचित्रकार आम्हाला व्यंगचित्राद्वारे बौद्धिक आनंद देतील आणि आम्हा राजकारणी लोकांची नेमकी जागाही दाखवतील.’’

असो, शेवटी जाता जाता एका परकी व्यंगचित्राचा उल्लेख करणं फार महत्त्वाचं ठरेल. एका विदूषकाला अनेक महिने तुरुंगात डांबून ठेवलेलं असतं. अचानक दरवाजा उघडतो आणि पहारेकरी सांगतो, ‘तुझी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. राजाला तुझा जोक समजलाय!’